माननीय उमर (रजि.) यांच्या कथनानुसार,
येणाऱ्या मनुष्याने (जे वास्तवात जिब्रिल (अ.) होते आणि पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याजवळ मानवरूपात आले होते) पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले, ''सांगा, ईमान काय आहे?'' पैगंबरांनी उत्तर दिले, ''ईमान म्हणजे, तुम्ही अल्लाहला, त्याच्या देवदूतांना, त्याने पाठविलेल्या ग्रंथांना, त्याच्या पैगंबरांना आणि परलोकाला सत्य समजा आणि सत्य माना आणि या गोष्टीचाही स्वीकार करा की जगात जे काही घडते ते अल्लाहकडून होत असते, मग तो सदाचार असो वा दुराचार.''
हा एका मोठ्या हदीसवचनाचा एक भाग आहे. ते हदीसवचन 'जिब्रिल' या नावाने प्रसिद्ध आहे आणि त्याचा खुलासा असा की माननीय जिब्रिल (अ.) एक दिवस पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे मानवरूपात आले आणि इस्लाम, ईमान, एहसान आणि कयामतच्या बाबतीत प्रश्न विचारले. पैगंबरांनी सर्वांची उत्तरे दिली. त्यापैकी ईमानच्या बाबतीत प्रश्नोत्तर येथे देण्यात आले आहे. (हदीस : सही मुस्लिम)
स्पष्टीकरण
ईमानचा खरा अर्थ आहे एखाद्यावर विश्वास ठेवणे आणि त्यामुळे त्याच्या सर्व गोष्टींना खरे मानणे. जेव्हा मनुष्याला एखाद्याच्या सत्यतेवर विश्वास बसतो तेव्हाच त्याची गोष्ट मानतो. विश्वास आणि भरवसा हाच ईमानचा खरा आत्मा आहे आणि मनुष्याला मोमिन (श्रद्धावंत) होण्यासाठी आवश्यक आहे की अल्लाहकडून पैगंबरांद्वारे येणाऱ्या सर्व गोष्टींना सत्य मानून त्यांवर श्रद्धा बाळगावी. त्यापैकी 'ईमानियात' (श्रद्धाशीलता) बाबतचा उल्लेख या हदीसवचनात आला आहे त्यांचे वेगवेगळे थोडक्यात स्पष्टीकरण खालीलप्रमाणे आहे-
(१) ईमान बिल्लाह-
अल्लाहवर ईमान बाळगण्याचा अर्थ असा आहे की त्याचे निरंतर अस्तित्व मान्य करणे, त्याला जगाचा निर्माणकर्ता आणि जगाचा एकमेव पालनकर्ता मान्य करणे आणि या गोष्टीचा स्वीकार करणे की जगाच्या निर्मितीत आणि जगातील कायदा प्रस्थापित करण्यात त्याचा कोणीही भागीदार नाही. सर्व प्रकारचे दुर्गुण आणि सर्व प्रकारच्या कमतरतेपासून तो पवित्र असल्याचे आणि तो सर्व प्रकारच्या उत्तम सवयींचा मालक आणि सर्वगुणसंपन्न असल्याचे मान्य करणे.
(२) देवदूतांवर ईमान बाळगणे-
त्यांचे अस्तित्व मान्य करणे आणि ते पवित्र लोक आहेत, ते अल्लाहची अवज्ञा करीत नाहीत, प्रत्येक समयी अल्लाहची उपासना करण्यात मग्न असतात, प्रामाणिक सेवकाप्रमाणे मालकाचा प्रत्येक आदेश पूर्ण करण्यासाठी हात बांधून त्याच्या समोर उपस्थित असतात आणि जगात सत्कर्म करण्याऱ्यासाठी 'दुआ' (प्रार्थना) करतात, यावर विश्वास ठेवणे.
(३) ईशग्रंथांवर ईमान बाळगणे-
अल्लाहने आपल्या पैगंबरांद्वारे मानवांच्या आवश्यकतेनुसार जी उपदेशवचने पाठविली त्यांना सत्य मानणे, त्यापैकी अंतिम उपदेशवचन पवित्र कुरआन आहे. पूर्वीच्या लोकसमुदायांनी त्यांच्या ग्रंथांमध्ये फेरबदल केला तेव्हा शेवटी अल्लाहने आपल्या पैगंबरांद्वारे अंतिम ईशग्रंथ पाठविला, तो स्वच्छ व स्पष्ट आहे, त्यात कसलीही कमतरता नाही आणि तो प्रत्येक प्रकारच्या फेरबदलापासून सुरक्षित आहे आणि आता या ग्रंथाव्यतिरिक्त जगात कोणताही असा ग्रंथ नाही ज्याद्वारे अल्लाहपर्यंत पोहोचणे शक्य आहे.
(४) पैगंबरांवर ईमान बाळगणे-
अल्लाहकडून आलेल्या सर्व पैगंबरांना सत्य मानणे, त्या सर्व पैगंबरांनी कोणत्याही फेरबदल न करता अल्लाहचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविला, या शृंखलेची अंतिम कडी पैगंबर मुहम्मद (स.) आहेत. आता फक्त पैगंबरांनी सांगितलेल्या मार्गावर चालण्यातच मानवांची मुक्ती आहे.
(५) परलोकावर ईमान बाळगणे-
मनुष्याने ही हकीकत मान्य करावी की एक असा दिवस येणार आहे ज्यात मानवांच्या जीवनातील सर्व रेकॉर्डची चौकशी केली जाईल तेव्हा ज्याचे कर्म उत्तम असतील त्यांना बक्षीस मिळेल आणि ज्याचे कर्म तुच्छ असतील त्यांना शिक्षा भोगावी लागेल. शिक्षा किती असेल आणि बक्षीस काय मिळेल हे सांगता येणार नाही.
(६) भाग्यावर ईमान बाळगणे-
ही गोष्ट मान्य करणे की जगात जे काही घडत आहे अल्लाहच्या आदेशाने होत आहे. येथे फक्त त्याचाच आदेश चालतो. त्याला जे हवे आहे त्याऐवजी जगाचा कारखाना वेगळयाच पद्धतीने चालत आहे, असे कधी घडत नाही. प्रत्येक सदाचार व दुराचार उपदेश आणि मार्गभ्रष्टतेचा एक नियम आहे, जो त्याने अगोदरच बनवून ठेवला आहे. अल्लाहचे आभार मानणाऱ्या दासांवर जे संकट येते, ज्या अडथळयांचा सामना करावा लागतो आणि ज्या कसोटीला त्यांना सामोरे जावे लागते, ही सर्व परिस्थिती आणि त्यांच्या पालनकर्त्याचा आदेश आणि अगोदरच निश्चित करण्यात आलेल्या कायद्यानुसार आहे.
Post a Comment