Halloween Costume ideas 2015

प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांनी जगासाठी दिलेले योगदान


प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांनी मानवी इतिहासातील एकमेव समग्र क्रांती घडविली. जगाला एक नविन विचार, दिशा आणि उद्देश प्रदान केला. या क्रांतीने सामाजिक, शैक्षणीक, अध्यात्मीक आणि राजकीय क्षेत्रात आमुलाग्र परिवर्तन घडवून एक नवीन विश्व निर्माण केले. एक नवजीवन, एक नवसंस्कृती आणि एक नवीन सभ्यता उदयास आली. त्यांनी लोकांच्या विचारांमध्ये कायापालट घडवून आणला. अरबस्थानातील क्रूर, अत्याचारी, असभ्येत आकंठ बुडालेला आणि नैतिकदृष्ट्या खोल गर्तेत पडलेला जनसमुह प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या नैतिकता, सभ्यतेच्या शिकवणीमुळे जागतिक ज्ञानाचा दिपस्तंभ झाला. प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांंनी मानवाच्या आंतरिक आणि बाह्य विश्वात क्रांती घडवून आणली आणि एक नव-मानव आणि आदर्श समाज निर्माण करुन दाखविला. प्रेषित मुहम्मद सल्ल. इतिहासातील एकमेव व्यक्ती आहेत ज्या व्यक्तीने ऐहीक आणि अध्यात्मिक दोन्ही पातळीवर अभुतपुर्व आणि दैदीप्यमान यश प्राप्त केले व जगाला सफलतेचा मार्ग दाखविला.

बरस्थानाच्या निर्जन वाळवंटातून निघून या पुरोगामी आणि आधुनिक जीवन व्यवस्थेने मोरोक्कोपासून होर्डजपर्यंत फक्त आफ्रिका, अशिया आणि युरोप खंडालाच प्रभावित केले नाही तर पाहता-पाहता संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेतले. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचा हा प्रभाव तात्कालिक नव्हता. गेल्या दीढ हजार वर्षात यात सातत्याने वाढ होत आहे आणि आज सर्वात वेगाने प्रसार होणारी जीवन व्यवस्था आहे. जगातील प्रत्येक तीन व्यक्तीत एक या विचारधारेचा अनुयायी आहे. निसंदेह प्रेषित मुहम्मद (सल्ल.) जगातील सर्वकालीन प्रभावी व्यक्ती होत.

सत्ता, संपत्ती, सेना इत्यादी कोणतीच संसाधने जवळ नसतांना अवघ्या तेवीस वर्षाच्या संघर्षमय जीवनात प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांनी मानवतेवर जो असीम प्रभाव टाकला तो भारावून टाकणारा आहे. अनाथावस्था अतिशय लाचार व असहाय्य स्थितीचे दुसरे नाव आहे. त्यांच्या जीवनाची सुरूवात एका अनाथ बालकाच्या रूपाने होते. नंतर आम्ही त्यांना एक यातनाग्रस्त देशत्याग केलेल्या व्यक्तीच्या स्वरुपात पाहतो आणि शेवटी तेच एक राष्ट्राचे ऐहिक व आध्यात्मिक नेते बनले. त्यांना या मार्गात ज्या कसोट्या व प्रलोभने, अडचणी व बदल, अंध:कार व उजेड, भय व प्रतिष्ठा, परिस्थितीच्या चढ-उतारातून जावे लागले त्या सर्वात प्रेषितांना अभुतपुर्व यश प्राप्त झाले. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत ही प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांनी आपल्या तत्वाशी तडजोड केली नाही. राज्यसत्ता या जगातील भौतीक सामर्थ्याची पराकाष्ठा असते; प्रेषितांनी सामर्थ्याचे सर्वोच्च स्थान प्राप्त करुन जगाचा निरोप घेतला.

जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आदर्श नायकाची भूमिका पार पाडली. प्रेषित मुहम्मद (सल्ल.) अनेक रूपात आपल्यापुढे येतात. एक राष्ट्राध्यक्ष, शासक, अजेय सेनापती, न्यायनिष्ठ न्यायाधीश, थोर तत्वज्ञानी, राजनितीज्ञ, महान उपदेशक, प्रामाणीक व्यापारी, समाजसुधारक, अध्यात्मिक गुरु, उत्तम वक्ते, योद्धे, अनाथाचे पालनकर्ते, गुलामांचे रक्षक, स्त्रीजातीचे उद्धारक, एक आदर्श पती, वडील, संत. थोडक्यात सर्वांगीणदृष्टया त्यांचे व्यक्तीमत्व एक आदर्श व्यक्तीमत्व होय. प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांंनी जीवनातील प्रत्येक भूमिका अशा  उत्कृष्टपणे वठविली की जगाच्या अंतापर्यंत संपूर्ण मानवजातीसाठी ती प्रमाण ठरावी. त्यांचे कर्तृव जीवनाच्या एखाद्या विशिष्ट क्षेत्रापुरतेच मर्यादित नसून संपूर्ण जीवनावर व्यापलेले आहे. म्हणूनच कुरआन सांगतो. 

’’निसंदेह! प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांचे जीवन तुमच्यासाठी उत्कृष्ट नमुना आहे.’’

प्रेषितांनी जगाला परिचय करून दिलेल्या इस्लामी जीवन व्यवस्थेचे सर्वात प्रथम वैशिष्ट म्हणजे त्यांनी मानवसमाजाला सर्व प्रकारच्या गुलामगिरीतून मुक्त करुन त्यांना वास्तविक स्वातंत्र्य प्रदान केले. माणूस स्वतंत्र जन्मला आणि स्वातंत्र्य माणसाचा जन्मसिध्द हक्क आहे. प्रेषितांनी फक्त या संबंधीचे प्रवचणच दिले नाही तर प्रत्यक्षात एक आदर्श समाज घडवून आणला. 

दीड हजार वर्षापूर्वी अरब मधून गुलामगिरीचे पुर्णपणे उच्चाटन केले आणि गुलामगिरी मुक्त स्वतंत्र समाज स्थापित केला. जो आजच्या तथाकथित प्रगतीशील अमेरीका सारख्या देशालाही एकविसाव्या शतका पर्यंतही साध्य करता आला नाही. आजदेखील तेथील कृष्णवर्णीय नागरीकांना समाजात दुय्यम दर्जा दिला जातो.

गुलामांना प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी माणूस बनविले. हीन, दीन, माणूसपण नाकारलेल्या सामान्य गुलामांना प्रतिष्ठा बहाल केली. ते ही आपल्या सारखेच मानव आहेत ही भावना लोकांमध्ये निर्माण केली. गुलामांना मुक्त केले आणि त्यांचा विकासाचे मार्ग मोकळे केले, म्हणूनच गुलाम राजे बनले. मानवी इतिहासात गुलाम राजे बनले हे केवळ प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांच्या शिकवणीमुळेच शक्य झाले. आपल्या देशाचा इतिहास पहिला तर दिल्लीच्या तख्तावर सुलतान म्हणून आलेला कुतुबुद्दीन ऐबक, शमसुद्दिन अल्तमश, गियासुद्दिन बलबन असे जवळपास नऊ सुलतान पुर्वाश्रमीचे गुलाम होते. 

विषमता ही कोणत्याही समाजाला लागलेला दुर्दम्य आजार असतो. ज्या समाजात विषमता नांदते तो समाज कधीही प्रगती करु शकत नाही. त्या समाजात कधीही शांती नांदू शकत नाही. उलट असा समाज अंतर्गत यादवी आणि कलहामुळे नष्ट होण्याचीच जास्त शक्यता असते. पैगंबर सल्ल. यांनी सर्व विषमता आणि असमानतेचा कडाडून विरोध केला आणि विश्वबंधुत्वाचा आणि समानतेचा अद्वितीय सिध्दांत मानवतेला दिला. तसे पाहता जगातील सर्व इश्वरी धर्मांनी / समाज सुधारकांनीही याच सिद्धांताचा प्रचार केला, परंतु प्रेषितांनी या सिध्दांताला व्यवहारिक स्वरुपात सादर केले. 

प्रेषितांनी लोकशाही शासनप्रणालीला तिच्या सर्वोकृष्ट रूपात स्थापन केले. राजसत्ता, राजे-महाराजे आणि तिला प्रस्थापितांच्या वंशवादाच्या परंपरेतून मुक्त करुन कर्तृत्व आणि योग्यतेवर आधारीत माणसाच्या सुपूर्द केले. कायद्याचे राज्य निर्माण केले. राष्ट्राच्या सर्वोच्च शासकाला देखील सामान्य माणसाप्रमाणे न्यायाधिशासमोर हजर व्हावे लागले. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायावर आधारित नवीन राज्यघटना अमलात आणली. जनतेला माहिताचा अधिकार दिला जो अधिकार मिळविण्यासाठी आम्हाला एकविसाव्या शतकाची वाट पाहावी लागली तो माहितीचा अधिकार इस्लामने पंधराशे वर्षापुर्वीच दिला. जनतेला आपल्या नालायक शासकाला परत बोलविण्याचा अधिकार दिला. (ठळसहीींें लरश्रश्र लरलज्ञ) जो आज देखहल आमच्यासाठी स्वप्नवत आहे. राज्यकर्ता जनतेचा मालक नसून सेवक असल्याची नवीन संकल्पना जगासमोर आणली. डर्शीींरपीं ङशरवशीीहळि चा फक्त सिध्दांतच मांडला नाही तर प्रेषित (सल्ल.) यांनी आणि त्यानंतर आलेल्या खलीफांनी प्रत्यक्षात तो कृतीतून सिद्ध करून दाखविला. 

प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी स्त्रीजातीचा उद्धार केला. शेकडो वर्षापासुन पिडीत आणि शोषित व क्षुद्र समजल्या  जाणाऱ्या स्त्रीला त्यांनी सन्मान, प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्य प्रदान केले. महिलांना दीड हजार वर्षापुर्वीच शिक्षणाचे, अध्यापनाचे तसेच उपासनेचे सर्व अधिकार प्रदान केले. प्रेषित सल्ल. यांच्यावर सर्वप्रथम श्रद्धा आणणारी ही स्त्रीच होती. तसेच इस्लामसाठी सर्वात प्रथम आपल्या प्राणाचे बलीदान देणारी देखील स्त्रीच होती. भावी पिढीच्या जडणघडण करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी तिच्यावर टाकून इस्लामने स्त्रीला आदर्श समाजनिर्मितीची महत्वपूर्ण जबाबदारी दिली. स्त्रीला पतीच्या निवडीचे अधिकार, ‘खुलअ’ अर्थात घटस्फोट घेण्याचे, पुर्नविवाहाचे अधिकार प्रदान केले, स्त्रीला वारसा हक्क प्रदान केला. प्रेषितांनी शोषणमुक्त आणि वेश्यामुक्त समाज निर्माण करुन दाखविला.

प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी अथेन्स, रोम, इराण किंवा चीनच्या विद्यापीठातून धडा घेतला नव्हता ते स्वत: निरक्षर होते. परंतु त्यांनी संपूर्ण मानवजातीला महानतेच्या सिध्दांताची ओळख करुन दिली. प्रेषित सल्ल. यांंची क्रांती ही बौध्दीक क्रांती होती. म्हणूनच कुरआनच्या अवतरणाची सुरूवात ज्ञानाचे महत्व अधोरेखित करणाऱ्या आयातीने होते. तद्नंतर प्रेषित सल्ल. यांनी ज्ञान, विज्ञान क्षेत्रात क्रांती घडवून आणली आणि संपुर्ण जगाला प्रज्वलंत केले. प्रेषित सल्ल. यांनी मानवाला शास्त्रीय दृष्टीकोन दिला. विज्ञानाची ओळख करुन दिली. संशोधन वृत्तीला प्रोत्साहीत केले. ज्ञान मिळविण्यासाठी चीनला जावे लागले तरी जाऊन ज्ञानार्जन करा असे फर्माविले. विवेकाला मानवाची सर्वात मोठी संपत्ती संबोधिले. अरबांमध्ये बोटावर मोजता येतील एवढे साक्षर लोक होते. परंतु पैगंबर सल्ल. यांनी आपल्या 23 वर्षाच्या प्रेषित्वाच्या काळात संपूर्ण अरबला फक्त साक्षरच केले नाही तर अशा पध्दतीने सुसंस्कृत केले की ते पुढे ज्ञान आणि विज्ञानासह प्रत्येक क्षेत्रात दिपस्तंभ ठरले. युरोपच्या उदयाच्या अगोदर पाचशे वर्षे मुस्लीमांनी ज्ञान, विज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केली. 

प्रेषितांनी आपल्या जीवनव्यवस्थेने जगाला अपराध निर्मुलनाचे रहस्य सांगीतले. अपराधाची मुळ कारणे विषद करुन त्याच्या निवारणाचा मार्ग दाखविला. लोकांच्या मनात इश्वराचे भय निर्माण केले. तो सदासर्वदा आपल्याला पाहत आहे आणि अंतिम न्यायनिवाड्याच्या दिवशी तोच आपल्या कर्माचा योग्य मोबदला देईल. ईश्वराचे भय लोकांच्या मनात इतके बसविले की लोक स्वतः अपराधापासून परावृत्त झाले. ज्यांच्या हातून काही गुन्हा झाला ते लोक गुन्हा घडल्यास स्वत: शिक्षा मागायला येऊ लागले. आज देखिल जगात जेथे जेथे इस्लामी संविधान आहे तेथे-तेथे अपराधाचे प्रमाण तुलनामत्क दृष्ट्या अत्यल्प आहे. हेच इस्लामी राज्यघटनेचे वैशिष्ट्य आहे. म्हणून थोडक्यात म्हणावे लागेल की ही राज्यघटना त्रिकालाबाधीत व्यवहार्य आहे.अरब हे घोर व्यसनी, दारुचे चाहते होते. ज्याच्या घरात सर्वात जुनी दारु तो धनवान समजला जाई. अशा व्यसनामध्ये लिप्त समाजाला प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांनी पुर्णपणे नशामुक्त करुन दाखविले. टप्प्या-टप्प्यात त्यांचे प्रबोधन केले आणि कालांतरणाने जेंव्हा दारु हराम करण्यात आली त्यावेळे मदिनाच्या गल्ली बोळात दारुचे पाट वाहत होते. लोकांनी आपल्या जवळील दारु ओतून दिली. -(उर्वरित पान 4 वर)

जो त्यावेळेस दारु पित होता त्याने उलटी करुन प्यायलेली दारु बाहेर काढली. अशा पध्दतीने पुर्ण समाज नशामुक्त करण्यात आला. ज्याचे इतिहासात दुसरे उदाहरण सापडणार नाही. 

प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी लोकांना सर्व अवडंबरातुन मुक्त करुन वैज्ञानिक दृष्टीकोन प्रदान केला. समाजाला पुर्णपणे कर्मकांड, अंधश्रध्दा, जादू टोणा, भूतप्रेत इत्यादी पासून पुर्णपणे मुक्त केले. तसेच धर्मपंडिताच्या पाखंडातून समाजाची सुटका केली. लोकांना वस्तुनिष्ठ आणि तार्कीक वैचारिक बैठक दिली.

प्रेषितांनी कोणत्याही सैनिक अ‍ॅकडमीमध्ये प्रशिक्षण घेतले नव्हते. तरी देखील अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत झालेल्या युध्दात ते अजेय राहीले. निर्विवादपणे ते एक महान योद्धे होते. त्यांच्या युध्दनितीचा अभ्यास केल्यास डोळ्याचे पारणे फिटतात. या भुतलावर एखादा व्यक्ती सिध्दांतवादीही असावा, सैनिक ही असावा आणि नेताही असावा, हे अशक्य प्राय आहे. परंतु प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या रूपाने जगाने या अतिदुर्लभ विशेषतांच्या संयोगाला मूर्त स्वरुपात पाहिले आहे. 

प्रेषितांनी कुरआनच्या मार्गदर्शनात एक संपुर्ण व्यवस्था निर्माण केली. सत्य, शांती, समता, न्याय आणि स्वातंत्र्य हे या व्यवस्थेचे मूळ सिध्दांत. नैतीकता आणि सदाचार आणि इशभय या व्यवस्थेचा पाया या व्यवस्थेने समाजाला पुर्णपणे शोषणमुक्त केले. मानवी इतिहासात सर्वप्रथम मानवअधिकाराला घटनात्मक रूप दिले. कोणतेही भेदभाव न बाळगता फक्त मानवतेच्या आधारावर न्याय निर्धारित करण्यात आला. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परस्पर संबंध अधोरेखीत करण्यात आले. याच तत्वाच्या प्रेरणेने आज मानवअधिकार आयोग आणि संयुक्त राष्ट्र काम करते. पैगंबर मुहम्मद सल्ल. यांनी मानवतेच्या इतिहासातील एकमेव अशी रक्तहीन क्रांती घडविली ज्यात उभय पक्षाकडून फक्त 1100 लोकांचा बळी गेला. मक्कावर विजय प्राप्त झाल्यानसंतर जवळपास दहा लाखचौरस मैलचा भूभाग त्यांच्या अधिपत्याखाली होता.परंतु प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या क्रांतीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे ही क्रांती तात्कालिक नव्हती. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी जे तत्व आणि सिध्दांत दिले, जेव्हा-जेव्हा जगात याची अमलबजावणी होईल पुन्हा तशीच क्रांती होऊन तसाच निकोप समाज व निस्वार्थ व्यक्तीमत्वाचे लोक निर्माण होतील. 

प्रेषित सल्ल. यांचे जीवन म्हणजे कुठली अख्यायिका नव्हे, ते एक अटल सत्य आहे आणि मानवतेला शेवटपर्यंत मार्गदर्शन करणारा एक दीपस्तंभ आहे. जेवढ्या सुक्ष्मपणे प्रेषित सल्ल. यांच्या संपुर्ण जीवनाचा अभ्यास करण्यात आला, तेवढा जगात कोणाचाही करण्यात आलेला नाही. प्रेषित सल्ल. यांच्या वकत्व्य आणि आचारणाची सत्यता पडताळण्यासाठी ज्या लोकांच्या माध्यमातुन ही माहिती मिळाली त्यांच्याही विश्वासहर्तेची पडताळणी करण्यासाठी त्यांच्याही संपुर्ण जीवनाचा अभ्यास करण्यात आला. 

जवळपास एक लाख लोकांची पडताळणी करुन पैगंबर सल्ल. यांचे  वक्तव्य आणि आचारणाला हदीस संकलकांनी संपादित केलेले आहे. परंतु प्रेषित मुहम्मद सल्ल. साहेब फक्त मुसलमानासाठी प्रेषित म्हणून पाठविले गेले नाही. कुरआनचे स्पष्ट प्रतिपादन आहे की, ’हे प्रेषित! आम्ही तुम्हाला संपुर्ण जगवासीयासाठी कृपा बनवून पाठविले आहे’ (कुरआन)

ईश्वराने प्रेषित मुहम्मद सल्ल. यांना सफल मानवी उद्धाराची जीवन व्यवस्था देेऊन पाठविले नसते तर जग आतापर्यंत विनाशाताच्या खाईत लोटले गेले असते. ते आले आणि त्यांनी जगाला विनाशापासुन वाचविले. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे जगावर एवढे उपकार आहेत म्हणूनच प्रत्येक वेळेस त्यांच्या नावावर आपण मुहम्मद (स.) म्हणतो अर्थात ईश्वर त्यांच्यावर कृपा करो. 


- अर्शद शेख 

आर्किटेक्ट

मो. 94222 22332


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget