मनुष्यासोबत आजार हे त्यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सोबत असतात. काही बालकं जन्मताच रोगाने ग्रस्त जन्माला येतात तर काहींना जन्माच्या काही तासानंतर रोगाची लागन होते. अनेक माणसं आजारांचा सामना करता-करता मरणाच्या दारापर्यंत पोहोचतात. आज वैद्यकीय सेवा, सेवा नसून व्यवसाय झालेला आहे. म्हणून ती अतिशय महाग झाली आहे. आपले किंवा आपल्या आप्ताचे जीव वाचविण्यासाठी प्रसंगी लोकांना कर्ज काढून उपचार करावे लागतात. आजार बरा न झाल्यास पैसा आणि जीव दोन्ही गमवावी लागतात. आजार बरा व्हायला लागणारा अधिक वेळ, अत्यधिक खर्च अनेकांना मानसिक व शारीरिकरित्या खचवून टाकतो. अशा अनेक समस्यांपासून लोकांना खरे समाधान व मार्गदर्शन मिळत नाही. सध्याचा काळ कुठलेही शुल्क न घेता नाडी तपासून आजार सांगणाऱ्या वैद्य, हकीम यांचा राहिलेला नाही. आता कुठल्याही वैद्यकीय सल्ल्यासाठी चिकित्सकाची फीस देणे अनिवार्य आहे. अशा परिस्थितीत चिकित्सा ही साधी, स्वस्त आणि सोपी असायला हवी, ही काळाची गरज आहे. या बाबतीत प्रेषित हजरत मुहम्मद (सअव.) यांचे मार्गदर्शन अनुकरणीय आहे. या वैद्यकीय मार्गदर्शनाला तिब्बे नबवी असे म्हटले जाते.
प्रेषित हजरत मुहम्मद (सअव) यांनी मध, कांद्याच्या फुलांच्या बिया, डाळिंब, मेथी, जांभुळ, आबे जमजम ( पवित्र मक्का येथील पाणी ), मसूरीची डाळ, मुंगा, मोती, उंबर, तुळस, काकडी, सिरका, ऊंट, बकरी व गायीचे दूध, मांस, मासोळी, बीट, पनीर, संत्री, सुंठ, बोर, कापुर, दुधी भोपळा, खारिक, अंजीर, ऑलिव्ह, कोहळं, कस्तुरी, पाणी, कांदा, पावसाचे पाणी आदींची मुबलक माहिती देत मानव जातीवर मोठे उपकार केले आहेत. आज याच वनस्पतींना खनीज शोधकर्त्यांद्वारे मानव जातीच्या सुदृढ आरोग्यासाठी महत्वपूर्ण मानले जात आहे. या औषधांना विशिष्ट अशा पद्धतीने तयार करून त्यांचे सेवन केल्याने पित्त, डायबटिज, मुळव्याध, पोटातील जंत, कर्करोग, कोलेस्टेरॉल, मासिक पाळीच्या समस्या आदी अनेक आजारांमध्ये हमखास फायदा होतो आहे. प्रेषित मुहम्मद (सअव) यांनी अनेकानेक वस्तूंचे फायदे सांगून आरोग्य आणि वैद्यकीय उपचार विश्वात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यावरून हे सिद्ध होते की, प्रेषित हजरत मुहम्मद (सअव) मानवजातीसाठी महान वैद्यकीय सल्ल्यागाराच्या परमोच्च शिखरावर विराजमान आहेत.
प्रेषित हजरत मुहम्मद (सअव.) यांनी मानव जातीला श्रद्धा आणि भक्ती या सोबतच शारीरिक आणि आत्मीय शिक्षणाची मोलाची भेट दिली आहे. यात व्यक्तीचे उठने, बसने, आहार, निद्रा याचे स्पष्टीकरण दिले आहे.
निरोगी विचार
निरोगी शरीरात विचारही निरोगी असतात. या विशेषतेचा अंदाज प्रेषित हजरत मुहम्मद (सअव.) यांच्या या विचाराने लावता येईल की, ’’परलोकात तुमच्या पुण्यकर्माची विचारणा करतांना सर्वात आधी आरोग्याची विचारणा केली जाणार.’’
पथ्य आणि स्वच्छता
उपचारापेक्षा काळजी बरी या तत्वानुसार वैद्यकीय क्षेत्रात ’पथ्या’ला महत्त्वाचे स्थान आहे. प्रेषित हजरत मोहम्मद सअव यांनी 1444 वर्षापूर्वी हे स्पष्ट केले की पथ्य पाळल्यास भविष्यात आरोग्याविषयी येणाऱ्या गोष्टीही बदलता येतात. प्रेषित हजरत मुहम्मद (सअव) यांनी स्वच्छतेला ईमानचा अर्धा भाग असल्याचे सांगितले. याचप्रकारे कुठल्याही प्रकारची इश्वरीय उपासना ही स्वच्छता व त्यांच्या अनिवार्यतेसोबतच पूर्ण होते. प्रेषित हजरत मुहम्मद (सअव.) यांनी सांगितले की,’’ शरीराची पवित्रता भक्तीतील विश्वासाचा भाग आहे.’’
स्वच्छतेत शरीराला ’गुसल’ नावाच्या आंघोळीने पवित्र केले जाते. प्रत्येक नमाजच्या अगोदर ’वजू’ अनिवार्य आहे, हे सुद्धा स्वच्छतेचे सरळ, सोपे प्रात्यक्षिक आहे. ज्यामुळे अनेक आजारांपासून स्वतःला दूर ठेवता येते. पर्यावरणात झालेल्या प्रदुषणाने अनेक आजारांना जन्म दिला आहे, यापासून बचावासाठी रोज नवे उपाय शोधले जात आहेत. मात्र प्रेषित हजरत मुहम्मद (सअव) यांनी शेकडो वर्षांपूर्वी एक योजना अमलात आणून सांगितले होते की, ’’ स्वच्छता हीच अर्धी श्रद्धा, भक्ती व विश्वास (ईमान) आहे आणी कुणी आजारी पडला तर म्हणायचे की, तुम्ही आजारी पडला असाल तर उपचार करून घ्या.’’ प्रेषित हजरत मुहम्मद (सअव.) म्हणतात, ’’जेव्हा तुम्ही कुठे संसर्गजन्य आजाराविषयी ऐकाल तर त्या ठिकाणी जाऊ नका आणि ज्या ठिकाणी अशी महामारी पसरली आहे अशा ठिकाणी असाल तर तिथून बाहेर कुठे जाऊ नका.’’
ताप आल्यास जव आणि कधी चिकित्सकाच्या आवश्यकतेवर भर हजरत आयशा रजी. सांगायच्या की, ’’प्रेषित हजरत मुहम्मद सअव यांच्या कुटुंबितील कुणाला ताप आल्यावर प्रेषित (सअव.) त्यांच्यासाठी जवापासून तयार केलेली खिचडी बनवून द्यायचे आदेश देत होते. एकदा प्रेषित हजरत मुहम्मद (सअव.) आजारी व्यक्तीच्या देखभालीसाठी पोहोचले तेव्हा त्यांनी चिकित्सकाला बोलवायला सांगितले, तेव्हा कुणी तरी म्हटलं की, हे प्रेषित सअव हे आपण म्हणत आहात? त्यावर प्रेषित (सअव) म्हणाले, ’’हो अल्लाहने जर हा आजार दिला आहे तर निश्चितच यावर औषधही दिले आहे.’’
पोटाच्या आजाराचे मूळ
अनेक रोगांचे मुख्य कारण अत्याधिक जेवन करणे आहे. पवित्र कुरआनच्या सुरह आराफच्या 31 क्रमांकाच्या आयातीत अल्लाहचा आदेश आहे की, ’’खानपान करा मात्र अनावश्यक खर्च करू नका, कारण, अल्लाह/ईश्वर अनावश्यक खर्च करणाऱ्याला पसंत करीत नाही.’’ प्रेषित हजरत मुहम्मद (सअव.) यांनीही अधिक जेवन करण्यास मनाई केली आहे. त्यांचा आदेश आहे की, व्यक्तीला ताठपणे चालण्यासाठी काही घास पर्याप्त आहेत, आणि जास्त जेवन करायचे असल्यास, पोटात एक तृतियांश अन्न, एक तृतियांश पाणी आणि एक तृतियांश वायुसाठी जागा शिल्लक असावी. एका ठिकाणी असं सांगितलं आहे की, ’’अल्लाह भुकेल्या व्यक्ती ऐवजी जास्त जेवन करणाऱ्याकडे तिरस्काराच्या नजरेने बघतो.’’ प्रेषित सल्ल. यांनी एकदा म्हटले होते की, माझा कालखंड सर्वोत्कृष्ट आहे. त्यानंतर माझ्या सहाबांचा, त्यानंतर त्यांच्या ताबेईन (अनुयायां)चा, त्यानंतर तबेताबाईन (त्यांच्या अनुयायां) चा, त्यानंतर जे लोक येतील त्यांचे पोट पुढे आलेले असेल आणि ते स्थूलतेला पसंत करणारे असतील.’’
दंत स्वच्छता
दातांचा जेवनाशी घनिष्ठ संबंध आहे. जठरा संबंधित आजार रोखण्यासाठी दातांची स्वच्छता महत्त्वाची आहे. दातांच्या स्वच्छतेवर जोर देतांना प्रेषित हजरत मुहम्मद (सअव.) म्हणतात, ’’आपले तोंड स्वच्छ ठेवा. मी माझ्या समुदायाला प्रत्येक नमाजच्या आधी मिस्वाक (दातांची स्वच्छता) करण्याचा आदेश दिला आहे.’’ प्रेषित हजरत मुहम्मद (सअव.) सकाळी उठल्यावर दातुनने आपले दात घासायचे. हे दातुन पिलू नावाच्या वृक्षाचे असायचे. पिलू वृक्षात अनेक औषधीय गुणधर्म आहे. हे झाड साल्वाडोरेसी परिवारातील आहे. याचे शास्त्रीय नाव ’साल्वाडोरा पर्सिका’ आहे. याच्या चावता येणाऱ्या काड्या मुख स्वच्छता, धार्मिक आणि सामाजिक उद्देशाने उपयोगात आणल्या जातात.
इंग्रजी भाषेत याला ’टूथब्रश ट्री’ , हिंदीत व उर्दूत पिलू, मराठीत व संस्कृत भाषेत कुम्भी नावाने ओळखले जाते. दातांची स्वच्छता आणि सुरक्षा आरोग्यासाठी महत्त्वाची आहे. व्यक्तीमत्वावर याचा सकारात्मक प्रभाव दिसून येतो. पिवळे, घाणेरडे दात, श्वासातील वास असणाऱ्या व्यक्तीजवळ बसायला व बोलायला कुणालाच आवडत नाही.
दंत चिकित्सकांनुसार मनुष्याला होणारे निम्मे आजार खराब दातामुळे होतात. दातांच्या माध्यमातूनच कोणतेही खाद्य आपल्या पोटात जातात. दातांची कीड, हिरड्यांमध्ये पस आल्यावर दूषित खाद्यपदार्थ पोटात प्रवेश करतात. यामुळे व्यक्ती विविध रोगांनी ग्रासला जातो.
विविध आजारांपासून बचाव
स्वच्छता ठेवल्यास विविध आजारांपासून बचाव करता येतो त्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञ स्वच्छतेवर अधिक जोर देतात. अल्लाहने प्रेषित हजरत मुहम्मद (सअव) यांना आदेश दिला,’’हे प्रेषित (सअव)! आपला पेहराव स्वच्छ ठेवा आणि अस्वच्छतेचा संपूर्ण त्याग करा.’’ अल्लाह स्वतः पवित्र आहे, पवित्रता आणि स्वच्छतेला पसंत करणारा आहे. प्रेषित हजरत मुहम्मद (सअव.) यांनी तिरस्काराचे कारण असलेल्या तीन गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवण्याचा आदेश दिला, यात पाणी भरण्याचे घाट, सावली व रस्त्यावर मलमुत्र विसर्जन करण्यास मनाईचा आदेश आहे. स्थीर असलेल्या पाण्यात मलमुत्र विसर्जन केल्याने होणारी अस्वच्छता शरीरासाठी नुकसानकारक असते. प्रेषित हजरत मुहम्मद (सअव.) म्हणाले, ’’तुमच्यातील कोणताही व्यक्ती स्थीर पाण्यात मलमुत्र विसर्जन करणार नाही.’’
नवजात बाळाच्या कानात अजान आणि इकामत
नवजात बाळाला आंघोळ (गुसल) दिल्यानंतर त्याच्या कानात अजान आणि इकामत बोलली पाहिजे. चिकित्सकीय सल्ल्यानुसार काही आजार असल्यास बाळाला आंघोळ घालने हानीकारक आहे. मात्र अस्वच्छता दूर केल्यानंतर अजान आणि इकामत मध्ये उशीर करू नये.
मृत्युनंतरही स्वच्छतेचा आदेश
प्रेषित हजरत मुहम्मद (सअव.) यांनी सांगितले की, ’’मुस्लिम व्यक्तीचे निधन झाल्यानंतर, त्याला अल्लाहच्या सुपूर्द करण्यापूर्वी त्याच्या पार्थिवाला बोरा पानांच्या कोमट पाण्याने आंघोळ घालून वजू दिला जावा. पवित्र कापडात लपेटून त्याचा लवकर दफनविधी केला जावा. दुर्गंध पसरू नये याकरिता या कार्यात उशीर होऊ देऊ नये.’’
मुळात प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी आरोग्य विषयक केलेले जे मार्गदर्शन आहे याचे तंतोतंत पालन केल्या तसेच हराम गोष्टींपासून दूर राहिल्यास शारीरिक आरोग्याच्या समस्या सहसा उद्भवत नाहीत. उद्भवल्याच तर युनानी/ आयुर्वेदिक / होमिओपॅथिक उपचारांना प्राधान्य द्यावे. कारण या उपचार पद्धतींमध्ये साईड इफे्नट होण्याची शक्यता फार कमी असते.
हे झाले शारीरिक आजारांसंबंधीचे प्रेषित सल्ल. यांचे मार्गदर्शन. याशिवाय, आजच्या गुंतागुंतीच्या जीवनामध्ये लोकांनी अनावश्यक इच्छा, आकांक्षा, बाळगून स्वतःचे जीवन तणावग्रस्त आणि कठीण करून घेतलेले आहे. मानसिक आरोग्य राखणे ही शारीरिक आरोग्य राखण्याएवढेच महत्त्वपूर्ण आहे. याकडे दुर्दैवाने फारसे लक्ष दिले जात नाही. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी ज्या इस्लामी इबादती सांगितलेल्या आहेत त्या जर नियमितपणे केल्या व जीवनाला साधे ठेवले तर मानसिक आरोग्य ही उत्तम राहते. यात वाद नाही. म्हणूनच म्हटले जाते की, प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी जगाला जी आचारसंहिता दिलेली आहे ती परिपूर्ण जीवन पद्धती आहे. त्यात कुठलीही दुरूस्ती शक्य नाही. तसे करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे उलट परिणाम झाल्याशिवाय राहणार नाहीत याची प्रत्येकाने खात्री बाळगावी. शिवाय प्रेषित सल्ल. यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यविषयक सूचनांकडे दुर्लक्ष केल्यास रोगट आयुष्य जगून त्याचे मुल्य चुकवावे लागेल, यातही शंका नसावी.
- डॉ.एम.ए. रशीद
Post a Comment