होऊ दे, होवोत किती, हृदयाच्या चिंधड्या
वाहू दे, वाहोत किती, रक्ताचे पाट
मायभूला दाखवूच आम्ही स्वातंत्र्याची पहाट
आपल्या भारत देशाला पारतंत्र्याच्या गच्च काळोखातून स्वातंत्र्याची पहाट दाखविण्यासाठी अनेक महान थोर व्यक्तींनी आपल्या आयुष्याचे अनमोल देणं पणाला लावून शब्दशः आपल्या संपूर्ण जीवनाच्या आहूती स्वातंत्र्य संग्रामाच्या यज्ञात अर्पण केल्या. या त्यांच्या त्यागाने आणि शौर्याने आपला देश स्वतंत्र झाला.९ ऑगस्ट १९४२ रोजी बलाढ्य ब्रिटिश सरकारला "चले जाव" असे सांगून हजारोंच्या संख्येने क्रांतिकारक स्वातंत्र्य मिळावे म्हणून उभे ठाकले होते. राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा आणि राष्ट्रप्रेम पुन्हा एकदा चेतवण्यासाठी हसत हसत फासावर गेलेल्या या क्रांतीकारी हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण नव्या पिढीला करून देणे,आज अगत्याचे आहे. शासनाने त्यादृष्टीने सकारात्मक पावले उचलून राष्ट्रभक्ती वाढविण्यासाठी ९ ऑगस्ट: भारतीय क्रांती दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रम आयोजित करून क्रांतीकारकांच्या त्यागाची व शौर्याची माहिती विविध माध्यमांतून करून दिली पाहिजे, असे वाटते. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वतः घ्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून हसत-हसत फासावर गेलेल्या शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्या सारख्या अनेक क्रांतिकारकांनी देशासाठी बलिदान दिले आहे.
नवाब सिराजुद्दौला, अशफाक उल्लाह खान, खान अब्दुल गफ्फार खान, शेरे-मैसूर टीपू सुल्तान, शहज़ादा फिरोज़ शाह, बेगम हज़रत महल, मौलाना अहमदुल्लाह शाह और मौलाना ज़फर अली खान यासह मुस्लिम समाजातील अनेक क्रांतिकारकांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाचे योगदान दिले आहे. २३ मार्च १९३१ रोजी लाहोर येथे भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली. हा दिवस 'शहिद दिन' म्हणून पाळला जातो.
भगतसिंग यांचा जन्म २८ सप्टेंबर १९०७ रोजी बंगा येथे झाला. भगतसिंगांच्या जन्माच्या वेळी सरदार किशनसिंग आणि सरदार अजितसिंह यांची जेलमधून सुटका झाली, म्हणून हा मुलगा भाग्यवान आहे असे जाणून आजीने त्याचे नाव भगतसिंग ठेवले. जालियनवाला बागेचे हत्याकांड भगतसिंग यांच्या मनावर खोल परिणाम करून गेले होते. सुखदेव हे त्यांचे वर्गमित्र होते. घरच्या लोकांनी लग्न ठरवल्यावर त्यांनी घर सोडले. देशसेवेचे व्रत घेतल्यामुळे आपण लग्न करू शकत नाही असे वडिलांना कळवून त्यांनी त्यांची क्षमा मागितली. कानपूरला आल्यावर 'बलवंतसिंग' या नावाने त्यांनी अनेक लेख लिहिले. अनेक धाडसी सत्कार्यात ते सक्रिय होते. लाला लजपत राय यांचा पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाला. त्यांना मारणाऱ्या स्कॉटचा बदला घेत असताना साँडर्स तावडीत सापडल्याने साँडर्सला उडविण्यात आले. या प्रकरणात सर्वजण फरारी झाले. क्रांतिकारकांचे म्हणणे काय आहे हे जाहीररीत्या सर्वांना समजावे यासाठी त्यांनी एक योजना आखली. 'पब्लिक सेफ्टी' बिलाविरूद्ध देशभर संताप व्यक्त होत होता. या बिलावर सेंट्रल असेंबलीत चर्चा चालू असताना बटुकेश्वर दत्त आणि भगत सिंह यांनी असेंबलीत बाँब फेकून गोंधळ उडवून दिला. स्वतःहून अटक करून घेतली. कोर्टात आपली बाजू प्रभावीपणे मांडली. कोर्टाने भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशीची शिक्षा फर्मावली. २३ मार्च १९३१ ला 'इन्कलाब झिंदाबाद' च्या घोषणा देत ते तिघेही हसत हसत फासावर गेले.
भगतसिंग यांचे दुसरे सहकारी शिवराम हरि राजगुरू यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील खेड (सध्या राजगुरूनगर) येथे १९०८ साली झाला. जालियनवाला बाग हत्याकांडाचे पडसाद त्यांच्या मनावर ही चांगलेच उमटले होते. अनेक पराक्रम करून त्यांनी क्रांतिकारकांच्या मनात मानाचे स्थान मिळवले होते. लाला लजपतरायांच्या हत्येचा सूड म्हणून त्यांनी साधलेल्या अचूक नेमबाजीमूळे साँडर्स वध घडवून आणलेला होता. पुढे फरारी असताना त्यांना फितुरीमुळे अटक झाली. लाहोर मध्ये झालेल्या खटल्यात त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. भगतसिंग यांचे तिसरे सहकारी सुखदेव थापर यांचा जन्म दि.१५ मार्च १९०७ रोजी लायलपूर येथे झाला. भगतसिंग यांनी असेंम्बलीमध्ये बाँब टाकल्यानंतर सुरू झालेल्या छापासत्रात लाहोरमध्ये छापे टाकण्यात आले. तेव्हा काश्मिर बिल्डींगमध्ये पडलेल्या छाप्यात काही बाँब जप्त करण्यात आले होते. ते बाँब सुखदेव यांनी तयार केले होते, म्हणून त्यांनाही अटक करण्यात आली. लाहोर कटाच्या पहिल्या खटल्यात १६ आरोपींचा नेता म्हणूनच सुखदेव यांची नोंद करण्यात आली. नवे सदस्य गोळा करून त्यांना क्रांतिदलात समाविष्ट करून त्यांच्या लायकीप्रमाणे काम देण्यात सुखदेव तरबेज होते. लाहोर केसमध्ये त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.
नरवीरांनी रक्त पेरिले, खिंडीत त्या काळा....!
म्हणोनी भारतीय स्वातंत्र्याचा, थोर वृक्ष झाला...!!
भारत देश हा एक प्राचीन देश असून या देशावर परकिय शत्रूंनी मोठी आक्रमणे करून येथील निसर्ग संपदा, अमूल्य संपत्ती लुटली आहे. आपआपसातील मतभेद, द्वेष, कूटनीती, फुटीरवृत्ती, अज्ञान, अंधश्रद्धा, आक्रमकधर्मवाद, समाजातील विषमता वंशवाद, प्रांतवाद, भाषावाद, आणि अतिस्वार्थ, देशाविषयी प्रेम नसणे, संरक्षण यंत्रणेकडे दूर्लक्ष, कमी दर्जाचे सैनिकी प्रशिक्षण, सैनिकांची उदासीनता, अयोग्य व कुचकामी युद्धनिती, प्रगतशस्त्राचा अभाव, राजेशाही, कर्तबगार व शुरविर राजाचा अभाव, कुटनितीचा अभाव, शस्त्रप्रबळ व बुद्धस्थितीचा सखोल आढावा व सुसज्ज तयारी, योग्य निर्णय क्षमता यामुळे परकिय शत्रूंनी भारतीयांच्या अकार्यक्षमतेचा पूरेपूर फायदा घेवून भारतातील निष्क्रीय, विलासी, अतिस्वार्थी, राजांना पराभूत केले. मुख्यत्वे मुघल राजवटीतील राजांनी भारतावर सत्ता प्रस्थापित केली. कालांतराने मुघलांचा शेवटचा बादशहा बाहदूर शहा जफर याला इंग्रजांनी कैद करून दिल्ली काबीज केली. ज्याचे शस्त्र प्रबळ तसेच युद्धनिती, लढण्याची क्षमता व आत्मविश्वास, सैनिकी क्षमता, शस्त्राताचा मोठा साठा, कुशल सैनिक, तत्कालीन लालची भारतीय राजाची सत्तेसाठी फितूरी याचा वापर करून इंग्रजांनी भारतावर सत्ता प्रस्थापित केली.
इंग्रजीसत्ता उलथून टाकण्याच्या उद्देशाने भगतसिंग राजगुरू व सुखदेव यांच्यासारख्या हजारो क्रांतीकारकांनी ब्रिटिशांविरुद्ध मोठा लढा दिला. ब्रिटीशांमध्ये एक प्रकारची दशहत निर्माण करण्याचे कार्य या क्रांतीकारकांनी केले. त्यासाठी काही क्रांतिकारकांना प्राणाची आहूती ही द्यावी लागली. त्यांनी अत्यंत निर्भिडपणे त्यागी वृत्तीने, शौर्याने इंग्रजांशी झुंज दिली. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांच्या हौतात्म्य पाहून प्रांत, जाती, धर्म, वंश यांचा विचार न करता हजारो लाखो युवक राष्ट्रासाठी एकत्र आले आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करण्यासाठी पुढे आले. अर्थात राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेम याची मशाल पेटवून आणि निर्भीड विचारातून क्रांती निर्माण करण्याचं मोठं काम भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांनी केले आहे. या त्यांच्या बलिदानाचा सकारात्मक विचार होवून अनेक भारतीय युवक या क्रांतीकारी चळवळीत सहभागी झाले. छातीवर बंदूकीच्या गोळ्या झेलून इंग्रजांना भारतीयांनी आपले शूरत्व दाखवून दिले. राष्ट्रासाठी प्राण हातावर घेवून स्वातंत्र्य चळवळीत अग्रभागी असणाऱ्या युवकांनी ब्रिटीशांना सळो की पळो करून सोडले. देशासाठी बलिदान देणारे कोवळे तरुण युवक पाहून ब्रिटीशांनाही नवल वाटले. त्यातूनच अनेक स्वातंत्र्यसैनिक स्वत:च्या घरावर तुळशीपत्रक ठेवून स्वातंत्र्याच्या होमकुंंडात आहुती द्यायला पुढे सरसावले आणि अत्यंत अवघड व अशक्य असणारे स्वातंत्र्य अतिशय पराकाष्ठेने मिळाले.
हजारो क्रांतिकारकांच्या बलिदानातून आणि त्यागातून मिळालेले हे भारतीय स्वातंत्र्य टिकणे आणि टिकवणे महत्त्वाचे आहे. त्याकरिता नव्या पिढीला राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा आणि राष्ट्रप्रेम काय असते, हे पुन्हा एकदा सांगण्याची गरज निर्माण झाली आहे, असे सध्याचे वर्तमानकालीन तरुण तरुणींकडून होणारे भोगवादी संस्कृतीचे प्रदर्शन पाहिले की, प्रकर्षाने जाणवते. या करिता समाजातील सर्वंच घटकांनी अशा क्रांतीकारी हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण होणेकरिता प्रबोधन कार्यक्रम हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे. शासनाने सुध्दा अशा विधायक उपक्रमांना मदत करणे अगत्याचे आहे. स्वतः शासनाने ही त्यादृष्टीने सकारात्मक पावले उचलून राष्ट्रभक्ती वाढविण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करून क्रांतीकारकांच्या त्यागाची व शौर्याची माहिती नव्या पिढीला करून दिली पाहिजे, असे वाटते.
- सुनीलकुमार सरनाईक
भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२
(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच दर्पण पत्रकार पुरस्कारने सन्मानित असून सा. करवीर काशी चे संपादक आहेत.)
Post a Comment