भारतीय समाजात भटक्या विमुक्त जातींची मोठी संख्या आहे. हे लोक कोणत्याही गावी, वस्तीत कधी कायमस्वरूपी ठिकाण करून राहात नाहीत. त्यांची घरंदारं नाहीत. घोड्यांवर त्यांचा संसार थाटलेला असतो. एका गावाबाहेर ठिकाण करून ते काही महिने आपलं गुजराण करतात. तिथून अन्नपाण्याची त्यांची साधनं संपली की ती वस्ती सोडून ते इतरत्र निघून जातात. त्यांच्याकडे नागरिक असल्याचा कोणताही पुरावा नाही. आधारचा आधार नाही. कुणाचा आधार घ्यायलाही ते पसंत करत नाहीत. शेळ्यामेंढ्या एक-दोन इतर पशू आणि प्रवासासाठी घोडे त्यांचे स्वतःचे असतात. त्यावरच त्यांचा भटकंतीचा प्रवास सुरू असतो. शासन प्रशासनाशी त्यांना काहीच अपेक्षित नसते. कोणत्याही शासकीय योजनांशी त्यांचे काही देणे घेणे नसते. शासनावर, शासनाच्या तिजोरीवर त्यांच्या जगण्याचा, उदरनिर्वाहाचा काहीच बोजा नसतो. देशात कोणते सरकार, कोणाचे राज्य आहे, त्यांचे लोकशाहीत काय स्थान आहे, मत देण्याचा त्यांनादेखील अधिकार आहे अशा क्षुल्लक बाबींशी त्यांचे काही देणे घेणे नसते. कोणाचे सरकार आले आणि कुणाचे गेले या बाबींत त्यांना काहीच रस नाही. एक प्रकारे असे वाटते की त्यांच्यासमोर या देशाची व्यवस्था, त्याचे अस्तित्व या सगळ्या गोष्टी त्यांच्या ज्ञानापलिकडे म्हणजेच त्यांच्यासाठी नगण्य. ते स्वतः आत्मनिर्भर आहेत. कोणाचा आधार त्यांना नको आहे. आपल्या मर्जीचे ते मालक असतात.
या देशात भटक्या विमुक्तांची दुसरी एक जमात आहे ती राजकीय, राजकारणी भटक्या विमुक्तांची. ते या देशावर राज्य करत आहेत. त्यांचा स्वतःचा कोणता म्हणजे त्यांच्या राजकीय विचारधारेचा कोणता पक्ष नसतो. त्यांना राज्य करण्याची, मंत्री बनून सत्तेचे वैभव, ऐश्वर्य प्राप्त करण्याची आणि देशाची संपत्ती लुटण्याचीच जास्त चिंता असते. हे भटके विमुक्त भारतीय समाजव्यवस्थेतील भटक्या विमुक्तांच्या अगदी उलट आहेत. त्या भटक्या जातींना देशाच्या तिजोरीतला एकही पैसा घ्यायचा नसतो. या भटक्यांचे सारे जीवन, जीवनातल्या प्रत्येक गोष्ट, क्षुल्लकातील क्षुल्लक गोष्ट हे शासनाच्या तिजोरीतून, नागरिकांच्या खिशातून त्यांना काही घ्यायचे नसते. ते अशा गोष्टीकडे चुकूनसुद्धा पाहात नसतात. या उलट राजकीय भटक्या विमुक्तांची सारी मदार सरकारच्या तिजोरीवर, राष्ट्राच्या संपत्तीवर, नागरिकांच्या खिशांवर असते. ते सदैव ही संपत्ती या ना त्या योजनेद्वारे आपल्या खिशात घालण्याच्या प्रयत्नात असतात. वेळ पडल्यास राष्ट्राची संपत्ती विकून टाकण्यापर्यंत त्यांची मजल जाते.
राजकीय भटक्या विमुक्तांच्या जातीचे लोक प्रत्येक पक्षात असतात. पक्ष म्हणजे त्यांचा सत्ता काबीज करण्याचा जसा मौल्यिक आधार. एका पक्षाकडून जर आता कोणते लाभ होणार नाही याचा अचूक अंदाज त्यांना आला की लगेच ते पक्ष सोडून दुसऱ्या पक्षाची वाट धरतात. या कलेत ते पारंगत असतात. निवडणुीकीचे हवामान कसं असणार आहे, कुठे संपत्तीचा वर्षाव होणार आहे, कुठे कोणत्या मंत्रीपदाची सूत्रे त्यांच्या हाती लागत असतील याचा अचूक अंदाज त्यांना आलेला असतो. हवामान खात्याचा अंदाज अनेकदा चुकतो, पण राजकीय हवामानाचा त्यांचा अंदाज कधीच चुकत नसतो. निवडणुका लागल्या की घोडेबाजार भरणार हे त्यांना आगाऊ माहीत असते. एखाद्याला निवडणुकीच्या वेळी बाजारात भाव मिळाला नाही की ते पुन्हा निवडणुकीनंतर भरलेल्या घोडेबाजारात जाऊन उभे राहातात. त्यांची किंमत ते लोकांना किती मूर्ख बनवू शकतात, किती वेळा त्यांना लुटू शकतात, स्वपक्षाला त्यांनी किती वेळा धोका दिलेला आहे, नागरिकांशी किती क्रूरतेने ते वागू शकतील, अशा त्यांच्यामध्ये दडलेल्या कर्तबगारीवर असते. एका पक्षाविरूद्ध ते अहोरात्र बोलत असले तरी त्यांच्या पक्षाने त्यंचे मंत्रीपद काढून घेतली की ज्या पक्षाला शिव्या दिल्या होत्या त्याच्या दारी जाऊन उभे राहातात आणि आपली किमंत वसूल करतात. खरे हे की या राजकीय भटक्या विमुक्तांमुळेच हा देश देशोधडीला लागला आहे.
- सय्यद इफ्तिखार अहमद
संपादक,
मो.: ९८२०१२१२०७
Post a Comment