तुम्हाला आता जे धान्य रेशन दुकानातून मिळत आहे ते 2017 पूर्वी मिळत होते काय? तेव्हा तर ते, ’अब्बाजान’ म्हणविणारे फस्त करत होते.’’ फ्रान्स पेक्षा मोठे क्षेत्रफळ असलेल्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्याचे हे विधान कुठल्याही दृष्टीने लोकशाही अनुरूप आहे असे म्हणता येणार नाही. या वाक्यामधून योगी आदित्यनाथ यांच्या मनामध्ये मुस्लिम समुदायाबद्दल घृणा किती ठासून भरलेली आहे याचा सहज अंदाज येतो. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या देशात घटनात्मक पदावर विराजमान या व्यक्तीचे हे सार्वजनिकरित्या केलेले कथन लोकप्रियता मिळवून जाते.
कारण बहुसंख्यांकांच्या मते योगी हे प्रखर राष्ट्रवादी आहेत व त्यांचे प्रत्येक विधान राष्ट्राच्या हितासाठीच असते. मुस्लिमांविषयी योगींनी यापेक्षाही अधिक आक्षेपार्ह विधाने भूतकाळात केलेली आहेत. त्यांच्यावर दाखल फौजदारी गुन्हे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी स्वतः कोर्टातून माघारी घेऊन नैसर्गिक न्याय तत्त्वाचे हनन केलेले आहे. परंतु त्यांची ही विधानं आणि कोर्टातून फौजदारी गुन्हे मागे घेण्याची कृती ही राष्ट्रवादाच्या मुलाम्याखाली सपादून जाते. भाजपचे हेच वैशिष्ट्ये आहे की ते आपल्या सांप्रदायिक राजकारणाला राष्ट्रवादाची फोडणी देतात, म्हणून तिच्याबद्दल कोणीही आक्षेप घेत नाही, कोर्टसुद्धा नाही.
दूसरे विधान प्रसिद्ध सिनेअभिनेता नसरूद्दीन शहा यांचे आहे. तालीबानची अफगानिस्तानमध्ये सत्ता आल्यानंतर बोटावर मोजता येतील एवढ्या भारतीय मुस्लिमांनी आनंद व्यक्त केला होता. त्यासंदर्भात शहा यांनी आपले मत मांडतांना (त्या) अपवादात्मक मुस्लिमांच्या प्रतिक्रियांसोबतच सर्व भारतीय मुस्लिमांना उद्देशून विधान केले की, ’’भारतीय मुस्लिमांनी तालीबानच्या क्रूर राजवटीचे समर्थन करू नये. भारतीय इस्लाम पेक्षा तालीबानचा इस्लाम वेगळा आहे, मध्ययुगीन आहे, बर्बरतापूर्ण आहे.’’ शहा यांनी एका झटक्यात समस्त भारतीय मुस्लिम समाजाला तालीबान समर्थक ठरवून टाकले. आसामच्या ज्या 14 तरूणांनी तालीबानच्या समर्थनात समाज माध्यमांवर आपले मत प्रदर्शन केले होते त्यांच्याविरूद्ध युएपीए सारख्या -(आतील पान 2 वर)
कठोर कायद्याअंतर्गत कारवाई झाली, स.पा.चे खा. शफिकुर्रहमान बर्क आणि प्रसिद्ध उर्दू शायर मुनव्वर राणा यांच्याविरूद्ध सुद्धा देशद्रोही वक्तव्य केल्याबद्दल एफआयआर दाखल झाले, याकडे नसिरूद्दीन शहा यांनी सपशेल दुर्लक्ष केले व समस्त भारतीय मुस्लिम समाजाला हिंदू बांधवांच्या नजरेमध्ये शंकास्पद बनवून टाकले. शहा यांचा इस्लामी आचरणाशी दुरान्वयेही संबंध नसतांना त्यांनी भारतीय मुस्लिम समाजाला ज्ञान देण्याचा जो प्रयत्न केला तो बहुसंख्यवादाच्या दबावातून दिला यात शंंका नाही.
तिसरे उदाहरण जावेद अख्तर या घोषित नास्तीक कविचे आहे. बॉलीवुडमध्ये आपल्या लेखन आणि काव्याच्या माध्यमातून एक वेगळा ठसा उमटविणारे जावेद अख्तर यांनी भावनेच्या भरात तालीबानची तुलना संघाच्या स्वयंसेवकांशी करून टाकली. त्यानंतर माध्यमामधून जो गदारोळ झाला त्याला नियंत्रित करण्यासाठी जावेद यांना तात्काळ डॅमेज कंट्रोल करत दैनिक सामनामधून लेख लिहून स्पष्टीकरण द्यावे लागले की, त्यांच्या म्हणण्याचा विपर्यस्त केला गेला आहे. वास्तविक पाहता भारतातील बहुसंख्य हिंदू समाज हा जगातील सर्वात मोठा सहिष्णू समाज आहे. नास्तिकतेची घोषणा करूनही केवळ नाव मुस्लिमसदृश्य असल्यामुळे त्यांना हा सगळा द्रविडी प्राणायाम करावा लागला. त्यांच्या मनातील ही भीती बहुसंख्यांकांच्या लेखी आपण राष्ट्रविरोधी समजले जाऊ नये या भावनेतून निर्माण झाली आहे, हे स्पष्ट आहे.
चौथे उदाहरण कंगणा रानावतचे आहे. मागच्याच वर्षी बॉलीवुडच्या नेपोटिझम (भाई-भतीजा वाद) वर मुखरपणे बोलल्यामुळे ती अचानक प्रकाशझोतात आली. तिने म्हटले की, ’’मुंबईत मला पाकव्याप्त कश्मीरसारखी परिस्थिती वाटत आहे.’’ तिने पुढे असेही म्हटले होते की, तिला मुंबई पोलिसांची भीती वाटते. महाराष्ट्र पोलीस, त्यातल्या त्यात मुंबई पोलिसांचा लौकिक, सचोटी, राष्ट्रनिष्ठा आणि धर्मनिरपेक्ष मुल्यांविषयींचे (त्यांचे) समर्पण हे जरी वादातीत नसले तरी इतर राज्यांच्या पोलीस दलाच्या तुलनेत उजवे आहे, एवढे नक्की. असे असतांना मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणे आणि मुंबई पोलिसांबद्दल भीती व्यक्त करणे हे सरळ-सरळ राष्ट्रद्रोही या श्रेणीत मोडणारे वक्तव्य होते. असे असतांना सुद्धा केवळ राज्यसरकारशी असलेल्या विरोधातून भाजपने तिची पाठराखन तर केलीच उलट केंद्र सरकारने तिला वाय दर्जाची सुरक्षा पुरवून आपल्याला न आवडणाऱ्या राज्यसरकारांच्या विरूद्ध आपण कुठल्या स्तरापर्यंत जाऊ शकतो याची देशाला प्रचिती करून दिली.
भाजपचा राष्ट्रवाद या ठिकाणी सपशेल पराभूत झाला. कुठलेही विधान कोण करतय? त्याचा धर्म कोणता? यावरून ते चांगले का वाईट हे ठरविण्याचा प्रकार अलिकडे सुरू झालेला आहे. एकीकडे कंगना रानावतची पाठराखण केली गेली तर दूसरीकडे ’’आपली पत्नी किरण राव हिला आपल्या देशातील परिस्थितीची भीती वाटत असून, दुसऱ्या देशात जाऊन राहवेसे वाटते’’ असे आमीर खानने म्हटल्याबरोबर केवढा गहजब माजला होता हे वाचक विसरलेले नसतील. वक्तव्य किरण रावचे असतांना ट्रोल मात्र आमीर खान झाला होता. हे खऱ्या-खुऱ्या राष्ट्रवादाचे नव्हे तर छद्म राष्ट्रवादाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. अलिकडे एकाच वर्गातील एकाच प्रकारच्या वक्तव्याचे सोयीने दोन अर्थ काढले जात आहेत.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची साधार भीती समोर उभी टाकलेली असतांना, अफगानिस्तानातील 300 कोटीची गुंतवणूक पाण्यात गेलेली असतांना, चीन दाराच्या आत येवून उभा राहिलेला असतांना देशात एकोप्याची गरज असतांनासुद्धा असे मतभेद देश हिताचे नाहीत एवढी शालेय स्तरीय समजसुद्धा अलिकडे सत्ताधारी पक्ष विसरून गेलेला आहे, ही आश्चर्याची बाब आहे.
विशेष म्हणजे भारतीय मुस्लिमांच्या बाबतीत जी कृत्रिम घृणा पसरविली जात आहे तिचा कडेलोट होण्यास सुरूवात झाली असून, दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील पसरत चाललेल्या किसान आंदोलनामध्ये जाट आणि मुस्लिम यांच्यातील सामंजस्य आकार घेत असल्याचे दिसत आहे. टिकैत यांच्या उत्तर प्रदेशातील सभेत ’अल्लाहु अकबर’ आणि त्या प्रत्युत्तरादाखल ’हर-हर महादेव’ सारख्या घोषणा सौहार्दपूर्ण वातावरणात झाल्यामुळे हिंदू-मुस्लिम सौहार्द निर्माण होतांना दिसत आहे. भारतीय मुस्लिमांच्या सचोटीबद्दल संशय घेणारे योगींचे विधान असो की शहांचे, भारतीय मुस्लिमांची निष्ठा नेहमीच वादातीत राहिलेली आहे, ही गोष्ट सामान्य हिंदू बांधवांना सुद्धा माहिती आहे. एवढेच नव्हे तर भारतीय मुस्लिमांच्या संबंधात बोलतांना दस्तुरखुद्द बराक ओबामा यांनी डिसेंबर 2017 मध्ये इंडिया टुडे एन््नलेव्हमध्ये भाषण दिल्यानंतर प्रधानमंत्री मोदींना व्यक्तीगतरित्या सांगितले होते की, ‘ऋेी र र्लेीपीीूं श्रळज्ञश खपवळरुहशीशींहशीश ळी र र्चीीश्रळा िेिर्ीश्ररींळेपींहरीं ळीीर्ीललशीीर्षीश्र, ळपींशसीरींशव रपव लेपीळवशीी ळीींशश्रष री खपवळरप -ुहळलह ळी पेीींंहश लरीश ळपीोशेींहशी र्लेीपीींळशी,ींहळीीर्हेीश्रव लश र्पेीीळीहशव रपव र्लीश्रींर्ळींरींशव,‘ (ढहश षेीाशी णड झीशीळवशपीं इरीरज्ञ जलरारीरळव. ऊशलशालशी 2017 ळप पशु वशश्रहळ.) ओबामांनी मोदींना म्हटले होते की, ’’ भारतासारख्या बहुमुखी समाजामध्ये मुस्लिम समाज हा यशस्वी समाज आहे. तो भारताशी समरस झालेला असून, स्वतःला भारतीय समजतो. याउलट अनेक देशांमध्ये अशी परिस्थिती नाही. म्हणून भारत सरकारने (मुस्लिम समाजाच्या समरसतेची) ही गोष्ट फक्त जपावीच असे नाही तर त्याचे संवर्धनही करावे.’’ ओबामांचे हे वाक्य मुस्लिमांच्या राष्ट्रनिष्ठेवर आंतरराष्ट्रीय मान्यतेची मोहर उठविणारे आहे. त्यांचे हे वक्तव्य आजही इंटरनेटवर उपलब्ध आहे. ज्यांना शंका असेल त्यांनी तपासून घ्यावे.
दूसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय हिंदू समाजाला सहिष्णूतेचे प्रमाणपत्र जावेद अख्तर यांचेकडून घेण्याची गरज नाही. हा समाज बाय डिफॉल्ट सहिष्णू आहे. शेकडो वर्षांच्या त्यांच्या सहवासात राहून मुस्लिम समाज सुद्धा जगातील इतर मुस्लिम समाजाच्या तुलनेत जास्त सहिष्णू बनलेला आहे. यातून भारतात राहणाऱ्या हिंदू-मुस्लिमांमध्ये एक नैसर्गिक सौहार्दाची भावना खोलपर्यंत रूजलेली आहे. याचा अनुभव दररोज व्यवहारातून येत असतो. विशेषतः जातीय दंगलींच्या काळात या दोन्ही समाजातील अनेक लोक एकमेकांच्या रक्षणार्थ नेहमी पुढे येतात व जोखीम पत्करून एकमेकांचे रक्षण करतात, याचे अनेक दाखले इतिहासात उपलब्ध आहेत. खरे तर भारत केवळ घटनात्मक तरतुदींमुळे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे असे नाही तर सनातन हिंदू धर्मातील सहिष्णूतेच्या भावनेमुळे धर्मनिरपेक्ष आहे. असे असले तरी अलिकडे अल्पसंख्यांकांचा दुस्वास करणाऱ्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढत आहे. ही सुद्धा एक अशी वस्तुस्थिती आहे जिला नाकारता येणे शक्य नाही. परंतु या वाढत्या घृणेचे कारण हिंदू समाजामध्ये सहिष्णूता कमी होत आहे हे नसून वाढत्या राजकारणामुळे असे होत आहे, असे मानण्यास ठोस पुरावा उपलब्ध आहे. विकिलिक्सने केलेल्या एका रहस्य उद्घाटनातून ही बाब समोर आलेली आहे. या संदर्भात तपशील असा की, भाजप नेते अरूण जेटली यांनी अमेरिकेच्या भारतीय प्रतिनिधी रॉबर्ट ब्लॅक यांच्याशी हिंदूत्वाच्या मुद्यावर बोलतांना असे म्हटले होते की, ’’ हिंदू राष्ट्रीयता ही आमच्यासाठी केवळ सत्ता मिळविण्याची संधी आहे.’’ रॉबर्ट ब्लॅकने जेटलींच्या या विधानाचा उल्लेख अमेरिकन सरकारला 6 मे 2005 रोजी पाठविलेल्या आपल्या अहवालात केला होता. ही माहिती सुद्धा इंटरनेटवर उपलब्ध आहे. यावरून भाजपचे खरे लक्ष्य सत्ता असून, सत्तेच्या सोपानावर चढण्यापुरता भाजपा ही राष्ट्रवादाचा आधार घेते हे चाण्नक्ष वाचकांच्या लक्षात येईल.
भाजपाने जाणून बुजून सत्ता मिळविण्यासाठी व टिकविण्यासाठी मुस्लिमांविरूद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र यात भावनेच्या आहारी जाऊन हिंदू समाजाने केंद्र सरकारला, ’’पवित्र गाय’’ समजण्याची चूक केली आहे, हे आता हिंदू नागरिकांनाही कळून चुकलेले आहे. या भावनेचा आविष्कार 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदी यांच्या जन्मदिवशी समाज माध्यमांवर पहावयास मिळोला आहे. मोदींच्या अभिष्टचिंतन करणाऱ्यांपेक्षा त्यांच्यावर टिका करणाऱ्यांची व तो दिवस बेरोजगार दिवस म्हणून उघडपणे साजरा करण्याची हिम्मत लाखो तरूणांनी दाखविली आहे. आता फार काळ आपण ’अब्बाजान- तालीबान’ असे नारे देऊन हिंदू समाजाला मूर्ख बनवू शकत नाही, हे एव्हाना भाजपच्या लक्षात आलेच असेल.
मुस्लिमांनीही भाजपच्या धोरणाचा विरोध करतांना एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, भाजपच्या सात वर्षाच्या शासन काळात एकही बॉम्बस्फोट झालेला नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुस्लिम तरूणांची रवानगी तुरूंगात झालेली नाही, दिल्ली वगळता देशात इतरत्र दंगल झालेली नाही. या सात वर्षाच्या शासन काळाची तुलना काँग्रेसच्या कुठल्याही सात वर्षाच्या शासन काळाशी केली असता तुलनेने भाजपच्या काळातील नुकसान कमी आहे, हे मुस्लिमांना नाकारता न येण्यासारखे सत्य आहे.
भारतीय लोकशाहीची एक शोकांतिका अशी आहे की, इतर समाज स्वतःच्या विकासाला नजरेसमोर ठेऊन मतदान करतात, या उलट मुस्लिम समाज आपल्या सुरक्षेला नजरेसमोर ठेऊन मतदान करतो. राष्ट्रीय भावनेचा दुरूपयोग कम्युनिस्ट वगळता सर्वच पक्षांनी केलेला आहे. मुस्लिमांना बहुसंख्य हिंदू समाजाकडून भविष्यात त्रास होईल, अशी भीती स्वातंत्र्य नजरेच्या टप्प्यात येताच अनेकांकडून व्यक्त केली गेली होती. फाळणीमुळे ती भीती काही अंशी खरी देखील ठरली होती. परंतु मौलाना अबुल कलाम आझाद आणि त्यांना नेता मानणारा मुस्लिम समाजातील एक मोठा वर्ग तसेच दारूल उलूम देवबंदच्या उलेमांना एकूणच हिंदू समाजाच्या सहिष्णू वृत्तीवर जास्त विश्वास होता. म्हणून या दोन्ही संस्थांनी फाळणीचा शेवटपर्यंत सर्वशक्तीनिशी विरोध केला होता, हे सत्य नाकारता येण्यासारखे नाही.
आजही या दोन प्रमुख धार्मिक समुहांमधील दैनंदिन व्यवहार हे सामंजस्याचेच आहेत. या सर्व विवेचनावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, राष्ट्रीयत्वाची भावना ही दोन्हीकडून चालविल्या जावू शकणाऱ्या तलवारीसारखी असते. खरे तर राष्ट्रवादाची भावना ही कृत्रिम असून, विश्वबंधुत्वासाठी घातक आहे. म्हणून इस्लाममध्ये राष्ट्रीयत्वाला फारसे महत्त्व नाही. खरे तर ईश्वराच्या या पृथ्वीवर माणसाला मुक्तपणे कुठेही संचार करण्याचा अधिकार असावा. कृत्रिम राष्ट्रवादाने तो हिरावून घेतलेला आहे. राष्ट्रवादाची भावना जरी एक महान भावना असली तरी त्या भावनेच्या वाजवीपेक्षा जास्त आहारी गेल्यास त्यातून समाजामध्ये संकुचितपणाची भावना वाढीस लागते आणि याच संकुचित पणातून आपल्याच देशाच्या नागरिकांना एकमेकाचे वैरी बनविण्यापर्यंत ती घेऊन जाते. राष्ट्रवादाच्या गर्भातूनच प्रादेशिकवाद, भाषावाद आणि इतर संकुचित विचारांची पैदास होते. कावेरी जलविवादामध्ये कर्नाटक आणि तामिळनाडू तर बेळगाव सीमावादामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लोक, भारतीय असूनसुद्धा एकमेकांचे हाडवैरी असल्यासारखे वागतांना दिसून येतात. या ठिकाणी राष्ट्रवादाची भावना काम करतांना दिसत नाही. अनेकवेळा मी अमूक राज्याचा, अमूक जिल्ह्याचा, अमूक गावचा आणि अमूक गल्लीचा इथपर्यंत राष्ट्रवादाचे स्खलन होत जाते. हाच राष्ट्रवाद इतर राष्ट्रांच्या चांगल्या गोष्टींचा द्वेष करायला शिकवितो. एका मर्यादित स्तरापर्यंत राष्ट्रवादाची भावना नियंत्रित ठेवायला हवी. तिचा अमर्याद विस्तार होणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी. याचा धडा वसुधैव कुटुंबकम या सनातन संकल्पनेतून मिळतो. जिच्याकडे अलिकडे दुर्लक्ष होत आहे. याच भावनेची अभिव्यक्ती कुरआनमध्ये खालीलप्रमाणे करण्यात आलेली आहे.
’’लोकहो, आम्ही तुम्हाला एका पुरुष व एका स्त्रीपासून निर्माण केले आणि मग तुमची राष्ट्रे आणि वंश बनविले जेणेकरून तुम्ही एकमेकांना ओळखावे. वास्तविकतः अल्लाहजवळ तुमच्यापैकी सर्वात जास्त प्रतिष्ठित तो आहे जो तुमच्यापैकी सर्वात जास्त ईशपरायण आहे. निश्चितच अल्लाह सर्वकाही जाणणारा आणि खबर राखणारा आहे.’’ (सुरे अलहुजरात आयत नं.13)
कुरआनमधील सिद्धांत सुद्धा जागतिक मानवकल्याणाचा सिद्धांत आहे. एकंदरित सनातन हिंदू धर्माच्या वसुधैव कुटुंबकम या तत्वाला डोळ्यासमोर ठेवून हिंदूंनी व सुरे हुजरातची वर नमूद आयत क्रमांक 13 मध्ये फरमाविलेल्या तत्वाला मुस्लिमांनी डोळ्यासमोर ठेऊन एकमेकांच्या सहकार्याने देशाचा विकास केला तरच भारताचे भविष्य उज्ज्वल होईल. त्याशिवाय चीनी ड्रॅगनचा सामना करणे शक्य होणार नाही. जय हिंद !
- एम.आय.शेख
Post a Comment