Halloween Costume ideas 2015

कोरोनाचा गरीबांवर आघात

कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे. मानवी सामाजिक जीवन एका नवीन भविष्यात परिवर्तीत होऊ पाहात आहे. या महामारीमुळे आपण पूर्वाग्रह,  द्वेष, लोभ इत्यादींचे ओझे घेऊन भावी आयुष्यात पदार्पण करणार आहोत. कोरोनामुळे गतकाळातील द्वेषमूलक विचारसरणीला आधुनिक प्रसारमाध्यमांच्या हवाली करून सोडले आहे.  समाजमाध्यमरूपी विषाणू सध्या इंटरनेटच्या मायाजालात अतिशय वेगाने वावरत आहे. मूळ महामारीच्या भीतीपेक्षा या प्रसारमाध्यमातील विषाणूची अधिक भीती वाटू लागली आहे. सामाजिक द्वेष अगदी विकोपाला पोहोचला आहे. विशिष्ट समाजाला टार्गेट करण्यात या माध्यमांनी अजिबात कसर सोडलेली नाही. त्यातच त्यांना व्यवस्थेतील काही मंडळीची साथ  मिळत असल्याचे दिसून येते. आता अशा वातावरणात नाती-गोती, मित्रपरिवार, ऑफीस, दळणवळणाची साधने, बाजार, मार्केट आणि इतकेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय प्रवासावर फार  मोठा दुष्परिणा झाला आहे. देशाची अर्थव्यवस्था कोलमडण्याच्या स्थितीत आहे. कोरोनामुळे होणाऱ्या बळींची संख्या वाढत असल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. काही अपवाद वगळता प्रशासनाने दिलेले आदेश सामान्य नागरिक पाळताना दिसत असला तरी सोशल डिस्टन्सिंगवर नियंत्रण ठेवण्यात बऱ्याचदा प्रशासनाला नाकी नऊ आले आहे. कोरोनाने  संपूर्ण मानवजातीला आपापल्या देशांत, शहरांत, गावांत आणि घरांमध्ये कैद करून सोडले आहे. आतापर्यंत जगातील महासत्ता म्हणविणाऱ्या देशांच्या बोकांडीवर हा व्हायरस बसल्यामुळे  तेथील भांडवलशाहीचे कंबरडे मोडले आहे. स्वत:ला महासत्ता म्हणविणारा देश धमकावून औषधांची मागणी करीत आहे. चीन आपला चायना छाप (नकली) माल इतर देशांना विकून  पैसा कमवू लागला आहे. त्या देशातील कोरानाने आता यूरोप आणि अमेरिकेकडे तोंड वळविले आहे. डिसेंबरमध्ये जेव्हा चीन वुहानमध्ये व्हायरसच्या संकटाचा सामना करीत होता तेव्हा  भारत सरकार संसदेत पारित करण्यात आलेल्या भेदभावपूर्ण आणि मुस्लिमविरोधी नागरिकत्व कायद्याचा विरोध करणाऱ्या देशभरातील लाखो लोकांद्वारे चालविण्यात आलेल्या  आंदोलनांना चिरडण्याचा प्रयत्न करीत होते. भारतात कोविद-१९ ची पहिली केस ३० जानेवारीला आढळून आली. फेब्रुवारीत या व्हायरसकडे दुर्लक्ष करून सत्ताधारी पक्षाने राष्ट्राध्यक्ष  ट्रंपच्या गळाभेटीचा कार्यक्रम गुजरातमध्ये थाटामाटात पार पाडला. त्यानंतर दिल्ली विधानसभेच्या निवडणुका. भाजपच्या वाचाळविरांनी जाहीरपणे हिंदू राष्ट्रवादी निवडणूक मोहीम,   शारीरिक हिंसाचाराच्या धमक्या आणि ‘गद्दारां’ना गोळ्या घालण्याच्या वल्गना केल्या आणि निवडणुकीत पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. त्यानंतर पराभवाचे खापर मुस्लिमांच्या  माथी मारण्यात आले.
पोलिसांच्या संरक्षणात हिंदूरक्षकांच्या शस्त्रधारी जमावाने उत्तर-पूर्व दिल्लीतील मुस्लिम कामगारांच्या घरांवर हल्ला केला. या दंगलीत ५० हून अधिक निष्पाप लोकांचा जीव गेला, त्यात  काही हिंदू बांधवांचाही समावेश होता. मार्चमधील पहिल्या दोन आठवड्यांत मध्य प्रदेशचे काँग्रेस सरकार पाडणे आणि भाजपचे सरकार स्थापित करण्यात केंद्रातील सत्ताधारी पक्ष व्यस्त  होता. ११ मार्चला जागतिक आरोग्य संघटनेने कोविद-१९ महामारी असल्याचे जाहीर केले. यानंतर दोनच दिवसांनी केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने कोरोनामुळे आरोग्यासंबंधी घाबरण्याचे काहीच कारण नसल्याचे जाहीर केले. सरतेशेवटी १९ मार्चला पंतप्रधानांनी राष्ट्राला संबोधित करताना २२ मार्चचा जनता कफ्र्यू साजरा करण्यासाठी इटली आणि फ्रान्सचे अंध अनुकरण  केले आणि लोकांना आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार प्रकट करण्यासाठी टाळ्या-थाळ्या वाजवण्याचे आवाहन केले. मात्र त्यासाठी कोणतीही सरकारी योजना आखल्याचे सांगतिले नाही. त्याच  वेळी भारताकडून संरक्षण सामुग्री आणि श्वसनसंबंधी उपकरणांची निर्यात करीत असल्याचे सांगितले नाही. प्रधानामंत्र्याच्या आग्रहाखातर लोकांनी सामूहिक नृत्य केले, मिरवणुका काढण्यात आल्या, त्यात सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला. त्यानंतर शेणामुत्रांच्या पार्ट्या भाजप समर्थकांद्वारे आयोजित करण्यात आल्या. चोवीस मार्चला रात्री आठ मोदींनी पुन्हा  टीव्हीवर येऊन रात्री बारा वाजल्यापासून संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू केला. एकशे तीस कोटी लोकसंख्या असलेल्या देशाला कसल्याही पूर्वतयारीविना लॉकडाऊन करण्याचा निर्णय  घेण्यात आला. त्यामुळे दुकाने, हॉटेल्स, कारखाने आणि बांधकाम उद्योग अचानक बंद झाले. शहरांमधील कामगार नागरिकांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. अनेक प्रवासी मजुरांना मालकांनी आणि घरमालकांनी हाकलून दिले. लाखो गरीब, उपाशीपोटी, तरुण, म्हातारे, पुरुष, स्त्रिया, लहान मुले, आजारी, नेत्रहीन, विकलांग लोक कुठे जाणार होते? गावी जाण्याचे  कसलेच साधन उपलब्ध नसल्यामुळे सवांनी पायीच घराची वाट धरली. अनेक दिवसांपर्यंत शेकडो कि.मी. अंतर एकसारखे चालत राहिला. अनेकांनी रस्त्यातच जीवनाचा निरोप घेतला.  काहींना मोटारींनी उडविले तर काहींना पोलिसांचा मार खावा लागला. काही दिवसांनंतर अशा वाटसरूंनाही रस्त्यातच अडवून ठेवण्यात आले. अनेक सामाजिक संघटनांनी गरिबांना,  गरजवंतांना अन्नधान्याचे वाटप करून आपली माणुसकी जपण्याचा प्रयत्न केला. हीच माणुसकी यापुढेही सर्वच क्षेत्रात अबाधित ठेवून येणाऱ्या सर्व प्रकारच्या व्हायरसचा सामना आता मानवांना करायचा आहे.

- शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget