Halloween Costume ideas 2015

जगाला आरोग्यसेवा देणारा इवलासा समाजवादी 'क्युबा'

कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग २१० देशांमध्ये पसरला आहे. संक्रमित रुग्णांची संख्या जवळपास २.६ दशलक्षपर्यंत पोहोचली आहे. आर्थिक आणि वैद्यकीय संसाधनांनी संपन्न अनेक विकसित आणि मोठे देश या संकटाला बळी पडले आहेत. विकसनशील आणि अविकसित देशांमध्ये संक्रमण पसरण्याची शक्यता असल्याने परिस्थिती भयानक होण्याची स्थिती आहे. दिवसेंदिवस वाढत जाण्याचे एक कारण म्हणजे निश्चित उपचारांचा अभाव आणि संसर्गाचा जागतिक प्रसार. गेल्या चार दशकांच्या जागतिक उदारीकरणाच्या धोरणांमुळे, विकसनशील देशांकडून गरीब देशांपर्यंत आरोग्य आणि इतर सामाजिक सेवांच्या वाढत्या खाजगीकरणामुळे अनिश्चिततेची परिस्थिती वाढत चालली आहे.
अशा वेळी लॅटिन अमेरिकेतील लहान बेट असलेले क्युबा या अंधारात आशेचा दीप प्रज्वलित करीत आहे. जगातील देशांमध्ये क्युबाचे डॉक्टर कोरोना विषाणूंमुळे पीडित व्यक्तींवर उपचार करीत आहेत. क्युबा सध्या ५९ देशांना वैद्यकीय मदत पाठवित आहे. बऱ्याच जणांना कदाचित हे माहीतही नसेल. क्युबा सध्या जगातील एकमेव नियोजित अर्थव्यवस्था असून पर्यटन उद्योग आणि कुशल कामगार, साखर, तंबाखू आणि कॉफीच्या निर्यातीत या अर्थव्यवस्थेचे वर्चस्व आहे. मानव विकास निर्देशांकानुसार क्युबाचा मानवी विकास उच्च स्थानावर आहे. उत्तर अमेरिकेत आठव्या क्रमांकवर असून २०१४ मध्ये जगात ६७ व्या क्रमांकावर आहे. क्युबा आरोग्य सेवा, शिक्षणासह राष्ट्रीय कामगिरीच्या काही मेट्रिक्समध्ये देखील उच्च स्थानावर आहे. डब्ल्यूडब्ल्यूएफने दिलेल्या टिकाऊ विकासाच्या अटींची पूर्तता करणारा क्युबा जगातील एकमेव देश आहे.
क्युबन सरकार एक राष्ट्रीय आरोग्य यंत्रणा चालविते आणि आपल्या सर्व नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वित्तीय आणि प्रशासकीय जबाबदारी स्वीकारते. क्युबामध्ये कोणतीही खासगी रुग्णालये किंवा दवाखाने नाहीत. कारण सर्व आरोग्य सेवा शासकीय संचालित आहेत. सध्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री रॉबर्टो मोरालेस ओजेदा आहेत. चीनच्या वुहानमध्ये रूग्णांच्या मदतीसाठी प्रथम आलेल्या परदेशी लोकांपैकी क्युबाचे डॉक्टरदेखील होते. इतकेच नव्हे तर क्युबाच्या कम्युनिस्ट पक्षाच्या ‘ग्रॅन्मा' या वृत्तपत्रानुसार सध्या जगातील ६१ देशांमध्ये क्युबाच्या आंतरराष्ट्रीय वैद्यकीय ब्रिगेडचे २८,२६८ सदस्य आहेत.
चीनने कोरोना विषाणूवर उपचार करण्यासाठी निवडलेल्या औषधांपैकी क्युबाचे अँटीवायरल रिकॉम्बीनंट इंटरफेरॉन अल्फा २ बी (घ्इNrाम्) हे आहे. हे औषध आज जगभरात प्रसिद्ध झाले. हे साडेतीन दशकांपूर्वी क्युबामध्ये विकसित झाले होते. याचा एक प्रकार १९८६ मध्ये तयार झाला होता, ज्याने कोट्यवधी क्युबा लोकांना डेंग्यूपासून वाचवले. सप्टेंबर २०१४ मध्ये युनायटेड नेशन्स (यूएन) आणि जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) पश्चिम आफ्रिकेत इबोला विषाणूच्या साथीच्या आजारामुळे होणाऱ्या वैद्यकीय संकट आणि सामाजिक आपत्तीला रोखण्यासाठी वैद्यकीय सहकार्याचे आवाहन केले. ऑक्टोबर २०१४ ते एप्रिल २०१५ पर्यंत सिएरा लिओनी, लाइबेरिया आणि इक्वेटोरियल गिनी येथे इबोला साथीच्या वेळी क्युबाच्या २५६ डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या गटाने थेट सेवा दिली.
पश्चिम आफ्रिकेतील इबोला साथीच्या रोगास क्युबाच्या वैद्यकीय पथकांचा प्रतिसाद म्हणजे जगभरातील आरोग्याच्या गरजा भागविण्यासाठी आरोग्य सेवेची तरतूद अधिक मजबूत करण्यासाठी क्युबा एक आदर्श उदाहरण आहे.
आफ्रिकेतील इबोलाविरूद्ध लढाईचा अनुभव घेऊन कोविड -१९ सोबत लढण्यासाठी, मदतीसाठी क्युबाचे ५२ जणांचे वैद्यकीय चमू इटली येथे दाखल झाले आहेत. सर्वाधिक प्रादुर्भाव झालेले लोम्बार्डी शहर येथे हा चमू मदत करत आहे.
क्युबाच्या इंटेन्सिव्ह केअरचे विशेषज्ञ लिओनार्डो फर्नांडिस म्हणतात, ‘आम्हाला सुद्धा कोरोनाची भीती आहे, मात्र आता या संकटसमयी भीती बाजूला सारून कर्तव्य पूर्ण करायला पुढे यावं लागेल.' इटलीत सेवा देणाऱ्या परिचारिका कार्लोस आर्मान्डो गार्सिया हर्नांडेझ यांनी सांगितले, ‘मंजुरीची पर्वा न करता, वैद्यकीय कर्मचारी जगभरातील आजाराशी लढत राहतील', ‘ही जागतिक लढाई आहे आणि आम्हाला ती एकत्र लढण्याची गरज आहे.’
जग अनिश्चित भविष्याचा सामना करत असून क्युबाने गेल्या आठवड्यात निकाराग्वा, व्हेनेझुएला, सूरीनाम आणि जमैका येथे वैद्यकीय कर्मचारी पाठविले आहेत. परंतु कमी उत्साहाने किंग्स्टन आंतरराष्ट्रीय विमानतळावर १४० क्युबा कर्मचाऱ्यांना अभिवादन केल्यानंतर जमैकाचे आरोग्यमंत्री खिस्तोफर तुफ्टन यांनी त्यांच्या उदारपणाचे कौतुक केले; ते म्हणाले, ‘संकटाच्या काळात क्युबाचे सरकार, क्युबाचे लोक, प्रसंगी उठले; त्यांनी आमचे अपील ऐकले आणि त्यांनी प्रतिसाद दिला’. पंतप्रधान अँड्र्यू होलिने देखील तितकेच आभार मानले, ‘आम्ही कोविड -१९ या साथीच्या रोगाविरुद्ध लढत असून क्युबाच्या सहकार्याबद्दल जमैका कृतज्ञ आहे,’
एक ब्रिटीश जहाज कॅरिबियन समुद्रात भटकत होते. त्यात स्वार झालेल्या काही लोकांना कोरोनाचा संसर्ग होता. अनेक देशांत त्यांचा प्रवेश नाकारला गेला होता. क्युबाने ते जहाज आपल्या किनाऱ्यावर उभे केले. पोलिसांच्या सुरक्षेसह सर्व प्रवाशांना नीट उतरवून घेऊन विमानतळावरुन त्यांना मायदेशी जाण्याची सोय उपलब्ध करून दिली. ब्रिटिश क्रूझ लाइनर एम.एस.च्या स्वागतासाठी युनायटेड किंगडमनेही कॅरिबियन बेटाचे आभार मानले.
क्युबाच्या वैद्यकीय संघांनी आंतरराष्ट्रीय आरोग्य संकटाला प्रतिसाद देण्याची ही पहिलीच वेळ नाही. डब्ल्यूएचओचे संचालक डॉ. मार्गारेट चॅन इबोला साथीच्या वेळी म्हटले होते, ‘जर आपण इबोलाबरोबर युद्धाला जात आहोत तर आपल्याला लढायला संसाधनांची गरज आहे. क्युबाच्या सरकारच्या उदारपणाबद्दल आणि आरोग्य व्यावसायिकांनी आम्हाला सर्वात वाईट इबोलाचा उद्रेक होऊ नये म्हणून मदत केली. त्यासाठी त्यांचे आभारी आहोत.'
क्युबाच्या सर्वांत व्यापक प्रयत्नांपैकी एक म्हणजे व्हेनेझुएला येथे नेत्र शस्त्रक्रिया कार्यक्रम आहे. जिथे हजारोंंचे मोतीबिंदूचे ऑपरेशन केले गेले आहे.
२०१० मध्ये हैती येथे झालेल्या भूकंपात क्युबाच्या शेकडो वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मदत केली. क्युबन वैद्यकीय संघांनी दक्षिण आशियाई त्सुनामी आणि २००५ मधील काश्मीर भूकंपसारख्या संकटात काम केले. सध्या दक्षिण आफ्रिका, गॅम्बिया, गिनी बिसाऊ आणि माली या देशांमध्ये आफ्रिकेत सुमारे २००० क्युबाचे डॉक्टर कार्यरत आहेत.
क्युबामध्ये कम्युनिस्ट क्रांती झाली. अमेरिका धार्जिण बतिस्ताची हुकूमशाही सत्ता उलथवून लावण्यात आली आणि युनायटेड स्टेट्सने क्युबाविरूद्ध केलेल्या प्रतिबंधानंतर १९६० मध्ये रोग आणि बालमृत्यूची संख्या वाढत गेली. फिडेल कॅस्ट्रो आणि चे गव्हेरा या क्रांतिकारकांनी क्युबामध्ये आमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले. १९६० मध्ये क्रांतिकारक आणि चिकित्सक चे गव्हेरा यांनी क्रांतिकारक औषधी या निबंधात क्युबाच्या आरोग्य सेवेच्या भविष्यासाठी आपले ध्येय मांडले ‘आज आरोग्य मंत्रालय आणि तत्सम संस्था यांच्याकडे जे काम सोपविण्यात आले आहे, ते महान सेवा देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य सेवा पुरविणे आहे. संभाव्य व्यक्ती, प्रतिबंधात्मक औषधाचा एक कार्यक्रम स्थापित करा आणि आरोग्यविषयक पद्धतींच्या कामगिरीकडे जनतेला अभिमुख करा.' कम्युनिस्ट क्युबा सरकारने असे ठासून सांगितले की सार्वत्रिक आरोग्य सेवा ही राज्य नियोजनाची प्राथमिकता बनली पाहिजे. त्या दुष्टीने क्युबाने वाटचाल केली. १९६० पासून सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाने वैद्यकीय सेवांचे राष्ट्रीयकरण आणि प्रादेशिकरण करण्याचा कार्यक्रम सुरू केला गेला.
क्युबाची राष्ट्रीय आरोग्य प्रणाली अनेक स्तरांवर बनलेली आहे, १) व्यक्ती आणि कुटुंब असलेले समुदाय, २) कौटुंबिक डॉक्टर-परिचारिका संघ, ३)  मूलभूत कार्य संघ, ४) समुदाय पॉलीक्लिनिक, ५) रुग्णालये आणि ६) वैद्यकीय संस्था. क्युबाचा फॅमिली फिजीशियन आणि नर्स प्रोग्राम हा डॉक्टर आणि नर्स टीमचा बनलेला आहे. जो व्यक्ती, कुटुंब आणि त्यांच्या समुदायांना सेवा देतो. ते त्यांच्या शासकीय-निर्मित कौटुंबिक औषध कार्यालयावर जगतात. थेट त्यांच्या समाजात राहातात आणि २४ तास उपलब्ध असतात. क्युबामध्ये शारीरिक, मानसिक, सामाजिक या सर्व स्तरांवर तिहेरी निदान करण्यासाठी प्रतिबद्धता आहे. सर्व स्तरांवर निर्णय घेताना 'रुग्ण' आणि लोकांचा व्यापक सहभाग असतो. पॉलीक्लिनिकद्वारे रुग्णालय, समुदाय, प्राथमिक काळजी यांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. १९७६ मध्ये क्युबाचा आरोग्य सेवा कार्यक्रम सुधारित क्यूबन राज्यघटनेच्या कलम ५० मध्ये समाविष्ट करण्यात आला. ज्यामध्ये असे म्हटले आहे की ‘प्रत्येकास आरोग्य संरक्षण आणि काळजी घेण्याचा अधिकार आहे. राज्य या हक्काची हमी देतो.’
१९६३ पासून क्युबा पोलिओपासून मुक्त आहे, परंतु मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिमेद्वारे सुरू असते. प्राथमिक काळजी सुविधांमध्ये, नीतिशास्त्र, मूल्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानासह क्युबाच्या आरोग्य व्यवस्थाचा एक मोठा भाग म्हणून शिकविले जाते. लॅटिन अमेरिकन स्कूल ऑफ मेडिसिन हे जगातील सर्वांत मोठे वैद्यकीय विद्यापीठ क्युबामध्ये आहे. आतापर्यंतचा सर्वांत मोठा फरक म्हणजे प्रति व्यक्ती डॉक्टरांचे गुणोत्तर क्युबामध्ये प्रति १७५ लोकांपैकी एक डॉक्टर आहे, यूकेमध्ये हे प्रमाण ६०० लोकांपैकी एक डॉक्टर आहे आणि भारतात १८०० लोकांपैकी एक डॉक्टर आहे. (ैैै.र्rोीrम्प्ुaूा.हाू) १९८० च्या दशकात क्युबाच्या शास्त्रज्ञांनी बॅक्टेरियाच्या मेंदूच्या बुबुळाच्या रोगास प्रतिबंधक लस तयार केली, जो त्या बेटावर एक गंभीर आजार होता. क्युबानची ही लस संपूर्ण लॅटिन अमेरिकेत वापरली जाते.
२०१२ पर्यंत युनायटेड स्टेट्समध्ये बालमृत्यू दर १,००० जन्मामागे ६.० होता, तो क्युबामध्ये ४.८ आहे. २००० मध्ये, युनायटेड नेशन्सचे सरचिटणीस कोफी अन्नान म्हणाले की, ‘क्युबाने इतर अनेक देशांचा हेवा केला पाहिजे' आणि असे म्हटले आहे की, दरडोई सकल देशांतर्गत उत्पादनाच्या आकारामुळे सामाजिक विकासातील कामगिरी प्रभावी आहेत. ‘आरोग्य, शिक्षण आणि साक्षरता यावर योग्य प्राधान्य दिल्यास राष्ट्रांनी आपल्याकडे असलेल्या स्रोतांद्वारे किती कार्य करणे शक्य आहे हे दर्शविले आहे.'
२००७ मध्ये क्युबाने जाहीर केले की त्याने रक्तपेढी, नेफ्रोलॉजी आणि वैद्यकीय प्रतिमांमध्ये संगणकीकरण आणि राष्ट्रीय नेटवर्क तयार केले आहे. अशा उत्पादनात फ्रान्स नंतर क्युबा जगातील दुसरा देश आहे. क्युबा एक संगणकीकृत आरोग्य नोंदणी, रुग्णालय व्यवस्थापन प्रणाली, प्राथमिक आरोग्य सेवा, शैक्षणिक कार्ये, वैद्यकीय अनुवांशिक प्रकल्प, न्यूरोसायन्स आणि शैक्षणिक सॉफ्टवेअर तयार करीत आहे. क्युबातील लोकांसाठी दर्जेदार आरोग्य सेवा मोफत राखणे, तज्ज्ञांमध्ये देवाणघेवाण वाढविणे आणि संशोधन-विकास प्रकल्पांना चालना देणे हे यामागील उद्दिष्ट आहे. वायरिंग प्रक्रियेचा एक महत्त्वाचा दुवा म्हणजे राष्ट्रीय आरोग्य प्रणालीतील सर्व घटक आणि कामगारांना क्युबाच्या डेटा ट्रांसमिशन नेटवर्क आणि आरोग्य वेबसाइट (घ्Nइध्श्ED) मध्ये प्रवेश मिळण्याची हमी देणे होय.
दोन दशकांपूर्वी दिल्लीतील एका कार्यक्रमात क्युबा क्रांतीवीर नायक ‘चे गव्हेरा’ यांची मुलगी एलिडा गव्हेरा यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, 'क्युबाला हजारो वकील, लेखापाल, दलाल नसून हजारो डॉक्टर, शिक्षक आणि तज्ज्ञांची आवश्यकता आहे. तिच्या वडिलांप्रमाणेच एलिडा स्वत: डॉक्टर आहे. क्युबाच्या समाजवादी राजकारणाचे सर्वांत मोठे समीक्षक आणि फिदेल कॅस्ट्रो यांच्यासह त्याचे नेतेही असा विश्वास ठेवतात की, ‘शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामगिरी विलक्षण आहे.' सध्याचे राष्ट्रपती राउल कॅस्ट्रो दैदिप्यमान कामगिरी करत आहेत.
क्युबाच्या डॉक्टरांनी नैसर्गिक आपत्तीनंतर आंतरराष्ट्रीय समुदायाला (विशेषत: तिसऱ्या जगातील देशांना) मोफत वैद्यकीय मदत व सेवा पुरविण्याचे काम केले आहे. आता संकट काळातही क्युबा धैर्याने लढत आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून हे क्युबन कोरोना विषाणूशी लढण्यासाठी गेले आहेत.
आज जेव्हा क्युबा कोरोना विषाणूविरूद्ध लढ्यात अग्रणी आहे. तेव्हा फिदेल कॅस्ट्रोचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये ते म्हणतात, ‘आपला देश इतर लोकांवर बॉम्ब टाकत नाही. आपल्याकडे जैविक किंवा आण्विक शस्त्रे नाहीत. आम्ही इतर देशांना मदत करण्यासाठी डॉक्टर तयार करतो.' क्युबाची आरोग्यदायी कामगिरी लक्षात घेता निश्चितपणे जगातील सर्वच देशांनी आपले प्राधान्यक्रम लक्षात घेतले पाहिजेत. तुम्ही तुमच्या देशाची संपत्ती जर पैशात मोजत असाल तर भविष्यात येणाऱ्या संकटांचाही तुम्ही सामना करू शकणार नाही. चांगले शिक्षण आणि उत्तम आरोग्य हेच तुमचे संरक्षण करणार आहे.
क्युबाने मानवतेबद्दल दाखवलेली जागतिक एकता, बांधिलकी, दृष्टिकोन जगाला दिशादर्शक आहेच. फक्त जगाने त्यातून धडा घेण्याची गरज आहे. फिदेल कॅस्ट्रो एकदा म्हणाले होते की, ‘उत्तर अमेरिकन लोकांना हे समजत नाही की क्युबाशिवाय आपल्याकडे देखील एक देश आहे, मानवता.' हे केवळ एका आश्चर्यकारक वत्तäयाचे विधान नाही. त्यांच्या आदर्श आणि तत्त्वांबद्दलच्या त्यांच्या दृढनिश्चयाची ती अभिव्यक्ती आहे. या प्रतिबद्धतेमुळेच अमेरिकेने कॅस्ट्रोला अनेक प्रकारे उलथून टाकण्याचे प्रयत्न केले. क्रांतीनंतर क्युबाने कम्युनिस्ट विचारांवर वाटचाल केली. शीतयुद्ध सुरू असेपर्यंत सोव्हिएट रशिया आणि इतर समाजवादी देशांकडून क्युबाला मदत होत होती. मात्र, सोव्हिएट कोसल्यानंतर क्युबासमोर अनेक आव्हाने उभी राहिली होती. अमेरिका आणि अमेरिकधार्जिण अनेक देशांनी त्यांच्यावर निर्बंध लादले. मात्र त्यावरही त्यांनी मात केली. परंतु जनतेच्या एकजुटीवर निधडाने सामना केला. ‘केवळ मानवताच संकटापासून मानवता वाचवू शकते.' हा आदर्श क्युबाने घालून दिला आहे.

- नवनाथ मोरे, 
कोल्हापूर, ९९२१९७६४६०
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget