हुपरीतील इर्शाद शेख -एनआयए तपास प्रकरणावर ग्राउंड रिपोर्ट
एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणा मुख्यतः दहशतवाद विरोधी टास्क फोर्स म्हणून काम करते. दहशतवाद संबंधी गुन्ह्यांचा तपास करताना एनआयए ला राज्यांकडून कोणत्याही विशेष परवानगीची आवश्यकता नसते. एनआयए कडे देशातील एक नामांकित तपास यंत्रणा म्हणून पाहिले जाते.
देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अशा संस्थांचा दर्जा टिकून राहणे आणि त्या विश्वासार्ह असणे खूप आवश्यक बाब असते. जर राष्ट्रीय 'तपास' यंत्रणेला नावातील फरक व शब्दांचे अर्थ समजत नसतील, पुरेशी माहिती घेतली जात नसेल आणि त्यातून सर्वसामान्य नागरिक भरडले जाणार असतील, धार्मिक तणाव निर्माण होऊन अनेकांची आयुष्ये उध्वस्त होणार असतील तर या यंत्रणांच्या खालावलेल्या दर्जाची आणि गमावू जाणाऱ्या विश्वासार्हतेची जबाबदारी देशाचे गृहमंत्री नाकारणार काय?
कोण आहे इर्शाद शेख?
महाराष्ट्रातील चंदेरी नगरी म्हणून ओळख असलेल्या हुपरीत तीस वर्षीय इर्शाद शेख त्याच्या जन्मापासून राहतो. कुटुंबाचा चांदी कारागिरीचा व्यवसाय. शिक्षण जेमतेम असले तरी चांदी कामातून आलेली मध्यमवर्गीय आर्थिक स्थिती. धार्मिक शिक्षणाच्या आवडीने हाफिजी असलेला इर्शाद गोरगरिब गरजूंना त्याच्यापरिने साहाय्य करण्यासाठी तीन वर्षापूर्वी एक फाउंडेशन स्थापन करतो. त्याचे नाव असते "लबैक इमदाद फाउंडेशन".
हुपरी शहर व परिसरात छोटी मोठी सामाजिक एकोप्याची कामे, गरजूंना मदत, जेवणाचे डबे मोफत पुरवणे, समुपदेशन, शैक्षणिक साहित्य वाटप, इत्यादीं सारखी कामे या फाउंडेशन मार्फत केली जात. प्रत्येक कार्यक्रम हुपरीतील पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन केले जात.
लबैक, इमदाद, तेहरिक या उर्दू शब्दांचे अर्थ काय आहेत?
एनआयए म्हणते नाम साधरम्यामुळे इर्शादची चौकशी केली. "लबैक तेहरिक फाउंडेशन" अशी नाव धारण केलेली संस्था पाकिस्तानात काम करते आणि तिचा दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असतो; इर्शादच्या संस्थेचे नाव "लबैक इमदाद फाउंडेशन" असे असल्याने नावाच्या साधर्म्यमुळेच इर्शादची चौकशी केली गेली, असे एनआयए चे म्हणणे आहे. आता संस्थांची नावे ठेवताना फाउंडेशन हा जनरल शब्द झाला. त्यामुळे तो बाजूला ठेवू. तेहरिक आणि इमदाद या शब्दात साहजिकच फरक आहे. तेहरिक हे नाव "चळवळ" या अर्थाने पाकिस्तानात कैक संस्था, संघटना, पक्ष यांच्या नावात सर्रासपणे येते. तर इमदाद या शब्दाचा अर्थ "दान" असा आहे. मग, "लबैक" या एका शब्दामुळे एनआयए ने इर्शादची चौकशी केली असल्यास ही हास्यास्पद बाब आहे. शिवाय, एनआयए च्या अधिकाऱ्यांचा मुस्लिम समुदयाबाबतचा पूर्वग्रह आणि संकुचित वृत्ती अधोरेखित करणारा हा प्रकार आहे.
लबैक हा शब्द आपण अनेक दुकानांवर, विशेषतः ट्रॅव्हल्स गाड्यांवर पाहिलेला आहे. लबैक या उर्दू शब्दाचा अर्थ "हजर", "उपस्थित" असा आहे. "लबैक इमदाद फाउंडेशन" म्हणजे "दानधर्म करण्यास हजर असणारी संस्था" या अर्थाने इर्शादने आपल्या संस्थेचे नाव ठेवले होते. आणि या नावाप्रमाणेच हुपरी परिसरात त्यांचे सेवा कार्य चालू होते.
धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत संस्था
"लबैक इमदाद फाउंडेशन" ही धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी क्र. KPR/00027/2020 ने नोंदणीकृत संस्था आहे.
एक रुपया देखील कोल्हापूरच्या बाहेरून नाही- इर्शाद
संस्थेसाठी वर्षाकाठी जो दीड दोन लाखांचा फंड गोळा केला, त्यातील एकही रुपया कोल्हापूर बाहेरून आलेला नाही असे इर्शाद त्याचे बँक डिटेल्सचा दाखला देत सांगतो. हुपरी परिसरातीलच मित्र मंडळी व पै पाहुण्यांनी दिलेल्या फंडातून त्यांचे सामाजिक कार्य चालू होते. फाउंडेशनने त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात कोणत्याही राजकीय व्यक्तीस न बोलवता हुपरी पोलिसांच्या हस्ते कार्यक्रम होत असत. याला बंदोबस्ताला असणारे पोलिसही दुजोरा देतात.
मी शिवरायांचा मावळा - इर्शाद शेख
"शिवजयंतीवेळी सरबत वाटण्याचे कारण काय?" असे चौकशीवेळी अधिकाऱ्यांनी विचारले तेव्हा, "मी शिवरायांचा मावळा आहे, शिवराय आमचे राजे आहेत. ज्यांच्या पावन मातीत जन्मलो त्यांच्या जयंतीला सरबत वाटण्यात गैर काय?" असे उत्तर देत, "शिवरायांसोबत अनेक मुस्लिम मावळे होते" असे सांगायला इर्शाद विसरला नाही!
"नुपूर शर्मा, पाकिस्तान बद्दल मत काय? भारतात असुरक्षित वाटते का?"
नुपूर शर्मा, पाकिस्तान बद्दल मत काय? भारतात असुरक्षित वाटते का? असे प्रश्न जेव्हा इर्शादला विचारले गेले तेव्हा, भारत माझा देश आहे मला का असुरक्षित वाटेल असे इर्शादने उत्तर दिले. जिच्या वक्तव्यावर सुप्रीम कोर्टाने देखील ताशेरे ओढले त्या नुपूर शर्मा बाबत इर्शादला विचारणा करणे कितपत योग्य आहे? ज्या नुपूर शर्मामुळे देशाची एकात्मता धोक्यात आली ती मोकाट आहे तर, जो इर्शाद देशाच्या एकात्मतेसाठी छोटे असेना पण कार्यरत आहे त्याची मात्र चौकशी होते. हा उरफाटा न्याय का? अशी विचारणा इर्शादचे कुटुंबीय करतात त्यावेळी आपण निरुत्तर होतो.
हरघर तिरंगा, हरघर संविधान मोहीम राबविण्याची तयारी चालू होती...
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त आमच्या फाउंडेशन तर्फे "हरघर तिरंगा, हरघर संविधान" मोहीम आमच्या आंबाईनगर येथे राबवण्याची आमची तयारी चालू होती शिवाय 9 ऑगस्ट हा संस्थेचा तिसरा स्थापना दिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करणार होतो, त्यावर या चौकशीने पाणी फेरले असल्याची हतबलता इर्शाद व्यक्त करतो. चौकशीच्या बातमीने फाउंडेशनच्या व्हाट्सएप ग्रुपवरून अनेक सदस्य लेफ्ट झाली आहेत. माध्यमांच्या वार्तांकनाने लोकांचा बदललेला दृष्टिकोन अस्वस्थ करणारा असल्याचे तो सांगतो.
परिचित लोकांनी केली तोडफोड
परिचित लोकांनी व ज्यांनी वेळोवेळी फाउंडेशन कडून मदत घेतली अशा लोकांनी चुकीच्या वार्तांकनावर विश्वास ठेवून आमच्या कार्यालयाची तोडफोड केल्याचे सांगितले. "भैया असे करणार नाहीत. काळजी करू नका. सर्वकाही ठीक होईल." असा पाच मिनिटांपूर्वी धीर देऊन गेलेले तरुण दुसऱ्याक्षणी तोडफोड करतात याचे वाईट वाटते असे इर्शादचे वडील शौकत शेख सांगतात.
इर्शाद, अल्ताफ ढसाढसा रडले..
रमणमळा पोस्ट ऑफिस चौकात शेख बंधूंना चौकशी करून दुपारी सोडले गेले. इर्शादचा भाऊ अल्ताफ याने जेव्हा त्याचा मोबाईल उघडला तेव्हा दहशतवाद्यांशी लागेबांधे असल्याच्या बातम्यांनी त्याचे व्हाट्सएप भरून गेले होते. आपल्याला तर चौकशीतून निर्दोष सोडले गेले आहे, आणि बातम्या तर विरुद्ध स्वरूपाच्या आलेल्या पाहून भर चौकात इर्शाद, अल्ताफ यांना रडू कोसळले. हा इतका गंभीर आरोप घेऊन गावी परत कसे जायचे या विचाराने ते गांगरून गेले. शेवटी, NIA च्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याजवळ पुन्हा धाव घेऊन त्यांची समजूत काढून गावी पाठवले.
माध्यमांचा उतावळे आणि अडाणीपणा मुळे जमाव प्रक्षुब्ध झाला
वृत्तवाहिन्या, न्यूज पोर्टल यांनी 'दहशतवादी लागेबांधे', 'isis ची संबंध'अशा आशयाच्या बेजबाबदार बातम्या प्रसारित केल्या. NIA ने स्वतः 12 वाजून 56 मिनिटांनी केलेल्या ट्विट मध्ये 'searches' (तपास) असा शब्द वापरला आहे 'raid' (छापा) असा नाही. असे असताना माध्यमांनी सर्रास छापा असा शब्द वापरून चुकीचे वार्तांकन केले. काही नामांकित माध्यमांनी तर मुंबईहून हुपरित आलेले, नातेवाईकाची खोली भाड्याने घेतलेले तरुण असे खोटे, चुकीचे वार्तांकन केले. यातून जमाव प्रक्षुब्ध होण्यास साहाय्य झाले.
शाहूंच्या कोल्हापुरात येण्यापूर्वी NIA ने दहा वेळा विचार करावा!
राजर्षी शाहूंचा पुरोगामी विचार जपणारे कोल्हापूर आहे. येथे सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. याभूमीने देशाला समतेचा आदर्श घालून दिलेला आहे. त्यामुळे NIA ने अशाप्रकारची चौकशी करण्याआधी दहावेळा विचार करावा अशी भावना हुपरी परिसरात आहे!
काही प्रश्न....
१) नाम साधर्म्यचा प्रश्न होता तर 'सनातन' हे नाव अनेक संस्थांनी धारण केले आहे. अशा किती संस्थांची चौकशी NIA ने केली आहे?
२) दाऊद नाव असलेली हजारो लोकं महाराष्ट्रात आहेत; अंडरवर्ल्ड डॉन दाऊद च्या नावाशी साधर्म्य म्हणून या सर्वांची चौकशी करणार काय?
३) उर्दू शब्दांचे अर्थ समजत नसतील, चौकशीपूर्व अभ्यास कमी असेल, गुप्तवार्ता विभागाशी समन्वय कमी असेल तर सामान्य नागरिकांना दाणीला देणार काय?
४) मुस्लिम समाजास जाणीवपूर्वक टार्गेट करून सामाजिक एकोपा भंग केला जात आहे का?
५) स्वातंत्र्याची पंचाहत्तर वर्षे झाली अजून किती दिवस मुस्लिम समाजाची देश प्रेमाची परीक्षा घेणार आहात?
६) तपास यंत्रणा आपापले धार्मिक पूर्वग्रह केंव्हा सोडणार?
७) विविध माध्यमे प्रगल्भ कधी होणार? धार्मिक पूर्वग्रह कधी सोडणार? उतावळ्या माध्यमांना शहाणपण कधी येणार?
शिवराय, राजर्षी शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचे आम्ही कोल्हापूरकर शेख कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत! हे कोल्हापूर आहे, येथे जातीधर्म भेदाला थारा नाही!
Post a Comment