Halloween Costume ideas 2015

स्वागत रमजानचे

येत्या दोन दिवसात रमजानचे आगमन होत आहे. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. मात्र इतर वर्षांप्रमाणे या वर्षाचे रमजान वेगळे असून, संपूर्ण लॉकडाउनमध्ये रमजानचा महिना आलेला आहे. हा महिना कसा साजरा करावा, यासाठी सरकारने मार्गदर्शक तत्वेही ठरवून दिलेली आहेत. देशाचा कायदा पाळण्याचा आदेश आपल्याला प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या शिकवणीतून मिळतो. म्हणून शारीरिक अंतर राखून लांब राहून हे रमजान साजरे करावे लागणार आहेत. म्हणून पाचवेळेसची नमाज आणि तरावीहची विशेष नमाज मस्जिदमध्ये जावून अदा करणे यावर्षी शक्य होणार नाही, याची खंत आपल्या सर्वांनाच आहे. मात्र कोरोनाला हरविण्यासाठी हृदयावर दगड ठेउन आपल्याला मस्जिदीपासून लांब रहावे लागणार आहे. रमजान म्हटलं की, सार्‍यांची लगबग असते. मार्केटमध्ये प्रचंड उलाढाल होते. रस्त्यावर गर्दी ओसंडून वाहत असते. वेगवेगळे चमचमीत पदार्थांनी हॉटेल आणि गाडे सजलेले असतात. यावर्षी मात्र असे काहीच होणार नाही. एका दृष्टीने जरी हिरमोड करणारी ही परिस्थिती असली तरी दुसर्‍या दृष्टीने आत्मचिंतन करण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. एकांतामध्ये अभ्यास चांगला होतो. रमजानमध्ये कुरआनला समजण्यासाठी एकांताममध्ये अभ्यास करण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. एरव्ही तर कुरआन समजून घेण्याला अनेक लोकांना वेळ नसतो. पण आता ही वेळ चालून आलेली आहे. म्हणून प्रत्येकाने ही संधी सोडू नये. कारण कोणी काहीही म्हणो, कुरआन हीच यशस्वी जीवनाची गुरूकिल्ली आहे.
    अल्लाहवर विश्‍वास ठेवणार्‍या प्रत्येक नागरिकासाठी ही एक चारित्र्यसंवर्धनाची संधीच आहे. आज भारतामध्ये पाश्‍चात्य असभ्यतेचा प्रभाव खोलपर्यंत रूजलेला आहे. पावलापावलावर खोटेपणा, विश्‍वासघातकीपणा, अश्‍लिलता इत्यादी विकारांनी थैमान घातलेले आहे. चांगल्या माणसांना जगणे मुश्किल करून टाकलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये मुस्लिमांचे हे राष्ट्रीय आणि धार्मिक कर्तव्य आहे कि, आपल्या प्रिय देशबांधवांपर्यंत सत्य आणि चांगुलपणाचा संदेश पोहोचविणे. रमजान म्हणताच सगळीकडे एक चैतन्याचे वातावरण निर्माण करते. लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना रोजे ठेवण्याचा उत्साह असतो. दिवसभर उपाशी राहून इबादत केल्याने एका वेगळ्याच आत्मीक आनंदाची अनुभूती होते. वर्षभर जे लोक इस्लामी उपासनेपासून अंतरराखून असतात ते सुद्धा रमजानच्या महिन्यामध्ये मनापासून इबादत करण्यामध्ये तल्लीन होतात. अनेक लोक ठरवून सुट्ट्या घेतात व या 30 दिवसाच्या तजकिया-ए-नफ्स (आत्म्याचे शुद्धीकरण) मोहिमेमध्ये उत्साहाने सहभागी होतात. तसे पाहता प्रत्येक समाजामध्ये उपवास ठेवण्याची प्रथा प्रचलित आहे. मात्र रमजानमधील रोजे हे इतर उपवासापेक्षा प्रत्येक बाबतीत वेगळे असतात. सुर्योदय ते सुर्यास्तापर्यंत कुठल्याही प्रकारच्या पेय आणि पदार्थाचे सेवन न करता राहणे हे केवळ आत्मीक बळानेच शक्य होते. नसता दुपारच्या जेवणाला तासभर उशीर झाला तर सहन होत नाही. रमजानमध्ये मात्र महिनाभर दिवसभर उपाशी राहूनसुद्धा माणसे शांत राहतात. सर्वश्रेष्ठ अल्लाहनी माणसाची रचना दोन गोष्टींपासून केलेली आहे. एक त्याचे शरीर आणि दूसरे त्याची आत्मा. शरीर रक्त, मांस, हाडे यांच्यापासून बनलेले आहे व दृश्य आहे. (उर्वरित  मात्र आत्मा अदृश्य आहे. आत्म्याच्या बाबतीत कुरआनमध्ये म्हटलेले आहे कि, हा आत्मा म्हणजे ’अम्र-ए-रब्बी’ म्हणजेच अल्लाहचा आदेश आहे. ज्याप्रमाणे शरीर आजारी पडते त्याप्रमाणे आत्मा सुद्धा आजारी पडतो. ज्याप्रमाणे शरीराला पोषणाची गरज असते त्याप्रमाणे आत्म्यालाही पोषणाची गरज असते. शरीराचे पोषण अन्न, पाण्याने होते तर आत्म्याचे पोषण इबादते इलाही(अल्लाहच्या उपासने) ने होते. आणि उपासनेचा उत्कृष्ट आविष्कार नमाज आणि रोजा आहे. रोजा ही एक अदृश्य इबादत आहे. एखाद्या माणसाने रोजा ठेवला म्हणजे स्वखुशीने त्यांनी अन्न आणि पाण्याचा त्याग केला. कोणासाठी? फक्त सर्वश्रेष्ठ अल्लाहासाठी. म्हणजे रोजा एक अशी इबादत आहे, ज्याचा संबंध अल्लाह आणि त्याचा बंदा दोघांमध्येच आहे. नमाजला जात असतांना सगळे लोक पाहत असतात. पण रोजा आहे का नाही? हे लोकांना कळत नाही. हे फक्त सर्वश्रेष्ठ अल्लाहला कळते. रोजामुळे तक्वा (चांगले चारित्र्य) वाढतो. लहापणापासून मुस्लिम मुलांना रोजा ठेवण्याची सवय लावली जाते. त्यातून त्यांचे चारित्र्य घडते, ते असे की- लहान मुले जेव्हा रोजा ठेवतात तेव्हा ते अल्लाहला घाबरून संधी असूनही पाणीही पीत नाहीत आणि जेवणही करीत नाहीत. समजा त्यांनी लपून घोटभर पाणी पीले तरी त्यांना कोणी पाहणारा नसतो. मात्र ते स्वमर्जीने अल्लाह पाहत आहे, म्हणून पाणी पीत नाहीत. यात त्यांच्या आत्म्याचे प्रशिक्षण होते. अल्लाहचे भय मनात निर्माण होण्यासाठी मदत होते. हीच मुले मोठी हाऊन देशाचे नागरिक बनतात आणि अल्लाहच्या भयाने वाम मार्गापासून दूर राहतात. लहानपणी जर का पूर्वजाद्वारे व्यवस्थित प्रशिक्षण मिळाले नाहीत तर हीच मुले मोठी झाल्यावर वाईट गोष्टींच्या प्रलोभनांना बळी पडण्याची शक्यता जास्त असते. रोजाचा मूळ उद्देशच चारित्र्य संवर्धन असल्यामुळे या महिनाभरात रोजदारांकडून कसून मेहनत घेतली जाते. भल्या पहाटे उठून मर्जी नसतानांनाही, भूक नसतांनाही केवळ अल्लाहचा आदेश आहे म्हणून काहीतरी खावं लागतं. त्यानंतर दिवसभर इच्छा असूनही, भूक असूनही केवळ अल्लाहचा आदेश आहे म्हणून अन्न आणि पाण्यासारख्या एरव्ही हलाल असलेल्या गोष्टींपासून दूर रहावे लागते. परत त्यात पाच वेळेसची नमाज आली. त्याशिवाय, 20 रकात अतिरिक्त तरावीहची नमाज आली. म्हणजे एकंदरित इबादतीचा भरगच्च कार्यक्रम असतो . मात्र यावेळेस सामुहिक नमाज वगळता बाकीचे सर्व कार्यक्रम ठरल्याप्रमाणे पार पाडता येवू शकतात. त्यातही शासकीय निर्देशांचे पालन काटेकोरपणे करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. 30 दिवसाच्या सततच्या या खडतर जीवन व्यवस्थेमुळे माणसाला एवढी उर्जा मिळते की, पुढच्या रमजानपर्यंत ती टिकते. पुढच्या रमजानपर्यंत 11 महिन्याचा जो काळ असतो त्या काळात येणार्‍या वेगवेगळ्या प्रलोभनांना रोजातून मिळालेल्या उर्जेमुळे मुस्लिम व्यक्ति बळी पडण्याची शक्यता कमी असते. रोजाच्या संदर्भात नुसते उपाशी राहून उपयोग नाही. यासंबंधी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी स्पष्ट मार्गदर्शन केलेले आहे, रोजा फक्त उपाशी राहण्याचे नाव नाही. तर डोळ्याचा रोजा, हाताचा रोजा, पायाचा रोजा, कानाचा रोजा सर्वार्थाने रोजा म्हणजे रोजा ठेवणार्‍याने डोळ्यांनी वाईट पाहू नये, हाताने वाईट करू नये, त्याची पावले वाम मार्गाकडे उठू नये, कानांनी वाईट ऐकू नये, कोणाशी भांडू नये, कोणी भांडायला आला तर त्याला नम्रपणे सांगावे की मी रोजात आहे. एकंदरित ही एक महिन्याची पवित्र जीवनपद्धती रोजा ठेवणार्‍या व्यक्तिस एवढी आत्मीक शक्ती प्रदान करते की, समाजासाठी ती व्यक्ति उपयोगी होवून जाते. आज समाजामध्ये राहणारे अनेक लोक समाजहिताच्या विरूद्ध वागताना दिसून येतात. त्यांचे अस्तित्व समाजासाठी उपकारक ठरण्याऐवजी अपकारक ठरत असते. रोजाच्या माध्यमातून आदर्श व्यक्तिंची निर्मिती करावी, ज्यायोग्य एक आदर्श समाजाची रचना होईल, हाच उद्देश आहे. शऊरी (समजून उमजून) पद्धतीने रोजा ठेवणे यासाठी प्रचंड माणसिक तयारीची गरज लागते. तर मित्रांनों! या दोन दिवसात आपली मानसिक तयारी करून घ्या आणि रमजानच्या स्वागतासाठी तयार व्हा.

- बशीर शेख

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget