प्रेषित्व मिळाल्यापासून मदीनेला प्रयाण करेपर्यंत म्हणजेच तब्बल 13 वर्षापर्यंत हजरत मुहम्मद सल्ल. यांच्या अनुयायींना अतोनात कष्ट सहन करावे लागले. लोखंडी सळईने त्यांना डागले गेले, तापलेल्या वाळूवर नग्नावस्थेत ओढले गेले, त्यांच्या मार्गात काटे टाकले गेले, त्यांना विविध प्रकारे कष्ट देण्यात आले. परंतु, त्यांच्या अनुयायांची नि:स्वार्थता, निर्भयता आणि उच्चदर्जाचे चारित्र्य पाहून हळू-हळू नैसर्गिक जीवन-प्रणालीकडे लोक वळू लागले. पाहता-पाहता अरब देशातले लोकच नव्हें तर संपूर्ण जगातील लोक ईस्लामधर्माकडे आकर्षित होऊ लागले.
प्रेषित हजरत मुहम्मद सल्ललाहु अलैहि व सल्लम ईस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित आहेत. हजरत मुहम्मद सल्ल. यांचा जन्म अरबस्थानात अशावेळी झाला जेव्हा अरबस्थान अधर्म, अशांती आणि अनेकेश्वरवादाच्या भयंकर काळोखात हेलकावे खात होता. वंशवाद, घराणेशाही आणि भूमिवाद इत्यादी कारणावरून नेहमी झटापटी होऊन रक्ताचे पाट वाहत होते. स्त्रियांची अवहेलना करणे, नवजात मुलींची हत्या करणे, जुगार खेळणे, मद्यपान करणे ह्या वाईट रूढींना चोहीकडे उधान आले होते. अरबस्थानात नव्हे तर जगातही अशांततेचा धुमाकूळ माजला होता. सर्वत्र धार्मिक अवनती होत होती. उच्च-नीच पणाला ऊत आले होते, नीतिमत्ता लयाला जात होती. स्वैराचार, अधर्म, अशांतीच्या काळकुट्ट अंधकारातून सुटका कधी होईल असे लोकांना वाटत होते. अखेर 20 एप्रिल 571 इ.स. म्हणजे ईस्लामी सन हिजरीच्या 50 वर्षापूर्वी 12 रबीउल अव्वल ईस्लामी कालगणनेनुसार तिसरा महिना, सोमवारच्या सकाळच्या प्रहरी मक्केच्या एका प्रतिष्ठित कुरैश कुटुंबात हजरत मुहम्मद सल्ल. यांचा जन्म झाला.
हजरत मुहम्मद सल्ल. यांच्या वडिलांचे नाव हजरत अब्दुल्लाह आणि आईचे नाव ‘बीबी आमेना’ होते. त्यांच्या जन्माअगोदर 4-5 महिन्यापूर्वी त्यांचे वडील वारले होते. ते सहा वर्षाचे झाल्यावर आईचे छत्रही हरपले. आईच्या निधनानंतर त्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी त्यांचे आजोबा ‘अबु मुत्तलिब’ यांच्यावर आली. दोन वर्षानंतर आजोबा सुध्दा वारले. अशा प्रकारे वयाच्या आठ वर्षापर्यंत आई-वडील आणि आजोबाविना ते पोरके झाले. आजोबानंतर काका ‘हजरत अबु-तालिब’ यांनी त्यांचे पालन पोषण केले. त्या काळातील परंपरेनुसार ते लहान वयातच आपल्या काकाबरोबर व्यापाराच्या निमित्ताने परदेशात जाऊ लागले. देशात आणि विदेशात ते ‘सादिक’ आणि ‘अमीन’ म्हणून ओळखले जाऊ लागले. वयाच्या पंचविसाव्या वर्षी हजरत खतीजा नामक परमपवित्र विधवा स्त्रीशी ते विवाहबध्द झाले. वयाच्या चाळीसाव्या वर्षी त्यांना ‘प्रेषितावस्था’ प्राप्त झाली आणि तेव्हापासून त्यांच्यावर क्रमाक्रमाने ‘कुरआन शरीफ’ चे अतवरण होऊ लागले. प्रेषित्व मिळाल्यावर लोकांना ईशआज्ञेकडे बोलावण्याची (इस्लामचा प्रसार करण्याची) आज्ञा त्यांना प्राप्त झाली. त्यांनी लोकांना संबोधून सांगितले की, ‘‘लोक हो ! केवळ एकट्या अल्लाहची उपासना (बंदगी) करा. व्याभिचार, चोरी, मद्यप्राशन, जुगार यांचा पूर्णपणे त्याग करा. दुर्बलांची मदत करा, स्त्रियांना त्यांचा हक्क द्या, अल्लाहची भीती बाळगा, लक्षात ठेवा मृत्यु अटळ आहे. मृत्युनंतर निर्माणकर्त्या ईश्वरासमोर सर्वांना जाब दयावा लागणार आहे. बघा, एका मनुष्याची हत्या म्हणजे संपूर्ण मानवतेची हत्या होय.’ लोक हो ! तुम्ही सर्व एकच आहात. तुमच्यात कोणी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही. श्रेष्ठत्व रंगावर अथवा वंशावर नसून ईशभक्ति आणि ईशभितीवर अवलंबून आहे.’’
हजरत मुहम्मद सल्ल. यांच्या या प्रचाराचा आरंभ होताच स्वत:ला सर्वश्रेष्ठ समजणारा अधिकारी वर्ग, कट्टर कुरैश आणि अनेकेश्वरवादी त्यांचे शत्रु झाले. प्रेषित्व मिळाल्यापासून मदीनेला प्रयाण करेपर्यंत म्हणजेच तब्बल 13 वर्षापर्यंत हजरत मुहम्मद सल्ल. यांच्या अनुयायींना अतोनात कष्ट सहन करावे लागले. लोखंडी सळईने त्यांना डागले गेले, तापलेल्या वाळूवर नग्नावस्थेत ओढले गेले, त्यांच्या मार्गात काटे टाकले गेले, त्यांना विविध प्रकारे कष्ट देण्यात आले. परंतु, त्यांच्या अनुयायांची नि:स्वार्थता, निर्भयता आणि उच्चदर्जाचे चारित्र्य पाहून हळू-हळू नैसर्गिक जीवन-प्रणालीकडे लोक वळू लागले. पाहता-पाहता अरब देशातले लोकच नव्हें तर संपूर्ण जगातील लोक ईस्लामधर्माकडे आकर्षित होऊ लागले. मक्केत शत्रुचे वर्चस्व आणि कष्ट देणे अधिकच वाढल्यामुळे ईस्लाम धर्मियांना तिथे राहणे कठीन झाले होते. हजरत मुहम्मद सल्ल. यांनी ईश आज्ञेने मक्केहून मदिनेला प्रयाण केले. त्यांच्या आगमनानंतर मदिना आणि आसपासच्या परिसरात न्याय, शांतता आणि बंधुत्वाचा सुगंध दरवळू लागला आणि दिवसेंदिवस ईस्लाम धर्म प्रफुल्लित होऊ लागला, वाढू लागला. ज्या दिवशी हजरत मुहम्मद सल्ल. यांनी मक्केहून मदिनेत पदार्पण केले त्या दिवसापासून ईस्लामी कालगणना हिजरी-सनाची सुरूवात झाली. ईश्वराचे लाडके प्रणेते आणि ईस्लामचे संदेशवाहक असूनही हजरत मुहम्मद सल्ल. यांची राहणी अत्यंत साधी आणि सरळ होती. खाण्यास जाडे-भरडे अन्न आणि झोपण्यास जमिनीवर फक्त एक चटई. जीवनभर त्यांनी कधीही भरपूर जेवण केले नाही. उलट कधी-कधी तीन-तीन दिवस त्यांना उपाशी राहावे लागत होते. या साध्या राहणीमागचे कारण गरीबी आणि दारिद्रय नव्हते तर त्यांना शतकानुशतकांच्या लोकांचे मार्गदर्शन केवल उपदेश म्हणून नव्हे तर स्वत: त्याच मार्गाचर अनुसरण करून दाखवायचे होते. हजरत मुहम्मद सल्ल. यांनी अरफातच्या मैदानावर एक लाख चोवीस हजार अनुयायांच्या समक्ष जो अतिम संदेश लोकांना दिला तो त्या काळाच्या अनुयायांपुरताच मर्यादित नव्हता तर प्रलयापर्यंतच्या सर्व लोकांवर तो बंधनकारक आहे. या अंतिम उपदेशच्या वेळी त्यांनी लोकांना सांगितले. ‘‘लोक हो ! मला वाटते मी आणि तुम्ही पुन्हा इथे जमणार नाही. आजपासून या शहरात रक्त वाहणे निषिद्ध आहे. म्हणूनच तुमच्यावर हत्या करणे, कुणाचा अवमान करणे, कुणाचा माल हडपणे अपराध हराम ठरविले गेले आहे. लवकरच आपण सर्वांना ईश्वराच्या समोर हाजर व्हायचे आहे आणि सर्वांना आपल्या कृत्यांबद्दल जाब द्यावा लागणार आहे. तेव्हा माझ्यानंतर एकमेकांचे नुकसान करू नये. जे दुष्कृत्य आजपर्यंत घडले त्यांची पुनरावृत्ती होऊ देऊ नका!’’ जगाचा निरोप घेतांना, प्राणोत्क्रमणच्या वेळी जमा झालेले सहाबा रजि. (सहकारी) यांना संबोधून ते म्हणाले होते, ‘‘ज्याची मला आज्ञा झाली, आजपर्यंत तेच मी तुमच्यापर्यंत पोहचविले आहे. अल्लाहच्या आदेशात बदल करू नका. लोकांवर बळजबरी करू नका कारण अल्लाहाने फर्माविले आहे की, परलोकाचे घर म्हणजेच ‘जन्नत’ एक असे पवित्र स्थान आहे की त्यावर हक्क त्याच लोकांना मिळणार आहे जे जमीनीवर विद्रोहचे अपराधी नाहीत. जमीनीवर कोणत्याही प्रकारचे दंगे किंवा भांडण करत नाहीत. कारण जन्नत पाक आणि पवित्र लोकांसाठी आहे. पवित्र लोकांच्या कर्माचे ते फळ आहे.’’ हजरत मुहम्मद सल्ल. यांनी ज्या इस्लामची शिकवण दिली, जो मार्ग आपल्या जीवनात त्यांनी अवलंबविला, जो संदेश ते घेऊन आले. त्यावरून हे स्पष्ट होते की ते शांतीचे महान प्रणेते होते. आपल्यापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ आहे, आपल्या कृर्त्यांचा जाब विचारणारा आहे, परलोकाविषयीची ही निष्ठा माणसाला स्वैराचार प्रवृत्तींपासून दूर ठेवते. ‘जगत महर्षी’च्या दुस-या पानावर महात्मा गांधीचे म्हणणे उद्धृत केलेले आहे. ज्यात ते म्हणतात, ‘‘नि:संशय ईस्लाम तलवारीने पसरला नसून प्रेषितांचे साधे जीवन, नि:स्वार्थता, प्रेम, निर्भयता, ईश्वरावर दृढ आस्था आणि विश्वास यांच्या बळावर पसरला आहे.’’ संपूर्ण जगासाठी कल्याणाचा मार्ग दाखविण्याकरिता ईश्वराचा संदेश घेवून येणारे रहमतुल्लील आलमीन हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व सल्लम यांना ईश्वराने ज्या दिवशी जगात पाठविले होते त्याच दिवशी आपल्याजवळ बोलावून घेतले आणि तो दिवस म्हणजे 12 रबीउल अव्वलचा सोमवार होय. जगाला ईशभक्ती, शांती-समृध्दी, न्याय-बंधुत्व, एकता आणि नैतिकतेचा संदेश देणारे हजरत मुहम्मद सल्ल. ज्या दिवशी जगात आले त्याच दिवशी त्यांनी पर्दा फरमाविला. शांतीचे महान प्रणेते हजरत मुहम्मद सल्ल. यांचा जीवन, पथप्रदर्शन प्रलयापर्यंतच्या लोकांकरिता आदर्शच आहे.
- डॉ. अर्जिनबी युसूफ शेख
अकोला
dr.arjinbee@gmail.com.
मो. 93718 95126
Post a Comment