Halloween Costume ideas 2015

सर्व धर्मांमध्ये समन्वयाची व बंधुभावाची भावना असल्यामुळे येथील सलोखा अबाधित ठेवणे कठीण नाही – ह.भ.प. हनुमान पाटील महाराज


कोनगाव (भिवंडी) 

हिंदू धर्मातील वेदानंतर एकमेव उपनिषद रचना ह्या सत्य शाश्वत मांडण्याचा प्रयत्न करतात. व्यक्तिगत स्वधर्म हा उपनिषदाचा प्रत्येक अध्यायात झळकतो. स्वधर्म समजून घेऊ इच्छित सर्व साधकांनी सर्वच उपनिषदांचा अभ्यास करण्यास हरकत नाही. भारत हा एक बहुधार्मिक देश असून येथील राज्य व्यवस्थेमध्ये सर्व धर्मामध्ये समन्वयाची व बंधुभावाची भावना असल्यामुळे येथील सलोखा अबाधित ठेवणे कठीण नाही. त्या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत ईद मिलन या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ह.भ.प. हनुमान पाटील महाराज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

माअत ए इस्लामी हिंद कोनगाव युनिट तर्फे १५ मे २०२२ रोजी स्थानिक गजाननराव पांडुरंग पाटील महाविद्यालयात आयोजित ‘ईद मिलन’ कार्यक्रमात हनुमान पाटील महाराज बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आम्हाला जो आनंद प्राप्त झाला आहे तो इतरांनाही मिळावा हा धर्माचरणाचा गाभा आहे. 'तमसो मा ज्योतिर्गमय' अशी प्रार्थना आपण करतो. मला अंधारातून प्रकाशाकडे ने, माझे मन काळोखाने, अंध:काराने नाही, तर प्रकाशाने भरून जाऊ दे आणि माझ्या हातून तसेच तेजस्वी काम घडू दे. धार्मिक त्यालाच म्हणता येईल ज्याला धर्म कळतो आणि धर्म कळून होत नाही तर त्याला आचरणात आणावा लागतो. ज्याला आचरणात आणावा लागतो तो धर्म आणि धर्म जेव्हा आचरणात येतो तेव्हा त्याला नीती म्हटले जाते. जेव्हा धर्म आणि नीती एकत्र येतात तेव्हाच धर्माचे आचरण योग्य प्रकारे होते. धर्माला नीतीची जोड येण्याकरिता आपले जीवन निस्वार्थी, निष्कलंक असले पाहिजे. जगामध्ये शांतता आणि सलोखा निर्माण करण्याचे काम धर्म करीत असतो. सध्या जगामध्ये सर्वांना धर्म कळत असतो, मात्र सामाजिक सलोखा नांदण्यासाठी प्रत्येकाने धर्म जगण्याची गरज असते.

कोनगावच्या प्रथम नागरिक सरपंच डॉ. रुपाली अमोल कराळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की आपण कोणत्या जातीत, कोणत्या धर्मात, कोणत्या प्रांतात जन्मावं हे आपल्या हातात नसतं. पण त्याच्यात तुम्हाला दोन पर्याय असतात की आपण कोणत्याही जातीमध्ये, कोणत्याही धर्मामध्ये, कोणत्याही प्रांतामध्ये जन्माला आलो तरी त्याचा निलकंठ आपल्यामध्ये असणं हा एक पर्याय असतो. तर दुसरा पर्याय असा की आपही जात कुठलीही असू दे, आपला धर्म कुठलाही असू दे, आपला प्रांत कुठलाही असू दे आपण आपलं व्यक्तिमत्त्व असं घडवावं की जेणेकरून आपल्या जातीला, आपल्या धर्माला, आपल्या प्रांताला, आपल्या राष्ट्राला आपला अभिमान वाटला पाहिजे. आणि ही मानसिकता, ही भावना आज आपल्या प्रत्येक नागरिकामध्ये येईल तेव्हाच आपले राष्ट्र एक प्रगतिपथावरील राष्ट्र म्हणून उदयास येईल. 

छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातल्या अठरापगड जातींना एकत्र घेऊन अनेक धर्मांच्या लोकांना एकत्र घेऊन लोकांचं, रयतेचं कल्याणकारी राज्य निर्माण केलं. सर्वधर्मीय त्यांच्या सोबत होते म्हणूनच ते कल्याणकारी राज्य निर्माण करू शकले. आजच्या घडीला, आजच्या समाजाला या मानसिकतेची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. रुपाली कराळे यांनी या वेळी केले.

कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख वक्ते म्यानमार येथून आलेले भन्ते दीपानंद यांनी बौद्ध धर्माने जगाला अहिंसेचा, समतेचा, शांततेचा संदेश दिला. आपण सर्वांनी हा संदेश आचरणात आणायला हवा, असे मत या व्यक्त केले.

ईद मिलन कार्यक्रमासाठी विशेष आमंत्रित प्रमुख वक्ते नांदेडहून आलेले अब्दुल मजीद खान म्हणाले की, धर्म ही एक आचारसंहिता आहे, त्या आचारसंहितेप्रमाणे वागलं तर आपल्याही जीवनात आनंद येईल आणि समाजात आनंद येईल, माणसाचा विकास होईल, राष्ट्राचाही विकास  होईल. सर्व धर्मांमध्ये एका ईश्वराची उपासना होते. हे प्रत्येक धर्माच्या धर्मग्रंथांमध्ये नमूद असल्याचे आढळून येते. प्रत्येकाने स्वतःचा आढावा घेतला पाहिजे की मी माझ्या धर्माप्रमाणे वागतोय का? माझ्यापासून दुसऱ्या समाजाला तर त्रास होत नाही ना! याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे. धर्माप्रमाणे वागणारा निश्चितच अधर्मी असतो आणि म्हणूनच अशा अराजक व्यक्तीमुळे धर्म बदनाम होतो. अशा अपकृती करण्यास कोणताही धर्म शिकवत नाही. इस्लाम धर्म सर्वांना जोडतो. इस्लामची शिकवण अशी आहे की तुमचा शेजारी उपाशी असेल तर तुम्ही इस्लामचे अनुयायी म्हणजेच मुस्लिम नाही. तुम्ही जर आपल्या शेजाऱ्याच्या समस्या सोडवत असाल, आपल्या तोंडचा घास त्याला देत असाल तर समाजात आणि देशात कुठेही वैरभाव निर्माण होणार नाही. माणसानं जर स्वतःला ओळखलं तर माणूस इतरांना त्रास देणार नाही.

दुष्ट लोकांना जिंकायचं असेल तर त्यांच्याशी प्रेमानं वागलं पाहिजे. चांगल्या गोष्टींचा प्रसार करणे आणि वाईट गोष्टींना रोखणे करणे हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे. या कर्तव्याचं आपण पालन केलं नाही तर हा देश अराजकतेत बुडून जाईल. मायाममतेनं वागा. आपण सर्वजण एकच आहोत. आपण भाऊभाऊ आहोत. आपणा सर्वांचा ईश्वर एकच आहे. मिळून मिसळून वागा. समाजावर, देशावर प्रेम करा, असा संदेश मजीद खान यांनी उपस्थितांना देऊन आपल्या भाषणाने मंत्रमुग्ध केलं.

कार्यक्रमाची सुरुवात जमाअत ए इस्लामी हिंदचे कार्यकर्ते जमील खान सर यांच्या कुरआनमधील आयतीचे पठणाने झाली. त्याचा मराठी अनुवाद त्यांनी वाचून दाखविला. त्यानंतर सर्व उपस्थित पाहुणे, मान्यवर आणि इतर उपस्थितांचे स्वागत अफसर खान सर यांनी केले, तर कार्यक्रमाची रूपरेषा आणि आपल्या सामाजिक संघटनेच्या कार्याचा आढावा घेत जमाअत ए इस्लामी हिंद कोनगाव युनिटचे अध्यक्ष इंतेखाब आलम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले.

कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रश्नोत्तरांच्या सत्रात मान्यवर वक्त्यांनी आलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. कार्यक्रमात सर्वधर्मिय सुमारे २०० लोक सहभागी झाले होते. या कार्यक्रमात मराठी भाषांतरित कुरआन आणि इस्लामी साहित्याचे निमंत्रितांना मोफत वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी शीरखुर्मा आणि स्नेहभोजनाचा स्वाद घेतला.

कार्यक्रमात उपस्थित असलेले कोनगावातील मान्यवरांमध्ये डॉ. रुपाली अमोल कराळे (सरपंच), कविता गुरुनाथ भगत (मा. जि.प. सदस्या), कविता गोरक्ष भगत (ग्रा.प. सदस्या), डॉ. अमोल बाळाराम कराळे (बेटी पढाव बेटी बचाव सदस्य), महाराष्ट्र राज्य, हनुमान गणपत म्हात्रे (भाजपा कोन शहर अध्यक्ष), विजयानंद (बाळूदादा) पाटील (संचालक, कृ.उ.बा.स.), भरत नकुल जाधव (आर.पी.आय. आठवले भिवंडी तालुका अध्यक्ष), जयंत गोपाळ टावरे (मा. उपसरपंच), संतोष पाटील (अध्यक्ष भाजपा वाहतुक आघाडी), प्रमोद पाटील (अध्यक्ष भाजपा भिवंडी विधान सभा क्षेत्र), चंद्रकांत पाटील (उपाध्यक्ष भाजपा ठाणे जिल्हा), सोहेल गांग्रेकर (उपाध्यक्ष अल्पसंख्यांक शिवसेना ठाणे जिल्हा), पांडुरंग कराळे (मा. उपसरपंच), विनोद हेंदर म्हात्रे (मा. उपसरपंच), विनोद बळीराम म्हात्रे (मा.उपसरपंच), ह.ब.प. मधुकर कराळे महाराज (अध्यक्ष, श्री. ज्ञानेश्वर सत्संग मंडळ, कोन), गोरक्ष भगत (शिवसेना विभाग प्रमुख), प्रा. विनोद पाटील (टि.डी.सी. बँक मॅनेजर), शैलेश पाटील (उपसंघटक ठाणे जिल्हा विद्यार्थी सेना ), जितेंद्र जाधव (आर.पी.आय. सेक्युलर अध्यक्ष भिवंडी तालुका), गणेश पाटील (अध्यक्ष शेतकरी संघटना), बाळाराम पाटील (मा.अध्यक्ष शेतकरी संघटना), हरिश्चंद्र कराळे (मा.अध्यक्ष शेतकरी संघटना), जयकांत म्हात्रे (हाडवैद्य), हरिभाऊ गवळी (अध्यक्ष गोधळी समाज ठाणे जिल्हा), सुनिल अहिरे (अध्यक्ष, असंघटित कामगार संघटना, उल्हासनगर), राजेद्र सोनार (अध्यक्ष, मानवाधिकार संघटना, भिवंडी तालुका), विजय नागपुरे (उपाध्यक्ष, मानवाधिकार, भि.ता.), इंजि. मधुकर पाटील, अ‍ॅड संदेश सरावते, सचिन म्हात्रे सर, गणेश म्हात्रे सर, प्रेम जाधव सर, विनोद म्हात्रे सर, नाजिम शेख, प्रमोद पाटील, महेश जाधव, अहमद मुल्ला, भास्कर भोईर, महेंद्र (बंटी )भगत, कैलास भोईर, प्रशांत चौधरी, महेश ठाकूर, वैभव सरावते, जतीन राठोड, जमील शेख इत्यादींचा समावेश होता.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी हनुमान म्हात्रे (भाजपा कोन शहर अध्यक्ष), फरदीन करेल (मा.उपसरपंच), सुनील म्हात्रे (मा.उपसरपंच), कमलाकर नाईक (मा.उपसरपंच), कुमार म्हात्रे (मा.उपसरपंच), भरत जाधव (मा.उपसरपंच), दर्शन रमाकांत म्हात्रे (मा.उपसरपंच), कल्पेश म्हात्रे इत्यादींचे विशेष सहकार्य लाभले.

कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जमाअत ए इस्लामी हिंद कोनगाव युनिटचे अध्यक्ष इंतेखाब आलम, महाराष्ट्र मीडिया नेटवर्कचे अफसर खान सर, साप्ताहिक शोधनचे कार्यकारी संपादक शाहजहान मगदुम, संघटनेचे कार्यकर्ते मजहर शेख, डॉ. दानिश खान, इरफान खान इत्यादी सहकाऱ्यांनी अथक प्रयत्न केले.


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget