हजरत अरबाज बिन सारिया (र.) म्हणतात, एके दिवशी प्रेषित मुहम्मद (स.) हे आम्हाला प्रवचन देत होते. जे ऐकून आमचे मन घाबरून गेले आणि डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. आम्ही म्हणालो, ‘हे प्रेषिता! हे तर समारोपीय प्रबोधन वाटते. आम्हाला शिकवण द्या.’
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले,
‘‘अल्लाहशी भीत राहा. त्याचे आज्ञापालन करा. तुमच्यावर एखाद्या गुलामाला जरी उत्तराधिकारी नेमले असेल तरी देखील त्याची अवज्ञा करू नका. माझ्यानंतर तुमच्यापैकी जे हयात असतील त्यांच्यामध्ये बरेच विरोध-प्रतिविरोध असतील. अशा वेळी तुमच्यावर हे बंधनकारक असेल की तुम्ही माझ्या उपदेशांचे आणि माझ्यानंतर येणाऱ्या खलीफांचे पालन करावे. (धर्मात) नवनवीन पद्धती निर्माण करू नका. हे वाट चुकणारे कृत्य असेल.’’ (अबू दाऊद)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात,
‘‘मी तुम्हास अशा तेजस्वी मार्गावर सोडले आहे की ज्याची रात्रसुद्धा दिवसाप्रमाणे प्रकाशमान आहे. या मार्गावरून माझ्यानंतर भरकटरा स्वतःच उद्ध्वस्त होईल.’’
प्रेषित मुहम्मद (स.) ईद आणि शुक्रवारच्या नमाजप्रसंगी प्रवचन देत असत आणि कधी कधी आपल्या अनुयायांना संबोधितदेखील करीत असत. अल्लाहने त्यांना म्हटले होते की,
‘‘त्यांना समजावून सांगा आणि असा उपदेश देत जा जे त्यांच्या मनांमध्ये घर करेल.’’ (पवित्र कुरआन, ४:६३)
‘‘आपल्या विधात्याकडे बुद्धिमत्तेने आणि चांगल्या उपदेशाद्वारे बोलवा.’’ (पवित्र कुरआन, १६:१२५)
पण प्रेषित मुहम्मद (स.) नेहमी असे प्रवचन देत नसत, कारण लोकांनी कंटाळू नये.
प्रेषित मुहम्मद (स.) थोडक्या शब्दांत अशा पद्थतीने सांगत की ऐकणाऱ्याला ते समजता यावे.
अबू दाऊद (र.) यांचे म्हणणे आहे की प्रेषित मुहम्मद (स.) शुक्रवारचे प्रवचन लांबलचक देत नसत. मोजक्या शब्दांमध्ये मोजक्याच गोष्टी सांगत असत. ह. अरबाज म्हणतात की प्रेषितांचे प्रवचन ऐकताना मन हेलावून जाई आणि डोळ्यांतून अश्रू ढळत असत.
पवित्र कुरआनात याचे वर्णन अशा प्रकारे केले आहे,
‘‘सच्चे श्रद्धावंत ते आहेत ज्यांची मने अल्लाहचे उपदेश ऐकून हेलावून जात आणि जेव्हा त्यांच्या समक्ष अल्लाहच्या (कुरआनातील) आयती ऐकविल्या जाताना त्यांची श्रद्धा आणखीनच बळकट होते.’’ (प. कुरआन, ८:२)
संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment