Halloween Costume ideas 2015

अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम धोक्यात

साडेआठ लाख हेक्टर्सवरील पिके धोक्यात : ओला दुष्काळ जाहीर करा


अतिवृष्टी आणि महिनाभराच्या संततधार पावसाने नदी, नाले, तलाव तुडूंब भरून वाहत आहेत. यामुळे मराठवाड्यासह विदर्भातील साडे आठ लाख हे्नटर्स पिके पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.   पावसाची संततधार थांबत नसल्याने शेतीसह मुलभूत सुविधांचेही मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्ली वारीतच मग्न असल्याने विकासाचे निर्णय मागे पडले आहेत. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांसह शेतकऱ्यांतून होत आहे. 

राज्याच्या कृषी विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार विदर्भ आणि मराठवाड्यात 857377 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर 3 हजार 793 हेक्टर शेतजमीन पुरामुळे खरडून गेली आहे. या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पंचनामे झाल्यानंतर नुकसानीच्या आकडेवारीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.  मुसळधार पावसामुळे खरिपात पेरणी केलेली पिके 15 दिवसांपासून पाण्याखालीच आहेत. नदी, ओढे, नदीकाठावरील शेतीजमीन पुराच्या पाण्यात खरडून गेली आहे. आपण पेरणी केलेले शेत हेच का? असा प्रश्न पडावा,अशी शेतजमिनींची अवस्था झाली आहे.  मोठा खर्च करूनही खरडून गेलेल्या जमिनी पुढील दोन-तीन वर्षे शेती योग्य होणार नाहीत. रस्ते, पुल वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे. अशा परिस्थितीमुळे शेतकरी, नागरिक चिंतातूर आहेत. लवकरात लवकर पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळावी, अशी मागणी जमाअते इस्लामी हिंदचे प्रदेशाध्यक्ष रिजवानुर्रहेमान खान यांनी शासनाकडे केली आहे. 

राजकारणाची ढगफुटी

जसे ढगफुटी होऊन  शेतीचे अतोनात नुकसान होते. तसेच राज्यात कटकारस्थानाचे राजकारण करीत ऐन पावसाळ्याच्या तोंडावर भाजपाने राजकीय ढगफुटी घडवून आणली आणि महाविकास आघाडीला सत्तेतून पायउतार करीत सत्ता स्थापन केली. यामुळे महाराष्ट्राचे नुकसान तर झालेच शिवाय, शिवसेनेसारख्या निष्ठावान पक्षाला भाजपाने भगदाड पाडले. एवढ्यावरच भाजपाचे राजकारण थांबले नसून महाविकास आघाडीने विकासाचे घेतलेले निर्णय सत्ता येताच रद्द करीत खुनशीपणाचे दर्शन घडवून दिले. सत्ता स्थापनेला महिना उलटला तरी भाजपाने मनावर दगड ठेवून जसे मुख्यमंत्री निवडले तसा मंत्रिमंडळाचा विस्तारही करणे गरजेचे होते. अशात पावसामुळे झोडपत असलेल्या महाराष्ट्राला भाजपा विकासापासून कोसो दूर घेवून जात आहे की काय, असे वाटत आहे? 

ओला दुष्काळ जाहीर करा : अजीत पवार

‘‘तुमच्याकडे बहुमत आहे, असे तुमचे मत आहे, तर मग मंत्रिमंडळाचा विस्तार का केला जात नाही. विधिमंडळाचे अधिवेशन का घेतले जात नाही, अशी प्रश्नांची सरबत्ती करीत विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला सोमवारी टीकेचे लक्ष्य केले. अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात आहे, त्यांना भरीव मदत करून दिलासा देण्यासाठी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी करीत पवार म्हणाले, नैसर्गिक आपत्तीच्या काळात पालकमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची असते. पालकमंत्री बैठका घेऊन सरकारी यंत्रणा कार्यरत करतात, वेळोवळी परिस्थितीचा अढावा घेऊन आपत्तीग्रस्त शेतकरी, सामान्य जनतेला दिलासा देण्याचे काम करतात. परंतु मंत्रिमंडळ विस्तार नाही, त्यामुळे पालकमंत्री नाहीत, सरकारकडून मदत नसल्याने जनता हवालदिल आहे. शिंदे सरकारने आता तातडीने मंत्रिमंडळ विस्तार करावा, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा  अशा मागण्या त्यांनी केल्या. तसे पत्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठविले आहे.


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget