Halloween Costume ideas 2015

वीर टिपू सुलतान क्रीडा संकुल : नावात काय आहे?


यंदाच्या प्रजासत्ताक दिनी मुंबईमध्ये पुन्हा एकदा मैदानाला नाव देण्यावरून वाद बघायला मिळाला. मालाड येथील एका मैदानाला टिपू सुलतान असं नाव दिल्याने भाजप, बजरंग दल आदी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. भाजपचं सरकार २०१४ मध्ये केंद्रात सत्तेत आल्यापासूनच स्थळं, शहरं आदींची मुस्लिम नावं बदलण्याचा त्यांनी सपाटा लावला आहे. कालच्याच दिवशी आंध्र प्रदेशातल्या गुंटुर येथे महंम्मद अली जिना सर्कल नावाचा एक भाग आहे. तिथे झेंडा फडकवायला गेलेल्या हिंदू वाहिनीच्या एका कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतला. त्यावरून सोशल मिडियावर भारतात जिना नाव का हवं यावरून हिंदुत्ववाद्यांनी टीवटीव सुरू केली. टिपू सुलनाचा इतिहास क्रमिक पुस्तकातून काढून टाकावा यासाठी कर्नाटकातील भाजपचे तत्कालीन मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनीही दोन-तीन वर्षांपूर्वी घोषणा केली होती का तर तो हिंदू विरोधी होता. खरंतर टिपू सुलतान हा त्याने केलेल्या ब्रिटिश विरोधासाठी प्रसिद्ध आहे. ब्रिटिशांचा धोका त्याने वेळीच ओळखला होता आणि त्यांच्याशी लढायाही केल्या. लष्करामध्ये, राज्यकारभारात आधुनिकता आणण्याचं, १७ व्या शतकामध्ये रॉकेटसारखी यंत्रणा सैन्यामध्ये आणण्यासारख्या अनेक सुधारणा त्याच्या नावावर जमा आहेत. यासाठी गुगल सर्च करण्याची गरज नाही कारण तिथेही खरं काय खोटं काय आजकाल सांगता येत नाही. बंगलोरमध्ये टिपू सुलतानाचा जो वाडा आहे तिथे त्याच्या राज्यकारभाराची सर्व माहिती अगदी जुन्या कागदपत्र आणि चित्रांसह पर्यटकांना बघता येतात.

भाजप सत्तेत आल्यावर अलाहाबादचं प्रयागराज केलं, मुघलसराय स्टेशनला दीन दयाल उपाध्याय नाव दिलं. शहरांची, स्थळांची नाव बदल बदलणं हा एक राजकीय कार्यक्रम भारताला नवीन नाही. पण केवळ मुस्लिम असल्याने नावं बदलणं आणि तिथे आग्रहाने हिंदू धर्माशी साधर्म्य सांगणारं नाव ठेवणं हे केवळ राजकीय असूयेतून नाही तर न्यूनगंडातून आलेलं आहे. जेत्यांनी कितीही इतिहास बदलला किंवा आपल्या बाजूचा इतिहास लिहिला तरी घडलेल्या गोष्टी बदलता येत नाहीत. त्या कधीना कधी तरी पुढे येतातच.

हीच बाब अजून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्या प्रेरणेवर चालणाऱ्या भाजप, बजरंग दल आणि इतर अनेक हिंदुत्ववाद्यांच्या लक्षात आलेली नाही. मुस्लिम हा त्यांचा शत्रू असल्याने इतिहासातून मुस्लिमांना गाळून टाकायचं आणि मग हिंदुत्वाचा खोटा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहायचा हे काम गेली अनेक वर्ष ते अखंडपणे करत आहेत. मुस्लिमांनी भारतावर आक्रमण करण्यापूर्वी भारतात कशी सुखशांती होती, सुबत्ता होती आणि सोन्याचा धूर निघत होता याच्या अनेक कहाण्या आपण सर्वांनी एेकल्या आहेत. पण एक दिवस अचानक दाढी-मिशा असलेला, डोळ्यात क्रूरता असणारा, समोर येईल त्याला कापून काढणारा कोणी मुस्लिम दरोडेखोर देशात आला आणि देशाला लुटून नेलं. मग काय इथली सुबत्ता पाहून असे अनेक मुस्लिम आले आणि भारताला ओरबाडून गेले. त्याचा परिणाम म्हणजे भारतीय जनता गरीब झाली, दुष्काळ आला, लोकांची अन्नान्न दशा झाली. त्यामुळे पुराणकाळातच आमच्याकडे विमानापासून प्लॅस्टिक सर्जरीपर्यंतचं ज्ञान होतं. पण मुस्लिम आल्याने ते नष्ट झालं. या हिंदुत्ववादी कहाण्या खूपच बिनडोक आणि खोट्या आहेत. पण सतत लोकांच्या डोक्यात ते भरवत राहिल्याने आज त्याच गोष्टी अनेकांना खऱ्या वाटू लागल्या आहेत. त्यामुळे वारंवार आताचा मुस्लिम कसा दोषी आहे हे बहुसंख्य हिंदूंना पटतं.

मुघल काळ हा हिंदुत्ववाद्यांसाठी अडचणीचा ठरतो कारण मुघलांनी दिल्लीची सत्ता मिळवली आणि अनेक पिढ्या ती टिकवली. ते इथलेच नागरिक झाले, इथलं राहणीमान, आचार-विचार त्यांनी स्वीकारले. त्यांना परकीय असं कोणत्याच अंगाने म्हणता येणार नाही इतके ते इथे रुजले आणि वाढले. बरं त्यांनी केवळ भारतावर राज्य करताना अनेक सुधारणा केल्या, इस्लाम इथल्या जनतेवर जबरदस्तीने लादला नाही. अन्यथा बहुसंख्य हिंदू आज देशात दिसलेच नसते. या साध्या साध्या गोष्टी बाजूला सारून केवळ मुस्लिम राज्यकर्त्यांनी हिंदूंना कसं छळलं याचं टुमणं सारखं लावायचं आणि देशाच्या प्रती त्यांनी केलेलं योगदान पुसून टाकायचं हे कारस्थान अनेक वर्ष सुरू आहे. फक्त सध्या भाजपच्या हातात सत्ता आल्याने सत्तेच्या जोरावर खोट्याला खरं म्हणायला लावणं त्यांना सहज शक्य झालं आहे. त्यामुळे ताज महाल हा तेजोमहाल होता, बाबरी मशिदीच्या जागी रामाचं मंदिर होतं, अशा कथांना प्रत्यक्षात उतरवणं हिंदुत्ववादी करू लागले आहेत. समाजातल्या एवढ्या मोठ्या मुस्लिम समूहाचं खच्चीकरण करून नक्की काय सिद्ध होणार आहे? त्यातून हिंदूंना काय फायदा आहे? हिंदुत्वाचा खोटा अभिमान कुरवाळण्यासाठी मुस्लिमांना वारंवार लक्ष्य करण्यातून देशाची प्रगती कशी साधणार? कोणत्याही देशाच्या इतिहासामध्ये एका समाजाला मारून, त्याचं खच्चीकरण करून प्रगती साधली जाऊ शकत नाही हे वारंवार सिद्ध झालं आहे.

ब्रिटिशांनी भारतात आपला जम बसवल्यावर इथल्या लोकांना छोट्या मोठ्या नोकऱ्या द्यायला सुरुवात केली. त्यामध्ये शिकलेला वर्ग उच्च जातीचा असल्याने त्यांना प्रामुख्याने काम मिळालं. जात व्यवस्था ब्रिटिशांना पूर्ण कळली नसल्याने काही नोकऱ्या मागास जातीतील लोकांनाही मिळाल्या. तसेच ब्रिटिशांनी त्यांच्या सोयीसाठी राज्यकारभारामध्ये एक आधुनिकता आणली. रस्ते बांधले गेले, ट्रेन आली, पोस्ट ऑफिससारखी यंत्रणा उभी राहिली. या आधुनिकतेमुळे आणि काही खालच्या जातीतील लोकांनाही नोकऱ्या मिळाल्याने उच्च जातींमध्ये खळबळ माजली. हिंदू धर्माच्या नावाने शेकडो वर्षे त्यांची चालणारी मक्तेदारी संपुष्टात येईल अशी भीती त्यांना वाटू लागली. खरंतर इंग्रजांनी दिलेल्या आधुनिक शिक्षणाचा फायदा याच उच्च जातींना, ब्राह्मण वर्गाला सर्वाधिक झाला. पण त्या आधुनिकतेचा फायदा घेत आपल्या धर्मात सुधारणा करण्याऐवजी सनातन हिंदू धर्माला धोका निर्माण झाल्याची भीती आणि न्यूनगंड त्यांच्यात निर्माण झाला. त्यातून हिंदू राष्ट्रवाद उभा राहिला. लढा इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी होता. पण त्याला धर्माची जोड देऊन सनातन हिंदू धर्म टिकवण्याचा आणि आणखी कर्मठ करण्याचा प्रयोग या हिंदू राष्ट्रवादाच्या माध्यमातून झाला. मग सतीविरुद्ध इंग्रजांनी केलेला कायदा, प्लेग-देवीसारख्या साथींमध्ये इंग्रजांनी केलेलं लसीकरण हे हिंदू धर्माच्या चौकटीत बसत नाही म्हणून हिंदू राष्ट्रवाद अधिकाधिक कठोर होत गेला. त्या न्यूनगंडातूनच मुस्लिम द्वेषही तीव्र होत गेला. त्याचं आजचं रूप हे हिंदुत्ववादाच्या माध्यमातून आपल्याला दिसतं.

खरंतर स्वातंत्र्याच्या लढ्यातही मुस्लिमांचं तेवढंच योगदान होतं जेवढं हिंदूंचं. अशोक मेहता यांच्या रिव्होल्ट ऑफ १८५७ या पुस्तकामध्ये मुस्लिमांच्या सहभागाचं वर्णन आहे. ते म्हणातात की, या बंडामध्ये हिंदू आणि मुस्लिम दोघेही एकाच त्वेषाने उतरले. पण मुस्लिम जास्त आक्रमक होते कारण १८ व्या शतकातील मुस्लिम स्कॉलर शाह वलिउल्ला यांच्या ते प्रभावाखाली होते. त्यांच्या मते, ब्रिटिशांच्या नियंत्रणामध्ये असलेला भारत म्हणजे दार-उल-हार्ब (युद्धभूमी) आणि परकीय शक्तींविरोधात जिहाद होता. त्यामुळे इंग्रजांशी लढणं हे राष्ट्रीय गरजेबरोबरच त्यांच्यासाठी ते धार्मिक कर्तव्यही होतं. त्यामुळे ब्रिटिशांनाही हिंदूंपेक्षा मुस्लिमांचा धसका अधिक होता. त्याचा परिणाम असा झाला की, बंड फसल्यावर ब्रिटिशांनी दिल्ली काबीज केली आणि हिंदूंना तिथे येऊ दिलं. पण मुस्लिमांना १८५९ पर्यंत तिथे येऊ दिलं नाही, त्यांची मालमत्ता जप्त केली. मुस्लिम तरीही मागे हटले नाहीत. त्यांनी आपला विरोध सुरूच ठेवला. त्याविरोधापायी त्यांनी इंग्रजी शिक्षणही नाकारलं आणि त्याचा परिणाम त्यांच्या भविष्यावर झाला. हिंदूंनी जितक्या त्वरेने इंग्रजांकडून शिक्षण घेऊन नोकऱ्या मिळवल्या त्यामानाने मुस्लिम मागे राहिले. आता हा मुस्लिमांचा इतिहास असताना या ब्रिटिशविरोधी लढाईमध्ये हिंदुत्ववाद्यांनी नक्की कुठे होते हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही किंवा गुगलवरही आलेलं नाही.

जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया पुस्तकामध्ये भारताचं उत्कृष्ट वर्णन केलंय. भाजपच्या हिंदुत्ववादी प्रचाराला बळी पडून सध्या काँग्रेस नेत्यांचंही उजव्या बाजूला झुकणं पाहिलं की त्यांना नेहरूंच्या या पुस्तकाची आठवण करून द्यावीशी वाटते. नेहरू म्हणतात, भारत हा देश एखाद्या जुन्या हस्तलिखिताप्रमाणे आहे. त्यात नवीन नवीन विचारांच्या पानांची भर पडते, पण कोणतंच जुनं पान पुसलं जात नाही. ते आपल्या मनात, अंतर्मनात घर करून राहतं. आपल्याला अनेकदा तर ते माहितही नसतं. पण हे नवं-जुनं घेऊनच जटील आणि गूढ अशा भारताची रचना झाली आहे. नेहरुंइतकं भारताचं अन्न वर्णन आणखी क्वचितच असेल. भारत हा वैविध्यपूर्ण देश आहे आणि हे वैविध्य फक्त धर्म, जातींमध्ये नाही तर खाण्यापिण्यापासून आचार-विचार, रहाणीमान, भाषा अशा प्रत्येक गोष्टीत आहे. हे वैविध्य टिकवण्याची मुभा प्रत्येकाला असल्यानेच भारतावर कितीही आक्रमणं झाली तरी तो नव्या प्रवाहांना आपलंस करून जुन्या गोष्टीही जपतो. हिंदू धर्माचं है वैशिष्ठ्य असल्याने तो इतकी वर्ष टिकला. आता मुस्लिमांचं नाव पुसून टाकून त्याला केवळ हिंदुत्ववादी देश बनवण्याचा आत्मघातकी प्रयत्न केला जात आहे. वैविध्यतेकडून एकसाचीपणाकडे हा प्रवास असून राज्यकर्त्यांनी बौद्धिक दिवाळखोरीच दाखवते.

- संघमित्रा प्रबल

(साभार - राईट अँगल्स)


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget