Halloween Costume ideas 2015

कोविड 19 : मृत्यू की जातियवाद

खुद ही कैद होकर रहे गए हैं वो
जो लोक थककर आराम करना चाहते थे
आज जगभरात कोविड 19 मुळे उलथापालथ सुरू आहे. बहुतेक पहिल्यांदा असे झाले आहे की, जगातील प्रत्येक देशातील प्रत्येक माणूस या आजारामुळे भयभयीत झालेला आहे. काही लोक या आजारापासून लांब राहण्याचा प्रयत्न करीत आहेत तर ज्यांना हा आजार झालेला आहे ते  यापासून मुक्ती मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. घराच्या आत भांडणं आणि बाहेर निघालो तर पोलिसांची दंडुके अशा दुहेरी कात्रित माणसं  सापडलेली आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या कमतरतेमुळे अनेक ठिकाणी लोकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. मुलांच्या शाळा बंद झाल्यामुळे   व त्यांनी घालत असलेल्या धिंगाण्यामुळे घराची कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे. एकमेकांच्या भेटी तर अशक्यप्राय झालेल्या आहेत. जे  घरात वेळ घालविण्यासाठी तळमळत होते ते आता घरात आराम करून बाहेर जाण्यासाठी तळमळत आहेत. आराम केल्यानेही थकवा येतो, याची  अनुभुती पहिल्यांदाच होत आहे. ज्या बायकांची तक्रार होती की पती घरात राहत नाहीत आता त्या तक्रार आहेत की, पती घराच्या बाहेर जात नाहीत. ज्यांच्याकडे खायला आहे, ते खाऊन खाऊन थकले आहेत, ज्यांच्याकडे खायला नाही ते अन्नाची वाट पाहून थकले आहेत. अशा अभूतपूर्व  परिस्थितीमध्ये मीडियाची सकारात्मक भूमिका असणे हे देशहितासाठी आवश्यक होते. मात्र कोरोना सुरू झाल्यापासून व त्यातल्या त्यात तबलिगी जमाअतच्या मर्कजची घटना समोर आल्यापासून माध्यमांनी एकमताने या जीवघेण्या आजाराचे वर्गीकरण हिंदू आणि मुसलमानांमध्ये   करून टाकलेले आहे. याचा परिणाम एवढा जबरदस्त झालेला आहे की, अहेमदाबादमधील शासकीय रूग्णालयामध्ये हिंदूंसाठी वेगळी व्यवस्था तर  मुस्लिमांसाठी वेगळी व्यवस्था केली असल्याचे बीबीसीने वृत्त दिले आहे.
मुस्लिमांविरूद्ध मीडियाद्वारे चालविला जाणारा अपप्रचार काही नवीन नाही. यामुळेच अनेकवेळा देशामध्ये तणाव निर्माण झालेला आहे. कधी दंगली झालेल्या आहेत तर कधी मॉबलिंचिंग झालेली आहे. कोरोना संबंधी मुस्लिमांच्या विरूद्ध एवढा जबरदस्त अपप्राचार केला गेला की, मध्यप्रदेशातील  बवाना येथील महेबूबअली (वय 22) हा केवळ भोपाळहून इज्तमा करून परत आला म्हणून त्याची कोरोनाची चाचणी निगेटीव्ह आल्यावरसुद्धा  एका समुहाने 8 एप्रिल रोजी त्याची हत्या केली. दुसऱ्या एका घटनेत मुस्लिमांनी थुंकले म्हणून रांचीपासून 120 किमी अंतरावर असलेल्या  सिसई गावामध्ये हिंदू- मुस्लिमांमध्ये दंगल झाली आणि त्यात एका व्यक्तीची हत्या झाली. तिसऱ्या एका घटनेत मध्यप्रदेशच्याच मौजे बनगड   जि. ना येथे दिलशाद नावाच्या एका तरूणाने गावातील लोक त्याला तबलिगीच्या संपर्कात राहून परत आला म्हणून एवढे हिनविले की, 10  एप्रिल रोजी त्याने आत्महत्या करून घेतली.
व्हॉटस्अ‍ॅपवर वेगवेगळ्या प्रकारचे संदेश फिरत आहेत. कोणी म्हणतंय मुसलमान नाकावाटे श्वास घेतात आणि तोंडावाटे कोरोनाचे व्हायरस सोडतात. आश्चर्य म्हणजे त्यांना कोरोनाचा संसर्ग होत नाही, दुसऱ्यांना होतो. कोणी म्हणतं 99 टक्के मुस्लिमांच्या चुकांमुळे 100 टक्के  मुस्लिमांबद्दल चुकीचा समज होत आहे. एक व्हिडीओ असाही आला आहे की, एक दाम्पत्य भीतीने गर्भगळीत होऊन सांगत आहे की, रात्री 8 वाजता कोणीतरी बेल वाजविली, बाहेर जावून पाहिले असता कोणीही दिसले नाही. काही वेळानंतर त्यांच्यापैकी एकजण कचऱ्याचा डब्बा बाहेर  ठेवण्यासाठी गेला असता त्यांना दारासमोर 500 रूपयांची नोट पडलेली दिसली. त्यामुळे त्यांना वाटले की, कोणीतरी त्या नोटेला कोरोनाचा   व्हायरस लावून त्यांना कोरोना व्हावा म्हणून मुद्दामहून त्यांच्या घरासमोर ती नोट ठेवलेली आहे. असे व्हायात संदेश फिरत असून, शासनाने अजूनही अशा लोकांच्याविरूद्ध म्हणावी तेवढी गंभीर भूमिका घेतलेली नाही. कुठल्याही धर्मामध्ये कुठल्याही व्यक्तीला कसल्याही प्रकारचा त्रास देण्याची परवानगी नाही. मग अशा मुर्खतापूर्ण व्हॉटस्अ‍ॅप संदेशाची देवाणघेवाण कशासाठी?
एकीकडे असा व्हायातपणा सुरू असताना दुसरीकडे जे लोक रोजंदारी करत होते ते मजुरी मिळत नसल्यामुळे दयनीय अवस्थेत पोहोचलेले आहेत.  शासनासहीत अनेक संस्था, संघटना जरी त्यांच्या मदतीला पुढे आल्या असल्या तरी त्या सर्वांचे प्रयत्न तोकडे पडत असल्याचे चित्र आहे. या  मजुरांची अवस्था दिवसेंदिवस दयनीय होत आहे. दरम्यान, पंतप्रधानांच्या संदेशांचा चुकीचा अर्थ लावून कोरोनाविरूद्ध लढणाऱ्यांचा उत्साह वाढावा  म्हणून थाळ्या वाजवा म्हटले असताना लोकांनी मिरवणुका काढल्या. दीप प्रज्वलित करा म्हणून सांगितले असता फटाके फोडले. इतके की सोलापुरला एका ठिकाणी त्यामुळे आग लागली. एकीकडे हा अतिउत्साहीपणा तर दुसरीकडे मीडियाचे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष. केवळ विष  पसरविण्याचा प्रयत्न. या सर्वांमुळे कोरोनाविरूद्धची लढाई अवघड बनलेली आहे.
23 तारखेला पंतप्रधानांनी 24 दिवसांच्या लॉकडाऊनची अचानक घोषणा केल्यामुळे जे जिथे आहेत तिथे अडकून पडले आहेत. दळणवळणाची सर्व साधनं अचानक बंद पडल्यामुळे गोरगरीबांच्या हालअपेष्टांना पारावर उरला नाही. तबलिगी जमाअतच्या मर्कजमध्येही लॉकडाऊनमुळेच लोक  अडकले. परंतु, त्याचे इतके विकृत वार्तांकन करण्यात आले की, तबलिगी जमाअतची सरसकट प्रतीमा मलीन करण्यात आली. केवळ तबलिगी   नव्हेच तर भारतातील सर्व मुस्लिमांच्या वर्तवणुकीवर प्रश्नचिन्ह लावण्यात आले. खरी परिस्थिती तर अशी आहे की, देशातील इतर संस्था-संघटनां  प्रमाणे मुस्लिमांच्याही संस्था-संघटनांनी आपल्या क्षमतेनुसार गरजूंना अन्नाची पाकिटे आणि धान्याचा पुरवठा यथाशक्ती केलेला आहे. केवळ चार  तासाचा अवधी मिळाल्यामुळे अनेक लोकांनी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी 23 तारखेच्या रात्री मार्केटमध्ये गर्दी केली आणि सामाजिक अंतर  राखण्याच्या तत्वाला हरताळ फासला गेला. अन्नधान्य गरीबांमध्ये वाटप करणाऱ्यांमध्येही काही लोकांनी चमकोगिरी करण्याची आपली हौस  भागवून घेतली.
एकंदरित परिस्थिती खूपच बिकट आहे. शासकीय प्रयत्न कमी पडत आहेत. महाराष्ट्रात आणि त्यातल्या त्यात मुंबई, पुण्यामध्ये कोरोनाचा  प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत मीडिया काहीही म्हणो, हिंदू, मुस्लिम, सीख, ईसाई, दलित थोडक्यात आपण सर्वांनी  एकजुटीने एकमेकांना सहाय्य करत या संकटाला सामोरे जाऊया. ह्याचीच खरी गरज आहे.

-नगीना नाज
मुंबई, मो.: 9769600126

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget