‘गांधीजी होते म्हणून’ लिहितांना लेखकाने ‘माझ्या डोळ्यासमोर सामान्य जिज्ञासू नागरिक आणि सामाजिक व राजकीय क्षेत्रात वावरणारे सर्वसामान्य कार्यकर्ते होते असे म्हटले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्र्योत्तर काळात महात्मा गांधी यांना मिळाली अफाट लोकप्रियता हा ज्या दुष्टप्रवृत्तींना अडसर वाटू लागला. त्यांनी महात्मा गांधीजींच्या विरोधात गरळ ओकून त्यांच्याबद्दल द्वेश पसरविण्याचे उद्योग सातत्याने सुरू ठेवले आहेत, अलिकडे तर त्यांच्या प्रतिमेवर गोळी झाडून त्यातून भळाभळा रक्त येणारा व्हिडीओ समाजमाघ्यमांवर व्हायरल झालेला आपण पाहिला आहे. या पार्श्वभूमीवर महात्मा गांधीजींच्या एकूणच व्यापक कार्याचा समर्थपणे प्रतिवाद करता यावा अशा उद्देशाने कोल्हापुरातील सामाजिक चळवळीत अग्रभागी असणारे कार्यकर्ते (कै.) बाळ पोतदार यांनी गांधीजी होते म्हणून पुस्तक लिहिले आहे, त्यांचा उद्देश निश्चितच अनाठायी तर नाहीच पण योग्य वेळी त्यांनी या पुस्तकाद्वारे केलेला विवेचनात्मक प्रतिवाद निश्चित स्वागतार्ह आहे.
सध्या गांधीजींचे विरोधक नथुराम गोडसेला हुतात्मा ठरवू पाहत आहेत. मात्र हे विरोधक गांधीजींचे विचार संपूर्णपणे पुसून ही टाकू शकत नाहीत ही त्यांची खरी अडचण झाली आहे. मग हे सनातनी विरोधक गाधींजींच्या बद्दल खोटेनाटे विपर्यास्त व बिनबुडाचे आरोप करून गांधीजींच्या विषयी मोठ्या प्रमाणात संभ्रम व द्वेश पसरविण्याचा प्रयत्न करीत आहेत, तरुण पिढीला गांधीयुगाचा सखोल अभ्यास नसल्यामुळे त्यांचा गैरसमज होईल अशी धादांत खोटी विधाने करण्यात ही सनातनी टाळकी मश्गूल आहेत. त्यांना श्री. पोतदार यांनी या पुस्तकातून थेट व बिनचूक उत्तर देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.
या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये ज्येष्ठ लेखक व विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस म्हणतात, “लोकशाहीच्या पराभवाचा पराक्रम असंख्य संवेदनाशून्य नागरिक पेरत असताना लेखकाची संवेदना मात्र गांधीजींच्या उमाळ्याने ओतप्रोत भरून वाहते आहे.” पोतदार यांचे विचार ज्यांनी जवळून ऐकले आहेत त्यांना डॉ. सबनीस यांचे वरील उद्गार तंतोतंत पटल्याशिवाय राहणार नाही.
पोतदार यांचे पूर्वायुष्य मार्क्सवादी विचाराने भारलेले होते. मार्क्सवादाचा त्यांचा सुक्ष्म अभ्यास होता. त्या अंगाने ते खरे व्यासंगी मार्क्सवादी होते, त्यामुळे या ग्रंथात त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक प्रकरणाला विश्लेषणात्मक तसेच मूल्यमापनदृष्ट्या उंची प्राप्त झाली आहे. अत्यंत संयत व सविस्तर लेखनशैलीच्या खूणा पानापानांवर दिसून येतात.
1857 सालच्या ब्रिटीश सत्तेच्या विरोधात झोलल्या बंडात हिंदू-मुस्लिमांच्या ऐक्याचा संदर्भ महत्वाचा ठरतो. दिल्लीचा मोगल बादशहा बहाद्दूरशहा जफरच्या नेतृत्वाखाली झालेल्या स्वातंत्र्यांच्या संघर्ष पर्वात हिंदू-मुस्लिम ऐक्याची साक्ष ब्रिटीश सरकारने अनुभवली. हा इतिहास या पुस्तकात पोतदार यांनी अधोरेखित केला आहे. या पार्श्वभूमीवर 1858 च्या अगोदर भारतीय जनतेमध्ये हिंदू-मुस्लिम असा भेदभाव नव्हता, असा ऐतिहासिक निष्कर्ष या पुस्तकांमुळे नोंदला गेला आहे. या नोंदीला आजच्या जातीयवादी संदर्भात फार मौलीक महत्त्व असून हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या दृष्टीने तो पुरेसा अर्थपूर्ण आहे. खर्या अर्थाने अशा ऐतिहासिक पुराव्यांची गरज आजच्या काळात प्रत्कर्षाने जाणवत आहे, पोतदार यांच्या या पुस्तकाने ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.
हिंदू-मुस्लिम वर्गाच्या ऐतिहासिक वास्तवाच्या शोधात 1870 नंतर ब्रिटीश राजवट मुस्लिमांच्या पक्षपातात उतरल्याचे सत्य या ग्रंथाने या पूर्वार्धातच मांडले आहे. हिंदू-मुस्लिम व ब्रिटीश या त्रिकोणातील ऐतिहासिक अनुबंधनाचा सूक्ष्म अभ्यास हे बाळ पोतदार यांच्या लेखनाचे खास वैशिष्ट्य आहे. या विषयाच्या मांडणीतील लेखक पोतदार यांनी पुढील प्रमाणे काही सुत्रे अधोरेखित केलेली आहेत. ती म्हणजे 1) 1920 ते 1925 हा काळ हिंदू-मुसलमानांच्या राष्ट्रीय भावनेच्या उत्कर्षाचा काळ होता. 2) 1925ते 35 या कालखंडात हिंदू-मुस्लिमांच्या राष्ट्रीय वृत्तीला दूराभिमानाने विकृत स्वरुप आले. 3) याच विकृतीतून हिंदू राष्ट्रवाद आणि मुस्लिम हिटलर मुसोलिनीचा उदय झाला. 4) 1933 नंतर याच द्विराष्ट्रावादाला हिटलर मुसोलीनीच्या फॅसिझमचे आकर्षण वाटू लागले. 1937 नंतर ही भावना वाढली आणि 1940 मध्ये लिगने पाकिस्तानचे ध्येय ठरवून विभागणीचे राजकारण केले. 5) या सर्वांचा परिणाम म्हणजे क्रांतिकारक राष्ट्रीय भावना दूभंगली व द्विराष्ट्रवादाची विकृती जन्माला आली. ताचेच रुप म्हणजे फाळणी लेखकाने या सर्वांची अभ्यासपूर्ण मांडणी केली. ही मांडणीच ऐतिहासिक वास्तवाचे अंतरंग अभिव्यक्त करणारी आहे.
पोतदार यांच्या इतिहासाच्या अभ्याबरोबरच वस्तूनिष्ठ सत्याचे विवेचन व विश्लेषण थक्क करून सोडते. त्यांनी टिळक व गांधीजींच्या राजकीय भूमिकांचे केलेले मूल्यमापन ही महत्त्वाचे ठरते. गीतेचा प्रभाव टिळक व गांधीजींच्यावर असला तरी दोघांच्या राजकारणची पद्धती भिन्न होती हे लेखकाने अनेक पुरावे देऊन नोंदवले आहे.
मुस्लिम समाजातील सुशिक्षीत वर्गाला खिलपतीबद्दल आस्था नव्हती, त्यामुळे खिलापत चळवळीचे नेतृत्व मुल्ला मौलवी यांचेकडेच राहीले तसेच देशातील काही भूभागावर आपले राज्य निर्माण करता यावे असे स्वार्थी राजकारण मुस्लिम लिगचे होते, ही सूत्रे अभ्यासपूर्व मांडतांना लेखकाचा राजकीय व्यासंग किती व्यापक होता ही दिसून येते. या ग्रंथात इस्लामचा उदय नावाचे एक प्रकरण आहे. गांधीजींचे राष्ट्रप्रेम व मानतवादी दृष्टीकोन समजून घेताना त्यांच्या कर्तृत्वाला हिंदू-मुस्लिम प्रश्न व फाळणीचे आव्हान निर्णायक ठरते. तेवहा लेखक केवळ भारतीय मुस्लिमांचा इतिहास न अभ्यासता ते देशाचा परिप्रेक्ष ओलांडून मध्ययुगीन इस्लामच्या उदयापर्यंत थेट भिडतात. अरबस्थानच्या वाळवंटातील अरंबांची जीवनपद्धती, इस्लामचा दिग्वीजय, युरोप आशियातील परिस्थिती, मोहम्मद पैगंबर (स.) यांचे अरब टोळ्यांना एकजीनसी बनवण्याचे कार्य, त्यांच्या मृत्यूनंतरची अबू बकर-उमर (र.) या खलिफांची कारकिर्द अशा इस्लामी इतिहासाची धार्मिक सामाजिक व राजकीय मांडणी समर्थपणे करतात. अरबी इस्लाम भारतात आल्यावर बाबर अकबर परंपारही तपशीलाने मांडली आहे.
गांधींच्या आकलनासाठी इस्लामचा पूर्वेइतिहास आवश्यक आहे, ही पोतदार यांची धारणास सर्वार्थाने योग्य आहे. 20 पानांचा इस्लामविषयक तपशील गांधींच्या कर्तृत्वासमोरील आव्हाने समजूनस घेण्याच्या प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाचा ठरतो.
मोतीलाल नेहरूप्रणीत स्वराज्यपक्षाची स्थापना, 1923 च्या कायदे मंडळाच्या निवडणुका, कौन्सिल प्रवेशाचे राजकारण, काँग्रेसमधील मतभेद, शासनाची दडपशाही, हिंदू-मुस्लिम दंगली, हिंदू महासभेचा उदय, धर्मांतरीत हिंदूच्या शुद्धीकरणाची मोहीम, मुस्लिमांच्या तंजीम व तबलीक चळवळी, सायमन कमिशनचा विरोध, मोतीलाल नेहरूप्रणीत राज्यघटना मसुदा, वसातीचे स्वराज्य भेदभंगाची चळवळ, पुणे करार अशा असंख्य घटना ऐतिहासिक सूत्रामध्ये वस्तूनिष्ठ पद्धतीने मांडल्या आहेत.
सध्याच्या दूषित आणि दिशाहीन राजकीय पर्यावरणात या पुस्तकाचे महत्त्व अधोरेखित होणारे आहे, भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात व महात्मा गांधींचे महात्म्य या विषयांवर अनेकांनी भरभरून लिहिले आहे, परंतु सूक्ष्म अवलोकन करून तपशीलवार मांडणी केलेले व तत्कालीन भारतीय राजकारणाचे वस्तूनिष्ठ व सर्वस्पर्शी विचारवंत लेखकांच्या यादीत स्वत:चा नामोल्लेख होत्यास भाग पाडावे आहे. लेखकाच्या चिंतनात्मक, मूल्यमापनात्मक आणि विश्लेषणात्मक लेखणीचा गौरव होणे अपरिहार्य आहे.
- सुनिलकुमार सरनाईक
कोल्हापूर
भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२
नाव : गांधीजी होते म्हणून....
प्रकाशक : किसान शक्ती प्रकाशन, 1403 ई, शाहूनगर, कोल्हापूर-416 008
पृष्ठे : 288, मूल्य : 250/-
Post a Comment