Halloween Costume ideas 2015

धार्मिक विद्वेषाचा व्हायरस कोरोनापेक्षा धोकादायक!

सध्या सुरू असलेला कोरोनाचा प्रभाव पुढील काळात आपणा सर्वांना दिसून येईलच. मात्र आतापासूनच याचे दुष्परिणाम सामान्य माणसांच्या मानसिकतेवर झाल्याचे आढळून येते. गेल्या गुरुवारी म्हणजे १६ एप्रिल रोजी पालघर येथे गाडीने सुरतला चाललेल्या तीन व्यक्तींची जमावाद्वारे हत्या केली गेली. मृत व्यक्तींमध्ये गाडीचा ड्रायव्हर आणि दोन साधू सामील आहेत. लॉकडाऊनच्या काळात पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही चोर दरोडेखोर येतात आणि किडन्या काढून नेतात अशा अफवा नागरिकांमध्ये पसरत होत्या. याच अफवांमधून जमावाने तीन जणांची हत्या केल्याचे स्पष्टपणे पोलीस अहवालामध्ये म्हटले आहे. अशा तNहेने अफवा पसरवून जमावाद्वारे हत्या घडविणे हा कदाचित पूर्वनियोजित कट असावा, असे अनेक विश्लेषकांनी मत व्यक्त केले आहे. या घटनेमध्ये सामील प्रत्येक व्यक्तीला कायद्याद्वारे कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे! परंतु पुन्हा एकदा झालेल्या या मॉब लिंचिंगच्या घटनेमुळे देशामध्ये सतत दिसून येणारी 'जमावाची' मानसिकता आणि या घटनेनंतर चाललेले धर्माचे राजकारण हे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत. पोलिसांच्या उपस्थितीमध्ये पुन्हा हल्ला करत जमावाने ही हत्या केली! यामध्ये पोलीस यंत्रणेचे अपयश, अकार्यक्षमपणा दिसून येतो, त्याचप्रमाणे राज्यातील प्रशासकीय यंत्रणा जनतेचे संरक्षण करण्यात अपयशी ठरली आहे हे निश्चित! अशामध्ये मॉब लिंचिंगच्या बहाण्याने समाजात विष पसरवणाऱ्या टोळ्या पुन्हा सक्रीय झाल्या असल्याचे दिसून येते. अशा घटनांचे निमित्त करून राजकारणाच्या पोळ्या भाजत सत्ता सोपानापर्यंत जाण्याची तयारी चालली आहे. जमावाद्वारे हत्यांना योग्य ठरवणारे, दंगलींच्या आगीत राजकारण करणारेच लोक आता या घटनेवर मगरीचे अश्रू ढाळत आहेत. त्यांना आता उदार, प्रगतीशील लोकांकडून उत्तर हवे आहे. राज्यासमोर कोरोनाचे संकट उभे ठाकले असताना असले विकृत राजकारण का केले जात आहे?  यापूर्वी मुलीवर बलात्कार करून तिच्यासह तिच्या बापाला मारले गेले. कित्येक दलितांना निघृणपणे मारले गेले. कोरोनाच्या काळात सर्व धर्मीय कोट्यवधी गरीब, कष्टकरी, कामगारांवर कोसळलेल्या संकटाच्या पहाडाकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून अशा प्रकारच्या घटनांचे निमित्त बनविले जात आहे जेणेकरून पुन्हा एकदा जनतेने हिंदू-मुस्लिम तणावात गुरफटून जावे आणि कोरोनाच्या संकटात सरकारचे अपयश झाकले जावे. कोरोनापेक्षा धोकादायक अशा या धार्मिक विद्वेषाच्या व्हायरस पासून सावधान!  आतापर्यंत जमावाला भडकावणाऱ्या लोकांना किंवा मारणाऱ्या लोकांना फुलांचे हार घालून सन्मानित केले जात होते, त्यांना पैसा आणि वकील पुरवले जायचे, त्यांना 'धर्मरक्षक'सारख्या उपाध्या दिल्या जायच्या हे आपण पाहिलेच आहे. त्यामुळे मॉब लिंचिंगच्या घटनांमध्ये वाढच होईल!  मॉब लिंचिंग करणाऱ्यांना डोक्यावर चढवले गेले. दररोज अंधविश्वास, धर्मवादाचा विषारी कचरा आणि वेगवेगळ्या अफवा पसरवून लोकांना विवेकशून्य रोबोट्समध्ये बदलवण्याचे काम सुरू आहे. पालघरच्या घटनेमध्ये सांप्रदायिक शक्तींनी आणि असामाजिक तत्त्वांनी अफवा पसरवण्यात कसर सोडलेली नाही. असे लोक समाजासाठी अत्यंत धोकादायक असतात. त्यापासून सर्वांनी सावध राहिले पाहिजे. जमावाद्वारे हिंसेच्या घटना भाजप शासनामध्ये सामान्य गोष्ट बनली आहे. गेल्या ६ वर्षांमध्ये मोहम्मद अखलाक, पहलू खान, इन्सपेक्टर सुबोध कुमार, मधू, तबरेज अंसारी सहीत शेकडो लोक जमावाद्वारे मारले गेले आहेत. फक्त गायीच्या नावानेच २०१२ नंतर मॉब लिंचिंगच्या ८८ घटना झाल्या आहेत, ज्यापैकी ८६ भाजप शासनात झाल्या आहेत. झुंडीच्या या मानसिकतेला थांबवले गेलेच पाहिजे! कायदा, न्याय आणि लोकशाही मूल्यांची रुजवण जिथे कमी आहे अशा देशामध्ये जात-धर्म-चोरी अशा कोणत्याही निमित्ताने लोकांच्या भावना भडकावल्या जातात आणि कायदा हातात घेऊन झुंडीला वाटू लागते की ‘थेट न्याय' करण्याच्या मार्गानेच आता गेले पाहिजे. प्रश्नांच्या मुळाशी न जाता तडकाफडकी न्यायाची ही कल्पना झुंडशाहीकडेच नेते. लक्षात ठेवले पाहिजे की विद्वेष आणि झुंडशाहीने कधीही कोणतेही परिवर्तन होत नाही! लोकांच्या मनातील भीतीमुळे संवेदना, सहानुभूती आणि सामाजिक सौहार्द यासारख्या मूलभूत मूल्यांचे पतन होत चालले आहे. भीतीच्या वातावरणात सामाजिक विद्वेषाचा व्यापक आणि दृढ परिणाम समाज आणि लोकांवर पडेल. भीतीची मानसिकता अनंत काळापर्यंत जीवनशैली आणि सामाजिक व मानसिक आरोग्यावर अतिशय परिणामकारक ठरू शकते. हिंसाचार जेव्हा शिगेला पोहोचतो तेव्हा संपूर्ण समाजाबरोबरच देशाचे नुकसान होते. मानवतेच्या मूळ भावनेला अतिश गंभीर आघात पोहोचतो. अफवांना बळी पडलेले लोकांच्या मनात असुरक्षिततेची भावना रुजते आणि त्याचा उद्रेक होऊन शांतीप्रिय समाजाचे फार मोठे नुकसान होते. त्यामुळे या अफवांवर विश्वास न ठेवता आपसातील सद्भावना वाढविण्याचे कार्य निरंतर सुरू ठेवण्याची आवश्यकता आहे. सांप्रदायिक सौहाद वाढविण्याच्या दृष्टिकोनातून विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले पाहिजे. सामाजिक ऐक्य टिकविण्याच्या दृष्टीने पावले उचलली पाहिजेत.

 -शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget