Halloween Costume ideas 2015

अनाथाचा अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)

माननीय खुवैलिद बिन उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘हे माझ्या अल्लाह! मी दोन दुर्बल लोकांच्या अधिकारांना श्रेष्ठ समजतो, म्हणजे अनाथ  आणि पत्नीच्या अधिकाराला.’’ (हदीस : निसाई)

स्पष्टीकरण
पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या सांगण्याचा हा अंदाज अतिशय प्रभावशाली आहे ज्याद्वारे पैगंबरांनी लोकांना असा उपदेश दिला की अनाथ व पत्नींच्या अधिकारांचा आदर करा. इस्लामच्या पुनरुत्थानापूर्वी अरब जगतात हे दोघे सर्वाधिक अत्याचारपीडित होते. अनाथांशी सामान्यत: वाईट व्यवहार केला जायचा आणि त्यांचा अधिकार हिसकावला जायचा. त्याचप्रमाणे  महिलांनाही कसलेच स्थान नव्हते.

एक मनुष्य पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे आला आणि म्हणाला, ‘‘मी गरजवंत आहे, माझ्याकडे काहीही नाही आणि माझ्या देखरेखीत एक अनाथ आहे (ज्याच्याकडे संपत्ती आहे). तेव्हा मी त्याच्या संपत्तीतून स्वत:चा उदरनिर्वाह करू शकतो काय?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘होय. तुम्ही आपल्या अनाथाच्या संपत्तीतून स्वत:चा उदरनिर्वाह करू शकता. मात्र अट अशी की व्यर्थ खर्च करू नका आणि कोणतेही काम घाई-गडबडीत करू नका आणि आपली सपत्ती बनविण्याची चिंता करू नका.’’ (हदीस : अबू दाऊद)

स्पष्टीकरण
जर एखाद्या अनाथाचे पालनपोषण करणारा श्रीमंत असेल तर त्याने कुरआनच्या उपदेशानुसार (त्या अनाथाकडून) काहीही घेता कामा नये, परंतु जर तो गरीब असेल आणि अनाथाकडे संपत्ती असेल तर तो त्याच्या संपत्तीचे रक्षण करेल. ती वाढविण्याचा प्रयत्न करेल आणि त्यातून स्वत:चा खर्च भागवेल, परंतु तो अनाथ तारुण्यात येण्यापूर्वी त्याची संपत्ती लवकर  लवकर खाऊन टाकणे त्याच्यासाठी अवैध आहे. तसेच तो अनाथाच्या संपत्तीपासून आपली संपत्ती उभी करू शकत नाही. अल्लाहला न भिणारे बेईमान लोक अनाथांची संपत्ती चलाखीने  आपली संपत्ती बनवितात अथवा त्याच्या प्रौढ होण्यापूर्वी त्याची संपूर्ण संपत्ती खाऊन-पिऊन फस्त करतात.
या हदीसमध्ये देण्यात आलेला उपदेश पवित्र कुरआनमधील सूरह निसामध्ये अल्लाहने अनाथांच्या संपत्तीच्या बाबतीत दिला आहे. अल्लाह म्हणतो, ‘‘आणि अनाथांची काळजी घेत रहा  इथपावेतो की ते विवाहयोग्य वयात येतील. मग जर तुम्हाला त्यांच्यात योग्यता आढळली तर त्यांची संपत्ती त्यांच्या स्वाधीन करा. असे कधीही करू नका की न्यायाच्या मर्यादा  ओलांडून या भीतीपोटी त्यांचा माल घाईघाईने गिळंकृत कराल की ते मोठे झाल्यावर आपल्या हक्कांची मागणी करू लागतील. अनाथांचा जो पालक धनवान असेल त्याने ईशपरायणतेने  वागावे व जो गरीब असेल त्याने परिचित पद्धतीने खावे. नंतर जेव्हा त्यांची संपत्ती त्यांच्या स्वाधीन करू लागाल तेव्हा लोकांना त्यावर साक्षीदार बनवा आणि हिशेब घेण्यास अल्लाह पुरेसा आहे.’’ (दिव्य कुरआन, ४:६)

माननीय जाबिर (रजि.) यांच्या कथनानुसार, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले, ‘‘माझ्या आश्रयाखाली असलेल्या अनाथाला कोणत्या कारणासाठी मी मार देऊ शकतो?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘ज्या कारणांसाठी तुम्ही स्वत:च्या मुलांना मार देऊ शकता. खबरदार! आपल्या संपत्तीला वाचविण्यासाठी त्याची संपत्ती नष्ट करू नका आणि त्याच्या संपत्तीद्वारे आपल्या  संपत्तीत वाढ करू नका.’’ (मुअजम तिबरानी)

स्पष्टीकरण
आपल्या मुलाबाळांना शिक्षण व प्रशिक्षणाच्या बाबतीत मार देऊ शकता, त्याचप्रमाणे अनाथालाही धार्मिक आणि शिष्टाचार व सभ्यता शिकविण्याच्या बाबतीत मार दिला जाऊ शकतो.  विनाकारण क्षुल्लक कारणासाठी मुलांना मारहाण करणे पैगंबरांच्या परंपरेच्या विरूद्ध आहे आणि अनाथाला मारणे हे तर फार मोठे पाप आहे.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget