Halloween Costume ideas 2015

कन्हैय्या आणि काँग्रेस


काँग्रेस नेत्यांना भाजपाची भीती वाटते त्यांना पक्षातून  बाहेर काढले गेले पाहिजे आणि पक्षाबाहेरच्या त्या नेत्यांना पक्षात आणले गेले पाहिजे ज्यांना भाजपाची भीती वाटत नाही. आम्हाला धाडसी नेत्यांची गरज आहे जे आमच्या विचारधारेमध्ये विश्वास ठेवतात. 16 जुलै 2021 रोजी राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या सोशल मीडिया सेल व्हॉलिंटियर्सच्या एका मेळाव्यात वरील उद्गार काढले होते. या उद्गारानंतर अलिकडेच काँग्रेस पक्षामध्ये कन्हैय्या कुमार यांचा झालेला प्रवेश लक्षणीय ठरला आहे. कन्हैय्या कुमार, जिग्नेश मेवाणी सारख्या दोन तरूण मागासवर्गीय नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित पक्षाच्या आरोग्याला शक्तीवर्धक ठरेल. मात्र त्यांच्या या प्रवेशाने काँग्रेसला उर्जित अवस्था मिळेल का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्याच्यावर चर्चा होणे गरजेचे आहे. म्हणूनच या आठवड्यात हा विषय चर्चे साठी निवडला आहे. 

कन्हैय्या कुमार राजकारणामध्ये यशस्वी होण्यासाठी सर्वात मोठा गुण म्हणून भाषण कलेकडे पाहिले जाते. या एकाच गुणाच्या बळावर अटल बिहारी वाजपेयी यांनी भाजपाचे राजकारण अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा जीवंत ठेवले होते. काँग्रेसमध्ये एकेकाळी विलासराव देशमुखांपासून माधवराव सिंधीया पर्यंत भाषणामध्ये पारंगत असलेल्या नेत्यांची एक मोठी फळी होती. अलिकडे प्रभावशालीपणे बोलणाऱ्यांची संख्या काँग्रेसमध्ये नाही. कन्हैय्या कुमार बोलण्यामध्येच नव्हे तर प्रसारमाध्यमांना हाताळण्यामध्येही त्यांच्या समकालीन नेत्यांमध्ये सर्वात पुढे आहेत. संदीप पात्रा सारख्या वाचाळ प्रव्नत्याला निरूत्तर करणारा त्यांचा वादविवाद  आजही युट्यूबवर उपलब्ध आहे. कन्हैय्याकुमारने आपल्या अंगभूत भाषणकला आणि तर्कशक्तीच्या आधारे भल्याभल्यांना नामोहरम करत  कुठलीही फारशी राजकीय कुमक नसतांना राष्ट्रीय पातळीवर स्वतःला प्रस्थापित केलेले आहे, यात शंका नाही. ’’काँग्रेसला जीवंत ठेवावे लागेल’’ या उद्गारासह काँग्रेसचे महत्त्व विशद करत त्यांनी आपली पहिलीच प्रेस कॉन्फरन्स अत्यंत संयतरित्या हाताळत सर्वांवर छाप सोडलेली आहे. म्हणूनच कन्हैय्याकुमार यांच्या प्रवेशानंतरची काँग्रेस कशी असेल याचा अंदाज लावण्यास सुरूवात झालेली आहे. आजमितीला काँग्रेसकडे नवज्योतसिंग सिद्धु वगळता जनतेवर मोहिनी घालणारा कुठलाही वक्ता नाही. राहूल गांधी यांच्या भाषण मर्यादा स्पष्ट झालेल्या आहेत. अशा वेळेस कन्हैय्याकुमारच्या प्रवेशाने पक्षाला एक राष्ट्रीय पातळीवर ओळख असणारा प्रभावशाली वक्ता मिळालेला आहे, एवढे निश्चित. 

वास्तविक पाहता भारतीय कम्युनिस्ट पक्षाने कन्हैय्या कुमारला सांभाळले, मोठे केले, पण भाकपचा स्वतःचा प्रभाव अंकुंचन पावत असल्यामुळे राष्ट्रीय पातळीवर भरारी घेण्यासाठी सज्ज असलेल्या आपल्या या युवा नेत्यास आवश्यक तेवढा अवकाश आपण उपलब्ध करून देऊ शकत नाही, हे भाकपला आणि आपल्याला भाकपमध्ये भविष्य नाही हे कन्हैय्या कुमार यांना कळून चुकले होते. त्यामुळेच कन्हैय्याकुमारच्या काँग्रेस प्रवेशानंतर भाकपमध्ये फारशी आदळआपट झाली नाही. स्वतःचा वैयक्तिक लाभ डोळ्यासमोर ठेवून संसदेमधील आपला मार्ग सुकर करण्याच्या आकांक्षेतून कन्हैय्याकुमार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे, यात वाद नाही. 

आपल्या प्रत्येक सभेची सुरूवात लाल सलामने करणारे कन्हैय्याकुमार आता काँग्रेसचे नेते झालेले आहे. त्यांचे फायरब्रँड बोलणे हीच त्यांची सर्वात मोठी शक्ती आहे. त्यांची राष्ट्रीय मुद्यांची समज इतकी जबरदस्त आहे की कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसतांना त्यांची तुलना सरळ पंतप्रधान मोदींशी केली जावू लागली होती; हा इतिहास जुना नाही. 

सीएए-एनआरसी विरूद्ध राष्ट्रव्यापी आंदोलनामध्ये राष्ट्रीय म्हणविल्या जाणाऱ्या काँग्रेसनेही उतरण्याचे धाडस केले नव्हते तेव्हा कन्हैय्याकुमार यांनी सीएएच्या विरोधात एक मोठे जनआंदोलन बिहारमध्ये स्वबळावर उभे केले होते. पूर्नियामध्ये तर झालेल्या त्यांच्या सभेला एक लाखापेक्षा जास्त लोक हजर होते. खरा नेता तोच असतो जो जनमताची नाडी ओळखून आंदोलनामध्ये उतरतो. सीएएमुळे उद्वेलित झालेल्या जनतेची नाडी ओळखून परिणामांची पर्वा न करता कन्हैय्याकुमार यांनी त्या आंदोलनात उडी घेतली आणि बघता-बघता राष्ट्रीय झाले. जेएनयूमधील एक विद्यार्थी नेता अल्पावधीतच राष्ट्रीय नेता कसा बनू शकतो याचे एकमेवाद्वितीय उदाहरण कन्हैय्या कुमारच्या स्वरूपाने तरूण पिढीसमोर आहे. 

काँग्रेसची अंतर्गत परिस्थिती

कन्हैय्याकुमार आणि जिग्नेश मेवाणी तरूण असले, भाषण कलेत पारंगत असले, त्यांचा जनतेवर मोठा प्रभाव जरी असला तरी काँग्रेसला गतवैभवापर्यंत नेण्यास ते यशस्वी ठरतील असे समजणे धाडसाचे ठरेल. कारण जो पक्ष राष्ट्रीय जरी असला तरी त्या पक्षाला स्वतःचा पक्षाध्यक्ष सुद्धा निवडता येत नाही ही भीषण वास्तविकता आहे. यावरून या पक्षाच्या राजकीय आरोग्याचा अंदाज येतो. राजकारणामध्ये कधी काय होईल हे जरी निश्चितपणे सांगता येत नसले तरी काँग्रेसचे दुखणे इतके विकोपाला गेलेले आहे की, डॉ. कन्हैय्या कुमार त्याच्यावर यशस्वी उपचार करू शकतील, याची शक्यता कमीच आहे. कन्हैय्या कुमार यांच्यावर कुठलेही भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत, सांप्रदायिकतेचा कुठलाही डाग त्यांच्यावर लागलेला नाही, ही त्यांची बलस्थाने जरी असली तरी स्वतःसोनिया गांधी आणि राहूल गांधी यांच्यातील मतभेद कन्हैय्या कुमार यांना मोकळेपणे काम करू देतील, याची शक्यता कमीच आहे. शिवाय जुने काँग्रेसी नेते जे की अत्यंत सांप्रदायिक मानसिकतेचे आहेत ते एका मागासवर्गीय नेत्याला मागून येवून आपल्या पुढे जाऊ देतील, याची शक्यता देखील कमीच आहे. असे म्हटले जाते की, काँग्रेसला कुठलाही विरोधी पक्ष हरवू शकत नाही. काँग्रेसला फक्त काँग्रेसच हरवू शकते. काही अंशी हे खरे असल्याची साक्ष पक्षाच्या इतिहासावर नजर टाकली तरी लक्षात येते. कन्हैय्या कुमार यांचे पाय तेच नेते खेचतील यात शंका नाही. राज्यसभेमध्ये आयुष्य घालवून पक्षात मोठी प्रतीष्ठा प्राप्त केलेल्या नेत्यांनी दस्तुरखुद्द राहुल गांधी यांना त्यांच्या मनाप्रमाणे काम करू दिले नाही, ते कन्हैय्याकुमार यांना मोकळेपणे काम करू देतील, असे वाटत नाही. 

आज पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदरसिंग विरूद्ध नवज्योतसिंग सिद्धू, राजस्थानमध्ये अशोक गहलोत  विरूद्ध सचिन पायलट यांच्यातील राजकीय द्वंद्व किती टोकापर्यंत गेले आहेत हे अवघ्या देशाने पाहिलेले आहे. इतर काँग्रेसशासित राज्यातील नेत्यामधील रूसवे फुगवे ही पक्ष नेतृत्वाला आवरता-आवरता नाकी नऊ येत असल्याचेही दिसून येते. काँग्रेसचे सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे त्याचे शिर्षनेतृत्व कमकुवत आहे आणि पक्षात दूसरा कुठलाही असा नेता नाही जो या कमजोर नेतृत्वाला आव्हान देऊ शकेल. सोनिया गांधी नामधारी अध्यक्ष आहेत. 

राहूल गांधी आणि प्रियंका गांधी पक्षाध्यक्ष बनण्यास तयार नाहीत. एकंदर परिस्थिती अशी आहे, ज्या राज्यात काँग्रेस कमकुवत आहे त्या राज्यात काँग्रेस नेतृत्व पक्षाला मजबुती प्रदान करू शकत नाही.  ज्या राज्यात काँग्रेस मजबूत आहे त्या ठिकाणी पक्ष कलह काँग्रेस नेतृत्व हाताळू शकत नाही आणि ज्या राज्यात भाजपा मजबूत आहे त्या ठिकाणी ती काँग्रेसला उभारी मिळू देत नाहीत. निवडणुका जिंकून देण्यामध्ये गांधी घराणे पहिल्यासारखे न राहिल्याने आपोआपच त्यांची पत घसरलेली आहे. येणेप्रमाणे काँग्रेसची चोही बाजूने कोंडी झाली आहे. अशा परिस्थितीत 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये हा पक्ष राष्ट्रीय स्तरावर निवडणुका जिंकून केंद्रात सत्तेत येईल, असे समजणे भाबडेपणाचे ठरेल. जो पक्ष स्वतःला पक्षाध्यक्ष देऊ शकत नाही तो देशाला पंतप्रधान कसा देऊ शकेल? 

सीएसडीएसचे अध्यक्ष अभय दुबे यांनी तर अशी शंका व्यक्त केलेली आहे की गांधी परिवार आणि भाजपच्या शिर्ष नेतृत्वामध्ये अशी सेटिंग झाली असावी की काँग्रेस नेतृत्व स्वतःच्या पक्षाला अशाच जर्जर अवस्थेत ठेवेल बदल्यात भाजपा नेतृत्वाने गांधी परिवाराला व्यक्तीगतरित्या कुठलेही नुकसान पोहोचवू नये.  ही शंका खरी असावी असे वाटण्याचे एक कारण रॉबर्ट वाड्रा यांना मिळालेले अभयसुद्धा आहे. 2014 पूर्वी भाजपाने रॉबर्ट वाड्रांच्या भ्रष्टाचारासंबंधी जे रान उठवले होते आणि पुराव्यानिशी माध्यमांमध्ये त्यांच्याविरूद्ध जी मोहीम सुरू केली होती ती 2014 नंतर अचानक अंतार्धन पावली व रॉबर्ट वाड्रांना अभय दिले गेले.  त्यांच्याविरूद्ध कुठलीही कायदेशीर कारवाई झाली नाही. अशी सेटिंग नसेल तर काय कारण आहे की पक्षाचे एवढे नुकसान सहन करूनही गांधी परिवार नेतृत्व सोडतही नाही आणि पक्षाची पुनर्बांधणीही करत नाही. जी-23 यांच्या मागण्या मान्य करत नाही. पुलाखालून प्रचंड पाणी वाहून गेल्यानंतर आता कुठे जी-23 नेत्यांची जुनी मागणी मान्य करून पक्ष नेतृत्वाने पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित केली असल्याचे समजले आहे. 

राहूल गांधी फक्त ट्विटरवर सक्रीय असतात. प्रियंका गांधी उत्तर प्रदेशाच्या प्रभारी असूनही, चार महिन्यावर विधानसभा निवडणुका आल्या असतांनासुद्धा उत्तर प्रदेशामध्ये पक्ष बांधणीसाठी पुरेसा वेळ देत नाहीत. उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांनीच या संबंधीची नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यांच्यापेक्षा जास्त सक्रीय तर वरूण गांधी आहेत. गांधी जयंतीच्या दिवशी गोडसेंच्या जयजयकाराचा विरोध काँग्रेसने नाही तर वरूण गांधी यांनी केला. त्यांनी किसान आंदोलनाला राहूल गांधी पेक्षाही आधी पाठिंबा दिला आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. राहूल गांधी आणि प्रियंका गांधी ही जोडी लखीमपूर खिरीच्या घटनेनंतर रस्त्यावर उतरली. पोलिसांचा विरोध धुडकावून हे दोघेही मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना जाऊन भेटून आले. परंतु त्यापूर्वी आसामच्या दरांग जिल्ह्यात पोलिसांनी गोळीबार करून मारलेल्या दोन मुस्लिम व्यक्ती आणि त्यांच्यापैकी एकाच्या प्रेतावर उड्या मारलेल्या फोटोग्राफरची घटना अंतरराष्ट्रीय पातळीवर गाजूनही त्यांच्या कुटुंबियांना भेटण्याची गरज राहूल गांधी यांना वाटली नाही. त्याचे काय कारण आहे याचे स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. काँग्रेस नेतृत्वाचा हा ढोंगीपणा अल्पसंख्यांकांसाठी नवीन नाही. 

कन्हैय्या कुमार यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसच्या  पेल्यामध्ये वादळ जरूर उठेल तरी परंतु पक्षाच्या मुलभूत संरचनेतच अनेक दोष असल्यामुळे कन्हैय्याकुमार यांना फारसा वाव नाही. काँग्रेसमधील सर्वात मोठा दोष हा की, पक्षात लोकशाही उरली नाही. पक्षातील शेवटचा निर्णय हा राहुल गांधी घेत असतात. परंतु ते पक्षाध्यक्ष नाहीत. 

निर्णय घ्यायचे पण अध्यक्षपदाची जबाबदारी घ्यायची नाही हा बेजबाबदारपणाचा कळस आहे. दूसरा सर्वात मोठा दोष पक्ष आपल्या धर्मनिरपेक्ष विचारधारेपासून कैक योजने दूर गेलेला आहे. खरे पाहता नेहरू आणि शास्त्रीनंतर पक्षातील धर्मनिरपेक्ष विचार मागे पडला आणि राजीव गांधी नंतर पक्षाने सौम्य हिंदुत्वाची कास धरली. 

80 टक्के बहुसंख्य मतदारांकडे दुर्लक्ष करून 20 टक्के अल्पसंख्यांक मतदारांचे लांगुलचालन करावे, असा मुर्खतापूर्ण विचार अल्पसंख्यांकांपैकी कोणीही करणार नाही. मुळात अल्पसंख्यांकांची समस्या ही आहे की, त्यांना विकास तर लांबच राहिला सुरक्षा देण्यात सुद्धा काँग्रेस पक्ष यशस्वी ठरला नाही. तेव्हा सुद्धा जेव्हा ते पूर्ण बहुमतानिशी केंद्र आणि राज्यांमध्ये सत्तेत होता. आजही काँग्रेसशासित राज्यात अल्पसंख्यांकांच्या कल्याणाचा विचार तर केलाच जात नाही उलट त्यांना सुरक्षाही पुरविली जात नाही, हे सत्य नाकारण्यासारखे नाही. काँग्रेसचा हा दुटप्पीपणा लक्षात यायला अल्पसंख्यांकांना उशीर जरी झाला असला तरी आता अल्पसंख्यांकांनी काँग्रेसला पुरते ओळखलेले आहे. त्यामुळे अल्पसंख्यांकांचा विश्वास जिंकण्याची पक्षाची क्षमताच लोप पावलेली आहे, असे वाटल्यास नवल ते काय? जुने काँग्रेसी नेते आणि नवीन काँग्रेसी नेते यांच्यातील प्रतीस्पर्धा सुद्धा टोकापर्यंत पोहोचलेली आहे. हा तिसरा दोष आहे. त्यावर अंकुश लावणे पक्षनेतृत्वाला जड जात आहे, हे सुद्धा एव्हाना लक्षात आलेले आहे.

एकंदरित कन्हैय्या कुमार आणि जिग्नेश मेवाणी यांच्या प्रवेशामुळे पक्ष गतवैभवाला प्राप्त करील याची शक्यता कमीच आहे. कन्हैय्या कुमार यांच्या प्रवेशानंतर सुद्धा दस्तुरखुद्द राहुल गांधी यांच्या वायनाड (केरळ) मधील मतदार संघातील एक ज्येष्ठ नेते जे 52 वर्षांपासून काँग्रेसमध्ये सक्रीय होते, पी.व्ही. बालचंद्र यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेली आहे व पक्ष सोडतांना त्यांनी पक्षाने दिशा गमविल्यामुळे आगामी निवडणुकीत केरळची जनता पक्षाच्या सोबत उभी राहणार नाही असे कारण देऊन  काँग्रेस सोडली आहे. हे एकच कारण पक्षाच्या दुर्दशेचे आकलन करण्यासाठी पुरेसे आहे. देशामध्ये राष्ट्रीय पातळीवर एका धर्मनिरपेक्ष पक्षाची व्हॅकेन्सी असतांना काँग्रेस त्या व्हॅकेन्सीचा लाभ उठवू शकत नाही, हे भारतीय लोकशाहीचे खरे दुर्दैव आहे. 

- एम.आय.शेख


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget