माध्यमक्रांतीचे शतक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकविसाव्या शतकात यूट्यूब, सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, सिनेमा इत्यादींमध्ये मुस्लिमांनावर खोटे आरोप करण्यात येऊन त्यांची प्रतिमा खलनायकाची बनविण्यात आली आहे. केंद्रात सत्ताबदलानंतर तर या सर्व प्रकारांना चांगलाच जोर आल्याचे दिसून येते. काही दिवसांपूर्वी झी न्यूजचे तथाकथित अँकर सुधीर तिहारीने जिहादचे इतके प्रकार सांगितले होते की तेवढे इस्लामिक धर्मगुरूलादेखील माहीत नाहीत. तथाकथित बुद्धिवादी मुस्लिमांना वाटते की आपण अशा माध्यमांवर बहिष्कार टाकू. ती आपल्या समाजातील कुणीही पाहू किंवा बघू नयेत. त्यांनी निश्चिंत राहावे की तुम्ही अशी चॅनल न पाहिल्याने किंवा अशी वृत्तपत्रे न वाचल्याने मुस्लिमांविरूद्ध माहितीयुद्धात सहभागी असलेल्या मीडिया घराण्यांवर कसलाही फरक पडत नाही. या मीडिया घराण्यांद्वारे निर्माण करण्यात आलेले काल्पनिक कार्यक्रम मुस्लिमांना दाखविण्याकरिता नसतातच मुळी. ते फक्त त्याच वर्गासाठी असतात जो मुस्लिमांबाबत सॉफ्ट कॉर्नर बाळगतात. त्यामुळे त्यांचा ब्रेनवॉश माहितीयुद्धाद्वारे दुष्प्रचार पसरवून केला जात आहे. देशभर फिरून मुस्लिमांविरूद्ध दुष्प्रचार पसरविणे, इतिहासाचे विकृतीकरण करणारे व्याख्याने आयोजित करून इस्लामोफोबियाला चालना देणे जेणेकरून लोकांच्या मनात द्वेष निर्माण व्हावा, इत्यादी कार्यासाठी तथाकथित बुद्धिवाद्यांची जणू नियुक्तीच करण्यात आली आहे. याचे परिणाम काय होतात हे सांगण्याची गरज नाही. माहितीयुद्धातील शत्र बदलले आहे. आता लढाई वॅâमेरा, माइक, की-बोर्डाने लढली जात आहे. याद्वारे असे योद्धे तयार होतात जे शत्र हाती घेतात, दंगली घडवितात, लिंचिंग करतात आणि जेथे जेथे मुस्लिमांची दुर्बलता दिसून येते त्या ठिकाणी हिंस्र जनावरासारखे तुटून पडतात. सामान्य लोक बुद्धीचा वापर फारच कमी करतात. त्यामुळे ते बौद्धिक दहशतवाद्यांच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या वक्तव्यांना सत्य समजून त्यांची बौद्धिक दहशतवाद्यांना हवी असलेली धारणा बनते. या देशात जो वर्ग मुस्लिमांविषयी द्वेष बाळगतो त्याला इस्रायल अमेरिका प्रिय वाटू लागतात. कारण या दोन्ही देशांची नीतीधोरणे मुस्लिम व इस्लामविरूद्ध आहेत. नुकतेच हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या न्यूज चॅनलने पॅलेस्टाईन विरूद्धदेखील प्रोपगंडा सुरू केला होता. कारण त्यामुळे मुस्लिम समाज नाराज झाला तरी त्यांचा द्वेष करणारा वर्ग निश्चित खूश होईल. हा द्वेष फक्त काही दिवसांपूर्वी निर्माण झालेला नाही. याचा रिमोट इस्रायलकडे असण्याची दाट शक्यता असून तेथूनच हा दुष्प्रचार नियंत्रित होत असावा. इस्रायलबाबतचा भारताचा दृष्टिकोन लपून राहिलेला नाही. म. गांधीपासून ते इंदिरा गांधींपर्यंत आपल्या राष्ट्रीय नेत्यांनी इस्रायलला कधीही राष्ट्र म्हणून मान्यता दिलेली नव्हती. उलट पॅलेस्टाईनबरोबर उभे राहिले. त्यानंतरच्या काळात भारतात इस्रायलने पाय रोवले आणि त्याचबरोबर मुस्लिमांच्या विरोधात द्वेषातदेखील वाढ होत गेली. हे सर्व माहितीतंत्राद्वारे घडविले जात आहे. हेच माहितीयुद्ध या देशातील मुस्लिमांसाठी त्रासदायक ठरत आहे. याकडे मुस्लिम समाजाच्या राजकीय आणि सामाजिक नेतृत्वाला लक्ष द्यायला सवड नाही. ते फक्त उर्दू वृत्तपत्रांपर्यंतच वक्तव्ये छापून त्यांत आपला फोटो पाहून खूश होतात. माहितीयुद्धाचा सामना करण्यासाठी मुस्लिमांनी त्याच शस्त्रांचा वापर करायला हवा ज्यांद्वारे त्यांच्याविरूद्ध द्वेष पसविला जात आहे. अशा प्रकारच्या माध्यमक्रांतीमुळे संपूर्ण समाज प्रभावित आणि संकुचित बनत चालला आहे. त्यामुळे माध्यमे कुटुंबाची, समाजाची आणि पर्यायाने राष्ट्राची डोकेदुखी ठरत आहेत. माध्यमांची स्वैर हाताळणी आणि त्याचा विघातक, आत्मकेंद्री वापर जवळच्या काळात खूप मोठी जागतिक समस्या बनेल यात शंका नाही. माध्यमांच्या आहारी जाणारा समाज स्वकेंद्री बनत आहे. मुस्लिमांबाबत बातम्या देताना केला जाणारा पक्षपात त्यांच्या मनांत अन्यायाची भावना निर्माण करतो. त्यामुळे मुस्लिम समाजाची प्रतिमा डागाळण्यास प्रसारमाध्यमांचा बेजबाबदारपणा कारणीभूत आहे. असा आरोप प्रेस कौन्सिलचे माजी अध्यक्ष मरकडेय काटजू यांनी केला आहे. देशात जातीयवादाला खतपाणी घालण्यास प्रसारमाध्यमांची बेजबाबदार वृत्तीच कारणीभूत आहे, माध्यमांनी आपल्या जबाबदारीचे भान ठेवावे आणि नैतिकतेने वागावे आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर जातीयता पसरविण्यासाठी करू नका. राष्ट्रीय हितसंबंधांना बाधा येईल अशी वृत्तांकने करण्यापूर्वी हजारदा विचार करावा, असा सल्लाही काटजूंनी माध्यमांना दिला आहे. विशिष्ट समाजाबाबत द्वेष पसरविण्यासाठी डिजिटल यंत्रणा अर्थात इंटरनेटचा वापर होत आहे. धर्म, राजकारण, खोट्या बातम्या, धर्मद्वेषी व वर्णद्वेषी मजकूर, एखाद्या समाजाबद्दल गैरसमज तयार करुन सोशल मीडियातून पसरवला जात आहे. हे सर्व देशात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूमुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात तबलीग जमातच्या मुख्यालयात अडकून पडलेल्या मुस्लिम अनुयायांच्या अनुषंगाने मीडियारूपी सांप्रदायिक व्हायरसद्वारे सुरू असलेल्या माध्यमयुद्धाची प्रचिती येते. प्रसारमाध्यमांमध्ये मानवतावादाच्या नावाने जी बौद्धिक विकृती फैलावली आहे, तिची चिकित्सा करणे आवश्यक आहे. जर हे थांबले नाही तर आगामी काळात गृहयुद्धाशिवाय दुसरा उपाय राहणार नाही. जगातील अनेक देशांत अशी गृहयुद्धे झाली आहेत.
-शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४
-शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४
Post a Comment