Halloween Costume ideas 2015

इस्लामचे चालते बोलते विद्यापीठ निवर्तले

जमाअत-ए-इस्लामी हिंदचे माजी अध्यक्ष मौलाना मुहम्मद सिराजुल हसन यांचं निधन

जमाअते इस्लामी हिंदचे तीसरे अध्यक्ष मौलाना मुहम्मद सिराजुल हसन यांचे 2 एप्रिल 2020 रोजी सायंकाळी 6 वाजता रायचूर (कर्नाटक) येथे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.  त्यांचा जन्म 3 मार्च 1933 रोजी झाला होता. 1958 ते 1984 दरम्यान ते कर्नाटक जमाअत ए इस्लामी हिंदचे अध्यक्ष (अमीर हल्का) होते. तसेच 1984 ते 1990 या कालावधीमध्ये  जमाअते इस्लामी हिंदचे सचिव होते. 1990 ते 2003 या कालावधीमध्ये ते जमाअत ए इस्लामी हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. तसेच ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे उपाध्यक्ष म्हणूनही  त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. ते इस्लामचे चालते बोलते विद्यापीठ होते. त्यांच्या अचानक जाण्याने इस्लामी जगताचे मोठे नुकसान झाले.

मौलानांच्या संपर्कात अनेक वर्ष राहिलेले जमाअत ए इस्लामी हिंद महाराष्ट्राचे पूर्व अध्यक्ष आणि मजलिसे नुमाइंदगान व केंद्रीय शुराचे सदस्य तौफिक असलम खान म्हणाले, मौलाना  सिराजुल हसन यांचा माझा परिचय 1978 साली झाला. तेव्हापासून मी त्यांच्या सतत संपर्कात होतो. माझ्या वैयक्तिक जीवनातही त्यांचा मोठा प्रभाव राहिलेला आहे. माझी  जडणघडणही त्यांच्याच देखरेखीखाली झाली आहे. मी जेव्हा स्टुडन्ट इस्लामिक ऑर्गनायझेशनचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून 1989 ला निवडलो गेलो, तेव्हा मौलाना अबुलैस इस्लाही हे  राष्ट्रीय अध्यक्ष होते. मात्र 1990 साली सिराजुल हसन हे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यावर माझा त्यांच्याशी जास्त संपर्क आला. त्यावेळी ते एसआयओचे मुख्य पालक (चीफ पॅट्रॉन) होते.  एसआयओचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी दिल्ली येथे गेलो तेव्हा जमाअते इस्लामी हिंदच्या ओखला येथील मुख्यालयात त्यांच्यासोबत 1991 पर्यंत राहण्याची मला संधी मिळाली.  त्याशिवाय त्यांच्या खास आग्रहास्तव मी 1999 ते 2002 पर्यंत सहसचिव जमाअते इस्लामी हिंद म्हणून दिल्लीला त्यांच्या संपर्कात राहिलो. एवढा मोठा कालावधी त्यांच्यासोबत राहिल्यामुळे मला त्यांच्या व्यक्तीमत्त्वाला अगदी जवळून पाहण्याची संधी मिळाली.
मौलाना मुहम्मद सिराजुल हसन हे अतिशय प्रेमळ आणि कनवाळू वृत्तीचे होते. पहिल्यांदा जरी त्यांची भेट झाली तरी प्रत्येकाला असे वाटत होते की, तो त्यांना अनेक वर्षांपासून ओळखतो की काय? त्यांची इस्लाम संबंधीची समज अतिशय प्रगल्भ होती. इस्लाम संबंधी कुठलाही प्रश्न विचारला असता ते त्या संबंधी इत्यंभूत माहिती अगदी सोपी करून सांगत.  त्यांच्या शब्दांमध्ये दृश्यनिर्मितीची जबरदस्त ताकत होती. जंगे बदर असो का इतर कुठलेही युद्ध, ते जेव्हा त्यांचे वर्णन करायचे तेव्हा ऐकणाऱ्यांना प्रत्यक्ष युद्धभूमीत असल्याचा भास  व्हायचा. त्यांचे वैयक्तिक जीवन आदर्शवत होते. पाच वेळेसच्या नमाज व्यतिरिक्त पहाटेच्या पूर्वी 3.30 वाजता उठून थंड पाण्याने आंघोळ करून तहाज्जुदची नमाज नित्यनियमाने अदा  करण्याची सवय त्यांनी आयुष्यभर जपली. ते प्रवासात असतांना सुद्धा कधी तहाज्जुदची नमाज सोडत नव्हते. दरवर्षी रमजानमध्ये दहा दिवसाचा एतेकाफ ते नियमितपणे करत. अमीरे  जमाअत असतांनासुद्धा त्यांनी कधी एहतेकाफला फाटा दिला नाही. शिवाय रमजाननंतर शव्वाल महिन्यातील सहा रोजे ठेवण्याची त्यांची सवय होती. इस्लामी ग्रंथांचा त्यांचा अभ्यास दांडगा होता. अरबी भाषेतून उर्दूमध्ये भाषांतरित झालेले अनेक ग्रंथ त्यांनी आत्मसात केलेले होते. ते जेव्हा बोलायला सुरूवात करत तेव्हाच त्यांच्या  ज्ञानाचा आवाका ऐकणाऱ्यांच्या लक्षात येत असे. त्यावेळी ते एक इस्लामचे चालते बोलते विद्यापीठ असल्यासारखे वाटायचे.
इस्लाममधील मुख्य चारही विचारधारांच्या उलेमांशी त्यांचा दांडगा संपर्क होता. देशातील प्रमुख मदरश्यांना त्यांनी भेटी देऊन सर्वांना एका मंचावर आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले. जेव्हा  ते पहिल्यांदा दारूल उलूम देवबंदला गेले तेव्हा मी त्यांच्या सोबत होतो. देवबंद येथील दोन्ही मोठ्या दारूलउलूमला मौलानानी भेटी दिल्या. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे उपाध्यक्ष असताना  त्यांनी बाबरी मस्जिद विषयी मोलाची भूमिका घेतली होती. मजलिसे मुशावरातच्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या विचारांच्या मुस्लिम गटांना एकत्र आणण्याचा मोठा प्रयत्न 1964  साली केला होता.
अमीरे जमाअत असतांना कुरआनचे वेगवेगळ्या भाषांमध्ये सुलभ भाषांतर करून त्यांना जनतेपर्यंत पोहोचविण्यामध्ये त्यांनी जेवढे काम केले तेवढे त्यापूर्वी देशात कधीच झालेले नव्हते.  मराठीमधील भाषांतरित कुरआनसुद्धा 1992 साली त्यांच्याच प्रयत्नातून साकार झाला. त्यांचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे मुस्लिमांसोबतच मुस्लिमेत्तर बांधवांमध्येही त्यांची  लोकप्रियता अफाट होती. शंकराचार्य, स्वामी अग्नीवेश, वॉल्सन थेम्पो, ग्रंथी मंजितसिंग यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. या सर्वांना सोबत घेऊन त्यांनी ’धार्मिक जनमोर्चा’ची  स्थापना करून सर्वधर्मीय लोकांमध्ये सलोखा निर्माण करण्यासाठी मोलाचे प्रयत्न केले होते. ते जेव्हा जमाअते इस्लामी हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष होते त्यावेळी कुरआन परिचय, कुरआन  संम्मेलन, सप्ताह, पंधरवाडे साजरे करून कुरआनचा संदेश देशबांधवांपर्यंत पोहोचविण्यासाठी भरपूर प्रयत्न केले होते. सर्वधर्मीय बांधवांच्या धार्मिक कार्यक्रमांनाही ते उपस्थित राहून  मार्गदर्शन करायचे. ते ज्यावेळी काही कामानिमित्त बाहेर पडायचे तेव्हा सर्वच समाजबांधवांशी त्यांची आपुलकीचे नाते असायचे.
त्यांच्याशी संवाद साधताना त्यांच्या अभ्यासाचा आणि विद्वत्तेचा सहज अंदाज यायचा. एकदा ते आई-वडिलांबद्दल मुलांशी नाते कसे असावे, या विषयी बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले  की,जर एखादा व्यक्ती फार मोठा विद्वान आहे, त्याला सर्व ग्रंथांचा, साहित्याचा अभ्यास आहे. मात्र त्या व्यक्तीचे आई-वडिलांशी जमत नाही, तर तो व्यक्ती कधीही यशस्वी होऊ शकत  नाही, ना तो जन्नतमध्ये जावू शकतो. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या आई-वडिलांशी प्रेम, आदरपूर्वक वागावे. अशाच पद्धतीने सोबत असलेल्या लोकांचे ते प्रशिक्षण करत होते.
फेब्रुवारी 1981 साली मी बी.ई. केमिकलच्या तिसऱ्या सेमिस्टरमध्ये शिकत होतो. त्या वेळेस असे झाले की, जमाअते इस्लामीतर्फे सहाव्या राष्ट्रीय अधिवेशनाची घोषणा झाली. नेमक्या  त्या तारखांनाच माझ्या तिसऱ्या सेमीस्टरची परीक्षा आली. माझ्या सोबत लातूरचे सलीम पटेल हे सुद्धा होते. आमची दोघांची अधिवेशनाला जाण्याची तीव्र इच्छा होती, मात्र परीक्षांमुळे  अधिवेशनाला जावे की जाऊ नये याबाबतीत आम्ही दुविधेमध्ये होतो. त्यावेळी मी मौलाना सिराजुल हसन यांच्याशी संपर्क करून त्यांना मनातील दुविधा सांगितली व विनंती केली की,  मी तिसऱ्या आणि चौथ्या सेमिस्टरची परीक्षा एकदाच देईन. तेव्हा त्यांनी विचारले की मी मग अडचण काय आहे? त्यावर मी उत्तर दिले की लोक मला म्हणत आहेत की, परीक्षा देणे  माझे प्रथम कर्तव्य आहे. ते सोडून अधिवेशनाला जाण्याची जमात कशी शिकवण देते? त्यावर मौलाना उत्तरले की, जमात आपल्या उद्देशाच्या प्राप्तीसाठी प्रत्येक संभाव्य त्याग  करण्याची शिकवण देते. तुम्ही अधिवेशनला या. त्यामुळे माझ्या मनातील दुविधा संपली आणि मी आणि पटेल खऱ्या अर्थाने अधिवेशनला जाण्याची तयारी करत असतांना निघायच्या  दिवशीच इंडियन एक्सप्रेसमध्ये एक बातमी छापून आली की, विद्यापीठाने अशी घोषणा केली आहे की, ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांनी परीक्षा द्यावी व ज्यांचा झाला  नाही त्यांना एक महिना तयारी करावी. त्यांची परीक्षा महिनाभरानंतर घेण्यात येईल. विद्यापीठाच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडले. जेव्हा मी ही बातमी आनंदीत होऊन मौलाना सिराजुल हसन यांना इज्तेमात सांगितली तेव्हा ते आनंदाने उद्वेलित होऊन उद्गारले की, तुमचा तर फायदा इब्राहीम अलै. यांच्यासारखा झाला. त्यांचा मुलगा जसा जीवंत राहिला  आणि कुर्बानीचे पुण्य पदरात पडले. अगदी तसेच तुम्हाला अधिवेशनाला जाण्याची संधीही मिळाली आणि तुमची परीक्षाही वाया गेली नाही. ते म्हणाले, अल्लाह आपल्या बंद्यांना फक्त  आजमावतो. तुमची नियत स्वच्छ होती म्हणून अल्लाहने अधिवेशन आणि परीक्षा दोन्हीचा लाभ तुम्हाला दिला. मला ही घटना आणि यापासून मिळालेला बोध आयुष्यभर लक्षात राहिल.
एकदा मी त्यांना विचारले की तुम्ही इतके चांगले आहात तर प्रेषित सल्ल. किती चांगले असतील? तेव्हा ते उत्तरले की, मी तर त्यांच्या पायाची धुळीची बरोबरी करू शकत नाही. तेव्हा  मी मनात विचार केला की, प्रेषितांच्या 1400 वर्षानंतर धूळ जर इतकी अमुल्य असेल तर स्वतः प्रेषित किती अमुल्य असतील? प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या विषयी त्यांच्या  मनामध्ये प्रेमाची उत्कट भावना होती. मौलानांना बघितल्या बरोबर अल्लाहच्या कृपेची आठवण येत होती. त्यांच्या एवढा चांगला व्यक्ती मी माझ्या आयुष्यात दूसरा पाहिला किंवा  अनुभवला नाही. त्यांच्या या अचानक जाण्याने इस्लामी जगताचे फार मोठे नुकसान झाले. शेवटी दुआ करतो की, ऐ अल्लाह! मौलानांना जन्नतुल फिरदौसमध्ये स्थान दे. आमीन.

- शब्दांकन
बशीर शेख, एम.आय.शेख.

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget