Halloween Costume ideas 2015

अल्लाह आणि प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांच्यातील संपर्क व्यवस्था


जगातील ज्ञान प्राप्त करण्याच्या ज्या विधी आहेत, जसे स्पर्श करून, ऐकूण, बोलून, चव चाखून, पाहून, ज्ञान मिळविता येते. या सर्व विधींपेक्षा श्रेष्ठ विधी ’वही’द्वारे मिळालेले ज्ञान आहे. कारण स्पर्श करून, ऐकूण, बोलून, चव चाखून, पाहून, निरिक्षण करून, चिंतन-मनन करून जे काही माणसाला अवगत होते त्यात चूक होण्याची भरपूर शक्यता असते. मात्र ’वही’ एक असा विश्वासपात्र मार्ग आहे, ज्या मार्गाने मिळालेले ज्ञान हे त्रुटी विरहित असते. कारण ज्ञान देणारा हा ईश्वर असतो,ज्ञान पोहोचविणारा ईशदूत असतो तर ज्ञान प्राप्त करणारा जगातील सर्वात विश्वासपात्र व्यक्ती ’प्रेषित’ असतो.


इरसाल अब के हक़ ने किया ऐसा एक रसूल

जिसने सरों के साथ दिलों को झुका दिया

गात ज्ञान हस्तगत करण्याची जी साधने आहेत त्यापेक्षा एक अधिकचे साधन प्रेषितांकडे असते. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्याकडेही ते साधन होते, ज्याचे नाव वही (वह्य /वहीह) असे आहे. ही वही म्हणजे ईश्वराचा संदेश होता. हा संदेश जिब्राईल अलै. या फरिश्त्या (ईशदूत) च्या मार्फतीने प्रेषित सल्ल. यांच्यापर्यंत पोहोचत होता. याच माध्यमातून संपूर्ण कुरआन अवतरित झाला. अल्लाह आणि प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्यातील या संपर्क व्यवस्थेबद्दल मराठी वाचकांसाठी फारसी माहिती उपलब्ध नाही. या विशेषांकाच्या माध्यमातून ती पुरवावी यासाठीचा हा लेखन प्रपंच. 

पहिली वही येण्यापूर्वीची स्थिती

प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचा जन्म 22 एप्रिल 570 रोजी झाला. त्यांच्या जन्माची असामान्य घटना जगाच्या उद्धारासाठी ईश्वरीय योजने (मिशन)चा एक भाग होती. वयाच्या 40 व्या वर्षी सर्वप्रथम त्यांच्यावर वही नाजील (अवतरित) झाली. परंतु तिच्या अवतरणाची पूर्वची तयारी म्हणून ईश्वराने प्रेषित मुहम्मद सल्ल. यांची 40 वर्षापर्यंत विशेष काळजी घेतली होती. 

त्यावेळी मक्का शहरामध्ये सर्वत्र मूर्तीपूजा प्रचलित होती. चोहिकडे अंधश्रद्धा, व्यसनाधिनता, भ्रष्टाचार, अनैतिकता आणि विश्वासघातकीपणाचे वातावरण पसरलेले होते. अशा दुषित वातावरणामध्ये सुद्धा मुहम्मद सल्ल. यांच्या व्यक्तीमत्वामध्ये वाईट गोष्टींचा लवलेशही नव्हता, ही त्यांच्यावर ईश्वराची विशेष कृपा होती. त्यांना मूर्तीपूजेमध्ये  काडीचे आकर्षण नव्हते, ते अनैतिक नव्हते, ते भ्रष्ट नव्हते, उलट मक्कामध्ये सर्वात जास्त नितीमत्तेचे धनी होते. ते एवढे विश्वासू होते की, मक्कावासीय त्यांना सादिक (खरा) आणि अमीन (अमानतदार) म्हणून ओळखत. म्नका शहरातील लोकांना शेती येत नव्हती ते व्यापारी वृत्तीच होते. व्यापारासाठी त्यांना   वारंवार लांबच्या प्रवासात जाण्याचा योग येई, तेव्हा ते आपल्या मौल्यवान वस्तू अमानत म्हणून मुहम्मद सल्ल. यांच्याकडे ठेवत. प्रेषितत्व मिळण्यापूर्वी सुद्धा त्यांची विश्वासर्हता मक्का शहरामध्ये सर्वात जास्त होती. जेव्हा ते अमानती ठेऊन जात तेव्हा मुहम्मद सल्ल. त्या जसच्या तशा जतन करून ठेवत व परत आल्यावर ज्यांच्या त्यांना परत करत. त्यात काडीचा बदल होत नसे. 

मक्का शहरामध्ये चोहीबाजूने वाईट गोष्टींचे थैमान चालत असतांना सुद्धा मुहम्मद सल्ल. यांना कधीच त्याचे आकर्षण वाटले नाही. बालपणी फक्त दोन वेळेस त्यांना ’किस्सा गो’ (मनाने गोष्टी रंगऊन सांगणाऱ्यां) चे किस्से ऐकण्याची इच्छा झाली तेव्हा त्यांनी आपल्या सोबत शेळ्या चारणाऱ्या मुलाकडे आपल्या शेळ्या ठेऊन, ’किस्से’ ऐकण्यासाठी जाण्याचा प्रयत्न केला होता पण दोन्ही वेळा त्यांना झोप लागली व जाता आले नाही. ही ईश्वरीय व्यवस्था होती. याबद्दल मुहम्मद सल्ल. वाईट गोष्टी, रूढी आणि परंपरा यांची त्यांना प्रचंड चीढ होती. पण त्या वाईट परंपरा मोडून नवीन चांगल्या परंपरा कशा निर्माण कराव्यात या संबंधी त्यांना काहीच माहित नव्हते. चांगले म्हणजे नेमके काय? हे माहित नव्हते. हलाल काय? हराम काय? या संबंधी सुद्धा त्यांच्या मनामध्ये संभ्रम होता. म्हणून आपसुकच त्यांच्या मनामध्ये यासंबंधीचे चिंतन सुरू झाले. त्यांना तनहाई (एकटेपणा) आवडू लागला म्हणून ते ’सत्तू’ (विशिष्ट प्रकारचे भाजलेले पीठ) आणि पिण्याचे पाणी घेऊन मक्कापासून दोन मैलावर उंच पहाडावर असलेल्या एका गुहेमध्ये जाऊन जिचे नाव,’ गारे हिरा’ होते तिथे एकटे बसू लागले. चांगल्या गोष्टीबद्दल चिंतन करू लागले. वयाच्या 37 व्या वर्षी त्यांच्या व्यक्तीमत्वात झालेले हे बदल सुद्धा ईश्वरीय योजनेचाच एक भाग होता. त्यांच्या मार्फतीने ईश्वराला जगाची दिशा बदलावयाची होती. वाईट मार्गावरून जगाला चांगल्या मार्गावर आणावयाचे होते. म्हणून मुहम्मद सल्ल. यांना असे एकटे पाडण्यात आले. मक्काच्या धकाधकीच्या दिनचर्येपासून लांब जावून गारे हिराच्या कुशीत एकट्याने शांत बसण्याची आवड त्यांच्यात निर्माण करण्यात आली. 

वहीच्या प्रत्यक्ष अवतरणाचा सिलसिला

वयाची 40 वर्षे पूर्ण होताच त्यांच्या व्यक्तीमत्वात एक क्रांतीकारक बदल झाला. त्यांना खरी स्वप्ने पडू लागली. ते रात्री स्वप्नात जे पाहत दिवसा अगदी तशाच घटना त्यांच्या डोळ्यासमोर घडू लागल्या. अशाच अवस्थेत सहा महिने सरले. असे म्हटले जाते की अगाऊ, खरी स्वप्ने फक्त प्रेषितांनाच पडतात व हा प्रेषितत्वाचा 46 वा भाग असतो. एव्हाना हिरामध्ये चिंतन करत तीन वर्षे संपली होती. अशातच रमजानच्या 21 व्या रात्री म्हणजे 10 ऑगस्ट 610 च्या रात्री ज्यावेळी त्यांचे वय 40 वर्षे, 6 महिने आणि 12 दिवस होते, अचानक ईशदूत जिब्रईल अलै. सलाम गारे हिरामध्ये प्रकट झाले. जिब्रईल अलै. यांच्या अशा अचानक आगमनाने मुहम्मद सल्ल. गडबडून गेले. जिब्राईल अलै. यांच्या आगमनाबरोबर गारे हिरा उज्ज्वल प्रकाशाने उजळून निघाली. इकडे मुहम्मद सल्ल. घाबरलेले होते, तिकडे जिब्राईल आत्मविश्वासाने पावले टाकत पुढ्यात येऊन उभे राहिले व म्हणाले, ’वाचा!’ तेव्हा प्रेषित उत्तरले मला वाचता येत नाही. जिब्राईल अलै. यांनी पुन्हा दोन वेळा, ’वाचा!’ असे म्हटले. मुहम्मद सल्ल. यांनी पुन्हा तेच उत्तर दिले. तेव्हा जिब्राईल अलै. यांनी मुहम्मद सल्ल. यांना तीन वेळा करकचून मिठी मारली. ती मिठी इतकी जबरदस्त होती की, प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी नंतर या भेटीचे वर्णन करताना सहाबा रजि. समोर सांगितले होते की, त्यांच्या मिठीने माझ्या शरिरातील जणू सर्व शक्तीच संपून गेली होती. 

तिसऱ्या वेळा वाचा म्हटल्यानंतर मिठी सोडल्यावर जिब्राईल अलै. यांनी कुरआनच्या पहिल्या पाच आयती मुहम्मद सल्ल. यांच्या समोर वाचल्या आणि त्यांना त्या आयातींचे पठण करण्यास सांगितले. त्या आयाती पुढीलप्रमाणे होत, ‘इक़रा बिस्मी रब्बिकलजी खलक-खलकल इन्सान मिन अलक अकरऊ व रब्बकल अकरमू, अल्लजी अल्लम बिल-अ-कलम, अल्लमल इन्सान मआलमू याअलम’ (वाचा आपल्या पालनकर्त्याच्या नावाने! ज्याने जन्माला घातले मानवाला मांसाच्या तुकड्यापासून. वाचा! तुमचा पालनहार अत्यंत उदार आहे, त्याने लेखनीद्वारे ज्ञान शिकविले, मानवाला ते ज्ञान दिले जे तो जानत नव्हता.) (संदर्भ : सुरे अल-अलक़ आयतक्र. 1 ते 5.).

वरील पाच आयातींचा संदेश देऊन जिब्राईल अलै. अंतर्धान पावले. तेव्हा मुहम्मद सल्ल. प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत घरी परतले. त्यांचे शरीर थरथरत होते. त्यांच्या हृदयाच्या ठोक्यांची गती वाढली होती. घरी येताच त्यांनी आपल्या पत्नी हजरत खतीजा यांना सांगितले की, ’’मला चादरीने पांघरून टाका’’ चादर पांघरून काहीवेळा शांत बसल्यानंतर ते स्थिरावले. त्यानंतर त्यांनी हजरत खतीजा रजि. यांना सर्व घटनाक्रम सांगितला व म्हणाले की, ’या घटनेमुळे मला काय झालंय कळत नाहीये. मला माझ्या जीवाची भीती वाटतेय.’’ त्यावर खतीजा रजि. उत्तरल्या, ’’कदापि नाही! आपल्या जीवाला काहीच धोका होणार नाही. आपण लोकांवर दया दाखविता, अडल्या नडल्यांच्या कामी येता, गरीबांची मदत करता, पाहुण्यांचे स्वागत व आदराआतिथ्य करता, सत्यावर असलेल्या प्रत्येकाची साथ देता, तेव्हा ईश्वर तुम्हाला कदापि धोका होऊ देणार नाही.’’ 

हजरत खतीजा रजि. यांच्या या बोलण्याने मुहम्मद सल्ल. यांना थोडा धीर आला. नंतर हजरत खतीजा रजि. यांनी मुहम्मद सल्ल. यांना आपले चुलतभाऊ ’वरका बिन नौफेल बिन असद बिन अब्दुल उज्जा’ यांचेकडे घेऊन गेल्या. त्यांनी ख्रिश्चन धर्म स्विकारलेला होता, त्यांना इब्रानी भाषा येत होती, ते बायबल हाताने लिहीत, त्यावेळी ते वृद्ध आणि दृष्टीविहीन झाले होते. त्यांनी मुहम्मद सल्ल. यांच्या मुखातून सारा वृत्तांत ऐकला आणि आश्चर्याने ओरडले. ’’अरे ! हा तर तोच ईशदूत आहे ज्याने मुसा अलै. (मोझेस)कडे ईश्वराचा संदेश आणला होता. ओह! कदाचित मी आज सुदृढ असतो किंवा त्या दिवसापर्यंत जीवंत राहू शकलो असतो ज्या दिवशी तुमचे लोक तुम्हाला मक्कामधून घालवून टाकतील तर मी तुमची खूप मदत केली असती’’ यावर प्रेषित सल्ल. यांनी चकित होऊन विचारले की, ’’अच्छा! तर मला आमीन आणि सादीक म्हणणारे माझेच लोक मला मक्कातून काढून टाकतील?’’ तेव्हा वरका बिन नौफेल उत्तरले, ’होय! ईश्वराचा हा संदेश ज्यांनी-ज्यांनी आणला त्यांना-त्यांना त्यांच्याच वंशाच्या लोकांनी शत्रुत्व करून आपल्यातून काढून टाकलेले आहे.’’ 

तबरी आणि इब्ने हश्शाम या इस्लामी पंडितांनी असे नमूद केलेले आहे की, पाच आयातीच्या या अवतरणानंतर घरी परतल्यावर वरका बिन नौफेल यांची भेट घेतल्यानंतर मुहम्मद सल्ल. परत गारे हिरामध्ये जावून बसले. त्यांच्या मनामध्ये नाना-विचार येत होते. पुढे त्यांनी या संबंधी सहाबा रजि. यांच्याशी बोलताना या घटनेसंबंधी असे म्हटले होते की, ’’ अल्लाहने जगामध्ये जेवढे लोक निर्माण केले त्यातील शायर (कवी) आणि पागल (वेडा) हे लोक मला अत्यंत नापसंत होते. इतके की मी त्यांच्याकडे पाहत सुद्धा नसे. परंतु वहीच्या अवतरणानंतर मी माझ्याशीच बोललो की मी त्यांच्यासारखाच आहे की काय? एका दिवशी मी पहाडाच्या टोकाकडे जात होतो, तेव्हा माझ्या मनात विचार आला पहाडावरून स्वतःला खाली झोकून देऊन आत्महत्या करावी व या दबावातून कायमची सुटका करून घ्यावी. हे विचार चालू असतानाच पहाडाच्या मध्यामध्ये मी जेव्हा पोहोचलो तेव्हा आकाशवाणी झाली की, ’’ हे मुहम्मद सल्ल. !  तुम्ही अल्लाहचे प्रेषित आहात आणि मी ईशदूत जिब्राईल आहे. तेव्हा मी आकाशाकडे पाहिले तेव्हा जिब्राईल अलै. एका माणसाच्या रूपाने आकाशात पाय रोवून उभे होते आणि म्हणत होते. ते पुन्हा म्हणाले, ’’ ऐ मुहम्मद सल्ल.! अल्लाहने प्रेषित म्हणून तुमची निवड केलेली आहे.’’तेव्हा मी एकाच ठिकाणी जड अवस्थेत उभा होतो. न मला एक पाऊल पुढे टाकता येत होते ना मागे घेता येत होते. परंतु मी माझे डोके वर करून आकाशाकडे जिब्राईल अलै. यांच्याकडे व त्यांच्या आजूबाजूला रोखून पाहत होतो. सर्वत्र मला जिब्राईलच दिसत होते. त्यांच्याकडे पाहता-पाहता मी इतका अभिभूत झालो होतो की माझ्या मनातील आत्महत्येचा विचार कधी निघून गेला हे मलाच कळाले नाही. मी निश्चल उभा होतो. शेवटी जिब्राईल अलै. अंतर्धान पावले आणि मी माझ्या घराकडे परत आलो व ह. खतीजा रजि. यांच्या जवळ बसलो. तेव्हा त्यांनी विचारले की, ’’आपण कोठे होतात? मी सेवकाला मक्का शहरामध्ये पाठवून सगळीकडे शोध घेतला.’’ त्यावर मुहम्मद सल्ल. यांनी आकाशात जिब्राईल अलै. यांना पाहिल्याची सर्व घटना सांगितली. तेव्हा हजरत खतीजा रजि. आनंदाने उद्गारल्या,’’ हे चुलत्याचे पुत्र ! आपण आनंदी व्हा आणि दृढ रहा. त्या ईश्वराची शपथ ज्याच्या ताब्यात माझा जीव आहे, मला आशा आहे की आपण एक उत्तम प्रेषित म्हणून आपली कामगिरी बजावाल. त्यानंतर त्यांनी परत वरका बिन नौफेलकडे जाऊन हा घटनाक्रम सुद्धा सांगितला. तेव्हा ते उद्गारले,’’ हे खतीजा ! त्या ईश्वराची शपथ ज्याच्या हातात वरकाचा जीव आहे. मुहम्मद सल्ल. कडे तोच ईशदूत पुन्हा आलेला आहे जो हजरत मुसा अलै. कडे वारंवार येत होता आणि त्याने मुहम्मद सल्ल. यांना प्रेषित्वाची शुभवार्ता दिलेली आहे’’ हजरत खतीजा रजि. यांनी घरी येऊन वरका बिन नौफेलशी झालेला वार्तालाप मुहम्मद सल्ल. यांच्याशी कथन केला. त्यानंतर काही अवधी लोटल्यानंतर प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी स्वतः वरकाशी भेट घेऊन या घडलेल्या घटनेबद्दल सविस्तर चर्चा केली. तेव्हा त्यांनी पूर्ण आत्मविश्वासाने सांगितले की, तुम्हाला महान प्रेषित म्हणून ईश्वराने निवडलेले आहे. पुन्हा आलेला ईशदूत हा जिब्राईलच होता. यानंतर काही दिवस जिब्राईल अलै. येण्याचा क्रम बंद झाला. कुठलीही वही अवतरित झाली नाही. त्यामुळे प्रेषित मुहम्मद सल्ल. दुःखी होते आणि अनेकवेळा त्या उंच पहाडावर जात होते. त्यांच्या मनात पुन्हा आत्महत्येचे विचार घोळत होते. एक दिवस स्वतःला पहाडावरून झोकून देण्याचा पक्का विचार करून ते पहाडावर पोहोचले तेव्हा जिब्राईल अलै. पुन्हा अवतरित झाले आणि म्हणाले, ’’हे मुहम्मद सल्ल. आपणच खरे रसूल आहात.’’ जिब्राईलच्या भेटीमुळे प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या मनाला थोडी शांती लाभली. 

हाफिज इब्ने हजर यांनी म्हटलेले आहे की, ’’वही येण्याचा सिलसिला यासाठी थांबविण्यात आला होता की, प्रेषित सल्ल. यांच्या जीवाला थोडा आराम मिळावा आणि चित्त स्थीर व्हावे. जेव्हा ते स्थिर झाले तेव्हा पुन्हा वही येण्याचा सिलसिला सुरू झाला व दूसरी आयत जी नाजिल झाली ती ’’या अय्युहल मुदस्सीर...’’ हे पांघरून ओढून पहूडणाऱ्या उठा आणि खबरदार करा, आणि पालनकर्त्याच्या महानतेची घोषणा करा आणि आपले कपडे स्वच्छ ठेवा आणि अपवित्रतेपासून दूर रहा आणि उपकार करू नका अधिक प्राप्त करण्यासाठी आणि आपल्या पालनकर्त्यासाठी धैर्य राखा जेव्हा प्रलयाच्या दिवशी मोठा आवाज केला जाईल तो दिवस फारच कठीण असेल, अश्रद्धावानांसाठी सोपा असणार नाही.  वगैरे वगैरे...’’ यानंतर वही येण्याच्या प्रक्रियेमध्ये गती आली आणि जगाला चांगले काय? वाईट काय? हराम काय? हलाल काय? इत्यादी संबंधी मार्गदर्शन करण्यात आले व हळूहळू परिपूर्ण इस्लामी जीवन शैलीचा परिचय प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या मार्फतीने जगाला करून देण्यात आला. ज्यात शिक्षण, अर्थकारण, समाजकारण, राजकारण, युद्धनिती, कायदा, न्यायशास्त्र, भौतिकशास्त्र आणि या सर्व शास्त्रांचा उपयोग करण्याची विधी शिकविली गेली. थोडक्यात यशस्वी जीवन जगण्यासाठी माणसाला ज्या-ज्या ज्ञानाची गरज आहे ते-ते ज्ञान अवतरित करण्यात आले अणि या सर्व ज्ञानाचा / शास्त्रांचा पाया नैतिकतेवर ठेवण्याचे व अनैतिकेला नापसंत करण्याचे शिक्षण देण्यात आले आणि वयाच्या 63 व्या वर्षी ज्या तिथीला त्यांचा जन्म झाला होता त्याच तिथीला त्यांना पर्दा फरमाविण्याचा आदेश झाला. 

एकंदरित जगातील ज्ञान प्राप्त करण्याच्या ज्या विधी आहेत, जसे स्पर्श करून, ऐकूण, बोलून, चव चाखून, पाहून, ज्ञान मिळविता येते. या ज्ञान मिळविण्याच्या विधींपेक्षा श्रेष्ठ विधी वहीद्वारे मिळालेले ज्ञान आहे. कारण स्पर्श करून, ऐकूण, बोलून, चव चाखून, पाहून, निरिक्षण करून, चिंतन-मनन करून जे काही माणसाला अवगत होते त्यात चूक होण्याची भरपूर शक्यता असते. मात्र ’वही’ एक असा विश्वासपात्र मार्ग आहे, ज्या मार्गाने मिळालेले ज्ञान हे त्रुटी विरहित असते. कारण ज्ञान देणारा हा ईश्वर असतो, ज्ञान पोहोचविणारा ईशदूत तर ज्याला ज्ञान प्राप्त झाले तो जगातील सर्वात विश्वासपात्र व्यक्ती प्रेषित असतो. आणि शेवटचे प्रेषित म्हणून द मोस्ट ट्रस्टेड मॅन ऑफ द वर्ल्ड असे ज्यांना म्हटले जाते व अल्लाहने स्वतः ज्यांच्याबद्दल असे म्हटले आहे की, ’’हे पैगंबर (सल्ल.) ! आम्ही तुम्हाला संपूर्ण जगासाठी कृपा बनवून पाठविले आहे.’’ (संदर्भ : सुरे अम्बीया आयत क्र. 107). तसेच  ज्यांचा समावेश मायकेल एच. हार्ट आपल्या ’द हंड्रेड मोस्ट इन्फ्लुयन्शल पर्सन्स इन हिस्ट्री’ मध्ये प्रथम स्थानावर करतो, ते मुहम्मद मुस्तफा सल्ल. असतात तेव्हा त्यांच्यावर अवतरित झालेल्या कुरआनच्या शिकवणीवर शंका उपस्थित करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. थोडक्यात वहींचा समुच्चय असलेले कुरआन हे किती कठीण कष्टाअंती प्रेषित मुहम्मद यांनी जगाला दिले या गोष्टीचा आता वाचकांना अंदाज आलाच असेल. कुरआनसारखा परिपूर्ण ग्रंथ मानवाला दिल्याबद्दल ईश्वराचे व अपरिमित कष्ट सहन करून ते आमच्यापर्यंत पोहोचविले, याबद्दल मुहम्मद सल्ल. यांचे कोटी-कोटी आभार.


- एम.आय.शेख


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget