बिहारमध्ये एका कार्यक्रमात भाजपचे राष्ट्राध्यक्ष प्रादेशिक पक्षांना संपवण्याची घोषणा केली आणि त्याची सुरुवात शिवसेनेपासून झाली, असे आपल्या भाषणात म्हणाले आहेत. भाजपकडे सध्या निर्विवाद सत्ता आहे. त्या सत्तेच्या जोरावर आणि केंद्रीय संस्थांचा वापर करून त्याने विरोधी पक्षांची कोंडी केलेली आहे. पण त्या पक्षाने जर असे करण्याची सुरुवात केली तर देशातले राजकारण पण तापणार यात शंका नाही. भाजपचा हा मनसुबा काही नवा नाही. ही भाजपची जुनी विचारधारा आहे. २००९ च्या निवडणूक प्रचारात तत्कालीन भाजप राष्ट्राध्यक्षांनी मतदारांना अशी विनंती केली होती की त्यांना जर भाजपाला मते द्यायची नाहीत तर कमीत कमी त्यांनी काँग्रेस पक्षाला मते द्यावीत, पण काही झाले तरी प्रादेशिक पक्षांना मतदान करू नये. देशात फक्त एकच भाजप हाच पक्ष टिकेल याची व्यूहरचना त्यांनी तेव्हाच केली होती. काँग्रेस पक्षाला संपवण्यासाठी भाजप अतोनात प्रयत्न करत आहे हे सर्वांना दिसत आहे. बऱ्याच प्रमाणात काँग्रेस कमकुवत करण्यात त्यांना यशही आले आहे. काँग्रेस विरुद्ध ही मोहीम सुरू ठेवतानाच आता भाजपने प्रादेशिक पक्षांकडे मोर्चा वळवला आहे. यात सर्वंत आधी त्यांनी शिवसेनेला लक्ष्य केले आहे. शिवसेनेविरुद्ध बंडाळी करण्यासाठी ईडीचा वापर करून त्याची सत्ता संपवली. यानंतर दुसरे लक्ष्य मुंबई महापालिकेतून शिवसेनेला संपवायचे आहे आणि जर तसे झालेच तर नड्डा असे जे म्हणतात की शिवसेना संपण्याच्या मार्गावर आहे हे खरे ठरेल आणि जे पक्ष सध्या अस्तित्वात आहेत ते टिकणार नाहीत. प्रादेशिक पक्षांमध्ये तेलंगणाचा पक्ष आंध्रातील राजेश्वर यांचा पक्ष, तामिळणाडूतील अण्णा द्रमुक आणि द्रविड मुन्नेत्र कळघम आहेत. तर उत्तरेत राष्ट्रीय जनता दल, नितिशकुमार यांचा पक्ष, कर्नाटकात जनता दल सेक्युलर हे पक्ष आहेत. तसेच झारखंड मुक्ती मोर्चा हा पक्ष आहे. या सर्व प्रादेशिक पक्षांमध्ये दक्षिणेतील द्रमुक, अण्णा द्रमुक आणि तेलंगणाचे पक्ष हे शक्तिशाली आहेत. नितिशकुमार भाजपमध्ये गेली वा बाहेर राहिले एकच गोष्ट आहे. कठीण समस्येला राजदला तोंड द्यावे लागेल. त्या पक्षाचे संस्थापक लालूप्रसाद यादव सध्या कसलेही नेतृत्व करण्याच्या लायकीचे नाहीत. तेजस्वी यादव भाजपसारख्या शक्तिशाली पक्षासमोर किती व कसे टिकू शकतील सांगता येत नाही. सर्वांत मोठी अडचण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोर आहे. जर हे पक्ष संपले तर मराठ्यांचा हक्काचा पक्ष संपुष्टात येईल आणि याचबरोबर त्यांच्या समोर राजकीय भवितव्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. शरद पवार आहेत तोपर्यंत या पक्षाला भाजप धक्का देणार नाही. असे जरी वाटत असेल तर २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांपर्यंत काहीही घडू शकते. जशी गंभीर समस्या राष्ट्रवादी काँग्रेसपुढे आहे तसलेच आव्हान खुद्द भाजपला आम आदमी पार्टीचे आव्हान ठरणार आहे. हा पक्ष घराणेशाही मार्गाने स्थापन झालेला नसून खुद्द भाजपचा सहभाग असलेल्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून उभा राहिलेला नव्या दमाचा पक्ष आहे. इतर प्रादेशिक पक्ष त्या त्या प्रदेशात सीमित आहेत तर आम आदमी पार्टी इतर राज्यांत विस्तारत आहे. दिल्लीनंतर पंजाब राज्यात त्या पक्षाने सत्ता काबीज केलेली आहे. म्हणून तो पक्ष आता प्रादेशिक राहिलेला नाही. घराणेशाहीचा आरोप त्याच्यावर लावता येत नाही. शरद पवार सक्रिय आहेत तोपर्यंत राष्ट्रवादी पक्षाकडे लोक आकर्षित होत राहतील. त्यांच्याबरोबर विरोधी पक्षनेते अजित पवार आणि जयंत पाटील पक्षाला चांगले नेतृत्व देत राहतील, पण एवढ्यावर भागणार नाही. जोपर्यंत मराठा समाज भक्कमपणे राष्ट्रवादीच्या पाठीशी येत नाही तोवर त्या पक्षावर संकट येण्याची शक्यता आहे. शेवटी मराठा समाजाचे हित समोर ठेवूनच ह्या पक्षाची स्थापना झालेली आहे हे वास्तव आहे, पण त्या समाजाला याचे भान असले तरच त्यांचे राजकीय भवितव्य कायम राहील. जर हा पक्ष संपला तर सर्वांत जास्त राजकीय संकट त्याच समाजावर कोसळेल, हे कटू सत्य आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल सरकार पाडायचे प्रयत्न भाजपने सुरू केलेले आहेत. पार्थ चटर्जी ईडीच्या ताब्यात आहेत. त्यांचा उपयोग ममता बॅनर्जींना अडचणीत आणून त्यांचा राजकीय प्रवास थांबवण्याच प्रयत्न लवकरच सुरू होणार आहे. गोव्यात सुद्धा प्रादेशिक पक्षाशी आघाडी केल्याशिवाय तिथे सरकार स्थापन करता येत नाही. पंजाबमध्ये सध्या आम आदमी पार्टीचे सरकार आले असले तरी तिथले प्रादेशिक पक्ष प्रबळ आहेत. भाजपला तिथे सरकार स्थापन करणे कधी शक्य होणार नाही. जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी तसेच नवीन गुपकार आघाडीशी भाजपला वेळोवेळी कोणत्या न् कोणत्या पक्षाशी संधान बांधावे लागले आहे. अशा प्रकारे चोहोबाजूंनी भाजपच्या केंद्रीय सत्तेला प्रादेशिक पक्षांनी घेरलेले आहे. यात सर्वांना संपवणे शक्य होणार नाही. स्वतः भाजपला केंद्रात आज जी निर्विवाद सत्ता मिळाली आहे, त्यासाठी त्यांना ह्या सर्व पक्षांचा उपयोग करूनच ते शक्य झाले आहे. ज्यांच्याद्वारे तो पक्ष सत्तेत आला त्यांना संपवणे भाजपचे लक्ष आहे. जो कुणी पक्ष भाजपबरोबर गेला त्याचा नाश झालेला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हे वास्तव अनेक प्रसंगी बोलून दाखवले आहे.
- सय्यद इफ्तेखार अहमद
संपादक,
मो.: ९८२०१२१२०७
Post a Comment