Halloween Costume ideas 2015

मौलाना कलीम सिद्दीकी यांना धर्मांतरण प्रकरणामध्ये अटक

उत्तर प्रदेश निवडणुकीच्या तोंडावर कारवाई : विविध सामाजिक, धार्मिक संघटना, राजकीय पक्षांचा योगी सरकावर आरोप

maulana kaleem siddiqui

उत्तर प्रदेशमध्ये मंगळवार, 21 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध आलीमे दीन मौलाना कलीम सिद्दीकी यांना अवैध धर्मांतरण प्रकरणात मेरठमधून अटक करण्यात आली. एटीएसने त्यांच्यावर लोकांना लालूच देवून धर्मांतरणासाठी प्रवृत्त करण्याचा आरोप लावला आहे. याशिवाय ते स्वतः ट्रस्ट चालवून अनेक मदरश्यांना आर्थिक मदत करत होते, असाही त्यांच्यावर आरोप लावण्यात आला आहे. त्यांच्यावर लावलेले आरोप बिनबुडाचे आणि उत्तर प्रदेश निवडणुकांमध्ये भाजपाला फायदा होईल, या उद्देशाने मौलानांना अटक केली असल्याचा आरोप विविध सामाजिक, धार्मिक संघटना व राजकीय पक्षांनी लावला आहे. 

एटीएसचे असेही म्हणणे आहे की, मौलाना कलीम सिद्दीकी यांनी विदेशातून मोठ्या रकमा हवाला आणि इतर अवैध मार्गाने मिळत होत्या. एटीएसने सांगितले की, कलीम सिद्दीकी यांच्या खात्यात आजमितीला दीड कोटी रूपये बहरीनमधून आल्याची नोंद आहे. त्यांच्या अकाउंटमध्ये एकूण तीन कोटी रूपये होते. एटीएसने असाही आरोप लावला आहे की, मौलाना उमर गौतम यांच्याकडून मिळविण्यात आलेल्या दस्ताऐवजामध्ये ज्या लोकांच्या धर्मांतरासंबंधीची माहिती मिळाली होती, त्यांचा जवळचा संबंध मौलाना कलीम सिद्दीकी यांच्याबरोबर होता. 

उत्तर प्रदेश एटीएसने पत्रकार परिषद घेऊन मौलाना कलीम सिद्दीकी यांच्यावर असा आरोप केला की, राष्ट्रीय पातळीवर त्यांचे अवैध धर्मांतराचे काम असून, ते वेगवेगळ्या शैक्षणिक, सामाजिक आणि धार्मिक संस्थांच्या पडद्यामागे धर्मांतराचे काम करत असतात. यासाठी त्यांना विदेशातून मदत मिळते. त्यांचे काम अतिशय सुनियोजित पद्धतीने संघठितपणे चालते. ते भारताचा सर्वात मोठा धर्मांतर सिंडीकेट संचालित करतात. बिगर मुस्लिमांची दिशाभूल करून प्रसंगी भीती दाखवून तसेच आर्थिक लालूच दाखवून ते गरीबांना धर्मांतरासाठी प्रेरित करत असतात. युट्यूब मार्फतही त्यांचा हा प्रचार जोरात सुरू आहे. 

कायदा व सुव्यवस्था प्रशांतकुमार यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये अशी माहिती दिली की, आतापर्यंत दहा आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. ज्यापैकी सहांच्या विरूद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे. चार लोकांच्या विरूद्ध चौकशी चालू आहे. यापूर्वी 20 जून 2021 ला अवैध धर्मांतरांचे रॅकेट चालविणाऱ्यांना अटक करण्यात आलेली होती. ज्यांना ब्रिटनमधील अनेक धार्मिक संघटनांकडून 57 कोटी रूपयांची फंडिंग केली गेली होती. या रकमेच्या खर्चाचा तपशील आरोपींना देता आलेला नाही. 

मौलाना कलीम सिद्दीकी हे उत्तर प्रदेशच्या खतोली क्षेत्रातील फुलत गावाचे रहिवाशी आहेत. -(आतील पान 7 वर)

 ते ग्लोबल पीस सेंटरचे अध्यक्ष आहेत. शिवाय, जमियते वलीउल्लाह या धार्मिक संघटनेचेही अध्यक्ष आहेत. ते अनेक मदरशांचे प्रभारी आहेत. शिक्षणाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केल्यामुळे त्यांची देश आणि विदेशामध्ये चांगली ओळख आहे. त्यांची गणती देशाच्या मोठ्या इस्लामिक विद्वानांमध्ये होते. प्रसिद्ध बॉलिवुड अभिनेत्री सना खानचा निकाह ही त्यांनीच पढविला होता. अगदी अलिकडे मौलाना कलीम सिद्दीकी यांची संघप्रमुख मोहन भागवत यांच्याशी संघाद्वारे आयोजित राष्ट्रप्रथम राष्ट्र सर्वपरी या कार्यक्रमांमध्ये भेट झाली होती. 

मौलानांच्या या अटकेनंतर अनेक लोकांनी ही कारवाई उत्तर प्रदेशाच्या आगामी निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून करण्यात आली असल्याचा आरोप केलेला आहे. सहारनपूरचे बसपाचे खा. हाजी फजलुर्रहेमान यांनी सांगितले की, मौलाना कलीम सिद्दीकी यांची अटक उत्तर प्रदेश भाजपा सरकारचा निवडणूक जिंकण्याचा एक हतकंडा आहे. उत्तर प्रदेशाची जनता या सरकारच्या कामाविषयी नाराज असून, त्यामुळे चिंतेत असलेल्या भाजपाने राज्यामध्ये दहशत पसरविण्यास सुरूवात केलेली आहे. ती समाजामध्ये विघटन करून निवडणूक जिंकू इच्छिते. त्यांनी या घृणेच्या कृतीचा निषेध करून मौलाना कलीम सिद्दीकी यांना तात्काळ सोडण्याची मागणी केली. दरम्यान, बुधवारी कलीम सिद्दीकी यांना कोर्टासमोर उभे करून एटीएसनी त्यांची पोलीस कोठडी मागितली होती, परंतु कोर्टाने ती दिली नसल्याची माहिती पुढे आली आहे. 

आम आदमी पार्टीचे आ. अमानुल्लाह खान यांनी उत्तर प्रदेश सरकारवर असा आरोप केलेला आहे की, योगी सरकार मुस्लिमांवर अत्याचार करत आहे. कलीम सिद्दीकी यांची अटक त्या अत्याचाराचाच एक भाग आहे.  विशेष म्हणजे, काँग्रेस आणि इतर धर्मनिरपेक्ष म्हणविणाऱ्या पक्षांनी हा अहवाल लिहिपर्यंत तरी या अटकेसंबंधी कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नव्हती. ही बाब लक्षणीय आहे. 

आंतरधार्मिक संवाद कुठलाही अपराध नाही

मौलाना कलीम सिद्दीकी यांना सोडण्याची मागणी : एसआयओ

प्रसिद्ध इस्लामी विद्वान मौलाना कलीम सिद्दीकी आणि त्यांच्या साथीदारांची अटक करून सत्तारूढ हिंदुत्ववादी शक्तींद्वारा आंतरधार्मिक संवादांवर प्रतिबंध लावण्याचा आणि उत्तर प्रदेश निवडणुकांअगोदर सांप्रदायिक भेदभाव निर्माण करण्याचा एक चुकीचा प्रयत्न असल्याचे एसआयओचे म्हणणे आहे. मौलाना कलीम सिद्दीकी यांना भारत देशात विभिन्न धर्मांतील लोकांकडून व्यापक प्रमाणात सन्मानित करण्यात येत आहे. कारण त्यांच्या प्रयत्नांतून मित्रत्वाचे आंतरधार्मिक संवादाच्या माध्यमातून सांप्रदायिक सद्भाव आणि सौहार्दाला बळ मिळते. त्यांनी आपले जीवन विभिन्न समुदायातील अविश्वास आणि चुकीच्या धारणांना दूर करण्यात समर्पित केले आहे. त्यांचा असाही प्रयत्न राहिला आहे की, वेगवेगळ्या समुदायांनी एक-दूसऱ्यांप्रती जाणून घेणे, त्यांना समजणे आणि व्यापक स्तरावर सामाजिक संवादाचे वातावरण निर्माण करणे. मौलाना कलीम सिद्दीकी यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांत थोडीही सत्यता नाही. त्यांच्यावर लावण्यात आलेला आरोप असा आहे की, त्यांनी लोकांना जबरदस्ती प्रलोभन देवून धर्म परिवर्तन करण्यासाठी मजबूर केले. जसे की यूपी एटीएसने आपल्या चुकीच्या आणि काल्पनिक तक्रारीत म्हटले आहे.  

आमचे असे म्हणणे आहे की, मौलाना कलीम सिद्दीकी यांना निवडणुकीच्या लाभासाठी युपी सरकार द्वारा बळीचा बकरा बनविला जात आहे. आम्ही अशा अटकेची कडी निंदा करतो आणि त्यांना तत्काळ सोडून देण्याची अपील करतो. निर्दोष मुसलमांनाना वारंवार त्रास देणे निंदनीय आहे असे प्रकार तात्काळ थांबविले जावेत. या प्रकारची कृत्य फक्त संशय आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण करेल आणि देशाच्या सामाजिक एकोप्यासाठी घातक सिद्ध होईल. प्रत्येकाला आपल्या आवडीचा धर्म मानने आणि प्रचार करण्याचा अधिकार आपल्या संविधानाने दिलेला आहे. यूपी सरकारचा धर्मांतरण विरोधी कायदा अशा स्वातंत्र्याला कमकुवत करत आहे आणि सामान्य नागरिकांना त्रास देण्याचे एक साधन बनले आहे. आम्ही आशा करतो की, शासन सत्याची बाजू घेईल आणि माननीय न्यायालय संवैधानिक मुल्यांना स्थापित करून न्याय देईल. 

 - मुहम्मद सलमान अहमद, राष्ट्रीय अध्यक्ष, स्टूडेंट्स इस्लामिक ऑर्गनायजेशन ऑफ इंडिया (एसआईओ)


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget