Halloween Costume ideas 2015

महिलांच्या अस्मितेला सुरक्षाकवच मिळणार की नराधमांना मोकाट रान...?


आजूबाजूला नजर टाकताच प्रत्येक क्षणाला एक ना एक महिलांच्या अस्मितेला तडा जाणारी घटना दृष्टीक्षेपास पडते. या घटनांचा वेध घेतला असता खरंच आपण माणूस नावाच्या संवेदनशील प्राण्यांच्या जगात वावरतो का? हा प्रश्न मनाला पोखरून टाकतो. या घटनांचा मागोवा घेतल्यास शासन व न्यायमंडळ यातील अस्थिरता अशा घटनांना दुजोरा देतो हे स्पष्ट होते. या घटनेला बळी पडलेल्या महिलांना न्याय मिळण्यासाठी कित्येक वर्षाची प्रतिक्षा करावी लागते, ही सर्वात मोठी दुर्दैवी बाब आहे. याला जर एवढा कालावधी लागत असतील, तर हा न्याय म्हणता येईल का? यावर गांभिर्याने विचार करणे खूप गरजेचं आहे. कारण एवढा वेळ लागत असतील तर नराधमांचं मनोबल उंचावेल आणि यावर अंकुश लावणे अशक्यप्राय होईल. ज्यामुळे अशा घटनेत वाढ होईल व आणखी कित्येक महिलांचा बळी जाईल ही शक्यता नाकारता येत नाही.

             संपूर्ण जगाला हादरवून सोडणा-या दिल्लीतील निर्भया बलात्काराची पुनरावृत्ती संपूर्ण भारतात घडत असल्याचं दिसून येत आहे. निर्भया सामूहिक बलत्कार आणि हत्या प्रकरण दिल्लीसह देशभर गाजले असतानासुद्धा यात काहीच फरक दिसून येत नाही. या अमानुष घटनेसोबतच आणखीही काही अलिकडच्या घटनांनी महाराष्ट्रासह संपूर्ण देश हादरत चालला आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणेला, पुणे तिथे काय उणे असं म्हटल्या जाते. खरंच पुण्यात काहीच उणे नाही हे पुण्यातील गेल्या काही दिवसात घडलेल्या बलात्काराच्या घटनांवरून स्पष्ट होते. ज्या पुणेला विद्येचे माहेरघर म्हटल्या जाते, ज्या पुण्याच्या संस्कृतीचे गोडवे गायिले जाते. त्या पुण्यातच अशा घटना घडाव्या हे पुण्याच्या वैभवशाली इतिहासाला काळीमा फासणार यात काही शंकाच नाही.

             पुणे रेल्वे स्टेशनवर आपल्या गावी जायला निघालेल्या व रेल्वेच्या चौकशीसाठी आलेल्या 14 वर्षीय मुलीवर 2 रेल्वे कर्मचारी व 11 रिक्षा चालक असे 13 नराधमांनी वानवडी परिसरातील निर्जनस्थळी नेऊन 2 दिवस आळापाळीने बलात्कार केला तरी पोलिसांना किंवा कुणालाही याचा सुगावा लागू नये ही किती लज्जास्पद गोष्ट आहे. या घटनेमुळे पोलिस प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यातील प्रशांत सॅमिनल गायकवाड व राजकुमार रामनगिना प्रसाद या दोन नराधम रेल्वे कर्मचा-यांना निलंबीत करण्यात आले. या दुर्दैवी घटनेनंतर लगेच त्याच पुणे स्टेशन परिसरात एका आईच्या कुशीतून 6 वर्षाच्या बालिकेचे अपहरण करून मध्यरात्री तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या घटनेला पूर्णविराम मिळते न मिळते तोच पुण्यातील पिंपरी येथे शिक्षिका असलेल्या महिलेला विवस्त्र करून बलात्कार करण्यात आला व तिचे विवस्त्र अवस्थेतील फोटो घेण्यात आले. या घटनेतील नराधमाचे नाव विकास अवस्थी असे असून तो स्वत:ला रिटायर्ड एसीपी म्हणवून घेत आहे. पुण्यातील या लागोपाठ घडणा-या घटनांवरून महिलांच्या बाबतीत पुणे खरंच सुरक्षित आहे का? असा प्रश्न भेडसावत आहे. ज्या पुण्यात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या उद्धाराकरीता आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घालून मुलींना शिक्षित केले. त्याच पुण्यात महिलांच्या अस्मितेला ठेच पोहचत आहे, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. या घटनेनंतर तर पुण्याच्या इतिहासावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

             यानंतर राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या ज्या मुंबईबद्दल संपूर्ण देशाला अभिमान आहे. ज्या मुबईमध्ये भारतीय लोकशाहीतील अनेक स्तंभ आहे. त्या मुंबईतसुद्धा बलात्कार नराधमांनी थैमान घालून अख्या मुंबईसह देशाला हादरून टाकले आहे. या मुंबईतील साकीनाकाच्या खैरानी रोड परिसरातील एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात सळई टाकण्याचे अमानुष कृत्य केले आहे. या संतापजनक घटनेमुळे स्थानिकांकडून रोष व्यक्त केल्या जात आहे. या पिडीत महिलेला जखमी अवस्थेत पोलिसांनी राजवाडी दवाखान्यात भरती केले होते. परंतु दुर्दैवाने तिची प्राणज्योत मावळली. बलात्कारानंतर गुप्तांगात सळई टाकण्यापर्यंत बलात्का-यांची प्रवृत्ती त्यांच्या हीन विकृतीचा परिचय देत आहे. असे विकृत नराधम जर समाजात मोकाट सुटले तर अनेक महिलांचे जीवन उध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. यानंतर अशीच एक घटना कल्याणमधील उल्हासनगर येथे घडली आहे. उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात एका 14 वर्षीय मुलीला तरुणाने तिला निर्जनस्थळी नेऊन बेदम मारहान करून बलात्कार केला. एवढेच नाही तर नालासोपारा येथे वसई परिसरात राहणा-या 16 वर्षीय मतिमंद मुलीला बळजबळीने बाईकवर बसवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. 

             या महानगरातील सर्व घटनांनी राज्यभर रोष व्यक्त होत असतांनाच चिखली तालुक्यातील आमडापुर येथील 19 वर्षीय मतिमंद मुलगी एकटीच असल्याचे पाहून गावातील दोन व्यक्तीने तिच्यावर बळजबरीने व आळीपारीने लैंगिक अत्याचार केला. पिडीत मुलीची आई शेतातून घरी येताच दोघांनी तिथून पळ काढला. अशा अगणित घटना राज्यभर खेड्यापाड्यातही घडत आहे. दिवसागणिक कित्येक महिला या घटनेला बळी पडत आहे. 

             या सर्व घटनेवरून असे लक्षात येते की, बलात्कारांना कायद्याचा धाक राहिला नाही. निर्भया हत्याकांडानंतर अनेक कठोर कायदे केंद्राने व राज्याने केले तरीसुद्धा बलात्काराच्या संख्येत घट होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. मागे महाराष्ट्र व आंध्रप्रदेशच्या धर्तीवर महिला व बालकांवरील अत्याचाराविरुद्ध कठोर शिक्षेची तरतूद असणारा शक्ती कायदा का व कुठे रखडला आहे. ज्याची किंमत हैद्राबाद येथील 6 वर्षीय मुलीला लैंगिक अत्याचाराला बळी पडून चुकवावी लागली. या तर केवळ बलात्काराच्याच घटना आहे. याही व्यतिरिक्त चाकूहल्ला, अॅसिडहल्ला व पेटविणे अशा कितीतरी घटनांना बळी पडून अनेक महिलांना आपला जीव गमवावा लागत आहे. म्हणून या व अशा अनेक घटना विचाराधीन ठेवून महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कडक व कठोर कायदे करून दोषींना वेळीच शिक्षा देणे क्रमप्राप्त झालं आहे. अन्यथा देशातील महिलांचं भवितव्य खूप धोक्यात येईल हे निर्विवाद सत्य नाकारता येत नाही.

- सुनील शिरपुरे

कमळवेल्ली, यवतमाळ

भ्रमणध्वणी-7057185479


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget