Halloween Costume ideas 2015

माणसातील दोन शक्तींचा संघर्ष


माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचे दोन पैलू आहेत. त्याच्यामध्ये फरिश्त्याचे स्वभाव गुणही आहेत आणि त्याच्यामध्ये पशूतुल्य वर्तनही आढळतात, पण जेव्हा माणसातील पाशवी शक्ती इतकी प्रबळ होते की माणसातील फरिश्त्याचे गुण दफन होतात, मातीपासून बनलेल्या या शरीरात दाबले जातात, तेव्हा जगात थैमान घालणारी माणसं दिसू लागतात.


माणसात दोन शक्ती कार्यरत असतात. एक त्याला वाईट आणि अयोग्य गोष्टींकडे आकर्षित करते तर दुसरी त्या बाबतीत नकारघंटा वाजवून चांगल्याकडे खेचू पाहते. माणसाला हे नेहमी जाणवत असते की त्याच्यात असलेल्या चांगल्या आणि वाईट दोन्ही शक्तींमध्ये सतत संघर्ष होत आहे. उदाहरणार्थ समजा एखाद्या माणसाजवळ एकच भाकर आहे. त्याशिवाय खायला दुसरं काहीही नाही. तो जेवायला बसणार इतक्यात एखादा गरजू आला, ज्याच्याकडे खायला काहीच नाही, तर मग लगेच माणसाच्या आत एक संघर्ष सुरू होईल. एक शक्ती म्हणेल की ही भाकर तुझ्यासाठीच ठेव, ती तुझ्या गरजेपुरतीही नाही म्हणून दुसऱ्याबरोबर वाटून घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, पण माणसातली दुसरी शक्ती याकडे आकर्षित करेल की त्याच्याकडे तर एकही नाही आणि तो भुकेला दिसतोय म्हणून ही भाकर दोघांनी वाटून घेतली पाहिजे, नाही तर समोरची व्यक्ती उपाशी राहील. प्रत्येक शक्तीची एक वैयक्तिक भावना असते, जी माणसाला स्वत: मध्ये जाणवते. एका शक्तीला केवळ स्वतःचे हित माहीत आहे. फक्त स्वतःचेच पोट भरण्याची चिंता आहे. दुसऱ्याचे पोट रिकामे असो वा भरलेले या विषयात त्याला रस नाही. दुसरे त्याला शारिरीक समाधान हवे असते. मग त्यासाठी कोणता मार्ग हलाल आहे आणि कोणता हराम याची त्याला पर्वा नसते. याशिवाय त्याच्यामध्ये आपले वर्चस्व गाजवण्याची तिव्र इच्छा असते. नेक नीतीने ही इच्छा पूर्ण होत नसेल तर कुटनीतीच्या नावावर प्रत्येक दुष्ट नीतीचा तो अवलंब करतो. ही आहे जैविक शक्ती.

याउलट दुसरी शक्ती आहे. ती दया, करूणा आणि कृपा यासारख्या गुणांनी भरलेली आहे. या शक्तीचा ओढा आपल्या निर्मात्याकडे असतो. त्यामध्ये आपल्या निर्मात्याची प्रेम ज्योत असते जी अखंडपणे तेवत ठेवणे अत्यावश्यक असते. अल्लाहची स्तुती, त्याच्या पावित्र्याचे गुणगान, तसेच आपल्या निर्मात्यासमोर प्रार्थना व क्षमायाचना करत राहिल्याने या शक्तीला शांती व समाधान मिळते. ही आहे आत्मिक शक्ती. 

कुरआनचा आत्म्याशी संबंध 

माणसाच्या जैविक अस्तित्वाचे पालन जमीनीतून होते तर आत्म्याला हवा असलेला पोषक आहार आकाशातून मिळतो जो अल्लाहने प्रत्येक काळात अवतरित केला. कुरआनचा आत्म्याशी घनिष्ठ संबंध आहे. सद्य काळात कुरआनद्वारेच दुःखी आत्मे सुखी होऊ शकतात. अल्लाहने कुरआनद्वारे मानवी आत्म्याशी संवाद साधला आहे. कुरआन हे आपल्या निर्मात्याने आपल्याशी केलेले संभाषण आहे, ज्याच्याशी मानवी आत्म्याला सर्वाधिक प्रेम आहे, कारण त्या निर्मात्याच्या आदेशानेच तो अस्तित्वात आला आणि त्याला अल्लाहकडेच परत जायचे आहे, म्हणून कुरआनवर दृढ विश्वास ठेवणे, ते शिकणे व शिकवणे, त्याचे वारंवार वाचन करणे, त्यामध्ये चिंतन व मनन करून त्याचा अर्थ समजून घेणे आणि इतरांनाही समजावून सांगणे आणि जीवनाच्या प्रत्येक बाबतीत त्याच्या कायद्यांना धरून आचरण केल्यास आत्मा हर्षित होतो. त्यामुळे आपल्या निर्मात्याशी असलेली प्रेम ज्योत तेवत असते, पण बहुतेक वेळा माणसाचे जैविक अस्तित्व हे आत्म्याला दडपून टाकते. माणूस आपल्या शारीरिक गरजा, इच्छा, आकांक्षा आपणहून अंगाअंगावर लादून घेतो, त्यांच्यासाठी तीव्रतेने धावपळ करतो, आपले सारे लक्ष त्यांच्यावरच इतके केंद्रित करतो की त्याचा आत्मा एक प्रकारे पूर्णपणे दुर्लक्षित होतो. गतिमान जीवनात बराच काळ जीवाबरोबर आत्माही धावत राहतो पण जीवाच्या गरजा, इच्छा-आकांक्षाच्या जड ओझ्याखाली तो सतत दु:खी असतो, अस्वस्थ होतो. शेवटी त्याची प्राणज्योत मावळते आणि माणसाचा आत्मा त्याच्या भौतिक अस्तित्वात गाडला जातो. माणूस खूप धावपळ करताना दिसतो पण आपल्या आत्म्यासाठी तो एक चालती फिरती कबर बनलेला असतो ज्यामध्ये त्याचा आत्मा दफन असतो. असा माणूस आध्यात्मिकतेच्या दृष्टीने मेलेला असतो.

मौलाना मुहियुद्दीन गाजी यांनी आपल्या पुस्तकात आत्म्याशी संबंधित कुरआनातील महत्त्वाच्या आयतींकडे लक्ष वेधतांना म्हटले आहे की, आत्म्याच्या संदर्भात पुढील आयती अत्यंत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करतात.’’साक्ष आहे मानवी आत्म्याची व त्या अस्तित्वाची ज्याने त्याला निटनेटके केले. मग त्याच्यातील दुष्टता व पापभिरूता त्यावर प्रकट केली. खचितच सफल झाला तो ज्याने अंतःकरणाची शुध्दी केली आणि विफल झाला तो ज्याने त्याला दाबून टाकले.(91-अश्शम्स: 7-10 )

या आयतीमध्ये ज्याला ’नफ्स’ असे म्हटले गेले आहे, वास्तविक पाहता तो शरीराच्या रूपाने अस्तित्वात असलेला माणसाचा आत्मा आहे.

(अनुवाद:-रूहानियत - पृष्ठ 12/13 ) म्हणजे अस्सल अस्तित्व माणसाचा आत्मा आहे जो भौतिक शरीरात फुंकला गेला आहे आणि हा विषय आपल्या समजण्या पलिकडचा आहे. एक साधे उदाहरण घ्या. आपल्याला आजपर्यंत हे सुद्धा माहित झाले नाही की आपल्या जीवाचा शरीराशी संबंध कसा जुळलेला आहे. शरीर विज्ञानाची मोठमोठी पुस्तके वाचून पहा. जीव  शरीराशी कसा संबंधित आहे आणि कोणत्या अवयवाशी आहे हे कळते का ते बघा. मेंदूच्या कोणत्या कोपऱ्यात ते बटन आहे जे चालू केल्यावर माणूस जागा होतो आणि बंद केल्यावर माणूस झोपी जातो हे कळत नाही. हे सर्व आपल्या आवाक्याबाहेर आहे. जेव्हा जीवाबद्दल आपल्याला माहिती नाही तेव्हा आत्मा तर त्यापेक्षा अधिक सूक्ष्म वास्तव आहे. वरील आयतीमध्ये शेवटी हे म्हटले गेले आहे की विफल झाला तो ज्याने आपल्या आत्म्याला मातीत पुरले, यासंबंधी कुरआनमध्ये स्पष्ट केलेला आणखी एक मुद्दा विचारात घ्या जो सातव्या अध्यायात आहे.

जिन्न आणि माणसांपैकी बहुसंख्य आम्ही नरकासाठीच निर्माण केले आहेत म्हणजे त्यांचा शेवट नरकच असेल. का असेल? कुरआनने पुढे स्पष्ट केले की, ज्यांना हृदये आहेत पण त्यांद्वारे त्यांना सत्याचे आकलन होत नाही. त्यांना डोळे आहेत पण त्यांद्वारे ते पाहत नाहीत. त्यांना कान आहेत पण त्यांद्वारे ते ऐकत नाहीत. ते गुराढोरांसारखे आहेत किंबहुना त्यांच्यापेक्षाही अधिक भरकटलेले. हेच लोक गाफील आहेत. ( 7 अल्-आअराफ : 179 ). या आयतीमध्ये असे कोणते ऐकणे आहे जे नाकारले जात आहे? कोणते पाहणे आहे जे नाकारले जात आहे? 

जगभरात हाहाकार माजवणारे असे कित्येक येऊन गेलेत जे अपंग नव्हते. धडधाकट होते. दिसायला सुंदर होते. वरवर पाहता खूप हुशार आणि ’विचारवंत’? समजले जायचे आणि आजही कित्येक समजले जातात, पण कुरआनने अशाच लोकांच्या बाबतीत म्हटले आहे की ते आंधळे आहेत त्यांची दृष्टी हरवली आहे. ते बहिरे आहेत त्यांना ऐकू येत नाही. त्यांचे हृदये ठप्प झालेले आहेत. ही आहे आत्म्याच्या मृत होण्याची वास्तविकता जी या आयतीमध्ये वर्णन केली गेली आहे. हे लोक गुराढोरांसारखे आहेत. दिसायला माणसं आहेत पण मानव स्वरूपात दोन पायांवर चालणारे प्राणी आहेत आणि प्राणीही कोणकोणते? 

 एकदा एका महात्म्यांनी भऱ्या बाजारात एका व्यक्तीला प्रश्न केला  की मला एखाद्या ’माणसाला’ भेटण्याची खूप इच्छा आहे. आपण मला माणूस दाखवाल का? 

यावर समोरची व्यक्ती म्हणाली की, अहो महाशय! बाजार गच्च भरलेला आहे. दुकानदार आहेत, गिऱ्हाईक आहेत, इतकी माणसं तुम्हाला दिसत नाहीत का?  यावर ते महात्मा म्हणाले 

कुठं आहेत माणसं? हा प्रश्न विचारण्याचा अर्थ असा होता की इथे तर कोल्हे, लांडगे व कुत्रे दिसताहेत. या शब्दांमध्ये लबाडी, धुर्तपणा व कधीही न संपणारी पोट आणि वासनेची लालसा हे अर्थ दडलेले आहेत. अशा वृत्तीच्या लोकांसाठी कुरआनने मात्र सौम्य शब्द वापरले आहेत की ते गुराढोरांसारखे आहेत. प्राण्यांमध्ये या वृत्ती असण्यात काय वाईट आहे? ते तर याच स्तरावर जन्माला आलेले आहेत, पण माणूस ज्याला सर्वोच्च निर्मिती म्हटले गेले आहे, बऱ्या वाईटाचा फरक ओळखणारे गुण ज्याच्या अंगी आहेत, तोही प्राण्यांच्या पातळीवर घसरलेला असेल तर त्याच्यासाठी जरूर लाज व शरमेची बाब आहे. 

माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचे दोन पैलू आहेत. त्याच्यामध्ये फरिश्त्याचे स्वभाव गुणही आहेत आणि त्याच्यामध्ये पशूतुल्य वर्तनही आढळतात, पण जेव्हा माणसातील पाशवी शक्ती इतकी प्रबळ होते की माणसातील फरिश्त्याचे गुण दफन होतात, मातीपासून बनलेल्या या शरीरात दाबले जातात, तेव्हा जगात थैमान घालणारी माणसं दिसू लागतात. यातून सुटका होण्याचा मार्ग कोणता?  अध्याय अत्-तीन मध्ये सांगितले गेले आहे की, ’’ज्यांनी श्रध्दा ठेवली आणि सत्कर्मे करीत राहिले त्यांच्यासाठी कधीही न संपणारा मोबदला आहे.’’ ( 95 अत्-तीन - 6 ) ...........क्रमशः

- अब्दुल कय्यूम शेख अहमद

9730254636 - औरंगाबाद


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget