Halloween Costume ideas 2015

तुम्ही काळजी घ्या आम्ही जबाबदारी घेतो’

Uddhav Thakare
कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. आजपर्यंत जगभरात 20 लाख 57 हजार जण कोरोनाने बाधित झाले आहेत. तर 1 लाख 33 हजार 264 जणांचा मृत्यू झाला. जवळपास 5 लाख 08 हजार 390 लोक बरे झाले आहेत. आपल्या देशात 12 हजार 370 रूग्ण बाधित असून, 422 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 हजार 508 लोक बरे झाले आहेत. महाराष्ट्रात 2 हजार 940 रूग्ण आढळले असून, 203 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर देशभरात लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याची परिस्थिती योग्यरितीने हाताळत असून, त्यांच्या संबोधनाने लोकांना धीर आणि परिस्थितीविरूद्ध लढण्यासाठी बळ मिळत आहे. नुकताच त्यांनी जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले, तुम्ही काळजी घ्या आम्ही जबाबदारी घेतो. त्यांच्या या शब्दाने महाराष्ट्रजणांना फार मोठा आधार मिळाला. प्रशासनालाही नागरिक मोठ्या संख्येने प्रतिसाद देत आहेत. डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कर्मचारी, पोलीस अहोरात्र परिश्रम घेत आहेत.
    14 एप्रिलच्या संबोधनात ते म्हणाले, पोटापाण्यासाठी महाराष्ट्रात आलेल्या तब्बल सहा लाख मजुरांची राज्य सरकार ’लॉक डाऊन’मध्ये काळजी घेत आहे मात्र आज कुणी तरी पिल्लू सोडले. मग वांद्रे स्थानक परिसरात या मजुरांची प्रचंड गर्दी उसळली. पण लॉकडाउन म्हणजे लॉकअप नाही, असा विश्‍वास या मजुरांना देतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मजुरांच्या भावना भडकवणार्‍यांना सज्जड इशाराच दिला. गोरगरीबांच्या भावनांशी खेळू नका. त्यांच्या भावना भडकवाल तर खबरदार. तो कोणीही असला तरी महाराष्ट्र सरकारच्या कायद्यातून सुटणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी बजावले.
    लॉक डाउनचा कालावधी वाढल्यामुळे वांद्रे रेल्वे स्थानक परिसरात परराज्यातील मजुरांनी गावी जाण्यासाठी संध्याकाळी गर्दी केली होती. त्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, परराज्यातील सहा लाख मजुरांना आम्ही सकाळची न्याहारी आणि जेवण देत आहोत. त्यांच्यासाठी वैद्यकीय सेवाही दिल्या. तुम्हाला येथे थांबविण्यात आम्हाला आनंद नाही. आपण सर्वजण मिळून कोरोनाच्या संकटाचा सामना करूया. तुम्ही आमच्या राज्यात महाराष्ट्रात आहात. सुरक्षित आहात. ज्यावेळी लॉकडाऊन उघडेल तेव्हा मीच काय केंद्र सरकारही तुमची व्यवस्था करील. आता वेळ आहे ती आवाहनाचा मुकाबला करण्याची, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
    आग भडकू देणार नाही
    ट्रेन सुरू होणार अशी आवई उठविणार्‍यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगलाच दम भरला. ते म्हणाले, कोणी राजकारण करू नका. गोरगरीब लोकांच्या भावनांशी खेळू नका. यांच्या भावनांशी खेळून कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला तर तो कोणीही असला तरी महाराष्ट्र सरकारच्या कायद्यातून सुटणार नाही. आग भडकवण्याचं काम करू नका. आग विझविण्याचे बंब आपल्याकडे खूप आहेत, ती भडकू देणार नाही.
    उत्सव सण घरच्या घरी साजरे होत आहेत. भीमसैनिकांना धन्यवाद. दरवर्षी 6 डिसेंबर आणि 14 एप्रिल रोजी भीमसागर उसळतो अनेक गावांतून गोरगरीब बाबासाहेबांचे भीमसैनिक महापुरूषाला अभिवादन करतात. मात्र आज त्यांनीसुद्धा अत्यंत शिस्तीत घरातूनच या महापुरूषाला मानवंदना दिली. त्यांना सर्वांना धन्यवाद देतो.
    महाराष्ट्र सरकार हे खंबीर आहे, धैर्याने संकटाचा मुकाबला करत आहे, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोनाची लागण झाली म्हणजे सगळे काही संपले असे नाही. 6 महिन्यांच्या तनिष्क मोरे या बाळाने कोरोनाला हरवले आहे. त्या बाळाच्या आईशी मी बोललो आहे. त्यानंतर 83 वर्षांच्या आजींशीही फोनवरून बोललो. 6 महिने ते 83 वर्ष कोरोनावर मात करता येते हे त्यांनी दाखवून दिलं, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ही लढाई आणखी प्रखरपणे लढण्यासाठी डॉक्टरांचा एक टास्क फोर्स तयार केला आहे. डॉक्टर व्यवसायातले विविध क्षेत्रातले तज्ज्ञ लोकांची टीम डॉ. संजय ओक यांच्या मार्गदर्शनाखाली दिली आहे. हा टास्क फोर्स काय करणार तर ट्रिटमेंटची गाईडलाइन ठरवणार आहे. काही खासगी क्षेत्रातील, महापालिकेतील डॉक्टर, सरकारी डॉक्टर जे तज्ज्ञ आहेत त्यांना या फोर्समध्ये घेतले आहे. एक सुंदर काम सुरू केलं आहे. कोव्हीड आणि नॉन कोव्हिड अशी रूग्णांची विभागणी करीत आहेत. कोव्हिड हॉस्पिटलमध्ये सर्व तज्ज्ञ उपचार करण्यासाठी सिद्ध असतील असे मुख्यमंत्री म्हणाले.
    कोव्हिडचं संकट गेल्यानंतर बरोबरीचं संकट आर्थिक संकट त्यासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिगट तयार केला आहे. त्यांचंही काम सुरू केलं आहे. नेमकं आर्थिक धोरण काय असायला हवं याचा संपूर्ण अभ्यास मंत्र्यांची टीम करीत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांना एकत्र केलंय त्याचप्रमाणे डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यासह सर्वांची एक टीम तयार केली आहे. तंत्रज्ञानात विजय केळकर, दीपक पारीख, अजित रानडे या अर्थतज्ज्ञांची टीम तयार केली असून, संकटकाळात कसं वाचायला हवं? अर्थव्यवस्थेच्या दुष्परिणाम कसा टाळायचा, पुन्हा झेप घेण्यासाठी काय करायचं हे सर्व ते तयारी करीत आहेत, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
    20 तारखेपर्यंतचा आपण अंदाज घेतोय, कोणते उद्योग सुरू करता येतील. याचा अंदाज माझे सहकारी मंत्री घेताहेत. त्यानंतर निर्णय घेऊच परंतु तोपर्यंत घाबरण्याचं कारण नाही. जिद्दीने आपण या विषाणूला थोपवलं आहे. 10 जिल्ह्यांत विषाणूला थोपवलंय. संपूर्ण महाराष्ट्रातून त्याला हद्दपार करायचं आहे असा निर्धारच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
    मुंबई आणि पुणे शहरांत अधिक खबरदारी घेत आहोत. चाचणी केंद्र आणि चाचण्यांची संख्या वाढवतोय. कंटेन्मेंट झोनमध्ये लागण झालेली व्यक्ती सापडली की त्यांच्या घरातल्यांना क्वारंटाईन करीत आहेत. त्यांच्यापासून अधिक संसर्ग होणार नाही याची काजी घेत आहेत. कंटेन्मेंट झोनमध्ये एखाद दिवस गैरसोय होते. पण ती गैरसोय दूर करून तिथे अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आपण सुरू केला आहे.
    पावसाळ्यातील कामांकडेही लक्ष
    अर्धा एप्रिल संपलाय. दीड महिन्यानंतर पावसाळा सुरू होईल. आदिवासी आणि दुर्गम भागात पावसाळ्यात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा लागतो. कोरोनाच्या परिस्थितील या दुर्गम भागाकडे दुर्लक्ष न करता तेथे सोयीसुविधा तसेच अन्नधान्य पुरवठा करण्याची तयारी आजपासून सुरू करा, असे निर्देश दिले आहेत असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
बळीराजाला कोणीही अडवणार नाही
    जगभरात सगळ्या वस्तूंचा तुटवडा असला तरी बळीराजा हा देशाचा आत्मा आहे. संपूर्ण जगरहाटी दोन घासासाठी चालते. बळीराजाला कोणी अडवू शकणार नाही, अशा सूचना दिल्या आहेत. शेतीविषयक कामं, शेतीचा माल, बियाणे, खते, अवजारे यांची दुकाने आणि ये-जा थांबविली जाणार नाही. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तसाच चालू राहणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
    कोव्हिड योद्धासाठी 21 हजार अर्ज
    वैद्यकीय क्षेत्रातील निवृत्त डॉक्टर, जवान, परिचारिका, वॉर्ड बॉय, वैद्यकीय शिक्षणाचा कोर्स पूर्ण करणार्‍यांना आवाहन केलं होतं. त्यासाठी ई-मेल आयडी देण्यात आला होता. कोव्हिड योद्धा ही साइड दिली होती. आज सकाळपर्यंत 21 हजार जणांनी आपली तयारी त्यासाठी दर्शविली आहे. आता त्यांची छानणी सुरू आहे. एकजुटीने लढण्याची भावना आपल्यात आली आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्र जगाला दिशा दाखवेल
    आपल्या महाराष्ट्रात नवीन प्लाझ्मा ट्रिटमेंट आणि बीसीजी व्हॅक्सीनचे प्रयोग करण्याची केंद्राकडे मागणी केली आहे. लस तयार होते का, औषध तयार होतं का, याची तयारी सुरू केली आहे. परवानगी मिळाली की ते सुरू होईल. प्रत्येक वेळी संकटात महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतो म्हणतात त्याप्रमाणे तो जगाला दिशा दाखवेल. परवानगी मिळाल्यानंतर प्रयोगाला सुरूवात होईल. मनातून वाटतंय की नक्की आपण यात यशस्वी होऊ, कुठेही आपण उणीव ठेवत नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले.
केंद्र आणि राज्य हातात हांत धरून चाललंय
    अन्न धान्याचा पुरवठा सगळीकडे करीत आहोत. रेशनवरील धान्य सव्वा कोटी कुटुंबियांनी नेलं आहे. केंद्राकडून पुरवठा करण्यात आलेल्या अन्न सुरक्षा योजनेतील तांदूळ वाटप सुरू झालेलं आहे. डाळीची मागणीही मान्य होउन डाळ द्यायला सुरूवात होईल. केंद्र आणि राज्य हातात हात धरून चाललं आहे. शिवभोजनाची व्याप्ती 80 हजार ताटांपर्यंत नेली आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
    महाराष्ट्रात अडकलेल्या परराज्यातील मजुरांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी हिंदीतून संवाद साधला आणि या संकटाचा आपण सर्वांनी मिळून सामना करूया असे आवाहन त्यांनी केले. घरी जाण्याची घाई करू नका. लॉकडाउन संपला की राज्य आणि केंद्र सरकार तुमची तशी सर्व काळजी घेईल, असेही ते म्हणाले. सर्व पक्षांचे वरिष्ठ नेते, राजकीय लेबल बाजूला ठेवून हातात हात घालून लढत आहेत. सर्व पक्ष आणि सर्व नेते सोबत आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, गृहमंत्री अमित शहा यांचा आवर्जुन उल्लेख केला आणि त्यांनी राज्यातील मुल्ला मौलवींनाही हिंदीतून आवाहन केले. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, मुल्ला मौलवींनी गैरसमजाचा शिकार बनू नये. जे काही करतो ते राज्याच्या हितासाठी करतोय. कृपा करून सहकार्य करा. विषाणू जात, पात, धर्म, बघत नाही. एकंदर मुख्यमंत्री ज्या पद्धतीने सध्या परिस्थिती हताळत आहेत, त्यावरून सर्वांनीच त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देणे अनिवार्य आहे.

- बशीर शेख 

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget