मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आपत्तीतून बाहेर काढणार, धीर सोडू नका - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मराठवाड्यातील शेतकऱ्यांना 24 ते 28 सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीचा अतोनात फटका बसला आहे. यामुळे शेतीसह पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यात 21 पेक्षा अधिक जणांचा बळी गेला असून, घरे, पीके वाहून गेली आहेत. तर हजारो कुटुंबांना पाण्यात रात्र काढावी लागली. एनडीआरएफच्या टीमने शंभरपेक्षा अधिक जणांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यश मिळविले. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना धीर देत म्हटले आहे की, आम्ही सरकार म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी असून सर्वोतोपरी मदत करणाऱ्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. अतिवृष्टीचा जिल्हानिहाय आढावा घेत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
शेतकरी, पशुपालकांनी मागणी केली आहे की, सरकारने तात्काळ मदत द्यावी. हातातोंडाशी आलेली पीके डोळ्यादेखत वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे सोयाबीनचे भाव गडगडले तर दूसरीकडे अतिवृष्टीत पिके वाहून गेली. त्यामुळे एकत्रित आलेल्या आसमानी आणि सुलतानी संकटामुळे कंबरडे मोडले असून, आर्थिक गणित बिघडल्याचे उस्मानाबादचे शेतकरी व्यंकट पाटील, खंडू काकडे, सचिन पाटील,लातूरचे अभिजित मदने म्हणाले.
सततच्या पावसामुळे काही ठिकाणी फळबागांचेही नुकसान झाले आहेत, पीके वाहून गेले आहेत, ही अभूतपूर्व अशी परिस्थिती उद्भवली आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देऊ नका. निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे आणि अनेक विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षेसाठी केंद्रावर पोहोचू शकले नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देण्याची पुन्हा संधी देण्यात येणार आहे, याविषयी विद्यार्थ्यांपर्यंत व्यवस्थित माहिती पोहचावा तसेच नवीन तारखांबाबत माहिती द्या असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांचा आढावा घेतला.
एनडीआरएफ जवानांनी तसेच स्थानिक पोलीस यंत्रणेने उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, यवतमाळ भागातील सुमारे शंभर जणांना वाचविले. उस्मानाबादमधून 16 जणांना हेलिकॉप्टर ने तर 20 जणांना बोटीने वाचविले. लातूरमध्ये 3 जणांना हेलिकॉप्टरमधून तर 47 जणांना बोटीतून वाचविले. यवतलां आणि औरंगाबादमधून अनुक्रमे 2 आणि 24 जणांना वाचविण्यात यश मिळाले अशी माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. एनडीआरएफचे 1 पथक उस्मानाबाद आणि 1 पथक लातूरमध्ये होते. हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने या दोन जिल्ह्यांत बचाव कार्य केले.
फक्त आश्वासन नको तातडीची मदत हवी...
जमाअते इस्लामी हिंदचे प्रदेशाध्यक्ष रिजवानुर्रहमान खान म्हणाले, ज्या-ज्या वेळी शेतीचे अतोनात नुकसान होते तेव्हा शासनाकडून मदतीच्या आश्वासनांचा पाऊस होतो. मात्र जसा पाऊस ओसरतो तसा मदतीचा ओघही आसेरतो. त्यामुळे मदत काही हाती पडत नाही. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने शेतकरी, पशुधन व घरांचे नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीची मदत देणे अपेक्षित आहे. तसेच नुकसानग्रस्त भागात फिरत्या मेडिकल व्हॅन, अॅम्ब्युलन्स आदी सेवा तत्पर ठेवाव्यात, अशी मागणीही जमाअतचे प्रदेशाध्यक्ष रिजवानुर्रहेमान खान यांनी केली.
Post a Comment