एक तेज:पुंज प्रकाश
इस्लामपूर्व काळाला इस्लामी परिभाषेत 'अज्ञानकाळ' संबोधले जाते. या अज्ञानकाळातील रानटीपणा, पशुहिनता, अत्याचार, अन्याय, हिंसा, लुटमार, बलत्कार, प्रतिशोध अशा सर्वप्रकारच्या असंस्कृत विचार-वर्तनांचे व अराजकतेचे तसेच सर्वदुर्गुणांचे प्रतिनिधित्त्व जणु काही अरबस्तानाच्याच वाट्याला आलेले होते, इतकी अमानविय, भयावह आणि कौर्याच्या सीमा पार करून गेलेली ती परिस्थिती होती. अशा महाभयानक अंध:कारात अल्लाहने प्रेषित्त्वाच्या शृंखलेतून आदरणीय मुहंमद (स.) याना अंतिम प्रेषित बनवून पाठविले आणि समस्त मानवजातीवर व तमाम जगवासियांवर फार मोठे उपकार केले. या मुळे अरब महाद्विपकल्पच नव्हे तर संपूर्ण विश्व इस्लामच्या महान शिकवणीचे उजळून निघाले. त्या प्रकाशाला पवित्र कुरआनने अशा प्रकारे वर्णन करून सांगितले आहे,
" तुमच्यापाशी अल्लाहकडून प्रकाश आणि असा एक सत्यदर्शी ग्रंथ (कुरआन) आला आहे ज्याच्या द्वारे सर्वश्रेष्ठ अल्लाह त्या लोकांना जे त्याच्या प्रसन्नतेचे इच्छुक आहेत, शांती व सुरक्षिततेच्या पध्दती दाखवितो आणि आपल्या आदेशाने त्यांना अंधारातून बाहेर काढून प्रकाशाकडे आणतो आणि सरळमार्गाकडे त्यांचे मार्गदर्शन करतो." (सूरह् अल् माइदा-१५,१६).
आज निर्विवादपणे सिध्द झाले आहे की, जगात इस्लाम व्यतिरिक्त कुणाकडेही न्यायोचित जिवनधारा नाही, ना असा सत्यदर्शी ग्रंथ आहे जो त्यांच्या आयुष्यात क्रांतीकारक परिवर्तन घडवून आणिल, ना शांती - सुरक्षिततेच्या प्रभावी व प्रबळ उपाययोजना आहेत ज्या मुळे ईहलोकासह परलोकात ही अभय प्राप्त करू शकतील, ना काळोखात खितपत पडलेल्या लक्षावधी पीडित, दु:खी, वंचित व लाचारांसाठी आशेचा असा एक 'प्रकाश किरण' आहे की, ज्यामुळे त्यांच्या जिवनात उभारी व उत्साह येऊन त्यांचे जिवन ख-या अर्थी सार्थकी लागावे. आज इस्लाम सर्व जिवन पध्दतीला पुरून उरला आहे. याचा पुरावा अल्लाहच्या या फर्मानात आढळून येतो,
"जे लोक या प्रेषितावर (मुहंमद (स.) वर) ईमान राखतात आणि त्याचे समर्थन करतात आणि त्याला मदत करतात आणि त्या नूर (प्रकाश अर्थात कुरआन) चे अनुसरण करतात जो त्याच्या समवेत पाठविण्यात आला आहे, असेच लोक परिपूर्ण साफल्य प्राप्त करणारे आहेत." (सूरह् अल् आराफ-१५७).
या आयतीच्या अंतिम शब्दांनी स्पष्ट होते की, सफल तेच लोक आहेत जे अंतिम प्रेषित मुहंमद (स.) वर विश्र्वास ठेवतील आणि त्यांचे अनुसरण करतील. जे लोक प्रेषित मुहंमद (स.) आणि त्याच्या प्रेषितत्वाला दुर्लक्ष करतील ते अपयशी लोक आहेत आणि परलोकात देखिल हानीच भोगणारे आहेत, मग भलेही त्यांनी या नश्वर जगात कितीही प्रमाणात भौतिक प्रगती साधलेली का न असो!
सदर आयत (श्र्लोक) मध्ये "आणि त्या नूर (प्रकाश) चे अनुसरण करतात " असे शब्द आले आहेत. काही लोकांच्या मते 'नूर' ने अभिप्रेत अंतिम प्रेषित मुहंमद (स.) आहेत. परंतु या ठिकाणी आयतीनेच स्पष्ट होते की, 'नूर' ने अभिप्रेत 'पवित्र कुरआन' आहे. कारण आयतीत पुढे स्पष्ट आहे की, हा 'नूर' अल्लाहतर्फे "त्याच्या (प्रेषित मुहंमद (स.) च्या ) समवेत पाठविण्यात आला आहे." तथापि ही वेगळी गोष्ट आहे की, विश्वनेते व जगतगुरू असलेले, अखंड विश्वासाठी करूणाकारी व दयानिधी असलेले आणि मानवहितपरायण प्रेषित मुहंमद (स.) च्या अनेक विशेष नामात एक विशेषण 'नूर' सुध्दा आहे, ज्या मुळे 'कुफ्र' (इस्लामचा नकार) आणि 'शिर्क' (अनेकेवरवाद) चा अंध:कार लोप पावला आणि इस्लामचा प्रकाश विस्तारला. या अनुषंगाने प्रेषित मुहंमद (स.) च्या व्यक्तीमत्वात आणि गुणवैशिष्ठ्यात 'नूर' (प्रकाश) चा जो स्वाभाविक गुणधर्म आहे ती एक उपमा असून प्रेषितांचा (स.) शारिरीक गुणधर्म नव्हे, जसे की प्रेषित मुहंमद (स.) यांना पवित्र कुरआनमध्ये 'सिराजुम्मुनिरा' (तेजस्वी दीपक) अशा उपमेने सुध्दा अलंकृत करण्यात आले आहे ज्याच्या प्रकाशात गेल्या चौदाशे वर्षांपासून ईमानवंत 'अल्लाहचे भक्त' होऊन यशस्वी जिवन जगत आले आहेत.
सरतेशेवटी एक व्यक्तीला जर मान - सन्मानाचे, सुख - समाधानाचे आणि चिंतारहित असे आत्मिक शांतीचे आयुष्य व्यतित करावयाचे असेल तर त्याला इस्लामवर ईमान पत्करल्याशिवाय अन्य पर्याय नाही. म्हणून पवित्र कुरआनची जगवासियांसाठी कळकळीची हाक आहे,
" ईमान राखा अल्लाहवर आणि त्याच्या प्रेषितावर (मुहंमद (स.) वर) आणि त्या प्रकाशावर (कुरआनवर) जो आम्ही उतरविला आहे." (सूरह् अत्तगाबून-८).
एक ईमानवंत अल्लाह आणि त्याचा अंतिम प्रेषित मुहंमद (स.) ची अवज्ञा करीत नाही, त्यामुळे त्याच्या आयुष्यात सदाचार, चारित्र्यसंपन्नता, नीतिमत्ता, प्रामाणिकपणा, सत्त्य आदी. सारखे समाजोपयोगी व समाजविधायक गुणवैशिष्ठ्ये विकसित होत असतात. पवित्र कुरआनने अशा मनुष्याला 'जिवंत' म्हटले आहे आणि तो ख-या अर्थी 'प्रकाशात' आहे. तर दुसरीकडे अल्लाह आणि त्याच्या अंतिम प्रेषिता(स.) च्या आदेशापासून दूर भटकणा-या काफिराच्या अंत:करणात दुराचार, मोह, मत्सर, कपट, निंदा, अविश्वास आदी. सारखे दुर्गुण व नैतिक अध:पतन ठाण मांडून बसलेले असतात. कुरआनच्या भाषेत अशी व्यक्ती 'मृत' आहे, ज्याचा परिणाम आत्मनाश व सर्वनाश आहे. सदर व्यक्ती सैतानाच्या प्रभावाखाली जाते. सैतान त्या व्यक्तीचे दुष्कृत्य सुंदर व आकर्षक बनवून सोडीत असतो, त्या व्यक्तीला वाटते की, आपण जे काही करीत आहोत ते योग्यच आहे. मोमीन व काफीरची हि परिस्थिती अंतिम विश्व ग्रंथ कुरआनने किती मार्मिकपणे, उद्बोधकपणे आणि स्पष्टपणे मांडली आहे,
"अशी व्यक्ती जी प्रथम मृत होती, मग आम्ही तिला जिवंत केले आणि असा प्रकाश दिला की, ती त्याला घेऊन माणसात चालत फिरत आहे , काय अशी व्यक्ती त्या माणसासारखी असू शकते जो अंधारातून निघूच शकत नसावा ? अशा प्रकारे काफीरांना त्यांची कर्मे शोभिवंत करून देण्यात आली आहेत." (सूरह् अल् अन्आम-१२२)
या ठिकाणी अल्लाहने काफिरांना 'अंध' आणि 'मृत' म्हटले आहे आणि ईमानवंतांना 'डोळस' आणि 'जिवंत' म्हटले आहे. यांचे कारण हे की, काफिरांनी इस्लामच्या दैवी संदेशांच्या इन्कार केला आहे, म्हणजे त्यांनी 'कुफ्र' केले आहे. त्यांच्या मनाजोगे वागणुकीमुळे या 'कुफ्र' च्या काळोखात ते भरकटत चालले आहेत आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी ते प्रयत्नशील नाहीत. त्यांची दशा अशीच राहिल्यास त्यांचा शेवट निर्रथक मृत्यू आणि सर्वनाशाव्यतिरिक्त दुसरे काहीच नाही. परंतु एक मुसलमानाचे अंत:करण अल्लाह व त्याच्या अंतिम प्रेषित मुहंमद (स.) वर ईमान (विश्र्वास) राखल्यामुळे सदैव जिवंत राहते ज्यामुळे त्याच्या जीवनाचा मार्ग प्रकाशमान व दैदिप्यमान होऊन जातो. असा मनुष्य आपल्या जगण्याचा उद्द्येश्य काय आहे ? आपण या जगात कशाला आलो? यांचे परिपुर्ण भान राखतो आणि ईमान व अल्लाहच्या मार्गदर्शनाच्या स्वच्छ प्रकाशात अविरत मार्गक्रमण करीत असतो ज्याची परिणती इहलोक व परलोकाचे साफल्य आणि सद्भाग्य आहे. म्हणून पवित्र कुरआनमध्ये अल्लाह फर्मावितो,
" आणि आंधळा व डोळस सारखे नाहीत आणि ना अंधार व प्रकाश सारखे आहेत, ना सावली व उन सारखे आहेत, ना जिवंत व मृत एकसमान होऊ शकतात." (सूरह् अल् फातिर-१९ ते २२)
या संपूर्ण चर्चेचा सारांश हा की, ज्या लोकांनी अल्लाहचा दिव्यबोध जो पवित्र कुरआन आणि प्रेषित मुहंमद (स.) यांच्या आचारविचार (हदिस/सुन्नत) मध्ये आहे त्याला नाकारले आहे. ते निश्चितच काळोखात आहेत आणि ज्यांनी त्याला स्वीकारून आपल्या जीवनात त्यास लागू केले आहे ते प्रकाशात आहेत.
- निसार मोमीन
पुणे
Post a Comment