Halloween Costume ideas 2015

मराठीतील प्रसिद्ध कवी गणेश विसपुते : संमेलनाध्यक्षांचे भाषण (भाग २)


‘माणसाचा वेळच संपून गेलाय’ अशी दिलीप चित्र्यांच्या कवितेतली एक ओळ आहे.

सामूहिक स्मृतीचं मेमरी कार्ड कालबाह्य झालंय. इतक्या वेगानं, भराभर दृश्यं बदलताहेत की आपल्याला विचलित करून गेलेलं आदलं दृश्य कोणतं होतं हेही सामूहिक स्मृतीच्या मेमरीकार्डात उमटत नाही. अगदी अलीकडे आपण पाहिलेले शेतकऱ्यांच्या अनवाणी आणि जखमी पायांनी भरून गेलेले राजधान्यांपर्यंतचे रस्ते निर्मनुष्य झालेले आहेत. वसतिगृहात जिथं विद्यार्थ्यांचं रक्त सांडलं होतं, ती वसतिगृहं, ते परिसर- सगळीकडे शुकशुकाट आहे. ज्या वस्त्यांमधली घरं जाळली गेली, तिथली राख थंड झाली असेल, तिथं कधीतरी राहिलेली, जगण्यासाठी किडूक मिडूक कामं करीत जगणारी माणसं कधीच कबरीत जाऊन निजली, त्यांची माती झाली. मुंग्या-किटकांनी खाऊन टाकलं त्यांना. निवारा नाही आणि अन्नाची शक्यता नाही म्हणून हजारो मैल पायी निघालेल्या कामगारांच्या हजारोंच्या दिंड्या आपल्याच विठोबा नसलेल्या पंढरपूराकडे निघालेल्या दिसल्या.

दोन-दोन हजार किलोमीटरचा प्रवास करून आपल्या गावात परतलेला एक दमून भागलेला माणूस आपल्या घराच्या गंजलेल्या दाराची कडी काढतांनाचं एकही दृश्य दिसलं नाही. अन्नछत्रांसमोर चूपचाप, अंतर राखून उभे राहिलेल्यांकडे पाहातांना असं वाटत होतं की वाटतं, की ते जगाच्या अंतापर्यंत तिथं रांगेत राहावं लागण्याच्या स्थितप्रज्ञतेनं तिथं उभे आहेत. धूसर झालेल्या आशांमध्ये स्थितप्रज्ञता बधिर होऊन थिजून जाते. परवा परवापर्यंत सतत आपल्या डोळ्यांसमोर दिसणारी ही सगळी दृश्यं कुणाच्याही लक्षात न येता हळूहळू अदृश्य होत गेली.

सामान्यांची माहिती-बोटांचे ठसे, डोळ्यांची छबी आणि इतर सगळी माहिती- विकून गब्बर होणाऱ्या अवाढव्य बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हातचलाखीच्या खेळाचा हा काळ आहे. वेगवान तंत्रज्ञानानं मानवी मेंदूचा कब्जा घेतल्यावर करूणा, शील, प्रज्ञा, मैत्त यांचं महत्वच लक्षात येईनासं होतं. कोणालाही खतम करून टाकण्याचे डिजिटल खेळ खेळणं हेच व्यसन लागलेले सत्ताधारी आणि तोच खेळ आपापल्या सेलफोनवर खेळणारे आबालवृद्ध असा सारीपाट जगभर सज्ज आहे. ह्या विरूप नेपथ्यात आपण सगळे अंताक्षरी खेळू, इ. बाष्कळ उपदेश गंभीरपणे केले जातात. आणि त्या अंताक्षरीच्या एका आवर्तनात काही नद्या, काही पर्वत-त्यातल्या खनिजांसकट आणि लाखो एकर जमीन धरणं, महामार्ग, अधिक वेगवान महामार्ग ह्यासाठी परस्पर विकली जाते. चर्चेशिवाय कामगार कायदे रद्द होतात आणि तरूण मुलं आपल्या सुरक्षित भविष्याच्या चिंतेऐवजी धार्मिक चिन्हांच्या मारामारीत गुंतून जातात. असुरक्षित भविष्य असणारे संपूर्ण जगणंच अनिश्चित असणारे करोडो लोक हेच आजच्या श्रमिकांचं रूप आहे. आता ते रोज त्याच ठिकाणी कामावर जाणारे कामगार नाहीत-तर ते प्रिकॅरियट बनले आहेत- त्यांच्या आर्थिक  वास्तवाची भरपूर चर्चा दिसते. परंतु, ही अस्थिरता, असुरक्षितता जगभर एक असुरक्षित, अस्थिर मन निर्माण करते, हे लक्षात घ्या.    

माणसांना मारणं आणि सुटून उजळमाथ्यानं अभिमानानं मिरवणं ही रीत झाली आहे. भारतात ट्रिलिअन डॉलर्सचे मालक आहेत हे सांगितलं जातं आणि त्याचं दुसरं टोक अंधारात हरवलेलं आहे हे कुणाला लक्षात येत नाही.

हंगर नावाची एक शॉर्टफिल्म आहे. त्यात एक ओंगळ ढेरपोट्या दाखवला आहे. तो सतत वस्तू खात सुटलेला आहे. तो पाशवी रीतीनं समोरच्या टेबलावरचे खाद्यपदार्थ खातो, टेबल खातो, अन्न देणाऱ्या मुलीला खातो. तो सतत खात आहे. तसेच आता खा-खा सुटलेले प्राणी जमिनी खाताहेत, सामान्यांच्या बचती खाताहेत, शेतकऱ्यांच्या विम्याचे पैसे खाताहेत, जंगलं खाताहेत, आदिवासींना लुटून खाताहेत, पैसे तर खात आहेतच, माणसं खाताहेत, निसर्ग ओरबाडून अधाशासारखा खाताहेत. जे जे दिसेल ते ओरबाडत खात राहाणं हीच एक अमानुष क्रिया फक्त करण्यासाठी आपण जन्मलो आहोत असं समजून हे चाललेलं आहे. अडीचेक हजार शेतकरी वर्षाला आत्महत्या का करतात ही साधी गोष्ट कुणाला जाणवतही नाही यावर कोणाचा विश्वास बसेल? विशेष म्हणजे काहीही केलं तरी आपलं काहीही वाकडं होत नाही याची उद्दाम मग्रुरी आहे.

प्रतिमांचा पूर आणि बधिरीकरण

प्रतिमांचं नवंच युग आहे. सगळीकडे प्रतिमांचे आरसे तुम्हाला टिपायलाही टपलेले आहेत. आरोग्यासाठीचं अॅप, स्विगीसाठीचं, झोमॅटोसाठीचं, अमुकसाठीचं अॅप, तमुकसाठीचं अॅप, तुमचं क्रेडिट कार्ड, तुमचा फोन या सगळ्यांतून एक अदृश्य डोळा पाहातोय तुमच्या इतिहास-वर्तमानाचा, तुमचं जन्म-मरणाचा एक्स रे विनासायास. सामाजिक माध्यमांतलं व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य वगैरे ऐकून सत्ताविसाव्या मजल्यावर राहाणारा गबदूल माणूस हसतो आणि ती माध्यमं विकत घेतल्याचा कागद लॉकरमध्ये ठेऊन देतो. ज्यां बॉद्रिला नावाचा एक फ्रेंच समाजशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ होता, त्यानं आजच्या या मायावी जगाबद्दल लिहितांना असं म्हटलं आहे की, "जे अदृश्य आहे त्याच्या अनिवार आकर्षणाशिवाय आपल्याकडे काहीही उरलेलं नाही. आणि यामुळे आपल्या नजरेसमोर एक खोटी, काल्पनिक स्वायत्तता उभी राहाते. मासमिडिया मालकांनी समाजावर ताबा मिळवला आहे. माध्यमातून जे आभासी वास्तवाचं चित्र आपल्याला दिसतं, खोटे घडवून आणलेले लष्करी हल्ले असतील, धादांत असत्याची चित्रणं असतील, ह्या सगळ्याला विरोध करण्याची शक्यता नष्ट करण्यात येत आहेत. अतिप्रगत तंत्रज्ञानाच्या वास्तवातल्या वापरानं वास्तवाचा अर्थच बदलून जातोय. अनेक गोष्टींमधले अर्थच हरवून टाकण्याची कारस्थानं रोज अंमलात येत आहेत. त्यातून येणाऱ्या अशा विषादानं आपण आज भिजलेलो आहोत." 

'वन हन्ड्रेड इअर्स ऑव्ह सॉलिट्यूड' अर्थात् एकांतवासाची शंभर वर्षं ही गॅब्रिअल गार्सिया मार्क्वेझ यांची नोबेल पुरस्कारप्राप्त कादंबरी आहे. त्यातल्या चौदाव्या प्रकरणातला एक भाग अलीकडे मला पुन्हा पुन्हा आठवतो. जुझे अर्काडिओ सेगुन्दो ह्या नावाच्या कामगारानं केळीच्या बागांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना संघटित करून संप करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. सगळ्या म्हणजे तीन हजार कामगारांना वाटाघाटींसाठी मैदानावर बोलावलं जातं. मैदानावरच्या त्या जाहीर सभेत लेफ्टनंट इसाका हा सगळा संपच अवैध असल्याचं सांगून कामगारांनी तो पाच मिनिटात मागं घ्यावा असं सांगितलं जातं. काही मिनिटांतच कामगारांवर मशिनगन्सच्या गोळ्यांचा वर्षाव होतो. तिथं म्हातारी माणसं असतात, लहानगी बाळं असतात, स्त्रिया असतात. लष्करी मशिनगन्स या जित्याजागत्या तीन हजार माणसांची चाळण करून त्यांना निर्जीव प्रेतांमध्ये बदलून टाकतात. अर्थातच मकॅन्डोत मार्शल लॉ जाहीर होतो. या नरसंहारानंतर काही काळानं सेगुन्दो डोळे उघडून पाहातो तेव्हा त्याला कळतं की आपण प्रेतांनी खचाखच भरलेल्या लांबलचक आगगाडीत प्रेतांच्या ढिगाऱ्यावर अस्ताव्यस्त पडलेलो आहोत. त्याच्या लक्षात येतं, सडकी केळी जशी फेकली जातात तशीच आगगाडीतली ही हजारो प्रेतं थोडाच वेळात समुद्रात फेकली जाणार आहेत. जुझे अर्काडिओ कसाबसा ट्रेनवरून अंधारात उडी मारून निसटतो आणि जखमी अवस्थेत तिथून उलटा प्रवास करत पहाटे फटफटतांना मकॅन्डोला पोहोचतो. 

एक स्त्री त्याला भेटते. तिच्याशी तो झालेल्या नरसंहाराबद्दल तो बोलू पाहातो. तर असं काही इथं झालेलंच नाही असं ती त्याला ऐकवते. तो लोकांशी बोलतो. प्रत्येक जण तेच सांगतो. मकॅन्डोत प्रत्येकाची स्मृती आणि मती हरवली आहे हे पाहून तो भयभीत होतो. सरकारी निवेदनातूनही हेच सांगितलं जातं की इथं कुणीही मृत्यू पावलेलं नाहीय. सरकारी अधिकारी त्याला वेड्यात काढतात. तू नक्कीच स्वप्न पाहिलं असेल. मकॅन्डोत असं कधी झालेलं नाही आणि कधीही होणार नाही. इथं सगळे आनंदी आहेत. चांगले दिवस आलेले आहेत. मकॅन्डोवर सतत एक कंटाळवाणा पाऊस चिकचिकत पडत असतो. त्या पावसात नरसंहारात वाहिलेलं रक्त धुतलं जातं. मरून पडलेली बायामाणसं जणू अदृश्यच होतात आणि त्यांच्याबद्दल कुणीही काही बोलत नाही. 

हे ऐकून तुम्हाला काही ओळखीचं आठवतंय?

मार्केझच्या कादंबरीतला हा भाग अलीकडे मला दुःस्वप्नासारखा सतत आठवतो. नव्हे, ती दुःस्वप्नं प्रत्यक्ष वास्तवात दिसू लागलेली आहेत. आपल्याकडेही, एवढं सगळं होवून मराठीतल्या एक प्रस्थापित लेखिका खुलेआम विचारतात, कुठे आहे या देशात हुकूमशाही? अभिव्यक्तीस्वातंत्र्याची कुठे आहे दडपशाही? तेव्हा माझ्यासारखा माणूस स्तब्ध होतो. लेखकपणाच्या प्राथमिक शर्तीचाच असा भंग झाल्याचं पाहून क्षोभ होतो. माझ्यासारखीच अवस्था सदैव जागा असलेल्या जयंत पवार या लेखक मित्राची झाली होती. मग ही कोणती शाही आहे ते तरी सांगा, असं उद्विग्न होऊन त्यानं विचारलं होतं. 

अन्यत्व, असहमती आणि सहिष्णुता

आपण इतका चिरफाळलेला, इतका असहिष्णू झालेला समाज नव्हतो. अलीकडेच रोमिला थापर यांच्या निबंधांचं एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहेः व्हॉईसेस ऑफ डिसेंट. त्याचं मिलिंद चंपानेरकरांनी केलेलं असहमतीचे आवाज या शीर्षकाचं मराठी भाषांतरही आता उपलब्ध आहे. त्यात थापर असं म्हणतात की, "असहमती ही काही आधुनिक काळातली संकल्पना नाहीये, परंतु,  असहमतीचे विविध आकृतीबंध ओळखणं ही गोष्ट मात्र या काळासाठी नवी आहे. प्राचीन काळापासून असहमतीचं तत्त्व उपस्थित राहात आलेलं आहे. ज्या देशात उदारमतवादी, लोकशाहीवादी समाज असतो, तिथं असहमती व्यक्त करणारे प्रश्न विचारले जातात, तेव्हा भुवया उंचावल्या जात नाहीत. तर चर्चेद्वारे अशा प्रश्नांची तड लावण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार आता सार्वजनिक आहे आणि कुणीही नागरिक तो अधिकार बजावू शकतो. पूर्वी हा अधिकार केवळ सामर्थ्यवानांना होता. आता तो सर्व नागरिकांना आहे...लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला समान दर्जा अभिप्रेत असल्याने लोकशाही ही धर्मनिरपेक्ष असू शकते. असहमतीचा अधिकार आणि सामाजिक न्यायाची मागणी या खऱ्या लोकशाही संकल्पनेच्या गाभ्याशी असलेल्या गोष्टी आहेत. कारण त्यात सर्व नागरिकांचा समावेश असतो आणि कायदेशीरदृष्ट्या समान दर्जा प्राप्त झाल्यानं लोकशाही ही धर्मनिरपेक्ष असण्याव्यतिरिक्त अन्य काही असूच शकत नाही."

इथं नागरिक हा केंद्रस्थानी आहे. त्याचं हित, त्याचे अधिकार आणि कर्तव्यं ही सर्वोपरी आहेत. एकाच समाजात विविध विचार आणि मतं असलेले लोक एकत्र राहात आलेले आहेत. त्याच्यात घर्षणंही झाली असतील, पण परस्परांबद्दलचा आदर मनुष्यत्वाच्या कसोटीवर केला गेलेला आहे. एकाच समाजात आस्तिक, नास्तिक, शाकाहारी-मिश्राहारी, विविध श्रद्धा बाळगणारे असे लोक एकाच वेळी राहात असतात. हा समाजाचा सामूहिक अवकाश असतो. समतेच्या मूल्यात कुणा एकाचं वर्चस्व मान्य केलं जाऊ शकत नाही. आज धार्मिक भावना किंवा अस्मिता दुखावण्याचे बहाणे किंवा निमित्तं करून विरोधी मतांच्या विचारांचे कार्यक्रम बंद पाडले जातात. नाटकं, चित्रपट, पुस्तकं यांच्यावर अवैध सेन्सॉरशिप लादली जाते. उदारमतवादी, लोकशाहीवादी विचारांची दडपणूक होते. राज्यसंस्थेच्या व्यवस्था यात बटीक झालेल्या गुलामांसारख्या कणाहीन वर्तन करतांना दिसतात. आम्ही नागरीक आहोत. आजच्या काळात त्या सर्वसाधारण नागरिकानं काय करायला हवं याचं सुरेख दर्शन मुंबईचे हिंदी कवी फ़रीद खान यांनी केलं आहे. ते म्हणतातः

मैं नागरिक हूं

सर्वोच्च पद पर आसीन हूं

मेरा फ़र्ज़ बनता है

कि अपने मातहत काम करनेवाले

राष्ट्रपति, प्रधानमंत्री और

सर्वोच्च न्यायालय की

आलोचना करूं।

हम भारत के लोग

यह वचन लें।

मित्रहो, भारतात पहिल्या शतकातच ख्रिश्चन धर्म पोहचला होता. त्यानंतर जगातल्या बहुतेक धर्मांचे लोक अनेक शतकं इथं राहात आलेले आहेत. इतकं वैविध्य इतरत्र कुठेही सापडत नाही. यातले बरेचसे लोक शतकानुशतकं इथंच राहून इथल्या हवा-पाणी-मातीशी जोडले गेले. त्यांनीही भारत नावाच्या कल्पनेला प्रत्यक्षात मूर्त करण्यात मदत केली. या सगळ्यांसह आपली जी संस्कृती तयार झाली तिची समृद्धी अभिमान वाटावा अशीच आहे. परंतु गेल्या काही वर्षांत मोठ्या योजनेंतर्गत अशा अनेक अल्पसंख्य समूहांना ठरवून अन्यत्वाची (प्रस्थापित स्व पासून अदरिंगची) वागणूक देण्याचे प्रयत्न होत आहेत. फाशिस्ट राज्यात ज्याप्रमाणे आर्य आणि ज्यू अशी विभागणी करून ज्युंचं शिरकाण झालं होतं, तीच मानसिकता इथं स्पष्टपणे दिसते. त्यामुळे एक अन्य हा शत्रु म्हणून चित्र रंगवून उभा केला की मग त्यांना अलग करून कोपऱ्यात ढकलता येतं, त्यांना हुसकावून लावण्यासाठी, हद्दपार करण्यासाठी एक कृतक कारण निर्माण करता येतं. रोमिला थापर असं म्हणतात की, आज जगभरात असे अनेकविध लोक-समूह नागरिकत्व नाकारले गेल्यानं किंवा हद्दपार केले गेल्यानं निराश्रित झालेले आहेत.


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget