Halloween Costume ideas 2015

इस्लामोफोबियाचे संस्थागतीकरण

जेएनयूमध्ये आतंकवादाला इस्लामशी जोडणारा पाठ्यक्रम मंजूर


जिन्होंने जान देकर मयकदे की आबरू रखली

वही अब कतरे-कतरे के लिए तरसाए जाते हैं

शैक्षणिक आणि प्रशासकीय पातळीवर जाणून बुजून मुस्लिमांना सरकार आपले आहे असे जेव्हा वाटेल तेव्हा इस्लामी जिहादचा विळखा आपसुकच कमी झालेला असेल’’- के.पी. रघुवंशी, माजी प्रमुख एटीएस महाराष्ट्र (लोकसत्ता दि. 12 नोव्हेंबर 2015 पान क्र. 7).

तत्कालीन एटीएस प्रमुखांच्या या दृष्टीकोणातून एक गोष्ट स्पष्ट होते की मुस्लिम लोक हे जिहादच्या नावाखाली आतंकवादी कारवाया करतात कारण की त्यांना शैक्षणिक आणि शासकीय पातळीवर डावलले जाते. एटीएस प्रमुख पदावर असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे हे विधान प्रातिनिधीक स्वरूपाचे आहे. वास्तविक पाहता कश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी असाच विचार करतात. म्हणूनच बॉम्बस्फोट कोठेही होवो, मस्जिदमध्ये होवो, मंदीरमध्ये होवो, मॉलमध्ये होवो का बाजारमध्ये होवो, सर्व घटनांमध्ये पोलीस एकाच दिशेने विचार करतात आणि मुस्लिमांना अटक करतात. फक्त अटक करून थांबत नाहीत तर अटक केलेल्या अनेक निरपराध लोकांच्या विरूद्ध स्वतः खोटे पुरावे तयार करतात, हे अनेक खटल्यांमध्ये सिद्ध झालेले आहे. पोलिसांचा हा दृष्टीकोण इस्लामोफोबियाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. दस्तुरखुद्द महाराष्ट्रामध्ये हेमंत करकरे यांनी मुस्लिमांविषयीच्या या दृष्टीकोणाला छेद देण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता. असे असतांनासुद्धा मुस्लिमांविषयीची ही मानसिकता पोलिसांमध्ये आजही आढळून येते. 

मुस्लिमांच्या राष्ट्रनिष्ठेवर शंका घेवून त्यांना आतंकवादाशी जोडण्याच्या या राष्ट्रीय प्रवृत्तीला दुर्दैवाने आता संस्थागत स्थान प्राप्त झाले आहे. त्यामुळे भविष्यकाळात मुस्लिमांकडे अधिकृतरित्या संशयाने पाहण्याची प्रवृत्ती पोलिसांबरोबर आम नागरिकांमध्ये ही वृद्धींगत होईल अशी भीती निर्माण झालेली आहे. आतंकवादाला इस्लामशी जोडण्याचा पराक्रम जेएनयूमध्ये झालेला आहे. जगात असे पहिल्यांदाच झालेले आहे. म्हणून याची दखल घेणे क्रमप्राप्त ठरते, त्यासाठीचा हा लेखन प्रपंच. 

दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने जगात पहिल्यांदाच असा एक पाठ्यक्रम तयार केला आहे की ज्याचे नाव ’काउंटर टेरेरिझम ऐसीमेट्रिक कॉन्फ्ली्नटस् अ‍ॅण्ड स्ट्रॅटेजिज फॉर कोऑपरेशन विथ मेजर पावर्स’ असे आहे. हा पाठ्यक्रम अभियांत्रिकीच्या त्या विद्यार्थ्यांसाठी डिझाईन (तयार) करण्यात आलेला आहे जे आपले तांत्रिक शिक्षण पूर्ण करून आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास करू इच्छितात. या पाठ्यक्रमाचा उद्देश धर्माने प्रेरित आतंकवाद म्हणजे काय? जिहादी आतंकवादाचा वैश्विक शक्तींच्या सहकार्याने कसा सामना करावा? त्यासाठी कशा योजना आखाव्यात ? कुठली रणनिती अवलंबवावी? या संबंधीचे ज्ञान (?) या पाठ्यक्रमामध्ये सामील करण्यात आलेले आहे. जेएनयूच्याच सय्यद अब्दुल खालीक अहेमद यांच्या मते, ’जो कोणी हा अभ्यासक्रम वाचेल त्याच्या लक्षात येईल की हा अभ्यासक्रम त्रुटीपूर्ण आहे कारण की विद्यापीठाद्वारे तयार केल्या गेलेल्या या आतंकवादविरोधी पाठ्यक्रमामध्ये फक्त इस्लामला आतंकवादाशी जोडण्याचे काम केले गेलेले आहे.’ विशेष म्हणजे या पाठ्यक्रमाला विद्यापीठाच्या अभ्यासक्रम तयार करणाऱ्या अ‍ॅकॅडमीक ए्नझीक्युटिव्ह काऊन्सीलनेही मान्यता दिलेली आहे. जेएनयूच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणाहून या अभ्यासक्रमाचा विरोध केला जात असताना व याला इस्लामोफोबियाग्रस्त संबोधले जात असतांनासुद्धा जेएनयूचे कुलपती मामिडला जगदीशकुमार यांनी या विवादाला, ’’अनावश्यक विवाद’’ असे म्हणत नवीन पाठ्यक्रमावर आपल्या मंजुरीची मोहर उठविली आहे. त्यांचे स्पष्ट म्हणणे आहे की, ’हा अभ्यासक्रम राष्ट्रीय सुरक्षेच्या हितामध्ये आहे.’ एवढेच नव्हे तर या पाठ्यक्रमाला केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचेही समर्थन प्राप्त आहे. काही दिवसांपूर्वी नवीन शैक्षणिक धोरण-2020 संबंधी केंद्रीय विश्वविद्यालयांच्या कुलपतींच्या सभेला संबोधित करतांना त्यांनी या अभ्यासक्रमाचे तोंडभरून कौतूक केले होते. 

मुळात चुकीची माहिती विद्यार्थ्यांमध्ये रूजविणाऱ्या या पाठ्यक्रमाद्वारे इस्लाम आणि मुस्लिमांना बदनाम करण्याशिवाय  विद्यापीठाला दूसरे काहीही साध्य करता येणार नाही. पाठ्यक्रम बनविणाऱ्या आणि त्याला स्विकृती प्रदान करणाऱ्यांचा उद्देश एकदम स्पष्ट आहे, त्यांना आतंकवादाशी फक्त इस्लाम आणि इस्लामच्या अनुयायानांच जोडणे अभिप्रेत आहे. या अभ्यासक्रमाच्या हेतूवर कोणी शंका घेऊ नये म्हणून यात असेही नमूद करण्यात आलेले आहे की, ’’कुरआनच्या आयातींच्या चुकीच्या व्याख्या करून मुस्लिमांना असे सांगितले जाते की, जिहादच्या नावाखाली निष्पाप लोकांच्या हत्या करणे योग्य आहे तसेच आत्मघाती हल्ल्यांचे महिमामंडन केले जाते.’’  

’’कट्टरपंथी धार्मिक आतंकवाद आणि त्याचे प्रभाव’’ या चॅप्टरमध्ये असे नमूद करण्यात आलेले आहे की, ’’ कट्टरपंथी इस्लाम, धार्मिक मुल्ला-मौलवींद्वारे केल्या जाणाऱ्या शोषणाच्या परिणामस्वरूपी जगभरात जिहादी आतंकवादाचा इले्नट्रॉनिक माध्यमातून प्रसार झाला आहे. जिहादी आतंकवाद, आतंकवादाच्या ऑनलाईन प्रचार आणि प्रसाराच्या परिणाम स्वरूप धर्मनिरपेक्ष बिगरइस्लामी समाजामध्ये हिंसक हल्ल्यांमध्ये वेग आलेला आहे आणि हे समाजगट वाढत्या हिंसेच्या कचाट्यात पूर्णपणे सापडलेले आहे.’’ 

यात शंका नाही की हा अभ्यासक्रम जनतेच्या मनामध्ये इस्लामोफोबियाला वाढवेल. त्यामुळे हिंदू-मुस्लिम सौहार्द कमी होईल. आपल्या देशातील मुस्लिम समाज हिंदू कट्टरपंथी तत्वांच्या मार्फतीने केल्या जाणाऱ्या हिंसेमुळे, स्वतःला शोषित अवस्थेत समजत असून त्यांच्यामध्ये वास्तविक भीतीचे वातावरण पसरलेले आहे. त्यांना आपला जीव आणि संपत्ती दोन्ही धोक्यात असल्याचा अनुभव येत आहे. फेब्रुवारी 2020 मधील  दिल्लीतील मुस्लिमकुश दंगे असोत की 24 सप्टेंबर 2001 रोजी शत्रूवर गोळीबार करतात तसा गोळीबार पोलिसांद्वारे केल्याने मृत झालेल्या मैनुल हक़ या मुस्लिम व्यक्तीच्या छातीवर फोटोग्राफरने मारलेल्या उड्यांची घटना असो, उत्तर आणि इशान्य भारतातील मुस्लिम प्रचंड घाबरलेले आहेत. या आणि अशा घटनांकडे या अभ्यासक्रमामध्ये सपशेल दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. 

घाबरलेला मुस्लिम समाज देशांच्या छोट्या मोठ्या शहरांमध्ये सुरक्षा मिळावी या भावनेतून विशिष्ट भागात दाटीवाटीने राहण्यास विवश झालेला आहे. या भीतीदायक वातावरणाने त्यांच्यासमोर एवढे कठीण आव्हान उभे केले आहे की ते आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे सुद्धा लक्ष देण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यांना केवळ सुरक्षा हवी. ज्या गावात कमी संख्येने मुस्लिम आहेत ते आपली संपत्ती कवडीमोल विकून शहराकडे जाऊन मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये राहण्यातच स्वतःला सुरक्षित समजत आहेत. भारतात आज मुस्लिमांची स्थिती 18 व्या शतकातील युरोपात राहणाऱ्या ज्यू लोकांसारखी झालेली आहे, ज्यांना ख्रिश्चनांसारखे समान अधिकार आणि सुरक्षा उपलब्ध नव्हती. भारतात असे कुठलेही अधिकृत प्रतिबंध नसले तरी प्रत्यक्षात त्यांच्यावर जमीन तंग करण्यात आलेली आहे आणि ते समाजापासून वेगळे होऊन झोपडपट्टी वजा दाट वस्त्यांमध्ये राहण्यास विवश आहेत. 

या अभ्यासक्रमाचे मूळ लेखक अरविंद कुमार यांनी मुस्लिमांच्या या सर्व परिस्थितीची काडीमात्रही दखल घेतलेली नाही. अरविंदकुमार हे विदेशात राहतात. सेंटर फॉर कॅनडियन, युनायटेड स्टेटस् अ‍ॅण्ड अमेरिकन स्टडीज, स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजमध्ये प्राध्यापक आणि विभागप्रमुख आहेत. एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीला मुस्लिमेत्तर लोकांनी केलेल्या आतंकवादाची माहिती नसेल असे गृहित धरता येणे शक्य नाही. मग प्रश्न असा उत्पन्न होतो की, त्यांनी मुद्दामहून इस्लाममध्ये धर्मप्रेरित हिंसा एवढाच विशिष्ट पाठ्यक्रम का तयार केला? स्पष्ट आहे याचे उत्तर इस्लामोफोबिया आहे. 

जेएनयु सारख्या विद्यापीठात या अभ्यासक्रमाला मान्यता मिळाल्यामुळे मुस्लिमांच्या चिंतेत नव्याने वाढ होईल यांत शंका नाही. यापूर्वी पोलीस त्यांना संशयावरून अटक करत असत आता पोलिसांच्या संशयाला अधिकृत अधिष्ठान प्राप्त होईल. इंग्रजांच्या काळात जशा काही विशिष्ट जातीच्या लोकांना गुन्हेगार समजण्यासाठी कायदे केलेले होते तसाच हा कायदा आहे. यामुळे फक्त मुस्लिम समाजाची बदनामीच होणार नाही तर त्यांना गुन्हेगार ठरविले जाईल. आपण सर्वांनी पाहिलेले आहे की, 2020 मध्ये कोरोना काळामध्ये कुठलाही कायदेशीर आधार नसतांना मीडियाने तबलीगी जमाअतच्या सदस्यांना कोरोना कॅरियर म्हणून कसे सळो की पळो करून सोडले होते. माध्यमांच्या दुष्प्रचाराचा परिणाम इतका जबरदस्त झाला होता की, आरोग्य विभागाने धार्मिक आधारावर कोरोना पॉझिटिव्ह डेटा प्रसारित करण्यास सुरूवात केली होती. दिल्ली अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष डॉ. जफरूल इस्लाम खान यांनी जेव्हा या संबंधी तीव्र आक्षेप घेतला तेव्हा ते प्रसारण बंद झाले. परंतु मीडियाने त्यानंतरही तबलिगी जमाअतला कोरोनाशी जोडण्यामध्ये तुसबरही माघार घेतली नव्हती. शेवटी सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर हा सगळा प्रकार बंद झाला. परंतु तोपर्यंत मुस्लिमांच्या प्रतिमेचे अपरिमित असे नुकसान झालेले होते. तबलिगी लोग आरोग्य सेविकेंसमोर अश्लील चाळे करत आहेत, रूग्णालयात अर्धनग्न अवस्थेत फिरत आहेत, कुठेही थुंकत आहेत अशा एक ना अनेक खोट्या गोष्टी जनतेच्या मनामध्ये बिंबविण्यामध्ये मीडियाला यश प्राप्त झाले होते. 

धार्मिक कट्टरवाद फक्त मुस्लिमांमध्येच प्रचलित आहे हा विचार चुकीचा आहे. हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध, शीख या सर्व धर्मामधील काही मुठभर लोक कट्टरवादी आहेत, हे अनेकवेळा सिद्ध झालेले आहे. पंजाबमधील खलिस्तान आंदोलन धर्मानेच प्रेरित होता. पूर्वोत्तर भारतामध्ये अनेक हिंसक आंदोलन धार्मिक भावनेतून ख्रिश्चन लोकांनी चालविल्याचा इतिहास जुना नाही किंबहुना ते अजून सुरूच आहे. हिंदू गोरक्षकांनी गोरक्षणाच्या नावाखाली तर कधी विनाकारणही झुंडित येऊन मुस्लिमांच्या केलेल्या हत्या अजून थांबलेल्या नाहीत. यामागे हिंदुत्वाचीच भावना कार्यरत आहे. एलटीटीईचे हिंसक आंदोलन हिंदू धर्माच्या चुकीच्या व्याख्येवरच आधारित होते, म्यानमारमधील रोहिंग्या मुस्लिमांचे शिरकाण बौद्ध धर्माच्या अहिंसेच्या शिकवणुकीच्या चुकीचा अर्थ लाऊनच केले गेले. वास्तविक पाहता या सर्व हिंसा संबंधित धर्माच्या ग्रंथामध्ये दिलेल्या शिकवणीच्या चुकीच्या व्याख्येवर केल्या जातात. असे असतांना फक्त कुरआनचेच उदाहरण देऊन एक संपूर्ण अभ्यासक्रम तयार करणे म्हणजे इस्लामोफोबियाच म्हणावा लागेल. प्रा. अरविंद कुमार यांनी जाणून बुजून हा चुकीचा अभ्यासक्रम तयार केलेला आहे. खरे तर इस्लाममध्ये आतंकवादाला स्थानच नाही. या संबंधी खरोखरच कोणाला अभ्यास करायचा असेल तर त्यांनी जमाअते इस्लामीचे संस्थापक सय्यद अबुल आला मौदूदी यांनी लिहिलेले, ’’अल-जिहाद-फिल-इस्लाम’’ हे पुस्तक आवर्जुन वाचावे, तेव्हा जिहाद या संकल्पनेची वाचकांना खरी कल्पना येईल. इस्लामी आतंकवाद हा शब्द 9/11/2001 च्या पूर्वी अस्तित्वातच नव्हता. 9/11 च्या घटनेनंतर अमेरिकन मीडियाने या शब्दाला जन्माने घातले आणि जागतिक मीडियाने त्याला जसेच्या तसे उचलले. ज्याला इस्लामी जिहादी आतंकवादी संघटना म्हटल्या जातात त्या आयएसआयएस, अलकायदा इत्यादींनी मुस्लिमांच्याच जास्त हत्या केलेल्या आहेत. मग ह्या संघटना मुस्लिमांच्या कशा? वास्तविक पाहता ह्या संघटना मध्य एशियातील तेल संपन्न राष्ट्रामध्येच उत्पन्न झाल्या आणि वाढल्या. हा सगळा,’’तेल का खेल’’ होता. भारतामध्ये अशा संघटनांचे नाव सुद्धा नाही. असे असतांना असा अभ्यासक्रम भारतातील एका नामांकित विद्यापीठात तयार होणे हा खोडसाळपणाच नाही तर भारतीय लोकशाहीची चेष्टाही आहे. जेएनयूसारख्या डाव्या विचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या विद्यापीठामधून हा उजवीकडे झुकणारा अभ्यासक्रम शिकविला जाणे यापेक्षा दुसरे दुर्दैव ते कोणते? 

असे असले तरी मुस्लिमांनी या अभ्यासक्रमाचा धसका घेण्याची मूळीच आवश्यकता नाही. हा कृत्रिम अभ्यासक्रम कालौघात स्वतःच्या मरणाने स्वतः मरेल. उलट हा अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यातील फोलपणा लवकरच कळून चुकेल आणि ते इतर धार्मिक समुहाद्वारे केल्या जाणाऱ्या हिंसाचाराचा सुद्धा तौलनिक अभ्यास करण्यास प्रेरित होतील. त्यातून त्यांना खरी परिस्थिती कळेल, अशी आशा करण्यास हरकत नाही. शेवटी अल्लाहकडे दुआ करतो की, ’’आम्ही भारतीय मुस्लिम विवश आहोत, ऐ अल्लाह! हे अभ्यासक्रम तयार करणारे आम्हाला गुन्हेगार ठरवू पाहत आहेत. तू आमचे रक्षण कर आणि अभ्यासक्रम तयार करणाऱ्यांना, त्याला मंजूरी देणाऱ्यांना आणि त्याचा अभ्यास करणाऱ्यांना सद्बुद्धी दे. आमीन.’’

- एम.आय.शेख


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget