केंद्र सरकारकडून ईडी उपयोगाबद्दल सर्वच विरोधी पक्ष आकाशपाताळ एक करत आहेत, पण आता पश्चिम बंगालचे मंत्री पार्था चटर्जी यांच्याकडे सापडलेल्या म्हणजेच त्यांच्या जवळच्या कुणी अर्पिता मुखर्जीच्या घरी ५०० व २००० रुपयांच्या नोटांचा ढीग आणि तोही इकडे तिकडे विखुरलेला पाहून काय म्हणतात. ममता बॅनर्जी यांनी अनेकदा भाजपच्या केंद्र सरकारवर विरोधी पक्षांच्या नेत्यांमागे ईडी लावल्याबद्दल आपल्या भाषणातून कडाडून टीका केली होती. पार्था चटर्जीविषयी ते काय बोलणार? हे गृहस्थ मंत्रीच नव्हते तर तृणमूल काँग्रेस पक्षाचे महासचिवदेखील आहेत. त्यांनी शिक्षक भरती घोटाळ्यात कोट्यवधी रुपये जमविले याची माहिती ममता बॅनर्जींना नसणार का? महासचिवांबरोबरच राज्य सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका निभावत होते. शिक्षण खाते त्यांच्याकडे असताना त्यांनी शिक्षक भर्तीमध्ये घोटाळा करून करोडोंची लूट केली. पश्चिम बंगालच्या प्रत्येक नागरिकाला हे प्रकरण माहीत होते. अशात मुख्रमंत्री बॅनर्जी यांना आपल्या मंत्री आणि पक्षाचे महासचिवांची 'कामगिरी'बद्दल माहिती नव्हती का? नसणे शक्य नाही. असली तर त्यांनी वेळीच त्यांच्यावर कारवाई का केली नाही, तेव्हा त्यांना ईडीचा उपयोग-दुरुपयोग बोलण्याचा काही अधिकार नाही. साऱ्या जगाला माहीत आहे की ईडी फक्त विरोधी पक्षाच्या नेत्यांवर, मंत्र्यांवर कारवाई करत आहे. त्यांना संधी दिली कुणी ह्याच भ्रष्टाचारद्वारे अमाप संपत्ती गोळा करणाऱ्यांनी.
पार्था चटर्जी यांनी शिक्षक भर्तीद्वारे कोट्यवधी जमा केले, आधीच नोकऱ्या निघत नाहीत, निघाल्या तर मिळत नाहीत. अशात पैशांची मागणी करणाऱ्यांना या इच्छुक शिक्षकांनी कुठून आणि कशा कशा प्रकारे पैसे गोळा केले असतील. ज्यांच्याकडे काही दागिने असतील, ते विकले असतील, कुणी बाईक विकली असेल, ज्यांच्याकडे विकण्यासारखे काहीच नसेल त्यांनी सावकाराकडून कर्ज घेतले असेल. एवढे सगळे करून देखील त्यांच्या नावाच्या नोकऱ्या जास्त पैसे देणाऱ्यांना दिल्या गेल्या असतील तर त्यांचेच नव्हे तर त्यांच्या संसाराचे, आई-वडिलांचे काय झाले असेल? मुलाबाळांचे काय झाले असेल? सुदैवाने जर नोकरीपूर्वी लग्न झाले असेल तर आणि चटर्जींनी त्यांच्याकडून घेतलेल्या पैशाचा अर्पिताच्या घरी नोटांचा ढीग लावला, एवढेच नव्हे तर या मिळकतीतून त्यांनी २-३ आलिशान बंगले खरेदी केले, हे सांगायला नको. अशाच एका आलिशान बंगल्यात त्यांनी कुत्री पाळली. कशा कशा प्रकारे किती किती आपल्या राजकारणातून मिळणाऱ्या संधीचा दुरुपयोगास कोणती सीमा आहे?
ममता बॅनर्जी यांना या सर्वांची माहिती नव्हती असे म्हणायचे ते धाडस करू शकतील का? खरेच माहिती नसेल तर त्या मुख्यमंत्रीपदावर असण्याच्या लायकीच्या आहेत का? आणि हा प्रश्न अशा सर्वांना आहे जे ईडीबद्दल बोलतात, पण त्यांनी राजकारणाद्वारे अमाप संपत्ती कमविल्याबद्दल का बोलत नाहीत?
राजकारणात किती पैसा आहे हे सर्वांना माहीत आहे. जिथे पैसा तिथे दलाली आलीच. पण दलालांकडून चक्क मंत्रीपद, राज्यपाल, आणि राज्यसभेची खासदारकीही मिळवली जाते हे आजवर माहीत नव्हते. ही घटना महाराष्ट्र राज्याची. याच राज्यात गेल्या महिन्यात सत्तापालट झाले. ज्या आमदारांनी यात भाग घेतला शिवसेनेशी बंड केले, त्यांना अशाच दलालांकडून एकवटण्यात आले होती की काय, असा प्रश्न उपस्थित होतो. सगळ्यांना माहीत आहे की मंत्रीपद म्हणजे पुढच्या १०-१५ पिढ्यांना जगण्याची, ऐशआराम उपभोगण्याची संधीच असते. त्यासाठी १०० कोटींची गुंतवणूक काही जास्त वाटू नये. तसे मंत्री होण्याआधी विधानपरिषदेची आमदारकी मिळवावी लागते. इथपासूनच त्यांच्या खर्चाला सुरुवात होते. आणि एक राजकारणातच नव्हे तर शासन प्रशासनात उच्चपदाच्या नोकऱ्या मिळविण्यासाठी देखील दलाल असतातच. पण राजकारणात जेवढ्या संधी तितकेच धोके देखील आहेत. कमवून कमवून शेवटी ईडीच्या भीतीने बाकीचे आयुष्य घालवावे लागत आहे.
ज्या दलालांनी महाराष्ट्रात मंत्रीपद देऊ केले त्यांचे असे म्हणणे आहे की दिल्लीत त्यांचे उच्च लोकांशी संबंध आहेत. म्हणजे हा व्यवहार जुना आहे. बाजारात ज्या वस्तूची मागणी असेत तीच वस्तू व्यापारी विकायला आणतात. याचाच अर्थ असा की राजकीय बाजारात विकत घेणारे आणि विकणारे दोन्ही आहेत.
- सय्यद इफ्तेखार अहमद
संपादक,
मो.: ९८२०१२१२०७
Post a Comment