Halloween Costume ideas 2015

भारतीय मुसलमानांना मित्र आहेत का?

शिक्षणाचा हक्क हा भारतीय नागरीकांचा जगण्याचा मुलभूत हक्क आहे. भारतीय संविधानातील कलम 21 जगण्याच्या हक्काचाच तो भाग आहे. असे सर्वोच्च न्यायालयाने सन1993 साली म्हटलेले आहे. पण सन 2005 साली न्यायमूर्ति राजेंद्र सच्चर आयोग काय म्हणतो. मुस्लिमांतील साक्षरतेचे प्रमाण 59.9 टक्के आहे. हे प्रमाण हिंदूतील ओबीसी आणि दलितांपेक्षा जास्त आहे. मुसलमानांचे देशभरातीत नोकरीचे प्रमाण तर नगण्यच. राज्य सरकारच्या नोकरीत 5 टक्के. केंद्र सरकारच्या सार्वजनिक उद्योगात 3.3 टक्के. इंजिनिअर्स 2.5 टक्के, डॉक्टर्स 2.0 टक्के, आय.ए.एस. 2.8 टक्के, आय.पी.एस. 2.0 टक्के, देशाच्या स्वातंत्र्यानंतर केंद्र आणि महाराष्ट्र शासनाने वेगवेगळे आयोग, समित्या नेमल्या. सन 1984 साली गोपालसिंह समिती, सन1990 मंडल आयोग, सन 2005 साली सच्चर समिती, सन 2007 रंगनाथ मिश्रा आयोग, सन 2012 अल्पसंख्यांक आयोगाचा आर्थिक सामाजिक अभ्यासगट. सन 2013 महेमदूर रेहमान आयोग. हे त्यापैकी काही. मुसलमानांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक परिस्थितीचा अभ्यास अतिशय सविस्तर आणि तपशीलवार अनेक आयोगांनी केला आहे. विशेषतः सच्चर आयोग.
    या अभ्यासाबद्दल खूप काही लिहिता,बोलता येईल. पण थोडक्यात याचा निष्कर्ष एकाच वाक्यात असा करता येईल. भारतीय मुसलमान आर्थिकदृष्टया गरीब आहे. सामाजिकदृष्टया मागास आहे. राजकीय दृष्टया अधिकारहीन आहे. अर्थात काही मुठभर नवाब आणि बादशहांच्या औलादींच आपण बोलत नाही आहोत. म्हणजेच याचा दूसरा स्पष्ट अर्थ असा होतो भारतीय मुसलमान त्याच्या जात वर्गाच्या मुळ पदापर पोहचला आहे. तो मागासलेल्या पेक्षा मागास झाला आहे. तो अतिशुद्र झाला आहे आणि अशा अतिशुद्र,अधिकारहीन, निर्धन गरिब भारतीयांपासून इतर सर्वांना धोका निर्माण झाला आहे. हा भ्रम पोसला आणि वाढवला जात आहे. आणि भ्रमाला बळी पडण्यात आपला इतिहास बदनाम आहे. मुसलमान मूळ पदापर आले असे म्हणण्याचे कारण इतकेच की इथला 95 टक्के मुसलमान शुद्र, अतिशुद्र जातीतून ब्राम्हणी धर्माविरुध्द विद्रोह करुन स्वःताच्या आत्मसन्मानासाठी समतावादी इस्लाम स्विकारण्याचा इतिहास फार जुना नाही. म्हणजे ब्राम्हणी कर्मकांडाला शोषणाला नकार देणार्‍या बौध्द क्रांतीनंतर सर्वात मोठी क्रांती इस्लामची आहे. यानंतर जैन, लिंगायत, शिख, आणि सगळ्यात अलीकडचा म्हणजे शिवधर्म देखिल आहे. दलितांनी भारतात ख्रिश्‍चन धर्म स्वीकारण्याचा इतिहास हा देखील विद्रोहाचाच भाग आहे. म्हणूनच त्यांची नावे जॉन कांबळे किंवा मिनिजिअसं सुतार असतात. म्हणून ब्राम्हणी जात वर्ण व्यवस्थेविरुद्धच्या लढयात हे एकमेकांचे नैसर्गिक मित्र ठरतात. आणि अर्थात ब्राम्हणी शोषण व्यवस्थेविरुद्धचा हा जबरदस्त धक्का ही व्यवस्था आजही पचवू शकलेली नाही. आणि गेल्या 100 -150 वर्षापासून ब्राम्हणी जात वर्ण व्यवस्थेला धक्का देणार्‍या सर्वात मोठया वर्गाला वेगवेगळ्या मार्गे नामोहरम करायचे चालू आहे. अर्थात यात फक्त शत्रू नामोहरम होणार आहे. इतकेच नाही तर त्यांच्यावर राज्य करायचे सुध्दा एका काल्पनिक भीतीखाली दडपूण त्याचा विवेक काबीज करता येतो. आणि आपल्या मुलाबाळांच्या शिक्षण, आरोग्य, रोजगारापेक्षा आपण विशिष्ट धर्माचे नागरिक आहोत याचा गर्व महसूस करता येतो. व दुसर्‍या समाजाच्या उद्धवस्ती करणामध्ये आपले सुख शोधता येते. इतकं सार सांगण्याचं कारण एकच भारतीय मुसलमान कोठूनही आलेला नाही. त्याने फक्त समतावादी धर्माची हाक स्विकारली आहे. ती पण अन्यायाच्या प्रतिकारासाठी. आणि म्हणूनच तो कोठेही जाणार नाही. तो आणि ती इथलेच भूमी पूत्र-पूत्री आहेत. असा हा सर्वसामान्य भारतीय सारखाच. आपल्या स्वतःच्या मुलाबाळांच्या शिक्षण, आरोग्य, रोजगाराच्या चिंतेत आहे. गरीबीच्या सर्वात खालच्या थरात आहे.स्वःताची चूल पेटेल का? हाताची आणि पोटाची गाठ पडेल का? या विवंचनेत आहे. हे सर्व भारतीय गरीबांसोबत होत असताना.
    सामान्य मुसलमानाला यापेक्षा जास्त परिक्षा पदोपदी द्यावी लागत आहे. जी दुसर्‍या कोणत्याही भारतीयाला द्यावी लागत नाही. एक म्हणजे देशप्रेमाची आणि दुसरी म्हणजे व्यक्ती किंवा गटाच्या चुकीसाठी संपूर्ण समाजाला जबाबदार धरण्याची. सततच्या दंगलीमुळे अजून तो खोलात रुतत आहे. नजीब, अखलाख, मोहसीन, पहेलूखान, जुनेद अशी कितीतरी नावे त्याला आठवली तरी त्याची झोप हराम होते. एका अनामिक भितीने डोळ्यासमोर अंधार आणि पोटात गोळा तो अनुभवतो. इतके सारे असताना पैगंबर (सल्ल.) यांंची शिकवण शेजारी उपाशी असेल, अडचणीत असेल तर, आपण स्वस्थ बसता कामा नये.  स्वःता उपाशी झोपा पण तुमची भाकरी शेजार्‍याला द्या त्यांच्या संवेदनशील मनाला गप्प बसू देत नाही. मग मराठा क्रांती मोर्चात तो लहान भावासारखा लाखों लोकासाठी पाणी आणि जेवन घेऊन उभा राहतो. तो पण अश्या काळात ज्यावेळी मदत सोडाच पण इतर काही समाजगट मोर्चाकडे संशयाने पाहत असतो.
    ज्या-ज्या ठिकाणी मागील वर्षी पूर आला. अनेक लोक बेघर झाले. त्या-त्या भागातील मुसलमानांनी आपल्या पवित्र मस्जिदीचे दरवाजे जात धर्म न बघताच सताड उघडले. आपल्या भाकरीचा वाटा पुरग्रस्तांना दिला. कदाचित अतिशयोक्ती वाटेल. पण हे अक्षरक्षः पुराव्यानिशी खरे आहे. अनेक मुस्लिम तरुणांनी त्यावेळची ईद पुरग्रस्तांसोबतच साजरी केली. आणि ’बुडते हे जण, देखवेना या डोळा, म्हणूनी येतो कळवळा.’ या तुकोबांच्या तत्वज्ञानाला जागली. पूर ओसरल्यावर मेडीकल कँप लावले आणि मंदिरे साफ करून दिले ते वेगळेच. आता सार्‍या जगाला त्या इवल्याशा कोरोना 19 नावाच्या विषाणू ने निसर्गापुढे आपण माणूस म्हणून किती शुल्लक आहोत. त्यामुळे जातीपाती, वर्णधर्म, स्त्रीपुरुष, पंथ भेदा पलीकडे जाऊन निखळ माणूस म्हणून जगावं. हेच शिकवलं. पण अडचणीतून असलं काही आपण शिकू. ही आता फक्त अपेक्षाच राहिली आहे. आणि त्यामुळे मी पूर्वी लिहिल्याप्रमाणे कोरोना 19 चा कोरोना 786 झाला. त्याचा रंग हिरवा झाला आणि भारतात कोरोनाची सुंता झाली. हे बहुतेक जणांना उपरोधीत जरी वाटत असेल पण भारतीय मुसलमान एका भयानक यातनेतून जात आहे. त्याच्या राक्षसीकरणाचा वेग वाढत आहे. हे त्याच्या लक्षात येऊन देखील तो हतबल आहे. आणि त्यांचे नेते आणि बुद्धीजीवी असलेच तर? मुर्खांच्या नंदनवनात वावरत आहेत. पण या काळात देखील काहींच्या चुकीसाठी संपूर्ण समाज वेठीला धरला जात असताना, सामान्य मुसलमान आपल्या इमानची भाकरी घेऊन दुसर्‍याचे पोट भरण्यासाठी बाहेर पडला आहे. अर्थात या काळात काही मुर्ख मुसलमानच जे मस्जिदीत जमतायत तेच मिडीया ला दिसतायत. असो.
    मुख्य मुद्दा आणि प्रश्‍न हा आहे की, जे मुसलमानांचे नैसर्गिक मित्र आहेत. ज्यांची मुसलमानांनी तहान भागवली. ज्यांची मुसलमानांनी स्वःता अर्धपोटी राहून आपल्या कष्टाच्या भाकरीमधून भूक भागवली. ते कुठे आहेत? जे नेहमीच स्वतंत्र, समता ,बंधूता, न्याय आणि धर्मनिरपेक्षतेचा उद्घोष घसा फुटेपर्यंत करत असतात. ते कुठे आहेत? का त्यांनी संपूर्ण मुसलमानांना कट्टर, जहाल, धर्मवेडे ठरवून मानवनिष्ठेवरील आपली जबाबदारी झटकलेली आहे. का एकजिनसी समाज अस्तित्वात असतो या ब्राम्हणी मिथकाला घट्ट मिठी मारली आहे? का मग भारतीय मुसलमानांनी सीएए, एनआरसी, आंदोलनात हाती घेतलेला लाखों शहिदांच्या रक्ताने भिजलेला तिरंगा ,छातीला कवठाळलेले संविधान आणि हृदयात बाबासाहेब घेऊन त्यांनाच रक्ताळलेल्या पायाने लाखो मैल चालावे लागणार आहे? एकतर उजेडाकडे किंवा अंधार्‍या गिलोटिनकडे?

- फारू़क गवंडी
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget