अल्पसंख्याकांना अभय, हे लोकशाहीचे भूषण मानले जाते. हजरत मुहम्मद (सल्ल.) यांच्या लोकसत्ताक राज्यात अनेक अल्पसंख्यांक जमाती होत्या. त्या सर्व जमातींना हजरत पैगंबरांनी कायद्यान्वये अभय दिले. अल्पसंख्यांकाचा धर्म, त्यांची संस्कृती अबाधित ठेवण्याकरिता त्यांनी वेळोवेळी जाहीर फर्माने काढली आहेत. केवळ मुस्लिम बहुसंख्यांक म्हणून त्यांचेच राज्य आहे असे अल्पसंख्यांकांना वाटू नये, या विषयी प्रेषित मुहम्मद सल्ल. फार दक्षता घेत. एखाद्या लहान अल्पमतवाल्या जमातीला देखील राज्याविषयी आपुलकी व विश्वास वाटेल असे वर्तन ठेवण्याबद्दल त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिलेली होती.
समाजात सर्व साधारणपणे अशी कल्पना स्थापित आहे कि धर्म आणि राजकारण हे दोन वेगवेगळे विषय आहेत. राजकारण घाणेरडं आणि धर्म पवित्र मानला जातं. धर्म ही प्रत्यकाची वैयक्तिक बाब आहे असाही समज आहे. धर्म, पूजा पाठ आणि काही कर्मकांडाशी संबंधित आहे म्हणून ते आपल्या घरापर्यंत मर्यादित ठेवायला पाहिजे हा ही समज व्यापक प्रमाणात समाजात रूजलेला आहे. राजकारण हे देशाचे शासन चालविण्यासंबंधीची विचारधारा आहे. राजकारणाचा धर्माशी काही एक संबंध नाही. इतर धर्मांच्या बाबतीत ही धारणा जरी खरी असली तरी इस्लामच्या बाबतीत ही धारणा बरोबर नाही कारण इस्लाममध्ये धर्म आणि राजकारण यांना वेगळे करताच येत नाही. उलट धर्माच्या उच्च नीति मुल्यांच्या पायावर राजकारणाची इमारत उभी करावी लागते.
पल्या देशात साधारणपणे अध्यात्मिक प्रवृत्तीच्या सज्जन लोकांनी राजकारणांत पडू नये असा सल्ला दिला जातो. मुस्लिमांमध्येही उलेमांनी राजकारणात भाग घेऊ नये, असा एक विचार प्रवाह अलिकडे प्रबळ झालेला आहे. भारतीय परिपेक्षात जेव्हा आपण पाहतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते ती ही की, धर्मापासून राजकारणाला दूर ठेवा म्हणणारी मंडळी सत्ता प्राप्त करण्यासाठी मात्र धर्माचा केवळ आधारच घेत नाहीत तर त्याचा दुरुपयोग देखील करतात.
काही जण म्हणतात इस्लामचे दोन प्रकार आहेत; एक सुफी इस्लाम आणि दुसरा राजकीय इस्लाम. सुफी इस्लाम हे भारतीय संस्कृतीशी निगडित आहे आणि राजकीय इस्लाम परकीय व आक्रमक आहे, असा भ्रम पसरविला गेला आहे. वास्तविक पाहता इस्लाम एकाच आहे. पैगंबर मुहम्मद (सल्लम.) यांनी आपल्या आयुष्यात धार्मिक, सामाजिक व राजकीय सुधारणा एकाच वेळी अत्यंत यशस्वीपणे करून दाखविल्या. धार्मिक आणि सामाजिक सुधारणाप्रमाणेच राजकीय सुधारणा करण्यात पैगंबरांना संपूर्ण यश मिळाले. मानव्य हे त्यांच्या राजकारणाचे अधिष्ठान आहे. दडपशाही, भ्रष्टाचार, जुलूम, लाच लुचपत, अत्याचार, द्वेष, तिरस्कार, ध्रुवीकरण यापासून त्यांनी आपल्या राजकारणास दूर ठेऊन राजकारण केले होते. ज्यात सहकार्य, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मानवी मुल्यांचा समावेश होता. त्यांचे राजकारण म्हणजे या उच्च नीति मुल्यांचे प्रात्यक्षिकच होय.
आजची पाश्चात्य राष्ट्रे ज्या लोकशाहीचा मोठा अभिमान बाळगून आहेत, ती लोकशाही प्रस्थापित करण्याचे पहिले श्रेय हजरत मुहम्मद सल्ल. यांच्याकडे जाते. त्यांनी ज्या काळात अरबस्तानात लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवली त्या काळात पाश्चात्य राष्ट्रांमध्ये बेबंदशाही बोकाळलेली होती, पाश्चात्य राष्ट्रांचे जंगली युग अजून संपलेले नव्हते किंबहुना आजही संपलेले नाही. फक्त त्यांच्या जंगली व्यवस्थेवर आधुनिक सभ्यतेचा बुरखा त्यांनी घातलेला आहे. हजरत पैगंबरांच्या लोकशाही नंतर 1000 वर्षांनी पाश्चात्य राष्ट्रात लोकशाहीच्या संकल्पना लोकांच्या मनात मूळ धरू लागल्या. इसवी सन 1641 साली राजा व प्रजा यामधील यादवीस तोंड फुटून त्याचे पर्यावसान 1688 सालाच्या फ्रेंच क्रांतीमध्ये झाले. लोकशाहीच्या गोंडस नावाखाली वाटेल त्याला धिंगाणा घालण्याची त्यांनी ही एक सोय करून ठेवली आहे. ज्यामुळे लोकशाही म्हणजे ‘उचल्यांचा बाजार’ न वाटता सुखाचे राज्य वाटावे, अशी त्यांच्या लोकशाहीची रचना आहे.
पैगंबरांच्या लोकशाहीत कोणत्याही एका गटाचा वरचष्मा नव्हता. सर्वाना त्यांच्या योग्य ते प्रमाणे राज्यकारभारात स्थान मिळे. त्यामुळे कोणत्याही कर्तबगार लोकांस महत्वाचे स्थान मिळत असे. त्यांच्या प्रशासनातील अधिकारी मंडळी फक्त स्वजातीयांच्या किंवा आप्तेष्टांच्या कल्याणाकरिता न झटता साऱ्या राष्ट्राच्या कल्याणाकरिता झटत असत. सरकारी अधिकाऱ्यांनी कसे वागावे यासंबंधी पैगंबर म्हणतात,’ त्यांनी (अधिकाऱ्यांनी ) आपली राहणी साधी ठेवली पाहिजे. गरजूंना त्यांना सहज भेटता आले पाहिजे. जे बेकार आहेत, जे आपले जीवन जगण्यास असमर्थ आहेत त्यांना सहाय्य देता आले पाहिजे. मुस्लिमेतर नागरिकांना जे हक्क आहेत ते अबाधित ठेवता आले पाहिजेत.’
समता
हजरत मुहम्मद पैगंबर सल्ल. प्रणित लोकशाहीचे वैशिष्ट्य म्हणजे समता. समता ही खरी लोकशाहीची द्योतक असते. ज्या राष्ट्रात काळा-गोरा हा भेदभाव केला जातो, वर्णावर योग्यता ठरविली जाते, उच्चनीचपणा दाखविला जातो, धनिक आणि गरीब असे कप्पे पडले जातात त्या राष्ट्रांनी आपल्या लोकशाहीचा कितीही डांगोरा पिटला तरीही ती लोकशाही आदर्श अशी कधीच होणार नाही. इतकेच नव्हे तर ते लोकशाहीचे विडंबन आहे असे मानले जावे. लोकशाही म्हटली की त्या ठिकाणी स्पृश्यास्पृश्यता, भेदभाव, उच्चनीचपणा किंवा तुष्टीकरण असता कामा नये. सगळ्यांना सारखे स्वातंत्र्य, सारखा न्याय, सारख्या सवलती म्हणजेच खरी लोकशाही होय. पैगंबरांच्या लोकशाहीत श्रीमंतापासून ते गरिबांपर्यंत सर्व नागरिक समतेने राहात होते. त्या ठिकाणी अरब, निग्रो असा भेदभाव नव्हता. मुस्लिमाना एक कायदा आणि ज्यू लोकांना एक कायदा असा पंक्ती प्रपंच दृष्टीस पडत नव्ह्ता. पैगंबरांचे लक्ष व्यक्तीच्या कर्तबगारीवर व योग्यतेवर होते. त्यांच्या लोकशाही मध्ये सैन्याचा सर्वाधिकारी झैद रजि. नावाचे गुलाम होते. त्याचप्रमाणे मुख्य मशिदीत अजान देण्याचा बहुमान बिलाल रजि. नावाच्या काळ्या निग्रो या सहाबींना देण्यात आला होता. हजरत पैगंबरांच्या राज्यात मालक व नोकर यामध्ये देखील आदर्श अशी समता होती. स्वतःला पंचपक्वान्ने आणि नोकरास कोंडाभाकर असा प्रकार तेथे दृष्टीस पडत नसे. आपण खातो तेच अन्न आपल्या नोकरास द्या, अशी हजरत पैगंबरांची आज्ञा असल्यामुळे मालक जे अन्न खाई तेच अन्न नोकरास मिळत असे. त्याप्रमाणेच नोकरास वाजवी पेक्षा जास्त काम कधीच देण्यात येत नसे. एखाद्या वेळी नोकरास कामाचा जास्त ताण पडला तर खुद्द मालक त्याच्या मदतीस जात असे. मालक व नोकर यामध्ये हजरत पैगंबर सल्ल. यांनी घालून दिलेला समतेचा उपक्रम त्यांच्या अनुयायांनी किती इमाने इतबारे चालू ठेवला हे पुढील उदाहरणावरून सिद्ध होण्यासारखे आहे.
एकदा असे झाले की, इस्लामी लष्कराने जेरूसलम जिंकले व पराभूत ख्रिश्चन शासकांसोबत वाटाघाटीसाठी अमिरूल मोमेनीन हजरत उमर फारूख रजि. (द्वितीय खलीफा) यांना पाचारण केले. ते तहाच्या वाटाघाटीसाठी जेरुसलेमकडे निघाले. निघताना त्यांनी फक्त एक नोकर सोबत घेतला होता. बसावयास फक्त एकच उंट असल्यामुळे हजरत उमर रजि. व त्यांचा नोकर आळीपाळीने उंटावर बसून जेरुसलेमकडे मार्गक्रमण करू लागले. हजरत उमर रजि. उंटावर बसले की त्यांचा नोकर पायी चालत असे, काही अंतर गेल्यावर हजरत उमर नोकरास उंटावर बसवीत व आपण पायी चालत. ज्यावेळी जेरुसलेम शहर जवळ आले त्यावेळी नोकराची उंटावर बसण्याची पाळी आली होती. शहर जवळ आले म्हणून तो नोकर उंटावर बसावयास संकोच करू लागला. पण हजरत उमर यांच्या आग्रहामुळे त्याला उंटावर बसावे लागले. नोकर उंटावर व हजरत उमर पायी चालत जेरुसलेमच्या वेशी जवळ आले. हजरत उमर यांचा सर सेनापती अबू उबेद रजि. हे त्यावेळी वेशीजवळ स्वागताकरिता उभे होते. नोकर उंटावर व राजा पायी चालत असलेला पाहून जेरुसलेम चे लोक तुच्छतेने हसतील अशी त्यांच्या सेनापतीने हजरत उमर यांना कळवून त्यांना उंटावर बसण्याचा आग्रह केला. त्यावर हजरत उमर म्हणाले, ’तुमच्या सारखी सूचना मला आतापर्यंत कोणी केली नाही. आपली ही सूचना मुस्लिमांची नाचक्कीच करील. आता पर्यंत आपली अधोगती झाली होती व आपला सगळीकडे धिक्कार होत होता. परंतु आपल्या इस्लाम धर्मामुळे आम्हां सर्वांस सारखा मान मिळाला आहे. आपण सांगता त्या प्रमाणे मी वागेन तर पुन्हा आपली पूर्वीप्रमाणे अधोगती झाली आहे हे सिद्ध होईल.’ आणि हजरत उमर रजि. जमिनीवर व नोकर उंटावर अशा अवस्थेतच ते जेरूसलम शहरामध्ये दाखल झाले. त्यांचा हा निर्णय जेरूसलम वासियांना चकीत करून गेला. जेरूसलमवासी हजरत उमर रजि. यांच्या न्यायप्रिय व समानतेच्या या प्रात्यक्षिकाला पाहून भाराहून गेले. वरील उदाहरणावरून इस्लामच्या लोकशाहीत मालक व नोकर यामध्ये किती समता होती हे स्पष्टपणे दिसून येईल.
स्वातंत्र्य
हजरत मुहम्मद पैगंबर सल्ल. प्रणित लोकशाहीत प्रत्येक नागरिकास पूर्ण स्वातंत्र्य होते. कोणीही सर्वसाधारण नागरिक राज्यप्रमुखास -(उर्वरित पान 23 वर)
बेडरपणे जाब विचारीत असे. एकदा एका नागरिकाने खलिफा उमर यांना भर सभेमध्ये एका गोष्टीचा जाब विचारला. त्या बरोबर काही लोकांनी त्या नागरिकास गप्प बसविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहून खलिफा म्हणाले, ’त्याला मोकळेपणाने बोलू द्या. नागरिकांनी जाब विचारून आम्हास जाणीव करून दिली तर त्यांनी आपले कर्तव्य योग्य रीतीने पार पाडले असेच मी म्हणेन.’ हजरत मुहम्मद (सल्ल.) यांनी काढलेली राजकीय फर्माने पाहिली म्हणजे परधर्मीयांच्या आचार व विचार स्वातंत्र्याबद्दल ते किती दक्ष होते हे सहज दिसून येते. त्यांच्या राज्यात ज्यू लोकांचे फार मोठे प्रस्थ होते. त्यांचा प्रमुख व्यवसाय व्याज होता. त्यामुळे गरीबांचे जरी शोषण होते तरी ज्यूंच्या हातात धन खेळत होता. आपला धर्म प्रसार त्यांनी नेटाने चालू ठेवला होता. मुसलमानांचा ते उघड हेवा करीत, पण, हजरत मुहम्मद सल्ल. यांनी राजकीय अधिकाराच्या जोरावर त्या लोकांची मुस्कटदाबी करण्याचा कधीच प्रयत्न केला नाही किंवा त्यांची संपत्ती जप्त करून टाकली नाही. आपल्या धर्माविरुद्ध वाटेल त्या खोट्या नाट्या कंड्या पिकवितात म्हणून त्यांनी ज्यू लोकांस जरब दाखविली नाही किंवा मुसलमानांचा उघड-उघड द्वेष करतात म्हणून त्यांचे खून पडले नाहीत. आपल्या राज्यात प्रत्येक व्यक्तीला किंवा समूहाला इतके स्वातंत्र्य दिल्याची उदाहरणे आपणास फारच थोडी सापडतील.
अल्पसंख्याकांना अभय
अल्पसंख्याकांना अभय, हे लोकशाहीचे भूषण मानले जाते. हजरत मुहम्मद (सल्ल.) यांच्या लोकसत्ताक राज्यात अनेक अल्पसंख्यांक जमाती होत्या. त्या सर्व जमातींना हजरत पैगंबरांनी कायद्यान्वये अभय दिले. अल्पसंख्यांकाचा धर्म, त्यांची संस्कृती अबाधित ठेवण्याकरिता त्यांनी वेळोवेळी जाहीर फर्माने काढली आहेत. केवळ मुस्लिम बहुसंख्यांक म्हणून त्यांचेच राज्य आहे असे अल्पसंख्यांकांना वाटू नये, या विषयी प्रेषित मुहम्मद सल्ल. फार दक्षता घेत. एखाद्या लहान अल्पमतवाल्या जमातीला देखील राज्याविषयी आपुलकी व विश्वास वाटेल असे वर्तन ठेवण्याबद्दल त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिलेली होती.
सरकारी नोकर म्हणजे जनतेचा सेवक, त्याने आपली जात किंवा धर्म याचा विचार न करता न्यायाने वागले पाहिजे असा दंडक घालण्यात आला होता. अल्पसंख्यांक असलेल्या ख्रिश्चन जमातीशी एक मुस्लिम अधिकाऱ्याने उद्धट व बेजबाबदार वर्तन केले म्हणून त्याला राजीनामा देण्यास खलिफा हजरत उमर रजि. यांनी भाग पाडले. न्याय धर्माकडे पाहून दिला जात नव्हता किंवा पैशा आधारे विकला जात नव्हता. गरीब असो, श्रीमंत असो, नोकर असो कोणीही मुसलमान असो किंवा परधर्मीय असो, सर्वांना हजरत मुहम्मद सल्ल. यांच्या राज्यात सर्वांना सारखा न्याय मिळत असे.
न्याय
एकदा त्यांच्या समोर मुस्लिम विरूद्ध ज्यू असा एक तंटा आला असतांना प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी मुस्लिम व्यक्तीला दोषी ठरविले. पवित्र कुरआनाच्या आज्ञेप्रमाणे प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी न्यायास अत्यंत श्रेष्ठ स्थान दिले आहेत. कुरआनमध्ये न्यायाच्या महत्वाला अधोरेखित करताना परमेश्वराने म्हटले आहे की, ’’हे श्रद्धावंतांनो! न्यायावर दृढ राहा आणि अल्लाहसाठी साक्षीदार बना, यद्यपि तुमच्या न्यायाचा व तुमच्या साक्षीचा आघात तुम्हा स्वतःवर अथवा तुमच्या आई-बापावर व नातेवाईकांवर जरी होत असेल तरी देखील! मामल्यातील पक्षकार मग तो श्रीमंत असो अथवा गरीब, अल्लाह तुमच्यापेक्षा जास्त त्यांचा हितचिंतक आहे. म्हणून आपल्या मनोवासनेच्या अनुकरणात न्यायापासून दूर राहू नका आणि जर तुम्ही पक्षपाताची गोष्ट बोललाच अथवा सत्याला बगल दिली तर समजून असा की जे काही तुम्ही करता अल्लाहला त्याची माहिती आहे.’’ (सुरे निसा : आयत नं. 135)
हजरत मुहम्मद सल्ल. प्रणित लोकशाहीचे लक्षात ठेवण्यासारखे एक वैशिष्ट्ये म्हणजे अधिकाराचा सदुपयोग होय. अलिकडे राजकारण हाती घेतले की ते यशस्वी करण्याकरिता अत्याचाराच्या कित्येक वेळा अवलंब करावा लागतो, असे नामुष्कीचे उद्गार काढणाऱ्या मुत्सद्यांच्या तोंडास हजरत पैगंबरांनी चांगलीच पाने पुसली आहेत. अधिकाराचा दुरूपयोग करून केले जाणारे अत्याचारी राजकारण जगाच्या इतिहासात अत्यंत लांछनास्पद समजले जाते. अत्याचाराचा वारंवार आश्रय घ्यावा लागणे हे कमकुवतपणाचे लक्षण आहे. राजकारणातून सत्ता मिळते आणि अधिकारातून सत्ता मिळते आणि हे अधिकार ही राजकारणामधील एक प्रचंड शक्ती आहे. उत्कृष्ट राजकारणाचा दाखला म्हणून आपणास राजकीय अधिकारांच्या सदुपयोगाकडे बोट दाखविता येईल. याच गोष्टीचा पैगंबर मुहम्मद सल्ल. यांनी अवलंब केला होता.
राजकारण यशस्वी करण्याकरिता त्यांनी अत्याचाराचा भस्मासुर कधीही निर्माण होवू दिला नाही. त्यांनी लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवल्यापासून एकंदर राजकारणाचा विचार केला म्हणजे अत्याचाराचे अनेक प्रसंग त्यांनी मोठ्या शिताफीने टाळले होते हे लक्षात यावयास फारसा वेळ लागणार नाही. उदाहरणादाखल म्हणून आपणास एका प्रसंगाचा उल्लेख करता येईल. एकदा हजरत मुहम्मद सल्ल. यांना बदनाम करण्याकरिता व त्यांचे लोकशाही शासन उलथून टाकण्यासाठी काही ज्यू लोकांनी एक भयंकर कट रचला होता. पण हा कट ऐनवेळी उघडकीस आल्यामुळेे ज्यू लोकांचा बेत सपशेल फसला. न्यायासनासमोर त्यांची चौकशी होऊन त्यांना योग्य त्या शिक्षा झाल्या. पण तेवढ्यामुळे जनतेचे समाधान झाले नाही. ज्यांनी हा कट करून राष्टास धुळीस मिळविण्याचा प्रयत्न केला त्यांचीच काय पण ‘ एकजात सर्व ज्यू लोकांची कत्तल करा’ अशा गर्जना शहराच्या कानाकोपऱ्यातून ऐकू येऊ लागल्या. तुमच्या हातून झाले नाही तर आम्हास परवानगी द्या, आम्ही त्यांची कत्तल करतो असे काही लोक हजरत मुहम्मद सल्ल. यांना उघडपणे बोलू लागले. दहा बारा ज्यू लोकांनी चूक केली म्हणून त्यांचे प्रायश्चित सर्व ज्यू लोकांना देणे म्हणजे धडधडीत त्यांच्यावर अत्याचार होय असे हजरत मुहम्मद सल्ल. यांना वाटल्यामुळे त्यांनी ज्यू लोकांच्या हत्याकांडास संमती दिली नाही किंवा त्यांच्यावर कडक नियंत्रणही घातले नाही. जेव्हा आस बिन जबल रजि. यांची यमनचे गव्हर्नर म्हणून त्यांनी नेमणूक केली. त्यावेळी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी त्यांना पुढीलप्रमाणे उपदेश केला, ’’ तुम्ही प्रजाजनांस अत्यंत दयाळूपणाने व विचाराने वागविले पाहिजे. तुम्ही त्यांच्याशी कठोरपणाने वागता कामा नये किंवा त्यांची संपत्ती लुटता काम नये. त्रस्त लोकांचे सुस्कारे परमेश्वर दरबारी लवकर रुजू होतात, या गोष्टीची आठवण असू द्या.’’ वरील लोकशाही मुल्यांचा निःपक्षपातीपणे विचार केल्यावर अशी आदर्शभूत लोकशाही प्रस्थापित करणारे प्रेषित हजरत मुहम्मद (सल्ल.) श्रेष्ठ दर्जाचे राजकीय धुरंधर होते व त्यांनी स्थापित केलेली राजकीय मुल्ये प्रलयाच्या दिवसापर्यंत मानवजातीला आदर्श राजकारण कसे करावे, याचे मार्गदर्शन करणारे दीपस्तंभ आहेत, यात शंका असण्याचे कारण नाही.
- संकलन
इम्तीयाज शेख, पुणे.
लेखकाचा संपर्क : मो. 9890988949
Post a Comment