Halloween Costume ideas 2015

राजर्षी शाहू महाराज, ब्राह्मणेत्तर चळवळ आणि वृत्तपत्रे


पत्रकारिता हे एक लोकसेवेचे व्रत म्हणून राहिले आहे. थोर समाजसेवकांनी हे ब्रीद ओळखून लोकसेवेसाठी पत्रकारिता हे शस्त्र म्हणून वापरले आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक इतिहासात ब्राह्मणेत्तर चळवळीने फार मोठी सामाजिक क्रांती केली आहे. 

स्वातंत्र्यपूर्व काळात ब्राम्हणेत्तरांची वृत्तपत्रे निघत, चार-सहा महिने कशीबशी चालत आणि आर्थिक अडचणीमुळे ती बंद पडत असत. सुशिक्षित, सुजाण ब्राम्हणवर्गाकडून अशा पत्रांना आश्रय मिळण्याची सुतराम शक्यता नव्हती. तसेच सुशिक्षित बहुजन समाजातील तरुणांकडे विकत घेवून वृतपत्र वाचण्याची ऐपत नव्हती. त्यामुळे वृतपत्र चालवण्यासाठी आवश्यक असलेला वाचक वर्ग व वर्गणीदार मिळत नसल्याने ही पत्रे अल्पायुषी ठरत. अशा कठीण परिस्थितीत ब्राम्हणेतर चळवळीतील कार्यकर्त्यांनी अत्यंत कष्टाने व तळमळीने वृत्तपत्र सुरू करून सनातन्यांसमोर आव्हान उभे केले.

महाराष्ट्रातील ब्राम्हणेत्तर चळवळ व पत्रकारिता:

भारतातील निरनिराळ्या प्रांतात एकोणिसाव्या शतकात सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी अनेक व्यक्ती व संस्था यांनी प्रयत्न केल्याचे दिसून येते. यात प्रामुख्याने राजाराम मोहनरॉय, महर्षी दयानंद यांचा ‘ब्राम्हो समाज’ व ‘आर्य समाज’ या संघटनांचा समावेश होतो. त्यांनी त्या काळात भारतात अंधश्रद्धेच्या व वाईट चालीरिती च्या विरोधात चळवळ चालवली होती. महाराष्ट्रातील त्या शतकातील सामाजिक स्थिती अत्यंत बिकट अशीच होती. पेशवाईच्या काळातील ब्राह्मणांचे वर्चस्व इंग्रजांच्या राज्यात ही कायम होते. त्यामुळे बहुजन समाजातील जनता त्यांच्या पिळवणुकीस कंटाळली होती. त्यावेळी अस्तित्वात असलेला प्रस्थापित समाज आपली सर्व क्षेत्रातील सत्ता सहजासहजी न सोडता आपल्या न्याय मागणीसाठी संघटीत होत चाललेल्या चळवळी मोडून काढण्याचे प्रयत्न करीत होता. म. फुले हे जाणून होते. त्यामुळे धार्मिक व सामाजिक पातळीवर वैचारिक भूमिका मांडण्यासाठी मानवी मूल्यांची जोपासना करणारा समाज स्थापन करण्याकरिता एका व्यासपीठाची गरज भासू लागली. महात्मा जोतीराव फुले यांनी दि. 24 सप्टेंबर 1873 रोजी पुणे येथे ‘सत्यशोधक समाज’ नावाची संस्था निर्माण केली. काबाडकष्ट करणार्‍या कामकरी वर्गात आत्मविश्वास आणि आत्मसन्मान निर्माण व्हावा, दारिद्रय, जुलमी समाजव्यवस्था व त्यातून उत्पन्न होणारे सामाजिक अन्यायाविरूद्ध दंड थोपटण्याचे धैर्य त्यांच्यामध्ये निर्माण व्हावे. अन्याय व अत्याचारविरूद्ध ठामपणे उभे राहण्याची प्रेरणा त्यांच्याठायी निर्माण व्हावी यासाठी कार्य करण्याचे उद्दीष्ट सत्यशोधक समाजाचे होते.

सत्यशोधक समाजाला बहुजन समाजापासून फार मोठा पाठींबा मिळाला.गावोगावी त्याच्या शाखा चालू झाल्या, तरी फार मोठ्या बुद्धीमंतांचा पाठींबा नव्हता. राजनिष्ठेने वागण्याच्या शपथेमुळे तर ती संस्था ब्रिटिश धार्जिणी  समजली गेली. तथापि तिची निर्मिती ही ऐतिहासिकदृष्ट्या एक फार महत्वाची गोष्ट होती. कारण या संस्थेचा संस्थापक हा एक साधा प्रामाणिक शेतकरी तत्वज्ञानी होता. त्याच्या कार्याच्या प्रेरणेचे स्थान ह्रदय होते. भाषा सर्वसामान्य जनतेची होती. अडाणी जनतेला चांगले शिक्षण मिळावे आणि त्यायोगे धर्म-अधर्म, न्याय-अन्याय, सत्य-असत्य काय हे त्यांचे त्यांनाच समजावे. अशी त्यांची अंत:प्रेरणा होती. त्याचे पांडित्य फार नव्हते. पण कार्यशक्ती व तळमळ फार मोठी होती.

कोल्हापूर येथील सत्यशोधक चळवळ :

पुण्यात म. फुले यांनी सत्यशोधक समाजाची सुरवात केली पण या चळवळीस प्रामुख्याने नंतरच्या काळात कोल्हापुरात आश्रय मिळाला,  वेदोक्त प्रकरणातून राजर्षी शाहू छत्रपतींच्या जीवनाला कलाटणी मिळाली. 1900 ते 1901 या दरम्यान वर्णवर्चस्वाच्या ब्राम्हणी अहंकाराचा जबरदस्त तडाखा शाहू छत्रपतींना वर्मी लागल्यावर 26 जुलै 1902 रोजी त्यानी आपल्या संस्थानात मागासलेल्या जातीसाठी नोकरीमध्ये 50 टक्के जागा राखून ठेवल्याचा आदेश काढून प्रथमच समाजाच्या आर्थिक क्षेत्रात पूर्ण वर्चस्व असणा-या वर्गाविरुध्द जोरदार आवाज उठवला. आणि इथूनच छत्रपती शाहुंच्या बहुजन समाजाच्या कार्यास सुरवात झाली. ख-या अर्थाने 1911 नंतरच कोल्हापूरात सत्यशोधक चळवळ अधिक जोरदारपणे  सुरु झाली. प्रत्यक्ष कोल्हापूरात 1913 मध्ये भास्करराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. शाहू छत्रपतींनी वेदोक्त प्रकरणानंतर सत्यशोधक चळवळीला अधिक प्रोत्साहन आणि पाठींबा देण्यास सुरवात केली. राजर्षी शाहू महाराजांनी जोतीरावांच्या तत्वांचा पुरस्कार केल्यामुळे महाराष्ट्रामध्ये सत्यशोधक समाजाचा हा हा म्हणता प्रसार होवून तो ब्राम्हणांची खुदद पाळेमुळे खणून काढण्या इतका खंबीर बनू लागला. सत्यशोधक मतांची पत्रे निघू लागली. सत्यशोधक समाजाच्या प्रगतीचा इतिहास जर पहिला तर सत्यशोधक समाजाची खरी प्रगती, वाढ किंवा जनतेत त्याचा प्रसार हा त्याला शाहू महाराजांचा आश्रय मिळाल्यानंतरच झाल्याचे दिसून येते.

ब्राम्हणेत्तर चळवळ :

महाराष्ट्रात पूर्वापार स्थायिक झालेल्या जमातीचे आर्थिक व शैक्षणिक प्रगतीनुसार ब्राह्मण, प्रभू इत्यादी पुढारलेल्या ब्राम्हणेत्तर जाती मराठा, कुणबी, माळी, आगरी, भंडारी इ. ब्राम्हणेत्तर जाती आणि अस्पृश्य व इतर मागासलेल्या जमाती असे तीन विभाग पाडावे लागतात.  पहिल्या महायुद्धानंतर इंग्रजांकडून काही प्रमाणात राजकीय हक्क मिळतील या आशेने हिंदू लोकांच्या निरनिराळ्या जातीत स्पर्धा सुरु झाली. महाराष्ट्रात मराठे बहुसंख्य असल्याने राष्ट्रीय चळवळीत भाग घेण्यासाठी मराठ्यांना प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने महर्षी विठ्ठल रामजी शिंदे वगैरे पुढार्‍यांनी ‘मराठा राष्ट्रीय संघ’ या संस्थेची स्थापना केली. मात्र ब्राम्हणेतर व अस्पृश्य समाजाला एकत्र आणण्याचे त्यांचे स्वप्न साकार झाले नाही. त्यामुळे ब्राम्हणेतराच्यां स्वतंत्र राजकीय पक्षाची उभारणी ही कल्पना पुढे आली. राष्ट्रीय चळवळीचा वाढता प्रभाव व पहिल्या महायुद्धामध्ये बदललेली परिस्थिती लक्षात घेवून दि. 20 ऑगस्ट 1917 रोजी भारतमंत्री माँटेग्यू यांनी ब्रिटीश सरकारचे हिंदुस्थान विषयक धोरण जाहीर केले. ब्रिटिश साम्राज्याचा अविभाज्य घटक असलेल्या प्रातिनिधिक स्वायत सरकार स्थापन करण्याचा हेतू माँटेग्यू यांनी स्पष्ट केल्यामुळे राजकीय हालचालींना सुरवात झाली. यानंतर  सत्यशोधक चळवळीचे राजकीय चळवळीत रुपांतर होवून सत्यशोधक समाजाच्या सभासदांनी 1918 साली ‘ऑल इंडिया मराठा लीग’  व  ‘डेक्कन रयत सभा’ या संघटनांची स्थापना केली. या संघटनांनी मराठा व मागासवर्गीयासांठी राखीव जागा ठेवण्याची मागणी केली.  सत्यशोधक चळवळी सारख्या मुलतः धार्मिक व सामाजिक सुधारणेच्या चळवळीचे शाहू महाराजांच्या प्रेरणेने व पुढाकाराने ब्राम्हणेत्तर या मुख्यत: राजकीय चळवळीत रुपांतर झाल्यानंतर सर्व सत्यशोधक ब्राम्हणेत्तर चळवळीत सामील झाले आणि 12 डिसेंबर 1920 रोजी पुणे येथील ‘जेधे मॅन्शन’ येथे ब्राम्हणेत्तर संघाची स्थापना करण्यात आली. 

ब्राह्मणेत्तर वृत्तपत्रे आणि राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य :

कोल्हापुरात  ‘ज्ञानसागर’ नावाचे पत्र 1870 मध्ये निघाले. परंतु या पत्राचा मवाळपणा व सरकारी अधिकार्‍यांची मनधरणी यामुळे हे पत्र अल्पावधीतच बंद पडले. त्यामुळे आबासाहेब पारसनीस व शंकरशास्त्री गोखले यांनी ‘दक्षिण वृत्त’  नावाचे पत्र 1883 मध्ये सुरु केले. परंतु शंकरशास्त्री यांचे पारसनीस यांच्याशी जमेनासे झाले. त्यामुळे 1886 मध्ये ‘विद्याविलास’ हे मासिक सुरु करून नंतर ते दैनिक स्वरुपात चालू केले. प्रोफेसर विजापूरकरांच्या प्रभावाखालचे ‘समर्थ’ साप्ताहिक व शंकरशास्त्री गोखल्यांचे ‘विद्याविलास’ ही साप्ताहिके त्यांच्या वतीने छत्रपतींवर हल्ला चढवीत होती. सत्यशोधक समाजाचे मूळ ‘दीनबंधू’  पत्र बंद पडल्यावर वर्तमान पत्राशिवाय लोकजागृती होत नाही हे ओळखून भास्करराव जाधव यांनी 1901 मध्ये ‘मराठा दीनबंधू’  हे पत्र सुरु केले. याच साचातले भुजंगराव तु. गायकवाड यांनी 1907 मध्ये ‘विजयी मराठा’ हे पत्र काढले. शाहू महाराजांविरुद्ध होणाऱ्या प्रचाराला उत्तर देण्यासाठी काही सुशिक्षित ब्राम्हणेत्तर तरुणांनी नियतकालिके काढण्याचा प्रयत्न केला. यामध्ये बळवंत कृष्णाजी पिसाळ यांचे ‘विश्वबंधु’ व सुदर्शन यांचा उल्लेख करावा लागेल.

त्याचप्रमाणे शाहू विजय  (1898) लक्ष्मीकटाश (1899)  प्रगती  (1908) व ब्रह्मोदय (1902) इत्यादी पत्रांनी ही शाहू महाराजांच्या कार्यास उचलून धरले. म. फुल्यांना शुद्रातिशूद्रांच्या अन्यायाला वाचा फोडणारे वर्तमानपत्र असावे असे वाटत होते. तरी प्रत्यक्षात त्यांची हि कल्पना मूर्त स्वरुपात आणण्यात अनंत अडचणी होत्या. परंतु या अनंत अडचणीवर मात करून त्यांचे एक सहकारी कृष्णराव भालेकर यांनी जानेवारी 1877 पासून ‘दिनबंधू’ हे ब्राह्मणेत्तरांचे पहिले वर्तमानपत्र सुरु केले.

महाराष्ट्रातील ब्राम्हणेत्तर वृतपत्रे :

शाहू छत्रपती संस्थानिक असल्याने उघड उघड राजकीय चळवळ करणे आणि राजकारणात भाग घेणे त्यांना शक्य नव्हते. सत्तेमध्ये योग्य तो वाटा मिळावा म्हणून सुरु झालेल्या ब्राम्हणेतर चळवळीसारख्या राजकीय चळवळीची सूत्रे पडद्याआडून हलविण्याचे काम ते करीत होते. महाराष्ट्रातील वृतपत्रे तेंव्हा ब्राम्हणांच्या मालकीची होती. छत्रपतींच्या कारभारावर ब्राम्हणी वृतपत्रे तुटून पडत असत. अशा परिस्थितीत ब्राम्हणेत्तरांच्या मालकीची आणि संपादकत्वाखाली चालणारी वृतपत्रे ठिकठिकाणी निघणे ही काळाची गरज होती. ब्राम्हणेत्तर चळवळीचे लोण खेड्यापाड्यापर्यंत पोचवण्यासाठी वृत्तपत्रासारख्या माध्यमाचा उपयोग करणे आवश्यक आहे हे जाणून शाहू छत्रपतीनी 1917 पासून 1922 पर्यतच्या काळात ठिकठिकाणी काढण्यात व चालवण्यात येणार्‍या ब्राम्हणेत्तर वृत्तपत्रांना आधार दिला असल्याचे दिसते. टिळकांवर टीका करणार्‍या ‘सुधारक’  किंवा ‘संदेश’ सारख्या ब्राम्हणी वृत्तपत्रांनाही आर्थिक सहाय्य करण्याची त्यांची तयारी असे.

प्रामुख्याने राजर्षी शाहूंच्या काळात ब्राम्हणेतरांना वृत्तपत्र चालवणे अवघड असे, कारण ब्राम्हणेतरांमध्ये शिक्षणाचा प्रसार फार कमी होता. त्यावेळी अशा पत्रांना म्हणावा तेवढा वर्गणीदार मिळत नसल्यामुळे त्यांचा खप कमी असे. त्यामुळे पदरमोड करून प्रसंगी कर्ज काढून वृत्तपत्र चालवावे लागत होते. तरी सुद्धा काही धडाडीच्या ब्राम्हणेतर कार्यकर्त्यांनी बहुजन समाजाचे कार्य नेटाने चालवण्याकरिता काही वृत्तपत्रे चालवली होती. 1910 च्या अखेरीस मुकुंदराव पाटलांनी सोमठाणे या खेड्यात सुरु केलेले ‘दीनमित्र’ हे साप्ताहिक 1917 पर्यंत सत्यशोधक चळवळीची बाजू एकाकीपणाने मांडत होते. 19 जुलै, 1917 रोजी पुण्यात वालचंद रामचंद्र कोठारींनी ‘जागरूक’ हे पत्र ब्राम्हणेतर चळवळीच्या प्रचारासाठी सुरु केले. ऑक्टोंबर 1917 मध्ये बडोद्याला भगवंत पाळेकरांनी कोणाही संस्थानिकाचा आधार न घेता आणि पैशाचे पाठबळ नसताना स्वतःच्या हिमतीवर ‘जागृती’ हे साप्ताहिक सुरु केले. 3 ऑक्टोंबर 1918 पासून पुण्यात लठठे व कोठारी यांनी ‘डेक्कन रयत’ नावाचे इंग्रजी साप्ताहिक सुरु केले. (ते फक्त एक वर्षभरच चालले.) कोल्हापुरातील बळवंत कृष्णा पिसाळ यांचे ‘विद्याबंधू’, दत्ताजीराव यशवंत कुरण्यांचे  ‘भगवा झेंडा’, दिनकरराव जवळकरांचे ‘तरुण मराठा’ आणि बाबुराव हैबतराव यादवांचे ‘गरीबांचा कैवारी’ ही वृत्तपत्रे शाहू छत्रपतींची कड घेवून जुन्या ब्राम्हणी वृत्तपत्रांशी टक्कर देत असत.

दत्तात्रय भिकाजी रणदिव्यांचे ‘संजीवन’, तासगांव येथून नारायण रामचंद्र विभूते चालवीत असलेल्या ‘सत्यप्रकाश’  9 मे 1921 रोजी बेळगावातून निघू लागलेले शामराव देसाई यांचे  ‘राष्ट्रवीर’  बेळगावचेच  ‘प्रगती  व  जनविजय’,  16 ऑक्टोंबर 1921 पासून केशवराव ठाकरे काढीत असलेले ‘प्रबोधन’ आणि केशवराव बागडे व कीर्तिवानराव निंबाळकरांचे ‘शिवछत्रपती’ ही सारी वृत्तपत्रे शाहू छत्रपतींची आणि ब्राम्हणेतर चळवळीची बाजू घेत असत. याखेरीज 31 जानेवारी 1920 ला मुंबईत सुरु झालेले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पांडुरंग नंदराम भटकर व ज्ञानदेव ध्रुवनाक घोलप यांनी संपादित केलेले ‘मूकनायक’ आणि गणेश आकाजी गवईचे नागपूरहून निघणारे  ‘बहिष्कृत भारत’ या अस्पृश मानल्या गेलेल्या लोकांच्या वृत्तपत्रांनाही शाहू छत्रपतींनी सहाय्य केले नसते तर ती निघालीही नसती.

- सुनिलकुमार सरनाईक

कोल्हापूर

भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२


(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित आहेत.) 


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget