अशात एक माणूस समोर येतो – सोनू सूद त्याचे नाव! त्याच्या माणुसकीने जन्म घेतला आणि मग तो या अ़डकून पडलेल्या गोरगरिबांना आपापल्या गावी पाठवून देण्याची सोय करू लागला. त्या अगोदर लाखो लोक हजारो किमीचा प्रवास पायीच करत आपल्या घराकडे निघाले. जवळ पैसे नाहीत. खायला काही नाही. अशात इतर स्वयंसेवी संस्थादेखील बाहेर पडल्या. जागोजागी रस्त्यात अशा लोकांच्या जेवणाची सोय करू लागल्या. पाण्याच्या बाटल्या, अन्नाची पाकिटे पाटू लागले. काही लोक रेल्वेमार्गाच्या कडेला उभं राहून प्रवाशांना अन्नाची पाकिटे, पाणी वाटत होते. देशात कोट्यवधी लोकांचे असे हाल होत असताना शासन-दरबारचा कुठे थांगपत्ता नव्हता. सोनू सूदने जणू शासनाचीच भूमिका घेतली. त्या एकट्या माणसानं लाखो प्रवासी मजुरांना बसेसची सोय करून ज्यांना त्यांना त्यांच्या गावी पाठवून दिले. शासनाला जमले नाही ते त्याने एकट्याने करून दाखवले. गोरगरीबांसहित अशा काही लोकांनाही त्याने चार्टर्ड विमानाने देशात आणले जे तिथे अडकून पडले होते. आणीबाणीच्या काळात लोकांच्या सेवेसाठी जर कोण कार्य करत असेल, आपली जबाबदारी नसताना शासनाची भूमिका घेत असेल तर त्याने या कार्यासाठी कुठून पैसे आणले, किती आणले, कुठे खर्च केले, किती शिल्लक आहेत, पैशांची अपरातफर केली का? असे प्रश्न सहसा कुणी विचारत नसतो. कारण जो माणूस अडकलेल्यांना मदतीचा हात देत आहे, आपल्या कमाईचे पैसे खर्च करीत असेल, जाहिरातींद्वारे आणि इतर मार्गांनी. म्हणजे त्याच्या उद्दिष्टाशी सहमत असलेय्या मंडळींकडून मिळालेल्या देणग्यांमधून खर्च करत असेल तर त्याने असा कोणता गुन्हा केला? त्याने जर लाखो लोकांचे पोट भरले, त्यांना त्यांच्या घरी पोहचवले तर त्याचा कोणता गुन्हा यात? ज्या महान कार्यासाठी, माणुसकीच्या अशा काळी सेवेसाठी ज्या वेळेस सरकारनेही काही केले नव्हते अशा वेळी जर त्याने लोकांची सोय केली असेल तर त्यासाठी त्याला पारितोषिक द्यायला हवे होते. त्याचा सन्मान करायला हवा होता. म्हणजे इतरही श्रीमंत लोकांना या महान कार्याची प्रेरणा मिळावी.
पण आपल्या देशाच्या सत्ताधाऱ्यांचे काय विचार आहेत, कोणती विचारधारा आहे याचा उलगडा होत नाही. असे वाटते की लोकांनी जगू नये. म्हणजे त्यांना जगू देऊ नये. एकामागून एक समस्येमझ्ये गुरफटून त्यांना ठेवावे आणि या यातनांमधूनच त्यांनी या जगाचा निरोप घ्यावा. असे जर वाटत असेल तर कोण काय करू शकतो.
- सय्यद इफ्तिखार अहमद
संपादक,
मो.: ९८२०१२१२०७
Post a Comment