सभ्यतांच्या उदय आणि ऱ्हासाबद्दल काही विचार या आधीच्या लेखात मांडले आहेत. आणखीन काही गोष्टींचा या संदर्भात तपास करताना असे दिसून येते की सभ्यतांचा विस्तार होत असताना किंबा एका ठराविक स्थितीस पोहोचल्यानंतर त्यांना ज्या समस्यांशी तोंड द्यावे लागते, ज्या आव्हानांना सामोरे जावे लागते त्याचे प्रत्युत्तर देण्याची त्यांची क्षमता असते किंवा नाही. मुळात सभ्यतांचा जन्म कठीण प्रसंगातून होतो. अशा कोणत्याही सभ्यतेच्या अनुयायांमध्ये समोरील आव्हानांना तोंड देण्याची मानसिक तयारी नसेल तर त्या सभ्यतांचे भवितव्य धोक्यात आल्याशिवाय राहात नाही. कोणत्याही सभ्यतेचा प्रवास सतत सुरू असावा लागतो. एक व्यक्ती असो की समाज अथवा त्यापासून उदयास आलेली सभ्यता हे सर्व या विश्वाचे (Universe) घटक आहेत. ज्या प्रकारे धरती इतर ग्रह, धरतीवरील प्रत्येक सजीव आणि निर्जीव अस्तित्व या विश्वाचे घटक आहेत. हे ब्रह्मांड निर्मितीनंतर स्थिर नसून आपल्या प्रवासाच्या प्रत्येक बिंदूवर सदैव विस्तारत आहे. एका व्यक्तीपासून जसे कुटुंब जन्माला येते, त्यापासून समाज, संस्कृती; तसेच या जगातील सर्व सभ्यता विस्तारत आहेत. हा सृष्टीचा नियम आहे. जर काही कारणाने विश्वातील एखादे अस्तित्व या सृष्टीच्या नियमाविरूद्ध जात असते तर मग त्याचा मृत्यू अटळ आहे. अशाच प्रकारे सभ्यतांना विस्तारायला हवे. त्या सभ्यतेमध्ये विस्तारासाठी पूरक तत्त्वे असायला हवीत. कोणत्याही संस्कृती-सभ्यतेमध्ये विभाजनाला थारा नसतो. यासाठी ती सभ्यता साऱ्या मानवजातीला आकर्षित करणे गरजेचे असते. जर मानवजातीला वेगवेगळ्या निकषांवर विभागले जात असेल तर ही प्रक्रिया सृष्टीच्या नियमांविरूद्ध जात आहे असे समजले जावे आणि नियमांचे उल्लंघन करणे म्हणजे स्वतःच्या विनाशाला आमंत्रण देण्यासारखे आहे. त्याचबरोबर त्या सभ्यतेची नैतिक मूल्ये सर्वसमावेशक असायला हवेत. जर समाजातील मानवांना निरनिराळ्या निकषांवर विभागले गेले तर मग संस्कृतीचे वेगवेगळ्या परंपरेत विभाजन होईल. याचा अर्थ संस्कृतीचे रूपांतर परंपरेत होईल. परंपरा कोणत्याही मानवी समूहासाठी प्रगतीची दारे उघडत नाही. प्रगतीचे दार बंद झाले की ती संस्कृती स्वतःहून आपला विनाश ओढवते. तसेच सभ्येमध्ये संतुलन असणे गरजेचे आहे. म्हणजे त्या त्या सभ्यतेतील माणसामाणसांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाऊ नये. वंश, वर्ण, जात अशा प्रकारचे भेदभाव जर माणसामाणसांमध्ये केले जाऊ लागले तर ती संस्कृती स्वतःच विभाजनाकडे जाते. अशा संस्कृतीवर आधारित सभ्यतादेखील मग एक सभ्यता म्हणून शिल्लक राहात नाही.
जगात ख्रिस्ती आणि इस्लाम धर्माने मानवजातीची विभागणी केली, पण ही विभागणी वर्ण, वंश, जात या निकषांवर नाही. ख्रिस्ती धर्माने मानवजातीला ख्रिस्ती आणि बिगर ख्रिस्ती अशी विभागणी केली, तर दुसरीकडे इस्लाम धर्माने सकल मानवजातीची विभागणी श्रद्ध आणि अश्रद्ध अशी केली. म्हणजे ही बिभागणी अटळ नाही. आज जे लोक ख्रिस्ती नाहीत उद्या ते ख्रिस्ती धर्मात प्रवेश करू शकतात. तसेच ज्या लोकांनी इस्लाम धर्मावर आज श्रद्धा ठेवलेली नाही ते उद्या श्रद्धा बाळगू शकतात.
कोणतीही वैश्विक सभ्यता ज्या धर्मावर ती आधारित असेल त्या धर्माची विचारधारा देखील वैश्विक असायला हवी. म्हणजे वैश्विक नियमांशी सुसंगत असायला हवी. त्याच्या शिकवणी एखाद्या विशिष्ट समाज-समूहासाठी, भौगोलिक क्षेत्रातील रहिवाशांसाठी, विशिष्ट जाती-समुदायासाठी नव्हे तर साऱ्या मानवजातीसाठी असायला हवी. त्याचे संबोधन साऱ्या मानवजातीला असायला हवे. या निकषांवर जगातील दोन सभ्यतांमध्ये बरेच साम्य आहे. एक ख्रिस्ती आणि दुसरे इस्लाम. या दोन्ही सभ्यता ज्या धर्मावर आधारित आहेत त्यांच्या शिकवणी साऱ्या मानवजातीसाठी आहेत. यासाठी ईश्वराची कल्पना एकत्वाची असावी. इस्लाम धर्मात एकमेव ईश्वराची कल्पना असल्याने सारी मानवजात समान आहे. समानता ज्या सभ्यतेत नसेल ती सदोष असेल आणि दीर्घकाळानंतर त्या सभ्यतेत विभागनाची प्रक्रिया सुरू होऊ शकते. एकाच ईश्वराने साऱ्या मानवजातीला एक पुरुष आणि एका स्त्रीच्या जोडप्याद्वारे जन्म दिला असल्याने सारे मानव एकसमान आहेत. जर मानसामाणसांत भेदभाव केला गेला तर तो धर्माच्या शिकवणींविरूद्ध असल्याने त्याला महत्त्व उरत नाही. ख्रिस्ती धर्मात ईश्वराचे तीन रूप मानले जात असल्याने काही प्रमाणात त्या धर्माच्या अनुयायांमध्ये समानतेचा अभाव आढळतो. एका प्रख्यात इतिहासकाराने असे म्हटले आहे की पाश्चिमात्य राष्ट्रवादाने राष्ट्रवादाच्या विषाणूला जन्म दिला म्हणून ख्रिस्ती सभ्यता एकसंघ राहू शकली नाही. आज ज्या सभ्यतेला ख्रिस्ती सभ्यता म्हणतात ती खऱ्या अर्थाने पाश्चिमात्य सभ्यता आहे.
आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही सभ्यतेने मानवजातीच्या विकासात योगदान द्यायला हवे. आज जगात पाश्चात्य सभ्यतेला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. याचे कारण असे की मानवी जीवनाचा एकही पैलू त्यांनी असा सोडला नाही ज्याच्या विकासात पाश्चात्य विचारवंतांनी आपले योगदान दिले नसेल. विज्ञानाचे क्षेत्र असो की मानवजातीच्या आरोग्याचे तंत्रज्ञान असो की इतर कोणतेही क्षेत्र, या सर्वांमध्ये पाश्चिमात्यांनी भरीव योगदान दिलेले आहे. पण त्याचबरोबर जगातील इतर राष्ट्राचा नाश करण्यात देखील पाश्चात्य सभ्यताच सर्वांत अग्रेसर आहे. त्याचे हे कर्तृत्व सृष्टीच्या नियमांविरूद्ध असल्याने त्याला याचे परिणाम आज ना उद्या भोगावे लागणार आहेत हेदेखील निश्चित. ख्रिस्ती धर्मियांच्या आधी मुस्लिम शास्त्रज्ञांनी विद्वानांनी जगभर ज्ञानाचा प्रसार केला. ते विज्ञानाचे क्षेत्र असो की तंत्रज्ञानाचे मुस्लिम वैज्ञानिकांनी बरेच शोध लावलेले आहेत. बरेच तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्याचबरोबर समाजशास्त्र, इतिहास, वाड्मय आणि इतर ज्ञानाच्या साऱ्या स्रोतांची सुरुवात मुस्लिमांनी केली. नंतरच्या काळात यूरोपियनांनी हा वारसा पुढे चालवतच इतर नवनवीन शोध लावले आणि तंत्रज्ञानाचा विकास केला, जो आम्ही सध्या पाहात आहोत. खगोलशास्त्र आणि अंतरिक्ष विज्ञान या क्षेत्रांमध्येदेखील मुस्लिमांनी बरेच संशोधन केले. जगातली पहिली नासासारखी वेधशाळा तुर्कीमध्ये होती.
इस्लामी शिकवणींची सुरुवातच मानवजातीच्या भल्यासाठी योगदान देण्याच्या आदेशाने होते. कोणतीही मुस्लिम व्यक्ती जोपर्यंत मानवजातीच्या कल्याणासाठी कार्यरत असत नाही तोवर तो सदाचारी होऊ शकत नाही. कोणत्याही सभ्यतेला धर्माचा, धार्मिक ग्रंथाचा मुलाधार नसेल तर ती सभ्यता जास्त काळ टिकू शकत नाही. धर्माशी बंड करून जगात कम्युनिझमची विचारधारा विकसित करण्यात आली. त्या विचारधारेवर आधारित राष्ट्र सभ्यतेची निर्मिती करताना रशिया, चायना वगैरे देशांमध्ये २-४ कोटी लोकांची हत्या केली गेली. मानवजातीचे रक्त सांडून जी सभ्यता जगात रुजविण्याचे प्रयत्न केले गेले ती जेमतेम ५० वर्षे टिकली नाही. चायनाने उघडपणे जरी कम्युनिझमशी फारकत घेतली नसली तरी त्या राष्ट्रात ती नष्ट झाली आहे. नावापुरता कम्युनिस्ट पक्ष जीवंत ठेवला आहे, ते जगाला दाखवण्यासाठी. निधर्मी सभ्यता असो की निधर्मी राज्यसत्ता मानवजातीने त्यांना कधीही महत्त्वाचे स्थान दिलेले नाही. सभ्यतेचा आधार नेहमी धार्मिक शिकवण, आचारविचार, नीतीशास्त्र, धार्मिक विधी राहिला आहे.
पण या धार्मिक शिकवणींचा आधार कोणता? प्रत्येक धर्मात धर्मग्रंथ असतात ज्यांना धर्माचे, धार्मिक शिकवणींचे मूळ समजले जाते. पण हे धार्मिक ग्रंथ कशाच्या आधारवर आहेत? ख्रिस्ती आणि इस्लाम धर्माचे धर्मग्रंथ मानवाने रचलेले, साकारलेले नाहीत, तर ते एकमेव ईश्वराने पाठवलेले आहेत. या ग्रंथांमध्ये ज्या शिकवणी आहेत त्या बुद्धिमत्तेला आव्हान देणाऱ्या नाहीत तर बुद्धिमत्ताच या शिकवणींचा मुलाधार आहे, असे जाहीरपणे घोषणा करतात. शिवाय धर्मग्रंथामधील शिकवणी शंकास्पद नसायला हव्यात. कुरआनातील शिकवणींची सुरुवातच अशी होते की हा धर्मग्रंथ अल्लाहने पाठविलेला आहे यात शंका नाही आणि त्याबरोबर या धर्मग्रंथातील कोणतीही गोष्ट अशी नाही जी शंकास्पद असेल. जगाने कितीही ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञानाचा विकास केला असला तरी आजदेखील इस्लामचा धर्मग्रंथ कुरआनातील कोणत्याही गोष्टींना विज्ञानाने आव्हान दिलेले नाही.
सांगायचे तात्पर्य हे की कोणत्याही सभ्यतेच्या शिकवणींचा मुलाधार भक्कम असणे गरजेचे आले. जर यात त्रुटी आढळत असतील तर मग एक तर तो ग्रंथ मानवाने रचलेला आहे किंवा यातील मजकुरामध्ये मानवांनी आपल्या आवडीनिवडीनुसार ढवळाढवळ केलेली असेल.
(उत्तरार्ध)
- सय्यद इफ्तिखार अहमद
मो.: ९८२०१२१२०७
Post a Comment