भारत आणि इतर देशांमध्ये मिलाद-उन-नबी आणि त्याच्या परंपरा मोठ्या प्रमाणात पाळल्या जात असल्या, तरी मुस्लिम समाजातील अनेक वेगवेगळ्या घटकांचा असा विश्वास आहे की पैगंबरांच्या वाढदिवसाच्या उत्सवाला इस्लामी संस्कृतीत स्थान नाही. पवित्र कुरआन आणि हदीसमध्ये सापडलेल्या पुराव्यांवरून हे सिद्ध होते की ईद उल फित्र (रमजान ईद) आणि ईद उल अजहा (बकरी ईद) वगळता इतर कोणत्याही कार्यक्रमाचा उत्सव साजरा करणे हा एक प्रकारचा बिदअतचे कृत्य (इस्लाम धर्मात पैगंबरकाळात नसलेली व नंतरच्या काळात नवीन सुरू करण्यात आलेली प्रथा) आहे. सलफी आणि वहाबी पंथांमधील मुस्लिम उत्सवाची परंपरा अमान्य करतात. कारण ते पैगंबर मुहम्मद (स.) आणि त्यांच्या नियुक्त उत्तराधिकाऱ्यांच्या युगातही साजरे केले गेले नव्हते.
सूफी किंवा बरेलवी विचारसरणीतील मुस्लिम इस्लामचे शेवटचे पैगंबर मुहम्मद (स.) यांची जयंती 'मिलाद-उन-नबी' म्हणून साजरी करतात. इस्लामी दिनदर्शिकेतील तिसरा महिना असलेल्या रबीउल अव्वल दरम्यान हा उत्सव साजरा केला जातो. इस्लामी कॅलेंडर किंवा चंद्र दिनदर्शिका अर्धचंद्र दर्शनाच्या आधारे ग्रेगोरियन कॅलेंडरपेक्षा भिन्न आहे. 'मिलाद-उन-नबी' मुस्लिमांच्या सुन्नी समुदायातील लोक रबीउल अव्वलच्या १२ व्या दिवशी साजरी करतात तर शिया समुदाय रबीउल अव्वलच्या १७ तारखेला साजरी करतो. यावर्षी सौदी अरेबियात १८ ऑक्टोबर रोजी आणि १९ ऑक्टोबर रोजी भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि उपखंडतील इतर भागांत 'मिलाद-उन-नबी' साजरी केली जाईल.
पैगंबर मुहम्मद (स.) यांचा वाढदिवस साजरा करण्याचे मूळ इस्लामच्या सुरुवातीच्या चार खलीफांच्या कारकिर्दीत शोधले जाऊ शकते आणि हा दिवस साजरा करण्याची कल्पना प्रथम फातिमी (शिया) पंथीयांनी मांडली होती. काही मुस्लिमांचा असा विश्वास आहे की पैगंबर मुहम्मद (स.) यांचा जन्म इ.स. ५७१ मध्ये रबीउल अव्वलच्या बाराव्या दिवशी मक्का येथे झाला होता. इजिप्तमध्ये अधिकृत उत्सव म्हणून प्रथम साजरा करण्यात आलेला 'मिलाद-उन-नबी' उत्सव ११ व्या शतकात अधिक लोकप्रिय झाला. त्या वेळी या भागातील शिया मुस्लिमांची तत्कालीन सत्ताधारी जमातच उत्सव साजरा करत होती. सीरिया, मोरोक्को, तुर्कस्तान आणि स्पेन यांनी १२ व्या शतकात 'मिलाद-उन-नबी' साजरी करण्यास सुरुवात केली आणि याच शतकाच्या आसपास मुस्लिमांच्या सुन्नी समाजातील लोकांनी देखील वेगळ्या तारखेला हा सण साजरा करण्यास सुरुवात केली. सणाच्या उत्सवाचे स्वागत जरी सुन्नी लोकांमध्ये काही प्रतिकाराने मिसळले गेले असले तरी हा सण १५ व्या शतकात आणि २१ व्या शतकाच्या सुरूवातीस मोठ्या संख्येने साजरा केला जाऊ लागला आणि अनेक देशांमध्ये तो एक शुभ आणि महत्वाचा सण मानला जाऊ लागला.
या वर्षी सुरू असलेल्या कोव्हिड-१९ साथीच्या रोगामुळे पैगंबरांच्या स्मरणार्थ रबीउल अव्वलच्या १२ तारखेला काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीतील जुलूस-ए-मोहम्मदी होणार की नाही हे अद्याप अस्पष्ट आहे. जुलूस-ए-मोहम्मदी यावर्षी १९ ऑक्टोबर रोजी होणार आहे. गणेशोत्सव आणि इतर सर्वधर्मीय सण-उत्सवांना प्रतिबंधात्मक नियमावली जाहीर केली असत्याने 'मिलाद-उन-नबी' साजरी करण्यावर देखील निर्बंध असतील यात शंका नाही. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीदेखील ती साधेपणाने साजरी करावी लागणार आहे.
मिरवणुकीचे नेतृत्व स्थानिक इमाम करतात. उंच खांबावरील हिरवे झेंडे त्यांच्याबरोबर फिरतात. या मिरवणुकीला जुलुस-ए-मोहम्मदी (पैगंबरांचा मार्च) असे म्हणतात. या मिरवणुकीला इस्लाममध्ये ऐतिहासिक प्राधान्य नाही. म्हणूनच पैगंबरांचा वाढदिवस साजरा करण्याच्या अशा पद्धतीवर मुस्लिमांचा एक गट विश्वास ठेवत नाही. संध्याकाळी स्थानिक सांस्कृतिक किंवा धार्मिक संघटनांकडून प्रत्येक परिसरात जाहीर सभा आयोजित केल्या जातात. या जाहीर सभांमध्ये धार्मिक अभ्यासक पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या जीवन आणि शिकवणुकीवर भाषणे देतात. संपूर्ण परिसर रंगीबेरंगी दिवे आणि हिरव्या झेंड्यांनी सजलेला आहे. नआतच्या कॅसेट्स (पवित्र पैगंबरांचा गौरव करणारी काव्ये) दिवसा आणि रात्री पूर्ण आवाजात वाजवल्या जातात.
भारत आणि इतर देशांमध्ये 'मिलाद-उन-नबी' आणि त्याच्या परंपरा मोठ्या प्रमाणात पाळल्या जात असल्या, तरी मुस्लिम समाजातील अनेक वेगवेगळ्या घटकांचा असा विश्वास आहे की पैगंबरांच्या वाढदिवसाच्या उत्सवाला इस्लामी संस्कृतीत स्थान नाही. पवित्र कुरआन आणि हदीसमध्ये सापडलेल्या पुराव्यांवरून हे सिद्ध होते की ईद उल फित्र (रमजान ईद) आणि ईद उल अजहा (बकरी ईद) वगळता इतर कोणत्याही कार्यक्रमाचा उत्सव साजरा करणे हा एक प्रकारचा बिदअतचे कृत्य (इस्लाम धर्मात पैगंबरकाळात नसलेली व नंतरच्या काळात नवीन सुरू करण्यात आलेली प्रथा) आहे. सलफी आणि वहाबी पंथांमधील मुस्लिम उत्सवाची परंपरा अमान्य करतात. कारण ते पैगंबर मुहम्मद (स.) आणि त्यांच्या नियुक्त उत्तराधिकाऱ्यांच्या युगातही साजरे केले गेले नव्हते.
ईश्वराने पैगंबर मुहम्मद (स.) यांना प्रेम आणि सलोखा यांचा प्रचार करणारा संदेष्टा म्हणून पाठविले परंतु या उत्सवांमधून प्रेम आणि सलोखा असलेल्या इस्लामी शिकवणुकीचे सार गहाळ झाल्याचे अनेक मुस्लिम विद्वानांना वाटते. कारण इस्लाम हा शांततेचा धर्म आहे असा मुस्लिम वारंवार दावा करतात परंतु त्यांचे वर्तन त्यांचा दावा नाकारते. त्यांच्या वागणुकीत खरी इस्लामी भावना नसते. मुस्लिमांचे सण आणि इतर धार्मिक कार्यक्रम हे धार्मिकतेचे बाहेरून प्रात्यक्षिक करण्याचे निमित्त बनल्यासारखे वाटते.
दुर्दैवाने आता अनेक देशांतील लोक या दिवसाच्या सेलिब्रेशनच्या नावावर डान्स पार्टी, मेळावे आणि असभ्य भाषणे आयोजित करत आहेत. हे उत्सव योग्य प्रकारे केले गेले तर मुस्लिमांना इस्लामच्या शिकवणी आणि पैगंबरांच्या उक्ती व कृती आणि जीवनाशी जवळीक साधण्याचा एक महान हेतू साध्य होईल.
एक विख्यात गणिततज्ञ, अंतराळ शास्त्रज्ञ आणि इतिहासकर मायकल एच. हार्ट जगाच्या इतिहासात सर्वांत प्रभावशाली ठरलेल्या १०० व्यक्तिमत्त्वांची अभ्यासपूर्ण यादी ‘द हंड्रेड’च्या नावाने प्रसिद्ध करतो. या यादीत महावीर १००व्या, लेनिन ८४व्या, अशोक ५३व्या, कार्ल मार्क्सला २७व्या तर गॅलिलियो १२व्या स्थानी आहेत. यादीत चौथे स्थान बुद्धांना, तिसरे येशू ख्रिस्तांना, दुसरे न्यूटनला तर पहिले स्थान पैगंबर मुहम्मद (स.) यांना देण्यात आले आहे. स्वत: धर्माने ख्रिस्ती असणारा मायकल हार्ट स्पष्टीकरण देताना म्हणतो, ‘‘मी केलेल्या पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या निवडीने काहींना आश्चर्य वाटले असेल आणि काहींना प्रश्न पडले असतील परंतु पैगंबर इतिहासातील एकमात्र व्यक्तिमत्व आहेत जे धार्मिक आणि ऐहिक दोन्ही मैदानात एकाच वेळी सर्वाधिक यशस्वी ठरले आहेत.’’
पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी मराठी भाषेत इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्ट द्वारा प्रकाशित झालेली अनेक पुस्तके सध्या उपलब्ध आहेत. माधव विनायक प्रधान यांचे ‘पैगंबर मुहम्मद’ आणि साने गुरुजी यांची ‘इस्लामी संस्कृती’ अशी बरीच प्रकाशित झाली आहेत.
पैगंबर मुहम्मद (स.) जगातील पहिले व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी इतिहासात पहिल्यांदा समतेचा व्यवहारिक संदेश दिला. केवळ २३ वर्षांच्या कालावधीत त्यांनी या समतेवर आधारित समाज स्थापन करून जगाला दाखविला. राजाराम मोहन रॉय, म. जोतीबा फुले, स्वामी विवेकानंद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर पैगंबर मुहम्मद (स.) यांचा उल्लेख वारंवार समतेचा प्रणेता म्हणून करतात. अरब समाजातच नव्हे तर जगात विशेषतः अमेरिकेत काळ्या गुलामांची खरेदी-विक्री केली जायची. जैद नावाच्या काळ्या गुलामाला आपली आत्या बहीण देऊन काळ्या-गोऱ्याचा भेद पैगंबरांनी नष्ट केला. जैद बिन हारिस नावाच्या गुलामाच्या घटस्पोटीतेशी विवाह करून तुच्छ समजल्या जाणाऱ्या घटस्पोटीतेला पत्नी बनण्याचा बहुमान पैगंबरांनी दिला. बिलाल नावाच्या तुच्छ समजल्या जाणाऱ्या गुलामाला काबागृहावर चढून अजान देण्याचा आदेश देऊन कोणतीच वास्तू अपवित्र नसल्याचा संदेश पैगंबरांनी दिला आणि स्पष्ट केले की, “आजपासून रानटीपणाच्या सर्व प्रथा आणि परंपरा मी माझ्या पायदळी तुडवीत आहे. कोणाला कोणावर कसलेही प्रभुत्व नसून सर्व समान आहेत, एकाच मानवाची संतान आहेत.”
सर्वांना एकाच मानवाची संतान मानणे इस्लामच्या मूलभूत सिद्धांतांपैकी आहे. जन्माच्या, रंगाच्या, वर्णाच्या, वंशाच्या आधारावर केला जाणारा भेद इस्लाम मुळापासून उपटून नष्ट करतो. मानवाची संतान या नात्याने सर्वांना समान हक्क, समान संधीची घोषणा इस्लामने आजपासून १४५० वर्षांपूर्वी केली. ज्या काळी जगातील श्रेष्ठ तत्वज्ञान स्त्रीमध्ये आत्मा असतो की नाही? यासारख्या गप्पा मारण्यात व्यस्त होते त्या काळात पैगंबर मुहम्मद (स.) यांनी स्त्रीला सर्वच क्षेत्रात समान (एकसारखे नव्हे) अधिकार देऊन टाकले. हार्वर्ड विद्यापीठाच्या प्रख्यात जर्मन महिला प्राध्यापक अन्नेमेरी शिम्मेल (Annemarie Schimmel) म्हणतात की, तुलनात्मक दृष्टीने पाहिले असता असे दिसते की इस्लामने महिलांना दिलेले अधिकार इतरांचा मानाने कित्येक पटीने पुरोगामी आहेत. पैगंबरांनी आईला हा दर्जा दिला की धर्मातील सर्वोच्च संकल्पना असलेला स्वर्ग आईच्या पायाखाली आणून ठेवला. पत्नीला हा दर्जा दिला की “तुमच्यापैकी सर्वोत्तम मुस्लिम तो आहे जो आपल्या पत्नीसाठी सर्वोत्तम पती आहे.” मुलीला हे स्थान दिले की “ज्याला एक, दोन किंवा त्यापेक्षा जास्त मुली असतील आणि तो त्यांचे पालनपोषण न्यायोचित पद्धतीने करेल, तो स्वर्गात माझा शेजारी असेल.” अशी शिकवण पैगंबरांनी दिली.
व्याजाच्या शापाने ग्रस्त झालेल्या समाजाला पैगंबरांनी सावकारी पाशातून मुक्त करून व्याजमुक्त अर्थव्यवस्थेचा संदेश दिला आणि केवळ १० वर्षांच्या कालखंडात व्याजमुक्त अर्थव्यवस्था प्रस्थापित करून दाखविली. गरिबांना आणि गरजूंना मागण्याची परिस्थितीच कधी पैगंबरांनी येऊ दिली नाही. अरब प्रदेश पाहता पाहता आर्थिकदृष्ट्या इतका सधन-संपन्न झाला की ज्याच्या आधारे समाजातून दारिद्रीचा नाश झाला; जनता दान देण्यासाठी हातात रक्कम घेऊन फिरू लागली. व्याजाच्या पाशातून मुक्ती प्राप्त करण्यासाठी आज श्रमिकवर्ग व्याजमुक्तीची मागणी करू लागला आहे.
ज्या काळात राजेशाहीच एकमात्र राजकीय व्यवस्था होती त्या काळात पैगंबरांनी खिलाफतची बीजे रोवली. आपल्यानंतर एखाद्या नातेवाईकाला जबाबदारी सोपवून घराणेशाही सुरु करण्याची संधी असूनही त्यांनी ही प्रथा लाथाडली आणि इस्लाममध्ये घराणेशाहीसाठी द्वारे कायमची बंद करून टाकली. मुस्लिम समाजाने पैगंबरांनंतर शेकडो वर्षे पैगंबरांनी दाखविलेला खिलाफतचा मार्ग अवलंबून दाखविला. हजारो वर्षांपासून टोळीपद्धतीने राहाणाऱ्या भटक्या अरब समाजाला एकसूत्र करून दाखविण्याचे श्रेय केवळ पैगंबरांचे. प्रातिनिधिक पद्धतीने आपल्या नेत्याची निवड करण्याची राजकीय प्रगल्भता या समाजात निर्माण करणे, सारेच अविश्वसनीय आहे. ज्या अरब समाजावर रोमन आणि पर्शियनदेखील सत्ता गाजवू शकले नाही त्या अरब समाजावर कसलीही सत्ता नसताना देखील पैगंबरांनी आपले साम्राज्य निर्माण केले.
प्रत्येक मुस्लिमासाठी मग तो स्त्री असो की पुरुष, शिक्षण प्राप्त करणे अनिवार्य असल्याचा आदेश पैगंबरांनी दिला. आपल्या अनुयायांवर शिक्षणाची सक्ती करून शिक्षणाला प्रभुत्वाचे माध्यम असल्याचा दर्जा दिला. युद्धामध्ये पकडल्या गेलेल्या युद्धकैद्यांना ठार करण्याची प्रथा प्रचलित असताना पैगंबरांनी हा पायंडा मोडून काढला आणि एक नवा पायंडा सुरु केला. युद्धामध्ये पकडला गेलेला कैदी जर मुस्लिमांना लिहिण्या-वाचण्याचे कौशल्य शिकवू शकत असेल तर तो मुक्त केला जाई. या प्रकारे पैगंबरांनी मुस्लिम समाजाला प्रत्येक क्षेत्रात केवळ १० वर्षांच्या कालखंडात अग्रेसर करून ठेवले. रानटी आणि भटक्या लोकांचा अरब समाज, पैगंबरांच्या या जगातून निरोपाच्या वेळेस एक महान संस्कृती म्हणून उदयास आला होता. एका नव्या संस्कृतीचा, ‘इस्लामी संस्कृतीचा’ जन्म झाला होता.
आपल्या अनुयायांना पैगंबरांनी आदेश दिला की, बुद्धिमत्ता आणि ज्ञान ही तुमची गमावलेली वैशिष्ट्ये आहेत. तेव्हा ती जिथे कुठे तुम्हाला सापडतील त्यास तुम्ही आत्मसात करा. ज्ञानप्राप्तीकडे दुर्लक्ष करू नका. त्यासाठी जर तुम्हाला चीनपर्यंत जरी प्रवास करावा लागला तरी तो करा. (‘चीन’ हा शब्द तत्कालीन अरबी भाषेत ‘सर्वदूर’ अशा अर्थासाठी वापरला जात असे.) सहाव्या शतकात अशा स्वरूपाचा संदेश मानवांना एकमेकांशी स्नेहसंबंधात बांधण्याच्या उद्देशाने पैगंबरांनी दिला. जगभरातील मानवांसाठी या शिकवणी नव्या स्वरूपात होत्या. वर्ण व वंशभेदाच्या भिंती मानवा-मानवांदरम्यान उभ्या होत्या. त्या भिंती पाडून सर्व मानवांना एकाच परिवारात समाविष्ट करण्यासाठी पैगंबरांनी मानवजातीला हाक दिली. ‘‘जो इतरांवर दया करत नाही ईश्वर त्याच्यावर दया करणार नाही.’’ असा त्या महामानवाने आदेश दिला होता.
प्रेषितांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य हेच होते की, त्यांनी सर्व मानवतेला प्रतिष्ठा बहाल केली. त्यांच्या वैयक्तिक सामूहिक समस्या सोडविल्या, त्यांच्या अनन्वित प्रश्नांना वाचा फोडली. मानवतेची अशी नितांत सेवा करताना त्यांनी स्वत:शी कसलाही विशिष्ट व्यवहार करण्यास लोकांना उद्युक्त केले नव्हते. सामान्यांतील असामान्य अशीच त्यांची ओळख होती.
अशा प्रकारे पैगंबर मुहम्मद (स.) जगातील इतिहासात सर्वाधिक प्रभुत्वशाली व्यक्तिमत्व सिद्ध होतात. त्यांच्या मूर्त्या आणि स्मारके नसताना आपल्या सिद्धान्ताच्या माध्यमातून ते जगावर आपल्या ‘न भूतो न भविष्यती’ प्रभाव टाकत राहातात.
आज पैगंबर मुहम्मद (स.) शिकवणींचे प्रमाण बदलल्याचे वाटते. त्याच्या गरजा विसरल्या गेल्या आहेत. आज आपले प्रेम ईश्वराच्या दूतापेक्षा वेगळे झाले आहे. प्रलोभनांच्या या काळात, जेव्हा श्रद्धा कमकुवत होत आहे, बदलत आहे, चांगल्या आणि वाईटाचे तराजू बदलले जात आहेत आणि कुरआन आणि पैगंबरांच्या जीवनचरित्राबद्दल बोलणे लोकांना रूढ आणि जुनी फॅशन वाटते. अशा काळात काहींसाठी ईश्वर आणि त्याचे पैगंबर यांच्या प्रेमाची अभिव्यक्तीही केवळ एक दर्जा आणि प्रतीक बनली आहे.
'मिलाद-उन-नबी'ची मिरवणूक कोणत्या प्रेमाचे उदाहरण आहे? प्रेमामुळे आज्ञाधारकता सुलभ होते आणि तुमच्यावर आज्ञाधारकता म्हणजे केवळ भावनिक प्रेम नव्हे, तर बुद्धी आणि चैतन्याच्या पूर्ण परिपक्वतेने प्रेम करणे होय. जी मुस्लिमांसाठी उत्कृष्ट संधी आहे. मुस्लिमांसाठी जीवनाच्या सर्व बाबतीत पैगंबरांचा मार्ग अवलंबणे हीच खरी प्रेरणा आहे. 'मिलाद-उन-नबी'च्या नावाने तुम्हाला एक शो करावा लागत असल्याने पैगंबरांच्या जन्माचा दिवसही मिथकांच्या वेषात मांडला जाताना दिसतो. आज मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीत तरुण निर्भयपणे नाचताना दिसतात.
मग आपल्या राष्ट्राचे दुःख दूर करण्याची जबाबदारी आपली नाही का? ईश्वराच्या पैगंबरांच्या शिकवणींचा प्रसार करण्यासाठी आपण दिवे आणि सजावटीसाठी खर्च केलेले पैसे गरीबांसाठी खर्च करणे किती चांगले होईल! जर आपण पैगंबरांच्या जन्मावर पुस्तके, ऑडिओ-व्हिडिओ कॅसेट आणि इस्लामिक साहित्य वितरीत केले तर किती चांगले होईल! मुस्लिमेतरांवर त्याचा किती चांगला परिणाम होईल. रेल्वे स्थानके, पदपथ, तुम्हाला समजेल की गरिबी आणि कष्ट म्हणजे काय, काहींना औषधासाठी पैशाची तळमळ असेल, काहींना भाकरीची तळमळ असेल, काहींना कपड्यांची चणचण असेल. तुम्हाला अशा शेकडो घटना दिसतील ज्या डोळ्यांना अश्रू आणतील, पण आज आपण आपल्या आयुष्यात इतके आनंदी आहोत की आपल्याला गरिबांकडे बघण्याची संधी मिळत नाही. मिरवणुकांद्वारे आपण खूप चांगले करत असल्याचे समजून घेतो.
पैगंबरांच्या आज्ञाधारकतेच्या, प्रेमाच्या आणि बांधिलकीच्या बाबतीतच्या आपल्या जबाबदाऱ्या केवळ मिरवणुका आयोजित करून पूर्ण होत नाहीत. काही लोक 'मिलाद-उन-नबी' मिरवणुकीत भाग घेण्यास सर्व काही समजू लागतात, मुस्लिम सध्या सर्वांत गंभीर काळातून जात आहेत. जगाच्या कानाकोपऱ्यात रक्त आहे आणि भारताच्या विविध भागांत मुस्लिमांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या अडचणींमधून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मुस्लिमाला ईश्वराच्या पैगंबरांशी व्यावहारिकरित्या संबंधित असणे. मिथक आणि अवाजवी छद्मीपणा टाळण्याचे आवाहन मुले आणि इतरांना करणे ही प्रत्येक आपणा सर्वांची जबाबदारी आहे.
कार्यकारी संपादक
मो. ८९७६५३३४०४
Post a Comment