Halloween Costume ideas 2015

वाईट दिवस कार्यकर्त्यांचे!


माणूस जन्माला आला की त्याला स्वातंत्र्य व सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळतो आणि तो संविधानाने आपणास बहाल केला आहे. जात, धर्म, लिंग, वर्ण, वंश अशा सगळ्या भेदाच्या पलीकडे जाऊन समतापूर्ण वातावरण, आनंदाने जगण्यासाठी पोषक सभोवताल मिळणे हासुद्धा आपला परम अधिकार आहे. तो आपणांस जन्मजात मिळतो. व्यक्ती जन्माला आल्यानंतर त्याला बालवयात सर्व सुविधा मिळण्याचा अधिकार मिळतोच आणि मिळालेला असतोच. शिक्षणाचा अधिकार, रोजगार अधिकार, विकासाचा अधिकार, व्यवसायाचा अधिकार, मतदानाचा अधिकार, मुक्तपणे भ्रमण-संचार अधिकार, मालमत्ता व साधने बाळगण्याचा अधिकार, आरोग्यपूर्ण जीवन जगण्याचा अधिकार, शोषणापासून मुक्त राहाण्याचा अधिकार; राजकीय नेतृत्व, शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचेकडून सेवा घेण्याचा अधिकार. असे एक ना अनेक अधिकार जन्मातच माणसाला मिळतात. सर्वसामान्य आणि लोकशाही देशातील नागरिक म्हणून पुढे त्याला बोलण्याचा, लिहिण्याचा अधिकार व विविध माध्यमांतून अभिव्यक्त होण्याचा, संघटित होण्याचा, अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याचा, अहिंसक मार्गाने आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार मिळालेलाच असतो. हे सर्व अधिकार आपणांस सभ्य नागरिक, समाजांत आपोआप बहाल झालेले असतात. तरीही आपल्यापैकी अनेकांना वरील अधिकारांचा पुरेपूर लाभ मिळत नाही आणि आपण तो मिळविण्यासाठी प्रयत्न सुध्दा करत नाही.

अनेकांना समतेचा अधिकार असूनसुद्धा जात-धर्म अशा भेदांना बळी पडावे लागते. शिक्षणाचा अधिकार असूनसुद्धा आज कित्येक मुलांना आज शासनाच्या विविध शैक्षणिक संस्था, सेवा-सुविधा असूनसुद्धा गरिबीमुळे शिक्षण मिळत नाही. हसण्या-बागडण्याच्या वयात मुलांना अवैध धंदे व इतर ठिकाणी कामगार म्हणून वेठबिगारी करावी लागते, यासारखे वाईट नाही. बालिक आणि महिला कामाच्या ठिकाणी उच्चपदावरील अधिकारी व कर्मचारी यांचेकडून होणऱ्या शोषणाला बळी पडत आहेत. आपण रोज वृतमानपत्रात वाचतो आणि विसरून जातो. सामान्य नागरिकांना काय पाहिजे असतं- दोन वेळचे अन्न, अंगभर कपडे, डोक्यावर आपलं स्वतःचं आणि हक्काचं घर. या सर्वांपासून आज सर्वसामान्य जनता वंचित आहे. शेतीतून उत्पन्न संपत्तीचे शोषण होत रहावे अशी पध्दतशीर व्यवस्था असल्याने ग्रामीण भारतातील शेतमजूर लोक शहरांत स्थलांतरित होऊन झोपडपट्टीत नरकयातना भोगत आहेत. इतके खराब जीवन जगत आहेत त्याची आपण कल्पनासुध्दा करू शकत नाही. त्याचबरोबर आदिवासी, भटके विमुक्त आणि अल्पसंख्याक लोकांना मूळ सामाजिक प्रवाहात कसलेही स्थान नाही. जातीय व धार्मिक हिंसाचार, अतिरेकी हल्ले यात मोठे राजकीय नेते, पुढारी कधी भरडले आहेत का? नाही. सर्वसामान्य माणूसच यात भरडला जात आहे. मग आंदोलन, मोर्चाच्या वेळी होणारी पोलीस कारवाई कार्यकर्ते यांचेवर होते आणि कार्यकर्ते असतात ते म्हणजे सर्वसामान्य. यामुळे राजकीय पक्ष व संघटना, सेवाभावी संस्था, युनियन व इतर पक्षाचे गट यांच्यामुळे सामाजिक सुरक्षितता हा मानवी अधिकार पायदळी तूडवला जात आहे.

मग आपणांस असा प्रश्न पडतो की इतके भरपूर मानवी अधिकार कार्यकर्त्यांना असताना आमच्या समाजात इतका मोठ्या प्रमाणात अन्याय आणि अत्याचार का? या आमच्या प्रश्नाला अनेक कंगोरे व अनेक पदर आहेत. परंतु मूळ प्रश्न असा गंभीर आहे त्याचा विचार सर्व पक्ष-संघटनांच्या मृगजळामागे धावणारे कार्यकर्ते व आम्ही अधिकारांची भाषा भरपूर करतो. परंतु आम्ही आमचे कर्तव्य विसरतो आणि पदाला बळी पडतो आणि स्वतःचा स्वाभिमान विकून एखाद्याच्या ताटाखालचे मांजर म्हणजे कार्यकर्ते होतो. भारतीय राज्यघटनेने माणसाला माणसाप्रमाणे वागणूक व अधिकार आम्हास सांगितली आहेत ती आपल्या डोक्यावर थैमान घालणारे राजकीय व अन्य लोक पाळतता का? जो कार्यकर्ता किंवा समाज आपले हक्काधिकार विसरतो त्या समाजात कार्यकर्त्यांना आपले हक्काधिकार सहजासहजी मिळत नाहीत. हा सर्व दोष आपलाच आहे, कारण गाफील आणि झोपलेल्या व्यक्तीच्या घरात चोरी होते. जो सतत जागरूक असतो व सावध असतो त्याच्या घरात चोरी करण्याचे धाडस चोर करत नाहीत. याचा साधा आणि सोपा अर्थ असा होतो की आपणांस कोणाचेही कार्यकर्ते बनवण्यासाठी समाजात आपल्या आजूबाजूला असे चोर फिरत असतात. तुमच काम चांगल आहे, माणसांचे बळ आहे, घरची परिस्थिती बेताची आहे यांच्यावर अशा चोरांचे लक्ष असते. म्हणून आपण गाफील न राहाता सतर्क राहाण्याची गरज आहे.

या उलट या चोरांना आता रान मोकळे झाले आहे, कारण आमचा समाज जागरूक नाही. धर्म, जाती, पंथ, संप्रदाय, प्रांत, भाषा, शैक्षणिक-सांस्कृतिक निरक्षरता, फुटिरता अशा विषमतेच्या विषाने तो मुर्छित झालेला आहे, म्हणजे कार्यकर्ते होताना. जेवण, काही थोडे आर्थिक आमिष यामुळे तो भुललेला आहे. संविधानातील समतेच्या मूल्यांचा नेहमीच आपल्या दलबदलू वागण्यामुळे अनादर झाला आहे. आपण जागरूक नसल्याने समाजाचे आर्थिक व राजकीय शोषण होताना आपण बघतो. गरीबांचे अज्ञान, हतबलता व मध्यमवर्गीय आत्मकेंद्री वृत्ती यामुळे मानवी अधिकारांचे रक्षण करणारे सकारात्मक दबावगट उरलेले नाहीत. ज्याप्रमाणे अंधाऱ्या रात्री सुसाट वारा वहात असताना हातांची ओंजळ करून दिवा विझू नये यासाठी आपणच प्रयत्न करणे गरजेचे आहे. नाहीतर भविष्यात आपण आणि आपली येणारी पिढी अंधारात चाचपडत राहील. आज वादळात सापडलेल्या दिव्यासारखी परस्थिती कार्यकर्त्यांची झाली आहे. हा दिवा विझू नये म्हणून कर्तव्याशील ओंजळी म्हणजे या रस्ता भटकलेल्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर आणण्यासाठी ओंजळीरुपी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे, तरच कार्यकर्तारूपी दिवा वाचणार आहे.

सांगेल तसे म्हणजे जी-हुजुरी करण्यासारखे काम करणारा म्हणजे कार्यकर्ता. काही ठिकाणी आपण बघतो काही कार्यकर्ते परस्थितीमुळे याला बळी पडले आहेत, तर काही पक्षाचे पुढारी यांच्या भुलभुलैया आश्वासनांना बळी पडतात. काही जण फक्त पदासाठी आणि खोटा आव आणण्यासाठी कार्यकर्ते होतात. मग काय आपल्या गाडीवर अमुक कार्यकर्ता, टी-शर्ट, विविध ग्रुप तयार होतात. आंदोलन, मोर्चा, दंगेधोपे, जाळपोळ यासाठी अशा कार्यकर्त्यांचा वापर केला जातो. त्या वेळी त्यात शिक्षण पूर्ण झालेले तरूण यांच्यावर पोलीस केस दाखल होते. भविष्यात कोठेही नोकरी नाही, जनसामान्यांच्या मनात प्रतिष्ठा खराब, त्यामुळे लग्न नाही. मग व्यसनाधीनता, गुंडगिरी, अवैध धंदे अशा विविध मार्गाला असे तरूण लागतात. त्या वेळी ज्या नेत्याचा, पक्षाचा, संघटनेचा, सेवाभावी संस्था, युनियन यांचा तो कार्यकर्ता आहे त्याचा प्रमुख बघायलासुध्दा कोर्टात, पोलीस स्टेशनला जात नाही. त्या वेळी स्वतःची जमीन गहाण ठेवून विकून आपल्या मुलांना कचेरीतून सोडवून आणणारे आई-वडील मी बघितले आहेत. मग आता कुठं गेले या कार्यकर्त्यांचे नेते? विचार करण्याची गरज आहे. डिजिटलवर नाव आलं की कार्यकर्ता स्वतःला नेता समजतो. आई-वडील रोजगार करतात. मग पोरगं कोणाचातरी कार्यकर्ता झाला, व्याजाने कर्ज काढून गाडी घेऊन दिली जाते. मग गाडीप्रमाणे कपडे बुट. सोबत असणारे कार्यकर्ते यांचा खर्च. मग काय सहा महिने ते एका वर्षात शेती, घर विकलेले कार्यकर्ते मी बघितले आहेत. आता कुठ आहे नेता तुमचा? प्रश्न मनाला करा उत्तर निश्चित मिळेल.

कोणत्याही भुलभुलैयाला बळी पडू नका. जर कोणी म्हणत असेल तुमचं सामाजिक कार्य चांगलं आहे, तुम्ही आमच्याकडे या. तर तुम्ही त्यांना विचारा की तुम्ही आमच्यासाठी काय करणार? पद नको. पदातून नोटा पडत नाहीत. आमच्या हाताला काम द्या. एखादा सक्षम व जगण्याचा पक्का रोजगार द्या. एखादा उद्योग उभा करून आम्हाला चार पैसे मिळविण्याचे साधन तयार करून द्या. मग बघा, जो तुम्हाला कार्यकर्ता म्हणतो किंवा ‘आमच्या पक्षात, सेवाभावी संस्थेत, युनियनमध्ये या’ म्हणणारा म्हणील, ‘मी तुम्हाला फोन करून कळवतो.’ त्याचा फोन तुम्हाला भविष्यात येणार नाही.

कार्यकर्ता सक्षम असेल तरच तुमचा नेता, पुढारी, संघटना अध्यक्ष व इतर कोणीही असो तो सक्षम होणार आहे. नाही तर जो कार्यकर्त्यांना सक्षम करू शकत नाही त्याने कार्यकर्त्यांना खोटं आश्वासन देऊ नये. कारण स्वतः फाटका असणारा, वेळोवेळी दलबदलू असणारा कार्यकर्त्यांचे भले करू शकत नाही. स्वतःचे चप्पल फाटकं असणारा दुसऱ्याला काय नवीन चप्पल घेऊन देणार! विचार करा. एखाद्याचा कार्यकर्ता- ताटाखालचे मांजर होण्यापेक्षा कष्ट करून जगा, मानाने जगा. तुम्हाला संविधानाने भरपूर हक्काधिकार दिले आहेत, त्यांचा वापर करा. कायदा सर्वांसाठी समान आहे, त्याचासुध्दा वापर करून बघा, यश निश्चित मिळेल!

- अहमद नबीलाल मुंडे


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget