Halloween Costume ideas 2015

भारतीय स्वातंत्र्य आणि मुसलमान


जिथे लोकशाही आहे अशा भारतीय गणराज्याचे आपण नागरिक आहोत.  तसे पाहिले तर लोकशाही या शब्दात स्वातंत्र्याची संकल्पना दडलेली असते. असे हे स्वातंत्र्य गेल्या 75 वर्षापासून आपण उपभोगीत आहोत. परंतु 75 वर्षानंतर आपण याचा विचार करणार आहोत का की काय खरेच ही लोकशाही आहे?

भारतीय स्वातंत्र्याच्या हीरक महोत्सवी वर्षात राष्ट्रभक्तीला उधाण आलेले दिसते. हर घर तिरंगा अभियानाने देशातील लाल किल्ल्यापासून खेड्यापाड्यातील घराघरापर्यंत तिरंगा फडकवण्याचे काम सरकारने हाती घेतले आहे. घरोघरी तिरंगा फडकवल्याने राष्ट्रप्रेम, देशभक्ती जागृत होत असली तरी हे स्वातंत्र्य कमावण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या स्वातंत्र्यवीरांची आठवण करणे उचित ठरेल. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी देशभर भाग घेतला. सर्व जाती-धर्माच्या स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आपले योगदान दिले.

गेल्या 75 वर्षात सुई पासून अणुऊर्जेपर्यंत आपण प्रगती केलेली आहे. ज्ञान आणि आधुनिक विज्ञान या क्षेत्रात आपली अभूतपूर्व प्रगती झाली आहे. पण त्याचप्रमाणे औद्योगिक क्षेत्र, शिक्षण, दळणवळण, आरोग्य, संरक्षण, दूरसंचार,  संशोधन अशा असंख्य क्षेत्रातील आपली कामगिरी लक्षणीय आहे. हा सारा विकास 1947 पासून आज पर्यंत झालेली आहे. या प्रगतीसाठी प्रामुख्याने भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दूरदृष्टीला सलाम केला पाहिजे. 

भारतीय स्वातंत्र्यात मुस्लिम चळवळींचे योगदान

स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्य सेनानी चा उल्लेख करताना मुस्लिम समाजातील केवळ अश्फाकुल्लाह खान यांचे नाव घेतले जाते . परंतु ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी असंख्य मुस्लिमांनी आपले योगदान दिले.  आपले प्राण अर्पण केले. परंतु 1498 पासून 1947 पर्यंत अनेक मुस्लिमांनी स्वातंत्र्यलढ्यात आपले प्राण अर्पण केले. 1772 मध्ये शाह अब्दुल अजीज यांनी इंग्रजांच्या विरोधात जिहादचा फतवा दिला होता. 

हैदर अली आणि टिपू सुलतान

 या पिता पुत्रांनी ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या कटकारस्थानास हेरले होते. ब्रिटिशांच्या विरोध करण्यास त्यांनी सुरुवात केली. टिपू सुलतानने आपल्या बुद्धी आणि शौर्याचा उपयोग करून इंग्रजांना गुडघे टेकण्यास भाग पाडले होते. 

अखेरचे मुगल सम्राट बहादुर शाह जफर

24 ऑक्टोबर 1775 मध्ये जन्मलेले बहादुर शाह जफर 82 वर्षांचे होते. त्यांनी ब्रिटिशांशी लढणाऱ्या सैनिकांचे नेतृत्व स्वीकारले. ते अकबर शाह (द्वितीय) आणि लाल बाई यांचे अपत्य होते. ब्रिटिश अधिकारी विल्यम हडसनने  कट रचून त्यांना अटक केली. ब्रिटिशांनी बाहदुर शाह जफर यांच्यावर राजद्रोह आणि खुनाचे आरोप लावले. 40 दिवस त्यांच्यावर खटला चालवला आणि त्यानंतर त्यांना रंगूनला हद्दपार करण्यात आले. त्यांच्या हद्दपारीचे कारण म्हणजे इतिहासकारांच्या मते जर त्यांना भारतात ठेवले गेले असते तर ते बंडाचे केंद्र बनू शकले असते. बहादूर शाह जफर यांची ब्रिटिशांना भीती वाटत होती. 07 नोव्हेंबर 1862 रोजी रंगूनच्या तुरुंगात त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांना रंगून मधील कब्रस्तानात दफन करण्यात आले. ब्रिटिशांना भीती होती की बहादुर शहा यांच्या मृत्यूची माहिती जर भारतभर पसरली तर पुन्हा एकदा बंड घडू शकते . त्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्काराचे सर्व विधी गुप्त पद्धतीने पार पडले. 

गदर आंदोलन

गदर या शब्दाचा अर्थ विद्रोह असा होतो. या आंदोलनाचा मुख्य उद्देश भारतामध्ये क्रांती घडवून इंग्रजांच्या नियंत्रणाखालील असलेल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे असे होते. गदर पार्टीचे मुख्यालय सन फ्रान्सिसको येथे होते. भोपाळचे बरकतुल्लाह गदर पार्टीच्या संस्थापकांपैकी एक होते. गदर पार्टीच्या सय्यद शाह रहमत यांनी फ्रान्समध्ये भूमिगत क्रांतिकारीच्या रूपाने कार्य केले आणि 1915 मध्ये गदर अर्थात बंड किंवा विद्रोह घडवून आणला जो अयशस्वी झाला आणि त्यामुळे या बंडात त्यांची भूमिका लक्षात घेऊन त्यांना फाशीची शिक्षा दिली गेली. उत्तर प्रदेशातील फैजाबाद येथील अली अहमद सिद्दिकी यांनी जोनपुरच्या सय्यद मुस्तफा हुसेन यांच्या मदतीने मलाया आणि बर्मा येथे भारतातील बंडाची योजना बनवली. त्यांना 1917 मध्ये फाशीवर चढवण्यात आले.

खुदाई खिदमतगार चळवळ

’लाल कुर्ती आंदोलन’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या चळवळीची सुरुवात भारताच्या पश्चिम उत्तर सीमांत प्रांतातील खान अब्दुल गफार खान यांच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने समर्थित केलेल्या खुदाई खिदमतगार या नावाने चालवली. हे एक ऐतिहासिक आंदोलन होते.

मौलाना हुसेन अहमद मदनी 

मौलांनानी फतवा दिला होता की ब्रिटिश फौजेमध्ये भरती होणे हराम आहे. ब्रिटीशांनी त्यांच्या विरुद्ध खटला दाखल केला. सुनावणीच्या दरम्यान ब्रिटिश जजने विचारले- ’ ब्रिटिश फौजेत दाखल होणे हराम आहे असा तुम्ही फतवा दिला आहे काय? 

त्यावर मौलाना उत्तरले-  हो फतवा दिला आहे.. आणि हाच फत मी या न्यायालयातही देत आहे आणि या पुढेही आयुष्यभर मी असाच फतवा देत राहणार. यावर जजने विचारले -  मौलाना याचा परिणाम जाणता का? यासाठी तुम्हाला कठोर शिक्षा होईल.   जजला उत्तर देताना मौलाना म्हणाले -  फतवा देणे माझे काम आहे आणि शिक्षा सुनावणे तुझे काम.

मौलानांचे शब्द ऐकून जज साहेब क्रोधित झाले आणि म्हणाले - याची शिक्षा फाशी आहे.

हे ऐकताच मौलांनानी स्मित हास्य केले आणि आपल्या  झोळीतून एक पांढरे कापड बाहेर काढले आणि टेबलवर ठेवले. जजने विचारले हे काय आहे त्यावर ते उत्तरले -  हा माझा कफन आहे. हा फतवा आणि ही घटना लोकांना कळताच हजारो सैनिकांनी ब्रिटिश फौजेला रामराम ठोकला आणि स्वातंत्र्यलढ्यात हिरीरीने भाग घेतला.

अलिगड आंदोलन

सर सय्यद अहमद खान यांनी अलिगड मुस्लिम आंदोलनाचे नेतृत्व केले. त्यांनी नेहमी हिंदू मुस्लिम ऐक्याच्या विचाराचे समर्थन केले. 1884 साली पंजाब दौऱ्यावर असताना त्यांनी हिंदू मुस्लिम एकता यावर जोर देताना म्हटले होते की हिंदू आणि मुसलमानांनी एक मन एक प्राण व्हायला हवे आणि एकजुटीने कार्य केले पाहिजे. जर आम्ही संयुक्तपणे कार्य केले, लढलो तर एकमेकांसाठी फायदेशीर ठरू शकतो, आणि जर आपण एकमेकांच्या विरुद्ध झालो तर आपल्या प्रभावाचे पूर्णतः विनाश होईल. अन्य एका ठिकाणी बोलताना ते म्हणाले होते-   हिंदू आणि मुसलमान हे शब्द केवळ धार्मिक भेद व्यक्त करतात परंतु दोघेही एक राष्ट्र - हिंदुस्थानचे निवासी आहेत.

तेहरिक ए रेशमी रुमाल

रेशमी रुमाल आंदोलन: हे आंदोलन 1913 -1920 या काळात देवबंदी उलेमांनी चालवलेली चळवळ होती. ओटोमन साम्राज्य, अफगाणिस्तान, तुर्की , जर्मन इम्पेरियल यांच्या मदतीने ब्रिटिश  साम्राज्यापासून भारताला मुक्त करणे हा या चळवळीचा उद्देश होता. पंजाब प्रांतातील सीआयडी च्या मदतीने हा कट उघडकीस आला. रेशमी कापडात लपेटलेल्या  पत्रावरील संदेशाने हा कट उघडकीस आला. सीआयडी पंजाबने अफगाणिस्तान येथील देवबंदचे मौलाना उबेदुल्लाह  सिंधी यांनी महमूद हसन देवबंदी आणि इतर उलेमांना लिहिलेल्या जप्त केलेल्या पत्रातून त्यांचा उद्देश कळला आणि हे सारे प्रकरण उजेडात आले. ही सारी पत्रे रेशमी  कापडातून म्हणजेच रुमालातून पाठवली जात होती म्हणून या चळवळीस रेशमी रुमाल चळवळ असे संबोधण्यात आले.

अलीकडेच भारत सरकार द्वारे प्रकाशित केले ’ढहश चरीीूंशीी’ या तीन इंग्रजी भाषेतील खंडातून भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतले स्वातंत्र्यसेनानींची थोडक्यात माहिती दिलेली आहे. ही वर्गवारी करताना ए ते झेड अशी सूची तयार केली गेली आहे. यात हुतात्म्यांचे  केवळ नाव आणि पंधरा-वीस ओळीत त्या हुतात्मयाची माहिती दिली आहे. या अक्षराने सुरू होणाऱ्या नावांची यादी पाहिल्यास यात 70 ते 80 टक्के हुतात्म्यांची नावे मुस्लिमांची आहेत. तरीही आज देशांमध्ये मुस्लिमांच्या देशप्रेमावर प्रश्नचिन्ह उभा केला जातो. सातत्याने त्यांची निष्ठा सिद्ध करण्यास भाग पाडले जाते. आज देशातील मुस्लिम समुदाय  आपल्या स्वेच्छेने भारतात आहे. पाकिस्तानला स्थलांतरित व्हायचे हा पर्याय असताना देखील आजच्या मुसलमानांच्या पूर्वजांनी भारतातच राहण्याचा निर्णय घेतला आणि ते या देशात निष्ठेने राहीले. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी आपल्या परीने या देशाच्या जडणघडणीमध्ये आपला वाटा दिला आहे. या देशाला घडविण्यामध्ये त्यांनी इतरां इतकाच आपलाही घाम गाळला आहे.

सामाजिक सलोखा आणि सौहार्द    

आज आपण खूप वेगाने  प्रगतीपथाकडे कुच करीत आहोत. संपूर्ण विश्वाला कवेत घेऊन त्याचे नेतृत्व करण्याची स्वप्न आपण पाहत आहोत. नवनिर्मितीच्या, औद्योगिक क्रांतीच्या क्षेत्रात आपला झेंडा उंच ठेवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. समृद्धीची अनेक क्षेत्र पादाक्रांत करण्याचा आपला मानस आहे.  त्यासाठी सर्वांगीण विकास करण्याची गरज आहे. परंतु हे सारे करीत असताना काय आपला सामाजिक सलोखा आणि सौहार्द टिकून आहे? सामाजिक समतेच्या, बंधुतेच्या आणि एकतेच्या गोष्टींचा आपण डंका वाजवतो. पण ही गोष्ट खऱ्या अर्थाने अस्तित्वात आहे? इतर सगळ्या गोष्टीत आपण प्रगती करीत असताना आपली नैतिकता मात्र दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे. आपण मनाला येईल तसे वागत आहोत.   काय हे खरे नाही? आपल्या संपूर्ण आयुष्याला चंगळवादाने घेरून टाकले आहे. अवाजवी ईर्षा आणि त्यामुळे निर्माण झालेली स्पर्धा आणि त्यातून फोफावत जाणारा भौतिकवाद आपला समाज आत्मसात करू पाहत आहे.

विविधतेतील एकता, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही ही भारतीय स्वातंत्र्याचे स्तंभ आहेत. यातला एक जरी स्तंभ कोसळला तरी  भारतीय स्वातंत्र्यास इजा पोहोचू शकते.  आपल्या देशातील प्रत्येक प्रांताची वेगळी भाषा, वेगळी संस्कृती आहे. वेगळ्या वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने गेल्या अनेक शतकापासून एकत्र राहत आहेत. हे सगळे लोक एकमेकांच्या रिती रिवाजांचे ,चाली- प्रथांचे, संस्कृतीचे जतन करतात आणि एकमेकांच्या  अशा साऱ्या गोष्टींचा आदरही करतात.

लोकशाही

संपूर्ण विश्वातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपण मिरवितो. आपल्या देशामध्ये लोकशाही आहे असे आपण मानतो. खरे तर लोकशाही हे जगण्याचे एक सर्वोच्च मूल्य आहे. जिथे लोकशाही आहे अशा भारतीय गणराज्याचे आपण नागरिक आहोत.  तसे पाहिले तर लोकशाही या शब्दात स्वातंत्र्याची संकल्पना दडलेली असते. असे हे स्वातंत्र्य गेल्या 75 वर्षापासून आपण उपभोगीत आहोत. परंतु 75 वर्षानंतर आपण याचा विचार करणार आहोत का की काय खरेच ही लोकशाही आहे? आपल्याकडे     -(उर्वरित पान ६ वर)

कोणत्याही वर्षी कोणत्याही ठिकाणी मतदान 50 ते 60% च्या वर जात नाही. मग या  50 ते 60% टक्क्यांमध्ये जो जास्त मते मिळवतो तो जिंकतो. ढोबळ मानाने जर एखाद्यास एखाद्या मतदारसंघातून 30 ते 35% टक्के मते मिळत असल्यास तो त्या मतदार संघातून निवडून येऊ शकतो आणि असे निवडून आलेले आमदार किंवा खासदार बनून सत्ता स्थापन करतात. अनेक आमदार अनेक प्रांतामध्ये पैशाच्या आमिषाने किंवा इतर कुठल्याही दडपणाखाली पक्षांतर करतात आणि आपली निष्ठा बदलतात. ही मतदारांची फसवणूक नव्हे काय? अनेक निवडणुकीत फक्त 500 रुपये देऊन किंवा देशी दारूची बाटली देऊन किंवा मटन चिकनची पार्टी देऊन लोकांना मत देण्यासाठी उद्युक्त केले जाते. हे उघड गुपित आहे. तरीसुद्धा हे सारे थांबवण्यासाठी काय उपाययोजना केली जाते? ही खरोखरच सुदृढ लोकशाहीची लक्षणे आहेत काय? नुकतेच मध्यप्रदेश मध्ये अनेक महिला स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडून आल्या. परंतु या महिलांनी गोपनीयतेची शपथ न घेता त्यांच्या पतीने किंवा त्यांच्या पुरुष नातेवाईकांनी गोपनीयतेची शपथ घेतली; नव्हे ती दिली गेली.  काय हे सगळे लोकशाहीस धरून आहे? निदान 75 वर्षानंतर तरी या साऱ्या गोष्टींवर विचार करायला हवा असे मला वाटते. 

धर्मनिरपेक्षता

भारतीय लोकशाहीचे सौंदर्य धर्मनिरपेक्षतेत आहे. इतिहासात ज्या ज्या राष्ट्रांची निर्मिती  धर्माच्या आधारे बनली आहेत त्या राष्ट्रांचे भविष्य काय झाले हे सर्वश्रुत आहे . त्यामुळे भारताचे अस्तित्व टिकवण्यासाठी धर्मनिरपेक्षता अत्यंतिक जरुरी आहे. परंतु  गेल्या काही वर्षा पासून लोकशाहीला वेठीस धरण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे. सांप्रदायिकता आपल्या चरमसीमेस पोहोचली आहे. प्रत्येकजण जात, धर्म , पंथ , प्रांत, भाषा अशा विविध गटात विभागलेला आहे. कधी नव्हे एव्हढी अस्मिता विविध जाती धर्माच्या लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात रुजत चालली आहे. आपण आज एकमेकास अत्यंत संशयाच्या नजरेने पाहत आहोत. एकमेकाबद्दलचा विश्वास दिवसागणिक घटत चालला आहे. हे देशाच्या एकतेसाठी योग्य नाही.

ग़ज़ल 

तो म्हणाला ‘नाव माझे खान आहे’ 

ते म्हणाले ‘हीच सारी घाण आहे’

फक्त त्याची देशभक्ती वेठणीला 

अन् खुले त्यांना सदोदित रान आहे

वाघ झाला खूप म्हातारा तरीही 

क्षीण डरकाळीत उसना त्राण आहे

हे कशाचे राजकारण, स्वार्थ नुसता 

सर्वसामान्यास केवळ ताण आहे

जाणता राजाच गेला भेट घेण्या 

कोणती खेळी? कुणावर बाण आहे?

पुस्तके न वाचली, ना मानवी मन 

तोच म्हणतो मी खरा विद्वान आहे

नाव तव ’इक्बाल‘ अहमद खान मित्रा

धर्म आणिक देश त्याचा प्राण आहे.

- डॉ. इक्बाल मिन्ने

मो. नं.7040791137


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget