Halloween Costume ideas 2015

तबलिगी जमाअत

दश्त तो दश्त है सहेरा भी न छोड़े हमने
बहेर-ए-जुल्मात पे दौडा दिये घोडे हमने
तबलिगी जमात रूढ अर्थाने अशी संघटना नाही की जिची अमूक या दिवशी स्थापना झाली असे म्हणता येईल. मुळात ही संघटना आहे असेही म्हणणे तितकेसे खरे नाही. याला  लोकचळवळ किंवा लोक आंदोलन म्हणता येईल. ब्रिटिश इंडियामध्ये 1925 ते 1926 दरम्यान हे आंदोलन हरयाणाच्या मेवात पासून सुरू झाले. या जमाअतच्या हालचालींवर काही वर्षे  बारीक लक्ष ठेवल्यानंतर ब्रिटीशांच्याही लक्षात आले की ही जमात त्यांच्यासाठी उपद्रवीही नाही, म्हणून त्यांनी या आंदोलनाला दडपले नाही. 1857 साली मुसलमानांनी जो उठाव केला  होता त्यामध्ये ’जिहाद’ या इस्लामी संकल्पनेचा मोठा वाटा होता. मात्र तबलिगी जमाअतच्या कामामध्ये जिहाद तर सोडा साधे राजकारण सुद्धा नव्हते. त्यामुळे ब्रिटिशांना या   जमाअतवर प्रतिबंध लावण्याची गरज वाटली नाही.

तब्लिगी जमाअतचे संस्थापक
या जमाअतचे संस्थापक मौलाना मुहम्मद इलियास कांधलवी (रहे.) हे होत. त्यांचा जन्म 1885 ला कांधला जिल्हा मुजफ्फरनगर उत्तरप्रदेश येथे झाला होता, तर मृत्यू 13 जुलै 1944   साली निजामुद्दीन दिल्ली येथे झाला. त्यांना लोक ’हजरतजी’ या नावाने हाक मारत. त्यांचे शिक्षण दारूल उलूम देवबंद येथे झाले होते. त्यांची जडणघडण रशीद अहेमद गंगोई, मुहम्मद  इस्माईल कांधलवी, खलील अहेमद सहारनपुरी आणि मुहम्मद याह्या कांधलवी यासारख्या दिग्गज उलेमांच्या देखरेखीखाली झाली.

तब्लिगी जमात सुरू होण्याची कारणे
1. विसाव्या शतकाच्या सुरूवातीला भारतामध्ये साम्यवादी चळवळ अगदी टोकदार झाली होती. 1917 मध्ये रशियन क्रांती झाली होती. त्यातून युनायटेड सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक  (यूएसएसआर) ची स्थापना झाली होती. जग यु.एस.ए. आणि यूएसएसआर या दोन गटामध्ये विभागले गेले होते. ख्वाजा अहेमद अब्बास, कैफी आजमी, फैज अहेमद फैज, हबीब  इरफान सारखे बुद्धिजीवी मुस्लिम लोक साम्यवादाच्या आहारी जाऊन जवळ-जवळ नास्तीक झाले होते.
2. 11 फेब्रुवारी 1923 रोजी स्वामी श्रद्धानंद यांनी ’भारतीय शुद्धी सभा’ ची स्थापना केली होती.  हे एक असे आंदोलन होते ज्याद्वारे मुस्लिमांची घरवापसी केली जात होती. मथुरा ते  आगरा या पट्यामध्ये 50 ते 100 वर्षापूर्वी ज्या राजपूत परिवारांनी इस्लाम धर्माचा स्वीकार केला होता, त्यांच्यामध्ये अद्याप काही हिंदू चालीरिती कायम होत्या. त्यांची आडनावे सुद्धा  त्यागी, राठौड, राठौर त्या वेळेपर्यंत कायम होते. स्वामी श्रद्धानंद यांनी अशा 30 हजार राजपूत मुस्लिमांची यशस्वी घरवापसी केली होती. त्यामुळे चिडून अब्दुल रशीद नावाच्या एका  मुस्लिम तरूणाने स्वामी श्रद्धानंद यांची हत्या केली होती. त्यामुळे देशात हिंदू-मुस्लिम तणाव शिगेला पोहोचला होता.
3. स्वातंत्र्य नजरेच्या टप्प्यात आल्याने स्वातंत्र्य आंदोलनामध्ये एकत्र काम करणाऱ्या हिंदू आणि मुस्लिम समाजातील लोकांना आपल्या भविष्याची काळजी लागली होती. त्यातच 1925  साली विजयादशमीच्या दिवशी संघाची स्थापना झाली. त्यांनी स्वतंत्र भारताला हिंदू राष्ट्र करण्यात यावे, अशा हिंदू महासभेच्या मागणीचीच री ओढायला सुरूवात केली होती. त्यातूनही  हिंदू-मुस्लिम तणाव कमालीचा वाढला आणि अनेक ठिकाणी दंगे, धोपे सुरू झाले. दंग्यामध्ये मारल्या गेलेल्या अल्पसंख्यांक मुस्लिमांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे ज्या  ठिकाणी मुस्लिमांची लोकसंख्या अत्यंत विरळ होती त्यांनी घाबरून आपण ओळखले जाणार नाही यासाठी मुस्लिम प्रतिकांचा त्याग करण्यास सुरूवात केली होती. विशेषकरून हरयाणाच्या मेवातमध्ये तर मुस्लिम हे इस्लामपासून फारच लांब गेल्याचे मौलाना इलियास कांधलवी यांच्या लक्षात आले होते.
4. सतत सव्वाशे वर्ष इंग्रजांच्या अधिपत्याखाली राहिल्यामुळे व इंग्रजांनी मुस्लिमांची, ’दर्स-ए-निजामी’ हा शिक्षण अभ्यासक्रम बंद करून त्या ठिकाणी ब्रिटिश अभ्यासक्रम सुरू केल्यामुळे अनेक सुशिक्षित मुस्लिम लोकांच्या मनामध्ये इस्लामी मुल्यांबद्दल शंका आणि ब्रिटिश मुल्यांबद्दल विश्वास निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये इस्लामी  मुल्यांप्रती निष्ठा आणि समर्पण कमी झाले होते.
या सर्व परिस्थितीचा खोल परिणाम दारूल उलूम देवबंदमध्ये शिकत असताना मौलाना इलियास कांधलवी रहे. यांच्या मनावर झाला होता. दारूलउलूमचे शिक्षण संपल्यानंतर ते तीर्थ   यात्रेसाठी 1925 साली मक्का येथे गेले होते. अनेक लोकांचे असे म्हणणे आहे की, मक्का येथे असतांना एका रात्री त्यांना असा दैवी इशारा मिळाला की इस्लामपासून दूर जाणाऱ्या  भारतीय मुस्लिमांच्या जीवनामध्ये इस्लामी मुल्यांची पुनर्स्थापना करण्याचे कार्य त्यांनी हाती घ्यावे. या पार्श्वभूमीवर मक्का येथून परत आल्यावर त्यांनी देवबंद आणि सहारनपूरमधील  त्यांच्या बरोबर शिकून नुकतेच उलेमा झालेल्या तरूणांचा एक गट तश्कील (तयार) दिला आणि त्यांना मेवातमध्ये रवाना केले. यालाच जमात असे म्हणतात. त्यानंतर ठराविक अंतराने  अशा जमाती मेवातमध्ये जाऊन ग्रामीण मुस्लिम लोकांना इस्लामच्या मुलभूत तत्वांचे शिक्षण देणे सुरू केले. तेव्हा स्थानिक मेवाती लोकांनी त्यांना, ’’तब्लिगी जमात’ म्हणून हाक   मारायला सुरूवात केली. अशा प्रकारे तबलिगी जमात असे यांचे नामांकरण झाले. तबलिग म्हणजे प्रसार व जमाअत म्हणजे गट. इस्लामच्या मुलभूत शिकवणीचा मुस्लिमांमध्ये प्रचार  आणि प्रसार करणाऱ्यांचा गट म्हणजे तबलिगी जमात. हळूहळू जमातींचे प्रमाण वाढत गेले आणि मेवातसोडून इतर ग्रामीण भारतातही जमाअतचे कार्य सुरू झाले. 1941 साली त्यांचा   पहिला इज्तमा (मेळावा) झाला त्यात 25 हजार लोक सामील झाले. दरवर्षी भारतात भोपाळ येथे अखिल भारतीय स्तरावरील इज्तमा घेतला जातो. ज्यात लाखो लोक सामील होत  असतात तर बांग्लादेशच्या तुराग नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या ’टोंगी’ येथे अंतरराष्ट्रीय इज्तमा आयोजित केला जातो. त्यामध्ये हज यात्रेपेक्षाही 20 लाख अधिक म्हणजे 50 लाख  तबलिगी उपस्थित असतात, असा दावा केला जातो.

विचारधारा
तब्लिगी जमाअतची विचारधारा फक्त 6 मुद्दयांच्या अवती भोवती गुंफलेली आहे. ती एकदम साधी, सोपी, सरळ आणि सहज आचरणात आणण्यासारखी आहे. पहिला क्रमांक कलमा -  इस्लामचा पाया कलमा मानला जातो. कलमा म्हणजे अल्लाहच्या एक होण्याची आणि त्याचे प्रेषित मुहम्मद मुस्तफा सल्ल. असण्याची सच्चा मनाने साक्ष द्यावी. केवळ तोंडाने कलमा  अदा केल्याने कोणी मुसलमान होत नाही. त्यासाठी कलम्याचा जाणीवपूर्वक स्वीकार करणे आवश्यक असते. याचीच जाण तबलिगी जमाअतचे लोक सामान्य मुस्लिमांच्या मनामध्ये  सर्वप्रथम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.
दुसऱ्या क्रमांकावर नमाज येते. इस्लामच्या मुलभूत तत्वांपैकी नमाज एक तत्व असून, हे सर्वात महत्त्वाचे तत्त्व आहे. पाच वेळेसची नमाज नियमितपणे ठरलेल्या वेळेत अदा  केल्यानंतर ती अदा करणारा माणूस कधीच कोणतेच पाप करत नाही. गुन्हे तर सोडा साधे नैतिक नियम सुद्धा तोडत नाही. अश्लिलता, नशा आणि इतर वाईट कृत्यांपासून स्वतःहोऊन  दूर होतो. याचा सरळ परिणाम त्याच्या कुटुंबावर होतो. त्याच्याबरोबर त्याचे कुटुंबही या सर्व वाईट कृत्यापासून सुरक्षित राहते.
तिसऱ्या क्रमांकावर इल्म व जिक्र आहे. या संदर्भात तबलिग जमाअतमध्ये ’फजाईल-ए-आमाल’ या पुस्तकाचा सर्वात जास्त उपयोग केला जातो. हे पुस्तक मुहम्मद जकरिया यांनी  संपादित केलेले असून, यामध्ये प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या अनेक हदीसांचा (शिकवणी) समावेश असून, लौकिक आणि परलौकिक दोन्ही जीवन कसे जगावे जेणेकरून या जगातही  आणि परलोकातही माणसं यशस्वी होतील? या संदर्भातले मार्गदर्शन या पुस्तकात केलेले आहे. याशिवाय अल्लाहचा जिक्र (जप) सातत्याने करत राहिल्याने माणूस सैतानाच्या  प्रभावापासून मुक्त राहतो, अशी भावना असल्यामुळे तब्लिगी जमाअतचे सदस्य ज्यांना ’साथी’ म्हटलं जातं. हातात जपमाळ घेऊन कायम नामस्मरण करत असतात.
चौथ्या क्रमांकावर इक्रामे मुस्लिमीन येतं. याचा अर्थ प्रत्येक मुस्लिमांनी एकमेकाचा इक्राम म्हणजेच आदर करावा. या तत्त्वाची तब्लिगी साथी इतकी प्रभावशाली अंमलबजावणी करतात  की एकमेकाचे हातपाय दाबणे, एकमेकांची पादत्राणे उचलणे, एकमेकांचे कपडे धुणे, कोणी आजारी पडल्यास घरच्या सदस्यांपेक्षा जास्त त्याची काळजी घेणे, कोणी अडचणीत सापडल्यास  सर्व मिळून त्याची अडचण सोडविणे, कोणाला आर्थिक चणचण भासत असेल तर त्याची निस्वार्थ भावनेने मदत करणे, यासारखे पुण्याचे काम हे साथी नित्य नियमाने करत असतात.
पाचव्या क्रमांकावर इख्लासे निय्यत येते. इख्लास म्हणजे निस्वार्थपणे केवळ अल्लाहला राजी करण्यासाठी केलेले कृत्य. नियत म्हणजे हेतू. थोडक्यात कोणाची सेवा, कोणाची मदत,  करूनही त्याच्यावर उपकार केल्याची कुठलीही भावना हे लोक ठेवत नाहीत. किंबहुना ज्याची मदत केली त्याला त्याच्यावर कोणीतरी उपकार केलेत याची जाणीव त्यांच्या मनात निर्माण  न होईल, यासाठी कटाक्षाने प्रयत्न केले जातात. वर्ष- वर्ष जमाअतमध्ये जान, माल आणि वक्त (जीव, संपत्ती आणि वेळ) देऊन सुद्धा हे लोक अस्तगफार (अल्लाहकडे क्षमा याचना)  करत घरी परत येतात. यातून त्यांचा उदात्त हेतू वाचकांच्या लक्षात यावा. जमाअतचा अमीर कुठल्याही विद्यापीठातून एमबीए करून नेतृत्वगुण शिकलेला नसतो, त्याला पगारही  मिळत नाही परंतु वेगवेगळ्या वयोगटातील, वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील लोकांना तो इतक्या प्रेमाने सोबत घेऊन चालतो की हे लोक 40 दिवस जमाअतमध्ये चालून परत  आल्यावर आपापल्या घरी जातांना एकमेकांच्या गळा भेटी घेऊन अक्षरशः रडतात.
सहाव्या क्रमांकावर दावत व तब्लिग येते. या संदर्भात  काही लिहिण्यापूर्वी मी एक गोष्ट आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, तबलिगी जमात कधीच कुठल्याच धर्माच्या लोकांचे  धर्मांतर करत नाही किंबहुना कुठल्याही इतर धर्मियांकडे हे लोक जातच नाहीत. त्यांचे एकमेव लक्ष्य मुस्लिम समाजातील ते लोक आहेत जे काही कारणांमुळे इस्लामी आचरणापासून   दूर गेलेले आहेत. त्यांच्या जीवनात इस्लामी आचरण परत आणणे जेणेकरून त्यांचे व त्यांच्यामुळे समाजाचे भले होईल, ह्या एकाच भावनेतून झपाटल्यासारखे हे लोक गेल्या 95 वर्षे  रात्रंदिवस काबाडकष्ट करत आहेत. जे लोक तबलिगी जमाअतवर धर्मांतराचा आरोप लावत आहेत ते या जमाअताला ओळखतसुद्धा नाहीत, असे माझे स्पष्ट मत आहे.

हे सहा मुद्देच का?
आता प्रश्न असा उद्भवतो की, या सहा मुद्यांवरच काम का करावे? या षट्कोणाबाहेर इस्लाम नाही काय? तर त्याचे उत्तर आहे की, कुठल्याही विवादाला वाव मिळणार नाही यासाठी इतर मुद्दे जमातमध्ये चर्चेमध्ये आणले जात नाहीत. हे जमाअतचे अगदी सुरूवातीपासूनचे धोरण आहे. राजकारण, मीडिया आणि आधुनिक गोष्टींपासून हे लोक चार हात लांबच राहणे   पसंत करतात. राजकारण आणि जिहादसारख्या मुद्यांना बगल देऊन तबलिगी जमाअत फक्त पुण्यवान लोकांच्या निर्मितीवर लक्ष केंद्रीत करून आहे. म्हणूनच 150 देशांमध्ये विस्तार  होऊनसुद्धा या जमाअतवर कधीच कुठलाही आरोपसुद्धा लागलेला नाही. कोरोनानिमित्त सध्या जमाअतवर जो आरोप केला जातोय  त्याच्यातील फोलपणा अनेक हिंदू पत्रकार आणि   विचारवंतांनी समाज माध्यमातून उघडून दाखविलेला आहे. वीट येईपर्यंत तबलिग जमाअतबद्दल केलेल्या कव्हरेजमुळे शरद पवार सारखा संयमी राजकारणीही वैतागून गेला आहे.

जमाअतचा परिणाम
निःस्वार्थ भावनेने केल्या जात असलेल्या तबलिगी जमाअतच्या अथक प्रयत्नांमुळे भारतामध्ये लाखो मुस्लिमांच्या जीवनामध्ये सकारात्मक क्रांती झालेली आहे. याचाच परिणाम आहे  की, भारतातलाच नव्हे तर अंतरराष्ट्रीय मुस्लिम उम्माह (समुदाय) मधील प्रत्येक तिसरा व्यक्ती तबलिगी आहे. अनेक लोकांची दारू सुटलेली आहे, अनेक परिवार अंधश्रद्धेपासून मुक्त  झालेले आहेत.
प्रसिद्धीसाठी आटापिटा करण्याच्या या कलयुगात स्वतःचा जीव, माल आणि वेळ खर्ची घालून, परत कोणाकडून कुठलीही अपेक्षा न ठेऊन, गेल्या 95 वर्षापासून एकाच ठराविक  लक्ष्याभोवती काम करण्यासाठी उच्चकोटीचे समर्पण असणे आवश्यक आहे. जमाअतने ही किमीया साधलेली आहे. भारताचे नाव संपूर्ण इस्लामी जगतामध्ये आदराने घेतले जाते  किंबहुना इस्लामी जगतामध्ये जगत्गुरू असण्याचा मान भारताला केवळ तबलिगी जमाअत आणि दारूल उलूम देवबंदमुळे मिळाला आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. भारतीय  स्वतंत्रता सेनानी ओबेदुल्लाह सिंधी, तिसरे राष्ट्रपती झाकीर हुसैन आणि हुसैन अहेमद मदनी सारखे उच्चकोटीचे स्वतंत्रता सेनानी तबलिगी जमाअतशी संबंधित होते. तबलिगी हे चिवट  प्रवृत्तीचे असतात. जगातील सर्वात मोठे आंदोलन लिलया चालवितात. मीडियाद्वारे चालविलेल्या या फाटक्या आणि बिनबुडाच्या ट्रायलला ते पचवून ढेकरसुद्धा देणार नाही, याची  प्रत्येकाने खात्री बाळगावी.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget