Halloween Costume ideas 2015

गरजूंच्या सेवेसाठी संस्था, संघटना सरसावल्या

लातूर (प्रतिनिधी)
कोरोनामुळे देश लॉकडाऊन करण्याची परिस्थिती ओढावली. त्यामुळे पूर्ण देशात कामगार, मजूर, शोषितांचे हाल सुरू आहेत. ज्यांचे हातावर पोट आहे, अश्यांना जगण्याची भ्रांत आहे. दिवसेंदिवस लॉकडाऊनची स्थिती कडक होत असल्याने सामान्य नागरिकांची घरप्रपंच चालविण्याची चिंता वाढत आहे. सरकारने उपाययोजनांची घोषणा केली असली तरी अद्यापही त्याची पूर्णतः अंमलबजावणी होत असल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे माणुसकीची जाण ठेवत राज्यभरातील विविध सामाजिक, धार्मिक, संस्था, संघटना, जमात तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी  गरीबांना अन्नधान्य, जेवणाचे डबे वाटपाला सुरूवात केली आहे. त्यामुळे कोरोनाच्या महाभयंकर महामारीतही माणुसकी जीवंत असल्याचे दिसून येत आहे.
    लातुरात जमाअते इस्लामी हिंद लातूरने जवळपास 350 अधिक लोकांना घरपोच राशन किट वाटप केले असून हे काम अजून सुरूच आहे. या किटमध्ये तूर दाळ, मसूर दाळ, साखर, पोहा, मिर्ची, जिरा, हळद, चहापत्ती, तेल पाकिट, मीठ आदींचा समावेश होता. सर्फराज मणियार यांनी जवळपास 200 राशन किट वाटप केले. वसुंधरा प्रतिष्ठानने दररोज 50 पेक्षा अधिक गरजवंतांना डबे नेऊन दिले. तसेच माय फाऊंडेशन, मुस्तफा सय्यद मित्रमंडळ, आम्ही लातूरकरकडूनही जेवण, भाजीपाला, कीट गरजवंतांना देण्यात आले. ज्या भागात खरेच गरजवंत आहेत त्या भागातील नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत अन्नधान्य पोहोचते केले. दररोज खिचडी शिजवून गरवंतांना देण्यात आली. विविध सामाजिक संघटनांच्या या समाजोपयोगी कार्याचे सर्वस्तरातून कौतूक होत आहे.

नागपूर (डॉ. रशिद) - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केेलेल्या लॉकडाऊनमुळे गरीबांची चांगलीच होरपळ होत आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या दैनंदिन रोजीरोटीचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. तसेच त्यांच्या आरोग्यावरही लक्ष देणे गरजेचे आहे. गरजूंच्या सेवेसाठी मेडिकल सर्व्हीस सोसायटी ऑफ इंडिया व जमाअते इस्लामी हिंद नागपूरच्या वतीने 25 मार्चपासून जीवनावश्यक सामुग्री व मास्क देऊन जनजागृती करण्यात येत आहे.
    एमएसएसचे अध्यक्ष डॉ. नईम नियाजी म्हणाले, आम्ही 25 मार्चपासून गरीब परिवारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करीत आहोत. यामध्ये एका परिवाराला 1 महिना पुरेल एवढे अन्नसामुग्री देण्यात येत आहे. याबाबत शहरात फिरण्यासाठी आवश्यक असलेला परवानाही पोलीस विभागाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे गरीब नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस प्रशासनाचेही सहकार्य लाभत आहे. डॉ. नियाजी म्हणाले, गिट्टीखदान, सदर, मानकापूर आणि पाच पावली पोलीस स्टेशनच्या महिला आणि पुरूष कर्मचार्‍यांना 150 हँडग्लोस व मास्कचे वितरणही करण्यात आले. कोरोनामुळे केलेल्या लॉकडाऊनची झळ सर्वांनाच बसत आहे. परंतु, अशा बिकट परिस्थितीत एकमेकांना सहकार्य करणे गरजेचे आहे. जे गरजवंत आहेत, ज्यांचे हातावर पोट आहे, अशांना मदत करणे हे धनवंतांचे आद्य कर्तव्य आहे. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी सांगितले आहे की, जो व्यक्ती दुसर्‍यावर दया करत नाही त्याच्यावर अल्लाह सुद्धा दया करत नाही. त्यामुळे या विषाणूजन्य आजाराच्या काळात परिस्थितीशी झगडणार्‍यांना मदतीचा हात देणे हीच खरी समाजसेवा आणि ईश्‍वरसेवाही आहे. मागील काही दिवसांपासून आमच्या संघटनेने छपारा, सिवनी जाणार्‍या मजुरांना भोजन सामुग्री सहीत किटची व्यवस्था करून दिली. हे मजूर इंदौर चौकाच्या इंदौरबारा खोली येथे थांबे आहेत. आंबेडकर हॉस्पिटल जवळ जडी बुटी विकणारा परिवार सुद्धा हलाकीच्या परिस्थितीशी तोंड देत आहे. नागपूर उत्तरक्षेत्राच्या झोपडपट्टीत अनेक परिवारांना एक महिन्याचं राशन कीट देण्यात आले. नागपूर शहरातील जाफर नगर, टेका भागातही राशनचं वितरण सुरू आहे. या कामी डॉ. जुबैर शेख, डॉ. शगुफ्ता शेख, डॉ. सरफराज अहमद, डॉ. रियाज आमीर, शफिक अहमद काजी, फैसल मलिक, अब्दुल सईद, मोइन खान, शाहरूख अंसारी, अकील अहमद, मोईन सिद्दीकी परिश्रम घेत आहेत.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget