इस्लामी कैलेंडरचा पहिला महिना म्हणजे मोहर्रम होय. ईस्लाम मध्ये अति महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या चार महिन्यातील एक महिना म्हणून मोहर्रम महिन्याची गणना होते. अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद सल्ल. यांनी हजरत इमाम हुसैन यांच्या जन्मापूर्वी 9 आणि 10 मोहर्रम ला उपवास (रोजा) ठेवण्याची आज्ञा दिली होती. अर्थातच मुस्लिम लोक 10 मोहर्रम म्हणजेच आशुरेचा ‘रोजा’ हजरत इमाम हुसैन यांच्या बलिदानाच्या पूर्वी पासून ठेवतात.
मोहर्रमच्या दहाव्या दिवसाला (ज्याला आशुरा म्हटले जाते) इस्लाममध्ये विशेष महत्व आहे. या दिवशी हजरत मूसा अलैहिस्सलाम आणि त्यांच्या अनुयायांना फिरऔनपासून मुक्ती मिळाली होती. यानंतर प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या प्रिय मुलीचे पुत्र हजरत इमाम हुसैन आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबियाने यजीदच्या सैनिकांशी लढता-लढता याच दिवशी बलिदान पत्करले. तेव्हा पासून आशुरेचा दिवस ‘शहादत दिन’ (बलिदानाचा दिवस) म्हणून ओळखला जातो.
इस्लामी संविधानानुसार राष्ट्र ईश्वराचे आहे आणि देशवासी ईश्वराची प्रजा असून शासकाला प्रजेच्या संबंधी ईश्वरा समक्ष जाब द्यावे लागेल. शासक प्रजेचा मालक नाही आणि प्रजा शासकाची गुलाम नाही. या नियमानुसार त्या काळी अरबस्थानात (मक्केत) लोकतांत्रिक प्रक्रियेतून सदाचारी, सूज्ञ विद्वान आणि साहसी पुरूषाला ‘खलीफा’ (आपले प्रमुख) स्वीकारून त्याला राज्य शासक मानले जात होते. हजरत मुहम्मद सल्ल. यांच्या नंतर हजरत अबूबकर सिद्दीक रजि., हजरत उमर फारूख रजि., हजरत उस्मान गनी रजि., हजरत अली रजि. आणि हजरत माअविया क्रमश: खलीफा (प्रमुख) नियुक्त झाले. किंतु हजरत माअविया यांनी स्वत:च्या नंतर लोकतांत्रिक पध्दतीने शासक न निवडता, आपले पुत्र यजीदला ‘उत्तराधिकारी’ घोषीत केले.
लोक लोकतांत्रिक अधिकाराने वंचित झाले, अंधाधुंद कारभार चालू लागला शासकाच्या सल्लागार-समिति मध्ये चापलूसी लोकांची भरती झाली. इस्लामी संविधानाच्या विरूध्द सर्व हालचाली होत होत्या. जबरदस्तीने राज्य करण्याची ही प्रथा इस्लामी संविधानाच्या आत्म्याविरूध्द होती.
यजीदची धारणा होती - इस्लाम धर्म संस्थापक अर्थातच प्रेषित हजरत मुहम्मद सल्ल. यांचे नातू (मुलीचा पुत्र) हजरत इमाम हुसैन रजि. याने जर मला ‘शासक’ स्वीकारले तर नक्कीच माझ्या बळामध्ये वाढ होईल. या हेतूने यजीदने हजरत इमाम हुसैन रजि. यांच्याजवळ अनेकदा संदेश पाठविले. परंतु इमाम हुसैन यांनी जबरदस्तीने शासक झालेल्या यजीदला आपले शासक मानण्यास नकार दिला आणि मदिना शहर सोडून ‘शाम’ देशाकडे त्यांनी प्रस्थान केले. शासक यजीदला याची चाहूल लागताच ‘कूफा’ नामक शहरात हजरत इमाम हुसैन आणि त्यांच्या कुटुंबियाच्या 72 लोकांना यजीदच्या फौजेने घेरून टाकले. इमाम हुसैन यांनी यावेळीही यजीदला ‘खलीफा’ मानणे अस्वीकार्ह केले. अखेरीस लढाई सुरू झाली. हजरत इमाम हुसैन यांच्या कुटुंबियांची लहान बालके पाण्याशिवाय तडफडत होती परंतु यजीद च्या सैनिकांनी नदीमधून त्यांना पाणी घेऊ दिले नाही. कुनब्यातले किशोर, युवा, सक्षम पुरूष तीन दिवसांपासून भूक-तहानेची पर्वा न करता लढता-लढता शहीद होत होते. शेवटी तिसऱ्या दिवशी (मोहर्रमच्या दहा तारखेला हजरत इमाम हुसैन शहीद झाले. मात्र नैतिक, सुदृढ, सत्यप्रस्थापित इस्लामी संविधानामध्ये बदल स्वीकार नाही केले. त्यांची ही आहुति लोकतांत्रिक प्रक्रियेसाठी सदैव स्मरणात राहील. जे लोक सत्य प्रस्थापित करू इच्छितात त्यांना बळ देते. अन्यायाविरूद्ध लढण्याची शक्ती प्रदान करते.
- डॉ. अर्जिनबी युसूफ शेख
9371895126
Post a Comment