Halloween Costume ideas 2015

धर्माने मला हिंमत आणि निर्भयता दिली आहे!


खरं तर एवढा खासगी नाजूक प्रश्न, या आधी कुणी विचारला नव्हता आणि मलाही कधी पडला नव्हता. कारण धर्म, वंश, जात, रंग आणि देश यांसारख्या अत्यंत महत्त्वपूर्ण बाबी माणसाला विनासायास जन्मतःच मिळत असतात. त्यामुळे त्याचे आपल्याला फारसे मोल वाटत नाही. तसेच या बाबींपैकी कोणत्या बाबी कोणाला मिळाव्यात हे कुणाच्याच हाती नसते. मग कोणाच्या हाती असते, असा प्रश्न सहज आपल्या मनात निर्माण होतो. या प्रश्नाचे उत्तर भारतीय मातीत जन्मलेला कोणताही माणूस ‘परमेश्वर’ असेच देणार आहे. मी माझ्या समाजात अथवा प्रार्थनेसाठी मशिदीत जातो तेव्हा एक वाक्य कुठून तरी कसे तरी कानांवर पडतच असते. ‘करने कराने वाली जात सिर्फ एक अल्लाह की है।’ ईश्वर निर्माता आहे. माणूस त्याची सर्वोत्तम निर्मिती आहे. विज्ञान सांगते की विश्वनिर्मिती निरुद्देश आहे. पण इस्लाम म्हणतो की माणसाने ईशभक्ती करावी म्हणून ही विश्वनिर्मिती करण्यात आलेली आहे. म्हणून दुबळ्या, अज्ञानी, संकुचित मनाच्या उतावीळ माणसाने आपल्या सैतानासम षड्‌विकारांशी झुंजत ईश्वराची एकमेवता, अदृश्यता, ईशग्रंथ, सर्व प्रेषित, सर्व देवदूत आणि अंतिम न्यायदिनावर विश्वास ठेवून ईश्वराची भक्ती करावी. माणसाच्या जगण्याचे ध्येय या अत्यंत अल्पकालीन दुनियेत जास्तीतजास्त सत्कर्मे करून कायमस्वरूपी जगात प्रवेश करण्याचेच असावे. ईशग्रंथ कुरआनमध्ये अल्लाहने सारेच सविस्तरपणे स्पष्ट करून माणसाला स्वातंत्र्य देऊन टाकलेले आहे की, ‘भक्तिमार्गाने गेलास तर स्वर्ग मिळेल अन्‌ नास्तिक झालास तर नरकात जाशील.’ यावर माझा अढळ विश्वास असणे म्हणजे माझा इस्लाममध्ये प्रवेश करणे आहे.

मी काही रीतसर धर्मशिक्षण घेतलेला माणूस नाहीय. माझ्या गावात तशी सोयही नव्हती. दहावीनंतर काम करून शिकावे लागल्याने मला तशी उसंतच मिळाली नाही. शिक्षणानंतर पुन्हा खेड्यातच नोकरी लागल्याने मी दारिद्र्यनिर्मूलनात, लेखन आणि वाचनात गुंतून पडल्याने माझे धर्मशिक्षण तसेच रेंगाळत राहिले. याशिवाय आधुनिक शिक्षणाचे वारेही डोक्यात शिरलेले होते. तसेच तेव्हा केवळ नावाचे मुसलमान असणाऱ्यांचीच संख्या जास्त होती. इस्लामपासून अनभिज्ञ असणारे सर्वाधिक मुसलमानच आहेत, असे मानवेंद्र रॉय यांनी म्हटलेले आहे ते खरे आहे. कारण घरीदारी, समाजात वावरताना जेवढे कळायचे तेवढ्यावर सामान्यांचे भागायचे. मीही सामान्य असल्याने माझेही धकून गेले. पण जेव्हा मुसलमान समाजाविषयी लिहायची वेळ आली तेव्हा माझ्या लेखनाचे घोडे अडून बसले. तेव्हा मी माझा धर्म समजून घेण्यासाठी पुरोगामी आणि सनातनी मुसलमानांच्या मराठी लेखनाबरोबर संघ परिवारातील मंडळींचेही इस्लामविषयक लेखन वाचून काढले. निवृत्तीनंतर वयाची गाडी उताराला लागल्याने माझे नेत्र पैलतीरी लागले आणि वेळही भरपूर असल्याने अनुवादित कुरआन, पैगंबरचरित्र आणि हदिस यांचे वाचन वाढले. तरी मी इस्लाम कळल्याचा दावा करणार नाही. जेवढे माझ्या पदरी पडलेले आहे तेवढ्यावरून माझ्या जाणिवा आणि नेणिवांना साक्षी ठेवून प्रस्तुत प्रश्नाचे उत्तर लिहीत आहे.

‘दहशतवाद’ म्हणजे गरिबांनी पुकारलेली लढाई, तर युद्ध म्हणजे ‘श्रीमंतांचा दहशतवाद’. नोबेल विजेता सर पिटर यांच्या या विधानाची आणि ‘इराक बेचिराख का झाला?’ या प्रश्नाची उकल केली तर हाताशी उच्च तंत्रज्ञानाची सभ्यता येते. या सभ्येतेने सर्वत्र दहशतवाद, सामाजिक भेदाभेद, हत्या, व्यभिचार आणि मद्यपान इत्यादींच्या सर्व सीमा ओलांडलेल्या आहेत. ही उच्च तंत्रज्ञानाची सभ्यता स्वतःच्याच नाशाला निमंत्रण देत आहे. तर दुसरीकडे मानवी कल्याणासाठी जन्माला आलेल्या धर्माला आणि विज्ञानाला छद्म धर्माचे व छद्म विज्ञानाचे रूप देण्याचे काम अहंकारी, दांभिक, संकुचित धर्म-अज्ञानी माणूसच करीत आहे. म्हणजे माणूसच दोन्हींकडून स्वतःच्याच अस्तित्वावर गदा आणत आहे. या पार्श्वभूमीवर माझ्या धर्माने मला काय दिले ते शोधावयाचे आहे.

इस्लाम म्हणजे शांती, इस्लाम म्हणजे पूर्ण शरणागती, इस्लाम म्हणजे नैतिकता, इस्लाम म्हणजे इमान-अढळ विश्वास, इस्लाम म्हणजे एक जगण्याची आदर्श रीत, इस्लाम म्हणजे समता, बंधुभाव आणि न्याय असे अनेक अर्थ सांगितले जाऊ शकतात. पण मला स्वतःला इस्लाम म्हणजे कोणत्याही मध्यस्थाशिवाय ईश्वर, ईश्वरी ग्रंथ आणि प्रेषितचरित्रासह प्रेषित वचनांशी आत्मिक पातळीवर संवाद करणे आहे, असे वाटते. या संवादातून माणसाच्या विवेकाचे संयमाचे आणि बुद्धीचे पोषण होत जाते. यातून माणूस आपले वर्तन ठरवत असतो. या संवादातूनच माझ्या जीवनातील साऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. जर एखाद्या प्रश्नाचे उत्तर मिळत नसेल तर या संवादाला नजरेसमोर ठेवून मी माझ्या बुद्धीचा वापर करून स्थल-काल-परिस्थितीनुसार निर्णय घेऊ शकतो. या बुद्धिवादामुळे इस्लाममध्ये समृद्ध ज्ञानपरंपरा निर्माण झाली. पण ती परंपरा मध्यस्थांच्या पुरोहितशाहीने, बुद्धिवादावर-इज्तिहादवर बंदी घातल्याने खुरटत गेली. नंतर ही ज्ञानपरंपरा भाषा, शैक्षणिक अभाव आणि भौगोलिक बदलांमुळे मागे पडत गेली. सर सय्यद, डॉ. इकबाल आणि मौलाना आझाद यांच्या स्थल-काल-परिस्थितीनुसार मांडलेल्या समाजहितकारक विचारांना मुस्लीम नेतृत्वाने नाकारून दुर्लक्षित ठेवले. द्विराष्ट्रवादातून निर्माण होणाऱ्या अलगाववादाला मुस्लीम नेतृत्वाने अनाठायी महत्त्व दिल्याने फाळणी झाली. फाळणीनंतरही इथे राहिलेल्या मुसलमानांना फाळणीने अक्षरशः ‘रामभरोसे’ - वाऱ्यावर सोडून दिले. त्यामुळे इस्लामचे संवादस्वरूप लोप पावून त्याला हट्टाग्रहाचे स्वरूप प्राप्त झाले. आणि सारेच मुसळ केरात गेले. इस्लामच्या मूळ तत्त्वज्ञानात किंचितही नसलेल्या पुरोहितशाहीने एवढे अनर्थ करून ठेवलेले आहेत.

ईश्वर-ईशग्रंथ-प्रेषितचरित्र आणि प्रेषितवचने यांच्याशी होणाऱ्या रोजच्या संवादातून अल्लाहने मला नेहमीच असे सांगितलेले आहे की, सत्याने, इमानाने राहा. प्रार्थना कर, कुणाला फसवू नकोस, कुणाला लुबाडू नकोस, जकात देे. गरिबांना जेऊ घाल, कुणावर अन्याय करू नकोस. अन्याय कुठे होत असेल तर त्याला विरोध कर. खोटी साक्ष देऊ नको. अराजक माजवू नकोस. प्रार्थना कर, व्यभिचाराकडे फिरकू नकोस, मद्यपान करू नको, बंधुभावाने राहा. अधिक असलेले गरजूंना दे. फिजूल खर्च करू नकोस. व्याज घेऊ नको. चूक झाली तर क्षमायाचना कर. गुलामाला मुक्त करून, अन्नदान करून अथवा उपवास करून प्रायश्चित्त घे. पुन्हा तीच चूक करू नकोस. ईश्वर सर्वत्र आहे. तू ईश्वराच्या उपस्थितीत हे अत्यंत अल्पकालीन नश्वर जीवन जगत आहेस. त्याला शोभेल असे सदाचाराने जगून कायमस्वरूपी अमर जीवनाची शिदोरी गोळा करीत राहा. ईश्वराच्या या काही माफक अपेक्षा मी, मला त्याने जन्माला घातल्याच्या बदल्यात पुरेपूर पूर्ण करू शकत नाही. काही पूर्ण करतो तर काही अर्धवट करतो, तर कांहीना पूर्ण फाटा देतो. बहाणे करतो, निमित्तेे शोधत माफीची याचना करतो. हे सगळे माझ्या आत्मिक पातळीवर चालत असते. ‘दाखवेगिरी’ करायची नाही. माफीचा साक्षीदार होऊन साधेपणाने जगत राहायचे. स्वतःच्या चुकांमुळे स्वतःचे मन स्वतःलाच खाऊ लागले की, प्रायश्चित्त घेऊन त्या आतल्या आवाजाला शांत करायचे आणि मग स्वतःच्या अंतिम कल्याणाची दुआ मागत राहावयाची. कारण ‘करने करानेवाली जात फक्त एकमेव अल्लाहची आहे.’ अशा संवादामुळे मला माझ्या जीवनातील अमर्याद दुःखदर्द सहन करता येतात. माझ्या धर्माने मला असा संवाद दिलेला आहे. मानवी कल्याणासाठी निर्माण झालेल्या धर्माला जेव्हा संस्थात्मक रूप येऊ लागते तेव्हा तो पुरोहित आणि वर्चस्ववादी वंशश्रेष्ठांच्या स्वार्थानुसार बदलत जातो. सोय म्हणून कुठली तरी रीत, पद्धत स्वीकारली जाते. मग या बदलांचीच परंपरा होऊन बसते. इस्लामध्ये जाती नसताना जाती मानल्या जाऊ लागतात. वर्ण, वर्ग निर्माण होऊन भेदभाव, उच्चनीच भाव मानला जाऊ लागतो. त्यामुळे इस्लामने जो इतरांच्या मार्गदर्शनासाठी आदर्शवत माणूस निर्माण केला होता तो आदर्शहीन होत जातो. अशा वर्चस्ववादी अनुयायांमुळे इस्लाम बदनाम होत गेलेला आहे. तरीही इस्लामने मला अन्‌ माझ्या समाजाला जगण्याची हिम्मत आणि निर्भयता दिलेली आहे.

आज इथे इस्लामी धार्मिक ओळख तोट्याचीच नव्हे तर जीवघेणी होऊन बसलेली आहे. राही मासूम रजा यांच्या एका आठवणीत असं आलं आहे की, लालकृष्ण अडवाणी एक दंगल झाली तर आपला देश सोडून भारतात आले. पण आम्ही मुसलमान हजारो दंगली झाल्या तरी कुठे जाण्याचा विचारसुद्धा करीत नाही. कारण हे जीवन तात्कालिक आणि नश्वर आहे. आज इथले मुसलमान पाकिस्तानी हेर, दहशतवादी, लव्हजिहादी, गोमांस बाळगणारे कवडीमोलाने मारले जात आहेत. तरीही ते कुठेही न जाता निवांतपणे दारिद्र्याची शिक्षा भोगत हिमतीने जगत आहेत. हातपाय न गाळता, गर्भगळीत न होता निर्भयतेने आपापली रोजीरोटी मिळवत जगत आहेत. मरायचे तर सगळ्यांनाच आहे. म्हणून मरेपर्यंत जगत राहायचे. फाशी न घेता, रेल्वेरुळाखाली न येता, विष अथवा विषारी कीडनाशके न पिता जगत राहायचे. ही हिंमत, ही निर्भयता इस्लामनेच दिलेली आहे. इथल्या मुसलमानांची स्थिती-गती अशी आहे की, पाणी प्यायला आलेल्या माकडाने उथळ प्रवाहात इकडून तिकडे अन्‌ तिकडून इकडे हुंदडणारे मासे पाण्यात पडून तळमळत आहेत असे समजून त्यांना वाचवण्यासाठी काठावरील वाळूवर एकेक पकडून फेकून दिले. मुसलमान समाजाच्या भोवतालचे पर्यावरण असे असतानादेखील ते इथे जगत आहेत, याचे मला राहून राहून नवल वाटते. 

त्यांच्या मनात ही जगण्यातील निर्भयता, हिंमत कोठून आली असणार आहे? ‘केवळ ईश्वराला भ्यायाचे, केवळ ईश्वरापुढे झुकायचे, केवळ ईश्वरापुढे नतमस्तक होऊन प्रार्थना करायची म्हणजे नमाज पढत राहायची. बाकी सारे ईश्वर बघून घेतो.’ या विश्वासापोटी म्हणजे इमानापोटी ही हिंमत, ही निर्भयता आलेली असावी असे मला वाटते.

अनुवादितच का असेना- कुरआनच्या वाचनाने माझ्या मनात असे झिरपले आहे की या विश्वाच्या पसाऱ्यात मला सर्वच बाबतींत अणूरेणूंहूनही कमी स्थान आहे. तरी पण ईश्वराने दिलेल्या बुद्धीच्या बळावर या विश्वातील ईश्वरी खाणाखुणा समजून घेऊ शकतो. ईश्वरी मार्गदर्शनानुसार सदाचरण करून गुणवंत होऊ शकतो. बाकी कर्ता करविता ईश्वर आहे. माझ्या हाती प्रयत्नांशिवाय काहीही नाही. मी आता आहे, पुढच्या क्षणी असणारही नाही. म्हणून मी भपकेबाजपणा करण्याच्या भानगडीत पडत नाही की कोणत्याही प्रकारची दाखवेगिरीही करीत नाही. प्रत्येक काम कमीतकमी खर्चात कसे बसेल याचाच विचारपूर्वक प्रयत्न करतो. साधे कपडे, साधे राहणे, साधा आहार घेणे मला आवडते. पैसे असले तरी वारेमाप खर्च मी कशावरदेखील केलेला नाही. माझ्या प्रेषितांच्या साध्या राहणीशी माझ्या साधेपणाची तुलना होऊच शकत नाही. कारण ठिगळं लावून कपडे आणि स्वतःच दुरुस्त केलेली वाहन वापरण्याची पाळी माझ्यावर कधी आली नाही. आयुष्यभर कधी मी चटईवर झोपलो नाही. जवळ असले नसलेले सर्व त्यांच्यासारखे गरजूंना वाटून, उपवास असतानाही उपाशीपोटी, अर्धपोटी मी कधी झोपलो नाही. रात्र रात्र मी कधी त्यांच्यासारखी प्रार्थनेत घालवली नाही. कुरआनचा तर असा आदेश आहे की, प्रेषितांच्या जगण्याचा आदर्श समोर ठेवून त्यांच्यासारखे जगावे. त्याच्याएवढे साधे राहणे मला शक्य झाले नाही. पण कमीतकमीत मी साधे राहण्याचा प्रयत्न तरी करू शकतो. माझ्या माहितीतल्या बऱ्याच मुस्लीम मित्रांनी नोकरी असतानादेखील, गरीब मुलींशी हुंडा न घेता केवळ चहावर लग्ने केलीत. इस्लामने सांगितलेला हा साधेपणा आहे. एवढा साधेपणा मला जमू शकला नाही. माझे शिक्षण चालू असतानाच मला आईचे कर्ज फेडण्यासाठी लग्नाआधीच हुंडा घेऊन लग्न ठरवावे लागलेले आहे. मला जमेल तेवढे, कुणालाच त्रास होणार नाही इतपत मला सहन होईपर्यंत मी साधेपणाचा अवलंब करीत आलो आहे. त्यामुळे कधी मला चैन करावीशी वाटली नाही. हा साधेपणा कधी कधी फुकटची चैन करण्याची संधी मिळाल्याने डागाळलेला आहे. पण ही चैन फारच अपवादात्मक असल्याने हा साधेपणा मला माझ्या धर्मातून मिळालेला आहे, असे म्हणायला काही हरकत नाहीय.

ईश्वरासाठी कुरआनचा विषय माणूस आहे. माणसासाठी शोषण करणारी समाजव्यवस्था बदलून गरिबालाही प्रतिष्ठा द्यायची आहे, तर माणसाला कुरआन स्वर्गाची आशा दाखवून, नरकाची भीती घालून सदाचरणी व्हायला सांगणारा ग्रंथ आहे. पैगंबरचरित्र तर टोकाच्या साधेपणाने भरलेले असून स्वर्गप्राप्तीसाठी कराव्या लागणाऱ्या नैतिक प्रयत्नांचा आदर्श आहे. चिंतनात मग्न असताना निरक्षर पैगंबरांना ईश्वराने जे ज्ञान दिले ते त्यांनी सर्व भोवतालच्या माणसांपर्यंत पोहोचविण्याचे अहोरात्र प्रयत्न केले. मानवी विकारांना जिंकत जिंकत नैतिकतेसह माणुसकीसह सततची प्रार्थना केली. तर क:पदार्थ असलेल्या माणसालाही कबीराच्या या म्हणण्याचे स्वरूप ‘प्रभू स्मरे हमारा नाम हम करे आराम’ प्राप्त होऊ शकते. अफाट दुःखांनी भरलेल्या या जीवनाला इस्लामिक संतांच्या समृद्ध वारशाने जगालाच एक काव्यात्मक दिलासा दिलेला आहे. त्याच्यानेच माझ्या अंतःकरणाची शुद्धी होऊन माझे मन निर्मळ होत जाते. सूफी एक वृत्ती आहे. ती कोणत्याही धर्माच्या माणसात असू शकते. ईश्वराखालोखाल या सूफींनी जगाला खूप खूप दिलेलं आहे. पण काय करावे? माझ्या मनाचा पदरच विकारांनी फाटलेला आहे. म्हणून तर आम्हांला कळत असूनही वळत नाही. जसे इस्लामने सूफींनी दिलेल्या समतेला धर्मांतरानंतरही आमच्यात राहिलेल्या जातिव्यवस्थेने खाऊन टाकले. त्यामुळे विषमता, भेदभाव, उच्चनीच भाव तसाच राहिला.

सूफींनी इस्लामला सर्वांत मोठी देणगी फिलॉसॉफीची दिलेली आहे, ज्याचे श्रेय इमाम गजालींना जाते. या फिलॉसॉफीमुळे इस्लाममध्ये जो एक रुक्षपणा होता तो दूर झाला. धर्मातील कर्मठपणा, कडकपणा लोण्यासारखा मऊ झाला. सूफींमुळेच तर इस्लाम जगभर दूरदूरपर्यंत जाऊन पोहोचला. सूफींची लोकोपयोगी सेवाकार्ये तर अनेक आहेत. सूफींच्या गाण्यांनी आणि इथल्या शास्त्रीय संगीतात सूफींनी घातलेल्या भरीमुळे तर इथल्या आध्यात्मिक, आत्मिक जगण्याची गोडी वाढलेली आहे. म्हणून मी म्हणतो आहे की धर्माने मला सूफींचा समृद्ध वारसा दिलेला आहे, माझ्या धर्माने आणि विज्ञानाने माझे जगणे सुसह्य झालेले असले तरी माझा पदर माझ्यातील षड्‌विकारांनी मळलेला असल्याने धर्माला पुढे करून धर्माच्या नावावर आणि वैज्ञानिक शोधांच्या दुरुपयोगाने माणसांनीच लाखो माणसे मारलेली आहेत, त्याचे कोण काय करणार आहे?

-फ. म. शहाजिंदे

लातूर, मो. 94243 76656


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget