Halloween Costume ideas 2015

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार

सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्रांतीचे मुलाधार आणि सद्यःस्थिती

जातिव्यवस्था ही भारतीय समाजव्यवस्थेला लागलेली कीड, जन्माने कोणी श्रेष्ठ तर कोणी हीन. समाजातील काही लोकांना आजन्म अन्यायाच्या, अंधाराच्या, अज्ञानाच्या खाईत लोटून देणे हा कुठला न्याय? ही विदारक विषमता समूळ नष्ट करण्यासाठी विसाव्या शतकातील बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतात अस्पृश्यतेविरूध्द बंड उभारले. शतकानुशतके गुलामगिरीत हीन अवस्थेत राहाणाऱ्या आपल्या दलित बांधवांची मुक्तता  केली. त्यांनी समाजात समानतेने जगण्याचा मार्ग दाखविला.
जोपर्यंत समाजातील तळागाळातील माणूस आत्मगौरवाने उभा राहत नाही. तोपर्यंत हा देश उभा राहणार नाही. केवळ या थोर पुरूषांमुळे देश  मोठा होत नसतो. देश मोठा होण्यासाठी सर्वसामान्य माणसाचा स्तर मोठा व्हावा लागतो. सर्वसामान्य माणसाच्या मनात आत्मविश्वास, आत्मगौरव असावा लागतो. आपल्या समाजाविषयी आणि राष्ट्राविषयी प्रत्येक व्यक्तीच्या मनात पराकोटीचे प्रेम असायला पाहिजे. राष्ट्र  उभारणीतील सर्वात मोठे काम कोणते असेल तर त्यांनी समाजातील सर्वात खालच्या श्रेणीत असलेल्या माणसाला जागे केले. हजारो वर्षे हिंदू  समाजातील अस्पृश्य जाती सामाजिक रचनेत अगदी तळाशी होत्या. त्यांना सामान्य नागरी अधिकार, सामाजिक अधिकार, राजकीय  अधिकारदेखील नव्हते. सामाजिक गुलामीत ते पिचत पडलेले होते. बाबासाहेबांच्या जन्मापूर्वी अस्पृश्यांनादेखील अस्पृश्यता हे सामाजिक पाप आहे  याची जाणीव नव्हती. त्याचप्रमाणे सवर्णानाही त्याबद्दल काही वाटत नव्हते. रूढींचे पालन करणे हाच सनातन धर्म आहे. अशी सर्व समाजाची  भावना झाली होती. सामाजिक गुलामीत जगणाऱ्या माणसाला शेकडो वर्षाच्या सामाजिक गुलामीच्या बेड्या तोडण्यासाठी प्रवृत्त करणे. त्याला  लढण्यास उभा करणे ही सामान्य गोष्ट नाही. या राष्ट्राचा फार गंभीरपणे आणि अत्यंत सखोलपणे बाबासाहेबांनी विचार केल्याचे लक्षात येते.  बाबासाहेबांचे भारतीय राष्ट्रवादाच्या संदर्भातील सर्वात मोठे योगदान कोणते असेल तर त्यांनी राष्ट्रवादाला चौथी मिती जोडली. जन, भूमी, संस्कृती   हे तीन घटक राष्ट्रवादाची जगन्मान्य त्रिमिती आहेत. तेवढ्याने राष्ट्र बनत नाही, हे बाबासाहेबांनी पटवून दिले आहे ही चौथी मिती आहे. सार्वत्रिक बंधुभावनेची, हे बंधुभावनेचे तत्व नसेल तर समाज दुभंगलेलाच राहणार आणि त्यामुळे राष्ट्र दुर्बल राहणार. जेव्हा राज्यघटना अंतिमतः तयार  झाली तेव्हा जी उद्देशिका निर्माण झाली. त्यात बंधुभावना हा शब्द बाबासाहेबांनी योजलेला आहे. ती बंधुभावना कायद्याने देता येत नाही. कायदा  हा संरक्षणात्मक असतो. तो कोणत्याही हक्काच्या सार्वत्रिक रक्षणाची हमी देऊ शकत नाही. व्यक्तीला जे अधिकार मिळाले आहेत. उदा. स्वातंत्र्य,  समता यांच्या रक्षणाची हमी बंधुभावनेची मानसिकता देऊ शकते. बाबासाहेबांच्या सर्व विचारांची मुळे आपल्या भारतीय जीवनदर्शनात आहेत. आपली राज्ये अनेक बाबतीत स्वायत्त आहेत; परंतु ती सार्वभौम नाही. सार्वभौम भारत आहे. बाबासाहेबांनी देशाला एक चलन दिले. एक नागरिकत्व दिले. आम्हाला खऱ्या अर्थाने भारत ही संकल्पना दिली. आज जी युवा पिढी उभी राहत आहे. ती बाबासाहेबांच्या संकल्पनेतील संपूर्ण  भारताचा विचार करणारी पिढी आहे.

शैक्षणिक तत्त्वज्ञान
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला शोषणमुक्तीचा मार्ग जणू समाजवादी तत्वज्ञानाचेच नवे रूप आहे. `शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा`   या तीन तत्वात डॉ. बाबासाहेबांच्या सर्व शैक्षणिक विचाराचे सार सामावलेले आहे. डॉ. बाबासाहेबांच्या मते शिक्षण हीच शोषण मुक्तीची पायवाट  होती. आपल्या भारतातील शोषितांच्या आणि पददलितांच्या दैन्यावरचा रामबाण उपाय म्हणजे शिक्षण होय. दीन – दलितांचे दैन्य संपविणारा   एकमेव मार्ग म्हणजे शिक्षण होय. तसेच संधीचा सदुपयोग करणे हे वचन त्यांच्या जीवन शिक्षणाचे मुख्य सूत्र होते.
बाबासाहेबांनी अस्पृश्यांना ठणकावून सांगितलेले की, ``तुमची गुलामगिरी तुम्ही स्वतः नष्ट केली पाहिजे. आत्मसन्मान हरवून जगणे लांछनास्पद  आहे.’’ शिक्षण म्हणजे ज्ञान आणि प्रज्ञा यांचा सुरेख संगम होय. डॉ. बाबासाहेबांना मूल्याधिष्ठित म्हणजेच उच्च नैतिक बैठक असलेले शिक्षण  पाहिजे होते. विशुध्द नैतिक आचरणातून त्यांना केवळ व्यक्ती जीवनाचा विकास करावयाचा नव्हता तर लोकशाही देखील यशस्वी करावयाची होती.
स्वातंत्र्यपूर्वकालीन शिक्षण संस्था ह्यामध्ये महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, डॉ. आंबेडकर, डॉ. रफीक झकेरिया अशी  कितीतरी मोठी याही महाराष्ट्रातच सापडेल की, राष्ट्रप्रेमाने भारावून स्वतःचे पैसे खर्च करून शिक्षणासारखे पवित्र दान केले जात होते. पण काळजाचा ठोका चुकतो, अशी स्थिती होते. मात्र अशीच स्थिती राहिल्यास देशात हिंसाचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याशिवाय राहणार  नाही. सध्याचे नेतृत्व पाहता या देशावर प्रेम करणारे सुसंस्कृत नेतृत्व हवे, शांतीचा विचार करणारे धर्मनिरपेक्ष मूल्य जोपासणारे नेतृत्व निर्माण   होणे आवश्यक आहे. हे कार्य शिक्षण संस्थाच करू शकतात. आपल्याला `यस सर` म्हणणारी संस्कृती नको आहे, नेते चुकले तर त्यांना बाजूला  सारणारे लोक शिक्षण हवे यासाठी लोकशक्ती जागरण, संस्करण व संगठन करणे गरजेचे आहे. आपले शिक्षण चार भिंतीत अडकलेले आहे.  पुस्तकात रूतलेले आहे. परीक्षांच्या फासावर गुदमरल्यामुळे विद्यार्थी वर्गात बसत नाहीत व शिक्षक ही पोटतिडकेने शिकवत नाहीत. योग्य  नागरिक कुशल नेतृत्व घडत नाही. त्यामुळे संस्कृतीचे विकृत रूप धारण करत आहे. विद्यार्थी ज्वलन घटक आहे. त्यासाठी त्याला योग्य दिशा  दाखवली पाहिजे. ती दिशा शिक्षणाने मिळू शकते.
भारताचा इतिहास सांगतो की, जेव्हा जेव्हा भारताची केंद्रसत्ता दुर्बळ झाली. तेव्हा तेव्हा भारत परकीय आक्रमणचा शिकार झाला आहे. ही इतिहासाची पुनरावृत्ती बाबासाहेबांना नको होती. म्हणून त्यांनी आणीबाणीच्या परिस्थितीत केंद्राने सर्व सत्ता हाती घेण्याची व्यवस्था राज्यघटनेत करून ठेवली आहे. डॉ. बाबासाहेबांना प्रबळ केंद्रसत्ता तर हवी परंतु त्याच वेळी भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. प्रादेशिक आणि भाषिक  आस्मिता प्रबळ असतात. त्या दाबून टाकता येत नाहीत आणि चिरडून टाकण्याची तर कल्पनाही करता येत नाही. व्यापक राष्ट्रीयतेच्या संदर्भात  त्याचा योग्य विकास होणे गरजेचे आहे. बाबासाहेब अनेक वेळा एडमंड बर्वâचे वाक्य उद्धृत करीत - `सत्ता देता येते. पण शहाणपण देता येत नाही.`बाबासाहेबांची महानता यात आहे की, त्यांनी राज्यांना सत्ता दिली आणि केंद्राला शहाणपण दिले.
१९२० पूर्वी राष्ट्रजीवनात समाजाच्या तळागाळातील माणूस आणि जातव्यवस्थेच्या उतरंडीतील शेवटच्या पायरीवरचा माणूस कोठेच नव्हता. त्याला  बरोबर घ्यायलाच कोणी तयार नव्हते. २०१६ म्हणजे जवळजवळ शंभर वर्षात परिस्थिती मध्ये मूलगामी परिवर्तन झाले आहे. आज वंचित  समाजातील व्यक्ती राष्ट्रपती, राज्यपाल मंत्रिपद भूषवू शकते. विद्यापीठाचा कुलगुरू होते. उद्योग क्षेत्रात उद्योजक म्हणून सन्मानाने वावरते. विदेशात   राजदूत अशा सर्व पदांवर तळागाळातील माणूस पोहोचला आहे. राष्ट्रापासून वंचित असणाऱ्या कोट्यवधी लोकांना डॉ. बाबासाहेबांनी राष्ट्रजीवनात सहभाग करून घेण्याची व्यवस्था उत्पन्न करून जी राष्ट्रसेवा केली आहे, त्याचे मोल करता येणार नाही. डॉ. बाबासाहेबांनी मूर्त स्वरूपातील राष्ट्रराज्याची तसेच सामाजिक, राजकीय व शैक्षणिक संकल्पना आपल्यासमोर मांडली आहे. राष्ट्राचा प्राण राष्ट्राच्या भावनिक एकतेत असतो.  आम्ही एक आहोत. मग आमची भाषा कोणतीही असो, आमचा उपासना पंथ कोणताही असो; पण आम्ही एक राष्ट्र आहोत ही भावना महत्वाची  आहे. बंधुभावनेचे तत्व यासाठी सर्वाधिक महत्वाचे ठरते. बाबासाहेबांनी निर्माण केलेली राज्यघटना आपल्याला लोकशाही देते. देशात मागासांना  मिळणारे आरक्षण हटविण्याची भाषा सुरू आहे. ही शोकांतिका आहे. त्यामुळे संविधान व मूलभूत अधिकार अडचणीत येत आहेत. सद्यः  परिस्थितीत निर्माण झालेल्या झुंडशाहीतून लोकशाही वाचविण्यासाठी युवकांकडे मोठी जबाबदारी आली आहे. यासाठी मशालींनी मशाली पेटवून  युवकांनी वैचारीक संघर्ष तेवत ठेवावा व बाबासाहेबांची वैचारिक दोर धरून वसा टिकवावा. भारत ही संकल्पना देते. एक सशक्त राज्य रचना देते.  ही सर्व रचना सामाजिक शैक्षणिक व राजकीय न्यायाच्या मजबूत पायावर उभी करते.

संदर्भ ग्रंथ :
  • बाबासाहेबांचे राष्ट्र उभारण्यातील योगदान – रमेश
  • पायाभूत मूलभूत शिक्षण – ना.य. डोळे
  • शिक्षणातील थोर विचारवंत – प्राचार्य रा.तु. भगत

- डॉ. आरिफ ताजुद्दीन शेख आणि
यास्मिन सुलताना
औरंगाबाद,
मो.:७०२०२६८४७१

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget