Halloween Costume ideas 2015

अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(४१) त्या वेळी तुम्ही अल्लाहचाच धावा करता, मग जर त्याने इच्छिले तर तो तुमच्यावरून संकट टाळतो. अशाप्रसंगी तुम्ही ज्यांना अल्लाहचे  भागीदार ठरविले आहे त्यांना विसरून जाता.२९
(४२) तुमच्यापूर्वी अनेक जनसमूहांकडे आम्ही पैगंबर पाठविले आणि त्या जनसमूहांना संकटात व दु:खात टाकले जेणेकरून त्यांनी नम्रपणे  आमच्यासमोर झुकावे.
(४३) मग जेव्हा आमच्याकडून त्यांच्यावर संकट आले तेव्हा त्यांनी नम्रता का दर्शविली नाही? परंतु त्यांची हृदये तर अधिकच कठोर झाली  आणि शैतानाने त्यांना दिलासा दिला की जे काही तुम्ही करीत आहात ते उत्तमच करीत आहात.
(४४) मग जेव्हा त्यांना दिलेल्या उपदेशाचे त्यांनी विस्मरण केले तेव्हा आम्ही सर्व प्रकारच्या सुखसमृद्धिची दारे त्यांच्यासाठी उघडी केली,  येथपावेतो की जेव्हा ते त्यांना दिल्या गेलेल्या सुखसमृद्धित खूप मग्न झाले, तेव्हा - अचानकपणे आम्ही त्यांना पकडले आणि आता परिस्थिती  अशी होती की ते प्रत्येक मांगल्यापासून निराश झाले होते.
(४५) अशा प्रकारे त्यांची मुळे कापून टाकली गेली ज्यांनी अत्याचार केले होते आणि सर्व प्रशंसा आहे सकल जगांचा पालनकर्ता  अल्लाहसाठीच. (४६) हे पैगंबर (स.)! यांना सांगा, कधी तुम्ही याचा तरी विचार केला, की जर अल्लाहने तुमची दृष्टी व श्रवणशक्ती तुमच्यापासून हिरावून घेतली  आणि तुमच्या हृदयावर शिक्कामोर्तब केले तर३० अल्लाहशिवाय इतर कोणता असा ईश्वर आहे जो या शक्ती तुम्हाला परत बहाल करू शकेल?  पाहा, कशाप्रकारे आम्ही वरचेवर आपली संकेतवचने त्यांच्यासमोर ठेवतो आणि हे कशाप्रकारे त्यांना दृष्टीआड करतात.
(४७) सांगा, कधी तुम्ही विचार केला की जर अल्लाहकडून अकस्मात किंवा जाहीररित्या तुमच्यावर प्रकोप आला तर अत्याचाऱ्यांशिवाय इतर  कोणी नष्ट होईल काय?
(४८) आम्ही जो पैगंबर पाठवितो तो याचकरिता तर पाठवितो की ते सदाचारी लोकांना खूषखबरी देणारे व दुराचारी लोकांना भय दाखविणारे  असतील. मग ते लोक त्यांचे म्हणणे ऐकतील व आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करतील त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारच्या भयाचा व दु:खाचा  प्रसंग नाही.
(४९) आणि जे आमच्या वचनांना खोटे लेखतील ते आपल्या अवज्ञेपायी शिक्षा भोगल्याशिवाय राहणार नाहीत.
(५०) हे पैगंबर (स.)! यांना सांगा, ‘‘मी तुम्हाला असे सांगत नाही की माझ्याजवळ अल्लाहचे खजिने आहेत. मला परोक्षाचे ज्ञानही नाही व  असेही सांगत नाही की मी ईशदूत आहे. मी तर केवळ त्या ‘वह्य’ (दिव्य अवतरण) चे  पालन करतो जे माझ्यावर अवतरले जाते.’’ मग यांना  विचारा, ‘‘आंधळा व डोळस दोघे समान असू शकतात काय? तुम्ही विचार करीत नाही?’’
(५१) आणि हे पैगंबर (स.)! तुम्ही या (दिव्य प्रकटनाच्या ज्ञाना) द्वारे त्या लोकांना उपदेश करा जे लोक याचे भय बाळगतात की, आपण  आपल्या पालनकर्त्यासमोर कधीतरी अशा अवस्थेत हजर केले जाऊ जेथे त्याच्याशिवाय कोणीही (असा सत्ताधीश) नसेल जो त्यांचा समर्थक व  सहाय्यक असेल किंवा त्यांची शिफारस करील, कदाचित (या उपदेशाने सावध होऊन) त्यांनी ईशपरायणतेचे वर्तन अंगीकारावे.


२९) मागील आयतीमध्ये सांगितले गेले होते की तुम्ही एका निशाणीची मागणी करता परंतु तुमच्या चहुबाजूंना चहुकडे निशाण्याच निशाण्या  आहेत. याविषयी पहिले उदाहरण म्हणून सजीवांच्या जीवनाचे अवलोकन करण्यास सांगितले गेले. आता दुसऱ्या निशाणीकडे लक्ष वेधण्यात येत  आहे जी नाकारणाऱ्यांच्या मनात उपलब्ध आहे. जेव्हा मनुष्याच्या समोर मोठे संकट उभे राहाते किंवा मृत्यू आपल्या भयानक रूपात समोर येतो  त्यावेळी एका अल्लाहशिवाय दुसरे कोणतेच शरणस्थळ त्याला दिसत नाही.मोठमोठे अनेकेश्वरवादी अशा वेळी आपल्या उपास्यांना विसरून एका  ईश्वराला पुकारू लागतात. कट्टर नास्तिकसुद्धा ईश्वरापुढे प्रार्थना करू लागतो. याच निशाणीला सत्य जाणून घेण्यासाठी सांगितले जात आहे. हा  पुरावा आहे या सत्याचा की प्रत्येक मनुष्यात भक्ती आणि एकेश्वरत्वाची निशाणी उपलब्ध आहे. या पुराव्यावर बेपर्वाईचे आणि अज्ञानतेचे कितीही  थरावर थर चढवून झाकले गेले तरी कधी न कधी ते स्पष्ट होऊन समोर येतातच. अबू जहलचा पुत्र इक्रमाला याच निशाणीला पाहून मुस्लिम  होण्याचे सौभाग्य प्राप्त् झाले होते. जेव्हा मक्का शहरावर पैगंबर मुहम्मद (स.) यांनी विजय प्राप्त् केला तेव्हा इक्रमा जेद्याहकडे पळाले आणि एका  नौकेत स्वार होऊन आफ्रिकेकडे जाऊ लागले. रस्त्यात भयंकर तुफान आले आणि नौका डगमगू लागली. प्रथम तर देवीदेवतांना पुकारले जाऊ लागले. परंतु जेव्हा तुफानाने उग्र रूप धारण केले तेव्हा प्रवाशांना खात्री पटली की आता नौका जलसमाधी घेणार तेव्हा सर्व म्हणू लागले की  आता या वेळी एक अल्लाहचा धावा करण्याशिवाय दुसरा उपाय नाही. त्याने इच्छिले तरच आम्ही वाचू शकतो. त्या वेळी इक्रमाचे डोळे  खाडकन  उघडले आणि त्याच्या मनाने ग्वाही दिली की येथे जर अल्लाहशिवाय कोणी दुसरा सहाय्यक नाही तर इतरत्र त्याच्याशिवाय कोण असणार? हेच  सत्य अल्लाहचा दास मुहम्मद (स.) आम्हाला वीस वर्षापासून समजावून सांगत आहे आणि आम्ही अकारण त्यांच्याशी लढत आहोत. हा  इक्रमाच्या जीवनातील निर्णायक क्षण होता. (Turning Point) त्यांनी त्याच क्षणी अल्लाहला वचन दिले की जर मी या तूफानापासून वाचलो तर  सरळ पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या सेवेत हजर होऊन इस्लामला स्वीकारीन. त्यांनी आपल्या वचनाला पूर्ण केले आणि फक्त मुस्लिम बनून  थांबले नाहीत तर उर्वरित आयुष्य इस्लामसाठी प्रयत्नाची पराकाष्ठा (जिहाद) करण्यात वेचले.
३०) येथे मनावर मुहर लावणे म्हणजे विचार करण्याच्या आणि समजण्याच्या शक्तींना हिरावून घेणे आहे.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget