Halloween Costume ideas 2015

मौलाना जलालुद्दीन उमरी यांचे शेवटचे तीन उपदेश


’’माणसाने सतत आत्मपरिक्षण करत रहावे. कुरआन आणि हदीसमध्ये बराच वेळा समाज किंवा समाजगटांना सामुहिकरित्या संबोधित केले गेलेले आहे. म्हणून आपल्याला वाटते की, ते संबोधन आपल्याला व्यक्तिगतरित्या थोडेच केलेले आहे. म्हणून नियमितपणे आपले आत्मपरिक्षण करत राहणे गरजेचे होवून जाते. ज्यामुळे सामुहिक संबोधनातूनही आपल्यावर येणाऱ्या जबाबदारीची जाणीव आपल्याला होत राहील.’’

कोरोना काळात अनेक लोक आपल्याला सोडून गेले. आता जो अवधी आपणास मिळालेला आहे त्याबद्दल ईश्वराचे आभार मानावे तितके कमीच आहेत. या अवधीचा दुसरा अर्थ असा आहे की, ईश्वर आपल्याकडून अधिक काम घेऊ इच्छितो. आता जेव्हा ही संधी आपल्याला मिळालेलीच आहे तर आपली जबाबदारी वाढलेली आहे हे लक्षात घेऊन आपल्याला काम करावे लागेल. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे निर्देश आहेत की, ‘‘अंतिम निवाड्याच्या दिवशी कोणालाही एक पाऊलसुद्धा पुढे टाकता येणार नाही, जोपर्यंत तो या तीन प्रश्नांची उत्तरे देणार नाही. 1. आयुष्य कुठे व्यतीत केले? 2. तुला मिळालेल्या ज्ञानावर किती अंमलबजावणी केली? 3. संपत्ती कोठून मिळविली आणि कोठे खर्च केली?’’

प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या वरील निर्देशाचे बारकाईने अवलोकन केल्यास आपल्या लक्षात येईल की, आपल्याला मिळालेल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा हिशोब द्यावा लागणार आहे. कल्पना करा की तो हिशोब किती कठोर असणार आहे. ईश्वराकडे प्रार्थना करतो की, आमच्याकडून सोपा हिशोब घ्यावा. 

:पहिला उपदेश :

ईश्वराची पुन्हा संपर्क स्थापित करा

समाजाला कठीण काळामध्ये अनेक उपाययोजना कराव्या लागतात. त्यापैकी एक उपाय म्हणजे ईश्वराशी नव्याने संपर्क प्रस्थापित करणे होय. सब्रहे संयम आणि शौर्याचे नाव आहे. व्यवस्था परिवर्तनाच्या मार्गात ज्या अडचणी आणि चाचण्या (आजमाईशें) येतात त्यांना तोंड देतांना परिस्थितीपुढे दृढतेने पाय रोऊन उभे राहणे गरजेचे असते. जेव्हा जो समाज धैर्याचा परिचय देतो तेव्हा त्या समाजाला ईश्वरीय मदत मिळते आणि ज्या समाजाला ईश्वरीय मदत मिळते त्या समाजाला कोणीही परास्त करू शकत नाही. ईश्वराने आपल्या ग्रंथात स्पष्टपणे म्हटलेले आहे की, 

‘‘अल्लाह तुमच्या मदतीला असेल तर कोणतीही शक्ती तुम्हावर वर्चस्व प्राप्त करणार नाही, आणि जर त्याने तुम्हाला सोडून दिले, तर त्यानंतर असा कोण आहे जो तुम्हाला मदत करू शकेल? तर मग जे खरे श्रद्धावंत आहेत त्यांनी अल्लाहवरच विश्वास ठेवला पाहिजे.’’  (सुरे आलेइमरान 3: आयत नं. 160)

आयुष्याच्या नाजुक प्रसंगी सब्र अर्थात धैर्याने उभे राहणे सोपे नाही. पण नमाजमधून हे धैर्य अदृश्य स्वरूपात आपल्याला मिळते. नमाजसंबंधी कुरआनमध्ये खालील निर्देश आलेले आहेत. 

‘‘संयम व नमाजाचे सहाय्य घ्या. निःसंशय नमाज हे अत्यंत कठीण कर्म आहे. परंतु त्या सेवकांसाठी कठीण नाही (सुरे बकरा क्र. 2: आयत नं. 45) जे जाणतात की सरतेशेवटी आपल्या पालनकर्त्याला भेटावयाचे आहे. आणि त्याच्याचकडे परत जावयाचे आहे.’’ (सुरे बकरा (2) : आयत नं. 46)

या ठिकाणी औपचारिक नमाजचा उल्लेख नसून खऱ्या नमाजचा उल्लेख आहे जिला आयुष्यात कायम स्थान देणे सोपे नाही. मात्र हे त्यांच्यासाठी सहज शक्य आहे. ज्यांच्यामध्ये खुशू (अंतःकरणाची शांती) व खुजू (गात्रांची शांती) असते आणि जे ईश्वराची मनापासून भक्ती करतात. खरे तर नमाजच त्या वैशिष्ट्यांनी भरलेली आहे जी वैशिष्ट्ये नमाज धारण करणाऱ्या समाजाला पतनाच्या खाईतून खेचून उत्कर्षाच्या शिर्ष बिंदूवर प्रस्थापित करू शकतात. आपल्या समाजाचे कल्याण आणि भरभराट ही सुद्धा नमाजशीच संबंधित आहे. संयमाचे मूळ नमाज आहे. ईश्वराच्या विशेष भक्तांचे हे वैशिष्ट्ये मानले गेले आहे की ते आपले आयुष्य नमाजच्या अवतीभवतीच केंद्रित करतात. ईश्वराने आपल्या ग्रंथात म्हटले आहे की,  ‘‘जे आपल्या नमाजात नेहमी नियमितपणा ठेवतात (सुरे अलमारिज 70 : आयत नं.23) आणि जे आपल्या नमाजचे रक्षण करतात,(सुरे अलमारिज 70 : 34)

हदीसमध्ये नमाजला मुस्लिमांचा उत्कर्षबिंदू म्हटलेले आहे. जी माणसाला चारित्र्याच्या आभाळाएवढ्या उंचीवर पोहोचविते. नमाज म्हणजे ईश्वराचे नामस्मरण ही आहे. नमाजमुळे माणूस ईश्वराच्या जवळ जातो. दुर्दैवाने आपल्या जीवनात आपण नमाजला ते स्थान देऊ शकलेलो नाही जे की द्यायला हवे होते. ते दिले असते तर आज आपल्या जीवनाची दिशा वेगळी असती. आपले जीवन अध्यात्मिक राहिले असते. त्यामुळे माणुसकीचा विकास झाला असता. 

उपदेश क्रमांक 2 : आत्मपरिक्षण करा

मौलाना सय्यद जलालुद्दीन उमरींचा दुसरा उपदेश असा की, ’’माणसाने सतत आत्मपरिक्षण करत रहावे. कुरआन आणि हदीसमध्ये बराच वेळा समाज किंवा समाजगटांना सामुहिकरित्या संबोधित केले गेलेले आहे. म्हणून आपल्याला वाटते की, ते संबोधन आपल्याला व्यक्तिगतरित्या थोडेच केलेले आहे. म्हणून नियमितपणे आपले आत्मपरिक्षण करत राहणे गरजेचे होवून जाते. ज्यामुळे सामुहिक संबोधनातूनही आपल्यावर येणाऱ्या जबाबदारीची जाणीव आपल्याला होत राहील. या संबंधी कुरआनचा स्पष्ट आदेश आहे की, ‘‘हे लोकहो ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे, अल्लाहच्या प्रकोपाचे भय बाळगा आणि प्रत्येक इसमाने हे पाहावे की त्याने उद्यासाठी काय सरंजाम केला आहे. अल्लाहच्या प्रकोपाचे भय बाळगत रहा. अल्लाह खचितच तुमच्या त्या सर्व कृत्यांची खबर राखणारा आहे जी तुम्ही करता.’’  (सुरे अलहश्र 59: आत नं. 18)

वरील आयातीत नमूद भय आपल्यात आहे का? आहे तर कितपत आहे? याचे नियमित आत्मपरिक्षण करत राहिल्यास माणसाचा पाय घसरत नाही. तो गुन्हेगारीकडे वळत नाही. अनैतिक कृत्य सुद्धा करत नाही. या आयातीमध्ये समस्त मुस्लिमांना संबोधित करून म्हटले आहे की, प्रत्येक ईमानधारकाने अल्लाहची भीती बाळगावी. ईश्वरीय आदेशाचे पालन करावे. वाईट कृत्यापासून दूर रहावे. नमाज एक असा आरसा आहे ज्यात माणूस आपल्या चारित्र्याचे प्रतिबिंब पाहू शकतो. याच आयातीमध्ये प्रत्येक ईमानधारकाला आत्मपरीक्षण करण्याची सूचना दिलेली आहे. असे करणे चारित्र्य संवर्धनाच्या दिशेने उचललेले पहिले आणि महत्वपूर्ण पाऊल आहे. यानंतरच चारित्र्य संवर्धनाचा पुढचा टप्पा सुरू होतो. हीच पायरी ओलांडली नाही तर पुढच्या पायऱ्यांवर पोहोचणे अशक्य होऊन जाते. 

ईश्वरीय संदेश सर्वांपर्यंत पोहोचवा

ईश्वराचे प्रेषित सर्वांपर्यंत - ईश्वरीय संदेश पोहोचविण्यासाठी कायम प्रयत्नशील राहत होते. त्यांना समाजाची काळजी वाटत असे. त्यांना वाटे की लोकांनी ईश्वराचा संदेश स्वीकारावा आणि त्याच्या कोपापासून दूर रहावे. प्रेषित मुहम्मद सल्ल. याबाबतीत एवढे चिंतीत राहत की, त्यांना उद्देशून ईश्वराने स्वतः म्हटलेले आहे की, ‘‘बरे तर हे पैगंबर (स.)! तुम्ही यांच्या मागे दुःखापायी आपले प्राण गमावणार आहात, जर यांनी या शिकवणुकीवर श्रद्धा ठेवली नाही?’’  (सुरे अलकहफ 18: आयत नं. 6)

’’हे पैगंबर (स.), कदाचित तुम्ही या दुःखाने आपले प्राण गमावून बसाल की हे लोक श्रद्धा ठेवत नाहीत. ’’ (सुरे अश्शुअरा 26: आयत नं. 3)

बुखारीच्या हदीस संग्रहामध्ये प्रेषित सल्ल. यांच्यासंबंधीचा एक प्रसंग नमूद केलेला आहे. ज्यात प्रेषित सल्ल. म्हणतात की, ’’माझे उदाहरण त्या व्यक्तीसारखे आहे जो पाहतो की, एक मोठा वणवा पेटविला गेला आहे आणि किटक ज्याप्रमाणे अग्नीकडे आकर्षित होतात तसे लोक त्या वणव्याकडे आकर्षित होवून पळत सुटलेले आहेत आणि मी एकेकाच्या कमरेला धरून मागे खेचून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र माझ्या या प्रयत्नांती सुद्धा अनेक लोक त्या वणव्यात जळून भस्म होत आहेत.’’ 

ईश्वराचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या संबंधाने आपण प्रयत्नशील जरूर असतो परंतु प्रेषित सल्ल. यांच्यामध्ये जी तडप होती ती आपल्यामध्ये नाही. आपल्याला याकडे लक्ष दिले पाहिजे. यामुळे आपला पुढचा मार्ग सोपा होईल. 

प्रामाणिकपणा धर्माचा आत्मा आहे. यासंदर्भात ईश्वराने सुरे जुमर च्या पहिल्या तीन आयातीमधून आपले लक्ष वेधले आहे.

1. ’’या ग्रंथाचे अवतरण महान व बुद्धिमान अल्लाहकडून आहे.’’

2. ‘‘(हे पैगंबर (स.)) हा ग्रंथ आम्ही तुमच्याकडे सत्याधिष्ठित अवतरला आहे. म्हणून तुम्ही अल्लाहचीच भक्ती करा, धर्माला त्याच्यासाठी निर्भेळ करताना.’’

3. ‘‘सावधान, विशुद्ध धर्म हा अल्लाहचा अधिकार आहे. उरले ते लोक ज्यांनी त्याच्याशिवाय इतरांना वाली बनवून ठेवले आहे (आणि आपल्या या कृतीचे समर्थन असे करतात की) आम्ही तर त्यांची उपासना केवळ एवढ्यासाठीच करतो की आम्हाला अल्लाहचे सान्निध्य लाभावे. अल्लाह निश्चितच त्यांच्यादरम्यान त्या सर्व गोष्टींचा निर्णय लावील ज्यात ते मतभेद दर्शवीत आहेत. अल्लाह अशा कोणत्याही इसमाला मार्गदर्शन करीत नसतो जो खोटा आणि सत्याचा इन्कार करणारा असतो.  (सुरे अज्जुमर क्र. 39 : आयत नं. 1 ते 3)

या आयातींमध्ये म्हटलेले आहे की, ’’ हा ग्रंथ ईश्वराकडून अवतरित करण्यात आलेला आहे. तो जबदरस्त आणि शक्तीशाली आहे. त्यामुळे हा ग्रंथ आपले वर्चस्व कायम राखील. याच्या अवतरणाचा उद्देश पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. तो शासक आहे. हा ग्रंथ तर्कांनी सजविलेला आहे. हे प्रेषित मुहम्मद सल्ल. लक्षात ठेवा हा ग्रंथ सत्य आहे आणि याचा आग्रह आहे की, सर्वांनी ईश्वराची भक्ती प्रामाणिकपणे करावी. भक्ती ईश्वरासमोर नमण करणे आणि त्याच्या आदेशांवर कुठलीही हरकत न घेता पालन करणे याचे नाव आहे. दीन या शब्दात भक्ती आणि आज्ञापालन दोन्ही गोष्टी सामील आहेत. या दोन्हींमध्ये प्रामाणिकपणा जरूरी आहे. आणि या दोन्ही गोष्टी भक्ती आणि आज्ञापालन या ग्रंथांच्या मार्गदर्शनाप्रमाणेच व्हावे मनाप्रमाणे नाही. अन्यथा जीवनाची दिशाच दुसरीकडे जाईल. देखावा किंवा प्रसिद्धी या दोन गोष्टी प्रामाणिकपणाच्या एकदम विरूद्ध आहेत. जेथे या दोन गोष्टी आल्या तेथे प्रामाणिकपणा संपतो. त्यानंतर मोठ्यात मोठे काम केले तरी ईश्वराच्या नजरेमध्ये त्याला काही मूल्य राहत नाही. 

एक प्रसिद्ध हदीस आहे ज्यात म्हटलेले आहे की, ’’सर्वात अगोदर तीन माणसं हिशोबासाठी ईश्वराच्या समोर उभे केले जातील. त्यातील एक क़ारी (कुरआनच्या आयाती सुरेल पद्धतीने आळवणारा) दूसरा शहीद आणि तीसरा सखी (दानशूर) या तिघांनाही ईश्वराने जी कृपा केली होती त्याची त्यांना आठवण करून दिली जाईल आणि मग विचारले जाईल की या कृपेचा तुम्ही कसा वापर केला? ते आपली कामगिरी नमूद करतील तेव्हा ईश्वर त्यांना म्हणेल, ’’हा सर्व देखावा होता तुम्ही त्याद्वारे लोकांकडून दाद मिळण्याची अपेक्षा करत होतात. ते केवळ माझ्यासाठी नव्हते. त्यामुळे तुमची ही कामगिरी रद्द करण्यात येत आहे.‘‘ ईश्वरीय आदेश होईल की यांना नरकात टाकून द्या. अल्लाह आपल्या सर्वांचे अशा कृत्यापासून रक्षण करो. एकदा प्रेषित सल्ल. यांनी सांगितले की, ’’मी शिर्क (ईश्वरामध्ये दुसऱ्याला भागीदार ठरविणे) पासून सर्वात जास्त अलिप्त आहे. ज्या व्यक्तीने शिर्कची कृती केली आणि त्यात मला सामील केले तर मी त्याचा आणि त्याच्या कृती दोहोंचा त्याग करेन.’’ 

ईश्वराने फर्माविले आहे की, ’’हे पैगंबर (स.)! सांगा, मी तर एक मनुष्य आहे तुम्हासारखाच, माझ्याकडे ’दिव्यबोध’ पाठविला जातो की तुमचा परमेश्वर केवळ एकच परमेश्वर आहे. म्हणून जे कोणी आपल्या पालनकर्त्याच्या भेटीची आशा करील त्याने सत्कृत्ये करावीत आणि भक्तीमध्ये आपल्या पालनकर्त्यासमवेत इतर कोणाला भागीदार करू नये.’’  (सुरे अलकहफ 18: आयत नं. 110).

अर्थात हे की, ज्या व्यक्तीला या गोष्टीचा विश्वास असेल की, त्याची ईश्वराशी निश्चितपणे भेट होणार आहे त्याची कृती स्पष्ट असावी. शिर्क आणि दिखाव्यापासून दूर असावी. द्वितीय खलीफा हजरत उमर रजि. दुआ करत की, ‘‘ऐ अल्लाह ! माझ्या प्रत्येक कृतीला चांगली बनव आणि तिचा स्वीकार कर आणि त्यात दुसऱ्याचा कोणाचा हिस्सा नसावा.’’ आपल्याला सुद्धा ही दुआ पुन्हा-पुन्हा करणे गरजेचे आहे. आपली कृती प्रामाणिक ठेवण्यासाठी असे करणे गरजेचे आहे. 

जमाअते इस्लामी हिंदच्या वरीष्ठ कार्यकर्त्यांच्या तीन दिवसीय शिबिरात जे की, 27 ते 29 मे 2022 मध्ये नवी दिल्ली येथे झाले होते. त्यात वरील तीन उपदेश मौलाना जलालुद्दीन उमरी यांनी केले होते.

भावार्थ : एम. आय. शेख


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget