Halloween Costume ideas 2015

जीवनात खेळाचे महत्त्व अतुलनीय


भारतीय इतिहासातील महान खेळाडू म्हणून ओळखले जाणारे, मेजर ध्यानचंदजी यांचा वाढदिवस, दरवर्षी २९ ऑगस्ट हा दिवस देशभरात "राष्ट्रीय क्रीडा दिन" म्हणून साजरा केला जातो. १९२८, १९३२ आणि १९३६ मध्ये तीन ऑलिम्पिक सुवर्णपदके मिळवण्याव्यतिरिक्त, ते त्याच्या असाधारण चेंडू नियंत्रण कौशल्ये आणि गोल-स्कोअरिंग पराक्रमासाठी ओळखले जायचे. १९२८ ते १९६४ या कालावधीत भारताने आठपैकी सात ऑलिम्पिकमध्ये फील्ड हॉकी स्पर्धा जिंकली. त्यांच्या असामान्य प्रतिभेमुळे त्यांना हॉकीचा जादूगर म्हणून ओळखतात. त्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत १००० हून अधिक गोल केले. भारत सरकारने १९५६ मध्ये त्यांना पद्मभूषण, देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन सन्मानित केले. भारतातील सर्वोच्च क्रीडा सन्मान, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार त्यांच्या नावावर आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त, खेळांचे महत्त्व आणि खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी देशभरात विविध क्रीडा स्पर्धा, कार्यक्रम आणि चर्चासत्रे मोठ्या उत्साहाने आयोजित केली जातात. आनंद राठी इन्व्हेस्टमेंट बँकिंगच्या अहवालानुसार, क्रीडा उद्योग २०२० मध्ये २७ अब्ज डॉलर वरून २०२७ पर्यंत १०० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याने व्यवसाय पाचपट वाढण्याची अपेक्षा आहे. 

आज बहुतेक लोक आधुनिकतेच्या चक्रात व्यस्त आहेत. आळस, प्रदूषण, भेसळमुळे शारीरिक आणि मानसिक आजार खूप वेगाने वाढत आहेत. आधुनिक संसाधने आणि सोशल मीडियाने तरुणांना मैदानी खेळांपासून दूर नेले आहे. समाजात खेळाची भूमिका केवळ व्यक्तीसाठीच नाही तर सार्वजनिक आरोग्यासाठीही महत्त्वाची बनली आहे. खेळामुळे व्यक्ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत बनते, शिस्त आणि सहभागाची भावना वाढते, उत्साही बनते. खेळापासून चांगल्या स्वास्थकर आहाराची सवयी लागतात, शारीरिक हालचाली आणि व्यायामामुळे रोग टाळण्यास किंवा ते कमी करण्यात महत्वाचा सकारात्मक परिणाम होतो. खेळामुळे ताण-तणावाचे व्यवस्थापन करण्यात मदत होते, नैराश्य आणि चिंता कमी होऊन एकाग्रता सुधारते, मेंदू तल्लख ठेवण्यासाठी खेळामध्ये सक्रिय राहणे आवश्यक आहे. दररोज ३० मिनिटांचा व्यायाम देखील शरीराला आणि मनाला आराम देतो. खेळाचा परिणाम व्यक्तीच्या मनःस्थितीवर आणि झोपेच्या गुणवत्तेवर तसेच संवाद आणि नेतृत्व कौशल्यांवर देखील होतो. खेळांमध्ये भाग घेऊन, आपण चांगल्या मित्रांचा संपर्कात राहू शकतो, खेळात आपल्या वेळेचा चांगला वापर करून बाहेरच्या वाईट सवयी टाळू शकतो. खेळातील सहभागामुळे विचारशक्ती आणि विश्लेषण कौशल्य सुधारते आणि चांगले निर्णय घेण्यास मदत होते. मेंदूला सजग ठेवल्याने त्याची कार्ये करण्याची आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता सुधारते. खेळ आत्मविश्वास वाढवून, संतुलित वजन राखून निरोगी जीवनशैली जगण्याची शक्यता वाढवून सामाजिक कौशल्ये सुधारतात. खेळामुळे एकता आणि सहकार्याची भावना विकसित होते, निरोगी व्यक्ती किंवा खेळाडू हे निरोगी समाज घडवतात आणि निरोगी समाज निरोगी देश बनवतो. प्रत्येक व्यक्तीने दररोज शक्य तितके मैदानी खेळ खेळले पाहिजेत. 

आपला देश लोकसंख्येच्या बाबतीत जगात दुस-या क्रमांकावर आहे, परंतु जागतिक दर्जाच्या क्रीडा महोत्सवांच्या स्पर्धांच्या पदक तक्त्यामध्ये आपण नेहमीच मागे राहतो आणि लहान- लहान देश पदक तक्त्यामध्ये वरती दिसतात. असे नाही की खेळात आपण मागे पडत आहोत, आपली खेळाची कामगिरी पूर्वीपेक्षा चांगली होत आहे. देशात क्रीडा प्रतिभेची कमतरता नाही, देशातील प्रत्येक शहरातून, गल्लीतून, परिसरातून प्रतिभा उदयास येत आहेत, देशात या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या क्षमता ओळखण्याच्या कौशल्याचा अभाव आहे. आज जगभरात क्रीडा प्रतिभेने देशाचे नाव रोशन करणारे बहुतांश खेळाडू हे अगदी सामान्य कुटुंबातील आणि ग्रामीण भागातील आहेत. खेळाडूंना आयुष्यातील वेळेचे मूल्य अधिक चांगले समजते कारण स्पर्धेतील विजेते मायक्रो सेकंदाच्या अंतराने बदलतात. अनेक आर्थिक समस्यांशी लढा देत या खेळाडूने आयुष्यात प्रगती केली आहे. खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि क्रीडा कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून अनेक योजना आणि कार्यक्रम राबवले जातात. शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये खेळाडूंसाठी विशेष कोटा असतो, क्रीडा प्रतिभांचा विशेष सन्मान आहे, विशेष कामगिरीवर खेळाडूंना पुरस्कार आणि पैसे दिले जातात. तरीही देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत खेळांना प्रोत्साहन देण्याचे प्रमाण फार कमी आहे. अनेक गुणवंत खेळाडू आर्थिक अडचणींमुळे खेळापासून दूर जातात. 

खेळ हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे, शैक्षणिक केंद्रातील मुख्य आव्हान म्हणजे क्रीडा क्रियाकलापांमध्ये पारंगत असलेल्या कुशल शारीरिक शिक्षकाची कमतरता. क्रीडा आणि शारीरिक शिक्षण देणाऱ्या शाळांसोबतच प्रत्येक शाळेत शारीरिक शिक्षकांची सतत नियुक्ती करण्यात यावी, याची काळजी घ्यावी लागेल. शैक्षणिक संस्थांमध्ये कुशल क्रीडा शिक्षक असणे ही काळाची गरज आहे. हे केवळ शैक्षणिक संस्थांपुरते मर्यादित नसून प्रशिक्षण केंद्रात शारीरिक शिक्षक आणि प्रशिक्षकांचीही कमतरता आहे. शारीरिक शिक्षण किंवा क्रीडा शिक्षणासाठी मार्गदर्शन आवश्यक आहे. योग्य मार्गदर्शनाअभावी खेळाडूंची तयारी कशी होणार? कुशल शारीरिक शिक्षकाचा अभाव ही क्रीडा शिक्षणाच्या भवितव्यासाठी मोठी समस्या आहे. मुलांना त्यांचे आवडते खेळ ओळखण्यात, त्यांची कौशल्ये समजून घेण्यात आणि नंतर त्यांना त्यात पारंगत करण्यात शिक्षकांची मोलाची भूमिका असते. खेळाच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, विवाद व्यवस्थापन, टीम बांधणी, स्वस्थ स्पर्धा आणि शिस्त यांसारखे गुण विकसित होतात. खेळामुळे व्यक्तीला सामान्यातून संपूर्ण व्यक्तिमत्वाकडे जाण्याचा मार्ग मोकळा होतो.

अनेक आंतरराष्ट्रीय पदक विजेते खेळाडू आणि पॅरालिम्पिक खेळाडू आज आर्थिक परिस्थितीशी झुंजत आहेत, कुटुंबाचे उदरनिर्वाह करण्यासाठी जे काही मिळेल ते काम करत आहेत, तर काही जण निनावी जीवन जगत आहेत. त्यांना नोकरी, शासकीय मदत किंवा क्रीडा प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी. आपल्या देशात क्रिकेटशिवाय आता इतर अनेक खेळ लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. देशातील सर्व प्रकारच्या खेळांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे, त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रोत्साहन द्यावे. देशातील नवीन क्रीडा प्रतिभा शोधण्यासाठी आणि त्यांना लोकांसमोर आणून योग्य व्यासपीठ देण्यासाठी राष्ट्रीय खेल प्रतिभा टीव्हीचॅनल्स सुरू केले पाहिजेत, जे देशाच्या कानाकोपऱ्यातून नवीन खेळाडू शोधण्यासाठी पूर्णपणे समर्पित असावे.

देशातील प्रत्येक जिल्ह्यात शासनामार्फत चालविण्यात येणारी आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रीडा प्रशिक्षण केंद्र असावीत. अशा सर्व केंद्रांवर जागतिक दर्जाचे पदक विजेत्या खेळाडूंनी प्रशिक्षकाची भूमिका बजावली पाहिजे. अशा केंद्रामार्फत जागतिक दर्जाचे प्रशिक्षण जिल्ह्यातील सर्व गावे व शहरातील नवीन खेळाडूंना मिळणार. सध्याच्या काळात अभ्यासासोबत खेळ देखील खूप गरजेचे आहे. पालकांनी मुलांमधील कलागुण ओळखून त्यांना खेळात सक्रिय होण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. मुले खेळात नाव कमवून चांगले करिअर करू शकतात. खूप खेळा, निरोगी राहा, मजबूत राष्ट्र घडवा.


- डॉ. प्रितम भी. गेडाम

भ्रमणध्वनी क्र.- 82374 17041


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget