Halloween Costume ideas 2015

स्वातंत्र्य संग्रामातील मुस्लिमांचा महत्त्वपूर्ण सहभाग


जेव्हा हिंदू आणि मुस्लिम दोन्हींना दिल्ली बाहेर काढण्यात आले त्यानंतर 1858 साली त्यांच्यातील केवळ हिंदू नागरिकांना दिल्लीत परत येण्याची अनुमती दिली गेली. बाकीच्या मुस्लिम नागरिकांना पुढे दोन वर्ष दिल्लीत परत येण्याची परवानगी नाकारली गेली. त्यांची सर्व मालमत्ता आणि व्यवहार सरकारने ताब्यात घेतले होते. कारण इंग्रजांनी 1857 च्या उठावासाठी केवळ मुस्लिमांनाच जबाबदार धरले होते. 

भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील मुस्लिमांचे योगदान भले मोठे आहे. खरे तर त्यांनी आपल्या शक्तीपलीकडे जाऊन या संग्रामात भाग घेतला होता. हा संग्राम स्वतः भारतातील शेवटचा मुगलसम्राट बहादुरशाह जफर यांच्या नेतृत्वात सुरू झाला आणि यामध्ये तत्कालीन नवाब, जमीनदार, जहागीरदार, श्रमिक मंडळी, उलेमा आणि त्याच बरोबर सामान्य नागरिकांचा सिंहाचा वाटा होता. त्या सर्वांनी या महान उद्दिष्टासाठी स्वतःला वाहून घेतले होते. त्यांनी भयंंकर आव्हानांना तोंड दिले आणि सर्वशक्तीनिशी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. कोणत्याही आव्हानाला, अत्याचाराला ते घाबरले नाहीत, ताकदीने उभं राहून स्वातंत्र्यासाठी सर्व काही अर्पण करण्यात मागे-पुढे पाहिले नाही. 

1857 साली ज्या इंग्रजांविरूद्ध उठाव केला होता हजारोंच्या संख्येने उलेमांची सर्रास कत्तल केली गेली. दिल्लीतून सर्वच्या सर्व मुस्लिमांना बाहेर काढले गेले आणि त्यांना परत दिल्लीत येण्यास मज्जाव केला गेला होता. त्यांना आपल्या घरादारांना परत येऊ दिले नाही की त्यांची मालमत्ता परत देण्यात आल्या नाही. मुस्लिमांच्या स्वातंत्र्य संग्रामातील या योगदानाची दखल घेतली गेली नाही. एवढेच नव्हे तर 1857 इ.स.पासून 1947 पर्यंतच्या स्वातंत्र्य लढ्यात मुस्लिमांच्या सहभागाचा इतिहास संपादित करण्यात आला नाही. 

वास्तविकता अशी की, 1857 च्या इंग्रजांविरूद्धचा उठाव असो की नंतर सुरू झालेली स्वातंत्र्याची चळवळ यात मुस्लिमांच्या योगदानाची प्रकर्षाने कुठे नोंद झालेली दिसत नाही. एवढेच नव्हे तर इंग्रज इतिहासकार आणि सत्ताधारींनी मुस्लिमांना गद्दार म्हटले आणि त्यांनीच इंग्रजांविरूद्ध उठावाचे नेतृत्व केले अशी नोंद केलेली आहे. हे मुस्लिम उलेमा आणि सामान्य नागरिकांनी ब्रिटिशाविरूद्ध केलेले बंड होते ज्याचे उद्दिष्ट गमावलेल्या सत्तेची पुनरप्राप्ती होती. 

1857 च्या उठावा अगोदरच मुस्लिम इंग्रजांविरूद्ध लढा देतील असा  अंदाज लावलेला होता. इंग्रजाविरूद्ध उठावाची सुरूवात झाली त्यावेळी हजारोंच्या संख्येने मुस्लिम लढवय्ये, जिथे-तिथे लढ्याचे केंद्र बनले होते. दिल्ली, लखनौ, बरेली, आग्रा आणि थाना भवन या ठिकाणी जमले होते. तसेच कानपूर आणि शहाजहानपुरी येथेही ते जमले होते आणि शेवटपर्यंत इंग्रजांशी संघर्ष करत राहिले. जेव्हा या लढवय्यांकडे कोणतीच मदत पोचत नव्हती ते एकाकी पडले होते. कोणतीच साधनसामुग्री त्यांना इतरत्र ठिकाणावरून पोहोचत नव्हती अशा कठीण प्रसंगी देखील त्यांनी मैदान सोडले नाही ते शेवटपर्यंत लढत राहिले. असंख्य जीवांचे बलिदान दिले आणि शेवटी जिंकले. खरे पाहता 1857 च्या उठावा अगोदरच मुस्लिम सुफी संत आणि उलेमा यांनी इंग्रजांविरूद्ध संघर्षाची सुरूवात केली होती. मौलवी अहमदुल्ला शाह यांनी स्वातंत्र्याविषयी प्रचाराची सुरूवात केली होती. फैजाबाद (अयोध्या) येथे ते नागरिकांना संबोधित करतांना त्यांना अटक करण्यात आली आणि जेव्हा या संग्रामाला प्रत्यक्ष सुरूवात झाली तेव्हा त्यांच्या समर्थकांनी तुरूंगावर हल्ला करून त्यांची सुटका करून घेतली. मौलवी लियाकत अली खान यांनी अलाहाबाद (सध्याचे प्रयागराज) वर चढाई करून ते शहर जिंकले आणि स्वतः बहादुरशाह जफर यांनी त्यांची अलाहाबाद (प्रयागराज) चे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली. सरफराज अली यांना उत्तर भारतातील लोकांचे मोठे समर्थन प्राप्त होते. त्यांनी बरख्त खान यांना दिल्लीत जाऊन इंग्रजांच्या सैन्याविरूद्ध युद्ध छेडण्यासाठी प्रवृत्त केले होते. म्हणजे फक्त मुस्लिम उलेमा मंडळीच नव्हे तर नवाब, जहागीरदार, जमीनदार आणि सामान्य मुस्लिमांनी सर्वशक्तीनिशी इंग्रज सैन्यांशी लढा दिला आणि राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी अमाप बलिदान दिले. नवाबांना या संग्रामात भाग घेण्याची भारी किंमत मोजावी लागली. 

नवाब तफज्जुल हुसैन फर्रूखाबादी यांची सर्वची सर्व मालमत्ता जब्त करून त्यांना देशाबाहेर अरबस्थानात पाठवले गेले. अत्यंत दारिद्रयाच्या अवस्थेत ते तिथेच मरण पावले. जहजीराच्या नवाब अब्दुर्रहमान खान यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली. दिल्लीत त्यांना डिसेंबर 23, 1857 रोजी फासावर लटकावले गेले. उम्बापाणीचे नवाब आणि जहागीरदार मुहम्मदखान स्वतंत्रता सेनानीचे नेते होते. त्यांना 1857 साली त्यांच्या साथीदारांसहित पकडले गेले आणि राहतबाग किल्ल्याजवळ या सर्वांना फाशी देण्यात आली. तसेच फर्रखनगरचे नवाब अहमद अली खान यांना सुद्धा मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली. 

1857 च्या उठावासाठी इंग्रजांनी मुस्लिमांनाच केवळ जबाबदार धरून त्यांचा बदला घेण्यासाठी हजारो मुस्लिम उलेमांना फासावर लटकवले गेले आणि जेव्हा इंग्रजांचे फाशी देणारे थकून गेले तेव्हा बाकीच्या हजारो उलेमांना अज्ञातस्थळी घेऊन गेले तिथे त्यांच्यावर गोळीबार करून सर्वांची हत्या केली गेली. बाकीर मुहम्मद सारख्या काही इतर उलेमांना तोफेला बांधून त्यांना उडवून दिले गेले. 

जेव्हा ब्रिटिश सैन्यांने दिल्लीवर पुन्हा ताबा मिळविला तेव्हा दिल्लीला सुरक्षित करण्यासाठी तिथल्या सर्वच्या सर्व मुस्लिम नागरिकांना दिल्लीतून हद्दपार करण्यात आले. ज्या शहराला त्याच्या पुर्वजांनी वसविले त्याचा विकास केला त्याच दिल्ली शहरातून सर्वच्या सर्व मुस्लिमांना बाहेर हाकलून दिले गेले. अपवाद फक्त  दोन व्यक्तीचा होता ज्यांना दिल्लीत राहू दिले त्यातले एक कवी असदुल्लाहखान गालीब आणि महाराजा आफ पतियाला यांचा होता. महाराजांनी इंग्रजांचा विरोध केला नव्हता. मोगल दरबारातील एकमेव  व्यक्ती कवी गालिब दिल्लीत राहू शकलेे. बाकीच्या सर्व मुस्लिमांना दिल्लीतून हाकलून दिले आणि त्याच्या सर्व मालमत्तांची नासधूस करण्यात आली.जेव्हा हिंदू आणि मुस्लिम दोन्हींना दिल्ली बाहेर काढण्यात आले. त्यानंतर 1858 साली त्यांच्यातील केवळ हिंदू नागरिकांना दिल्लीत परत येण्याची अनुमती दिली गेली. बाकीच्या मुस्लिम नागरिकांना पुढे दोन वर्ष दिल्लीत परत येण्याची परवानगी नाकारली गेली. त्यांची सर्व मालमत्ता आणि व्यवहार सरकारने ताब्यात घेतले होते कारण इंग्रजांनी 1857 च्या उठावासाठी केवळ मुस्लिमांनाच जबाबदार धरले होते. दिल्लीच्या जामा मशिदीचे सैन्य छावणीत रूपांतर केले गेले. बऱ्याच वर्षांनी प्रदीर्घ काळ आणि मुफ्ती सद्रुद्दीन आजुर्दा यांच्या प्रयत्नानंतर जामा मशीद मुस्लिमांना परत मिळाली. फतेहपुरी मस्जिद एका हिंदू नागरिकाला इंग्रजांनी विकली. बऱ्याच काळाने आणि भलीमोठी किंमत दिल्यानंतर ती मस्जिद परत मिळाली. 

दिल्लीमध्ये कूच-ए-चेलान नावाचे एक सांस्कृतीक, साहित्यिक केंद्र होते. त्या वस्तीतील 1400 नागरिकांची कत्तल करण्यात आली. यात प्रख्यात विचारवंत इमाम बख्श सहबाई यांचा समावेश होता. त्यांच्या मुलांची देखील हत्या केली गेली. एका ब्रिटिश सैन्य अधिकारीने असे म्हटले होते की तिथल्या सर्व नागरिकांना ठार मारण्याचे आदेश देण्यात आले होते. विलियम डालरिम्पले आपल्या पुस्तकात लिहितो की, ‘‘दिल्लीत जे नागरिक रक्तपातापासून बचावले होते त्यांना दिल्ली बाहेर मैदानात पळवून लावण्यात आले. त्यांच्या अन्न पाण्याची कोणतीच व्यवस्था केलेली नव्हती त्यांना वाऱ्यावर सोडून देण्यात आले. शाही कुटुंबात जरी शांततेत सरेंडर केले होते तरी देखील बादशहाच्या सोळा मुलांपैकी त्यांना पकडून फाशी दिली गेली. त्यांनी आपले शस्त्र टाकून दिल्यानंतर देखील त्यांना गोळ्याघालून मारण्यात आले. त्या आधी त्यांना विवस्त्र केले गेले होते. पहिल्या 24 तासात ती तिमूर आणि तारतारी घराण्याचे सर्व प्रमुख व्यक्तींना ठार केले. कॅप्टन विलियम हाडसन त्या घटनांच्या दुसऱ्या दिवशी आपल्या बहिणीला लिहिलेल्या पत्रात असे म्हणतो की, ‘‘मी जरी अत्याचारी नसलो तरी शपथेवर सांगतो की मला या जमीनीवरून या जुलमी लोकांना संपवण्यात आनंदच मिळाला आहे. ‘‘मुस्लिमांनी 1857 मधील स्वतंत्रता संघर्षाचे नेतृत्व केले एवढेच नाही तर त्यांनी भारतातून इंग्रज साम्राज्याचा पाडाव करण्यासाठी मौलाना मुहम्मद हसन आणि मौलाना उबैदुल्लाह सिंधी रेशमी रूमाल नावाची चळवळ उभी केली होती. त्यांना अटक करून प्रदीर्घकाळ तुरूंगात डांबून ठेवले गेले. काँग्रेसच्या वसाहतवादाविरोधी चळवळीचे देखील मुस्लिम प्रमुख स्तंभ होते. जस्टिस बद्रुद्दीन तय्यबजी पासून मौलाना अबुल कलाम आझाद यांच्यापर्यंत अनेक मुस्लिम नेत्यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व केले आहे. महात्मा गांधी बरोबरच सरदार पटेल, पंडित नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही स्वातंत्र्य संग्रामाचे नेतृत्व केले आहे. मुहम्मद अली जौहर, शौकत अली जौहर, मौलाना आझाद, डॉ. मुख्तार अन्सारी, मौलाना महेमूद हसन आणि आणि मुस्लिमांमधील बऱ्याच प्रमुख व्यक्तींनीही यात भाग घेतला. त्यात खान अब्दुल गफ्फारखान यांचाही समावेश होता. ह्या सर्वांनी आपल्या परीने मोठ्या प्रमाणात बलिदान देखील दिले आहेत. स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास बराच विस्तृत आणि प्रदीर्घ आहे. यातला काही भाग या लेखात आलेला आहे. 

(सय्यर उबैदुर्रहमान हे बायोग्राफिकल एन्साय्नलोपेडिया ऑफ इंडियन मुस्लिम फ्रिडम फायटर्स या ग्रंथाचे लेखक आहेत.) 

- अनुवाद : सय्यद इफ्तेखार अहमद


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget